प्रतिसाद – ऑक्टोबर २०२४

प्रश्नोपनिषद : ऑक्टोबर २०२४

मंडळी, 

 आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. 

 या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी :

सध्या जग दोन युद्धांच्या गर्तेत सापडले आहे.  युक्रेन आणि गाझा येथे जे काही चालले आहे ते आपण हताशपणे पाहण्याशिवाय काही करू शकत नाही. नुकतीच वैशाली करमरकर यांची एक मुलाखत मी  ऐकली. त्या एक आंतरसांस्कृतिक विश्लेषक आहेत. त्यांनी त्यांच्या विवेचनात युद्धाच्या चार-पाच कोटी  सांगितल्या आहेत.  इंटरनेट संवादाचा वेध घेऊन तेथे शत्रूचे अस्तित्व गृहीत धरून यांत्रिक पद्धतीने  स्वयंचलित क्षेपणास्त्रांचा हल्ला ही त्यांतली सगळ्यात आधुनिक कोटी –  यातूनच युक्रेन आणि गाझा  येथे हॉस्पिटल किंवा शाळांवर हल्ले झाले असावेत. 

WAR :  How Conflict shaped us? हे मार्गरेट मॅकमिलन यांनी लिहिलेले पुस्तकदेखील नुकतेच वाचण्यात आले.  त्यात लेखिकेने युद्धाच्या अनेक पैलूंचा विचार केला आहे. आपल्या जगाचा इतिहास, वर्तमान व भविष्य हे युद्धांवरच अवलंबून आहे का काय हा प्रश्न हे पुस्तक वाचल्यानंतर मनात येतो. 

 या वेळेचा प्रश्न आहे,

 युद्धपिपासा हा मनुष्य स्वभावाचा एक अविभाज्य भाग आहे का?  

सुभाष आठले यांचा प्रतिसाद : 

इतिहास पाहता असे दिसून येईल की , चुकीच्या व्यक्तींना राष्ट्रप्रमुख म्हणून निवडल्यामुळे बहुतेक सर्व युद्धे झाली. पूर्वी राजे राज्य करायचे. ते राजे म्हणून जन्मायचे तरी किंवा युद्ध जिंकल्यामुळेच राजे व्हायचे. म्हणजे जनतेने निवडण्याचा प्रश्नच नव्हता. नशिबाने काही राजे चांगले राज्य करीत तर काही युद्धखोर असत.

  सध्या निवडणुकीने राष्ट्रप्रमुख निवडतात. हिटलर, मुसोलिनी, पुतिन, नेतान्याहू   हे सारे निवडून दिलेले नेते आहेत किंवा होते.  एखाद्या  राष्ट्रावर जर दीर्घकाळ अन्याय झाला असेल तर जनता युद्धखोर नेत्याला नक्कीच निवडून देईल; पण तसे नसेल तर चुकीच्या निवडणूक पद्धतीमुळे अयोग्य, गुन्हेगार प्रवृत्तीची माणसे निवडून येऊ शकतात. असे दिसते की मतांच्या प्रमाणात प्रतिनिधित्व (प्र प्र) देणाऱ्या निवडणूक पद्धतीमुळे जास्त चांगले नेते निवडले जातात.  सहसा एकाच पक्षाला बहुमत मिळत नाही.  आघाडीची सरकारे तयार होतात.  त्यामुळे युद्ध सुरू करणारे नेते सहसा सत्ता मिळवू शकत नाहीत. याला अपवाद जेथे धर्म राजकारणात शिरतो 

तेथे : उदा.  इस्राएल. इतिहासातील बहुतेक सर्व युद्धे धर्मामुळे झाली!  एकदा सेक्युलर झालेली राष्ट्रे  पुन्हा धार्मिक होऊ शकतात – उदा. इराण, तुर्कस्तान आणि कदाचित नजीकच्या भविष्यात भारत!  देशातील बहुसंख्य जनताच जर निधर्मी झाली, तरच राज्ययंत्रणा धर्माच्या प्रभावातून कायमची मुक्त होईल.

   तेव्हा  प्र प्र निवडणूक पद्धत वापरणारी लोकशाही आणि निधर्मी जनता हे माझे शांततेसाठी prescription आहे.  ही उपाययोजना इंग्लंड वगळता बाकी पश्चिम युरोपामध्ये अनुभवास येते.  जगातील बहुतेक सर्व देशांत निधर्मी लोकांचे प्रमाण वाढत आहे, ही आशादायक गोष्ट आहे. आपण सर्वांनी त्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करावा.

Leave a Reply