दिनांक २४ सप्टेंबर २०११ या ‘लोकसत्ता’ वर्तमानपत्राच्या पुरवणीमधील ‘ग्रंथविश्व’या सदरात वरील शीर्षक असलेल्या प्रशांत दीक्षित लिखित लेखात ‘द इसेन्शियल सुधीर कक्कर’ या पुस्तकाचे परीक्षण आले होते. ते परीक्षण वाचल्यावर हे पुस्तक वाचले पाहिजे असे वाटल्यावरून मी ते परीक्षण कापून ठेवले. या परीक्षणाविषयी मी आपल्याला सांगणार आहेच परंतु आज हे परीक्षण परत वाचल्यावर माझ्या मनात काय विचार आले तेही आपल्या पुढे मांडणार आहे. मी हे परीक्षण कापून ठेवले तरी मी हे पुस्तक मिळवून वाचू शकलो नाही. या परीक्षणात पुस्तकातील विषयांचा गोषवारा दिला आहे. तो गोषवाराच इतका विचार प्रवर्तक आहे की त्यावरून पुस्तकाच्या दर्जाची कल्पना येईल.
श्री. सुधीर कक्कर यांनी अभियांत्रिकीची पदवी घेतली नंतर त्यांनी व्यवस्थापन शास्त्राचा अभ्यास करून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. हा अभ्यास चालू असतानाच त्यांना मानसशास्त्रात रुची निर्माण झाली म्हणून त्यांनी फ्रॅंकफर्ट येथील सिग्मंड फ्राईड इंस्टिट्यूटमध्ये मनोविश्लेषण शास्त्राचा अभ्यास केला. तेव्हापासून ते याच विषयात अधिक संशोधन करू लागले. संस्कृतीच्या अंगाने मनोविश्लेषण करण्यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. त्यांच्या अनेक पुस्तकांचे वीस भाषांमध्ये अनुवाद झाले आहेत. जगातील अनेक मान्यवर विद्यापीठे त्यांना व्याख्यान देण्यासाठी निमंत्रित करतात. या त्यांच्या परिचयातून त्यांची अभ्यासूवृत्ती वाचकांच्या लक्षात येईल.
हे पुस्तक म्हणजे निरनिराळ्या विषयांवरील निबंधांचे संकलन असावे असे मला वाटते. ठोस निष्कर्ष देण्यापेक्षा विषयाचा पट उलगडण्याकडे त्यांचा रोख असतो. भारतीय मनाचा नकाशा ते आपल्यापुढे उलगडत नेतात – त्यातील काही गोष्टी आपल्याला पटतात; काही गोष्टी पटत नाहीत. परंतु न पटणाऱ्या गोष्टींकडेही सहिष्णुतेने पाहण्याची दृष्टी कक्कर यांचे लेखन आपल्याला नकळतपणे मिळवून देते हा त्यातील विशेष गुण आहे. सहिष्णुता हा भारतीय मनाचा स्थायीभाव आहे. त्याचे प्रतिबिंब कक्करांच्या लिखाणावर पडले असले पाहिजे असे माझे मत आहे. असो. कक्कर यांची दृष्टी सहानुभूतीची असल्यामुळे भारतीय मनाची गुंतागुंत ते चांगल्या तऱ्हेने समजू शकतात. कामभावना व अध्यात्माविषयीचे आकर्षण या मानवीवृत्तींचा भारतीय संस्कृतीच्या संदर्भात कक्कर शोध घेतात तेव्हा आपलीच आपल्याला निराळी ओळख पटते. या पुस्तकातील ‘इरॉटिक लव्ह’ या भागातील तीन निबंधांत त्यांनी भारतीय मनातील कामभावनेचे सुंदर विवेचन केले आहे.
आध्यात्मिक अनुभवांचेही कक्कर यांना खोल आकर्षण आहे. रामकृष्ण परमहंस यांच्या अनुभवांचे विश्लेषण ते आधुनिक मानसशास्त्रातून करत असले तरी अनेक अभ्यासकांमध्ये आढळणारा तुच्छतावाद कक्कर यांच्याकडे नाही. आध्यात्मिक अनुभव म्हणजे एखादी मनोविकृती अशा दृष्टीने ते पाहत नाहीत. जगाकडे एका वेगळ्या सर्जनशीलतेने पाहण्याची शक्ती असे अनुभव देतात असे त्यांचे म्हणणे आहे. बुद्ध, रामकृष्ण व सिग्मंड फ्रॉइड हे बऱ्याचदा एका पातळीवर येतात असे कक्कर यांचे मत आहे.
आध्यात्मिक अनुभवांविषयीचे माझे मत संतांच्या लिखाणाचा आधार घेऊन मांडण्याचे धाडस करीत आहे. त्याकडे वाचकांनी सहानुभूतीने पहावे अशी विनंती. आध्यात्मिक अनुभव अद्वितीय असतात व ते फार थोड्या लोकांना येतात. परंतु म्हणून ते खोटे असतात असे म्हणता येणार नाही; कारण ज्यांना – म्हणजे संतांना हे अनुभव येतात – त्यांच्यात या अनुभवांबद्दल एकवाक्यता असते. म्हणजे असे, की आत्मसाक्षात्काराच्या वाटेवर चालताना संत ज्ञानेश्वर, संत कबीर व संत पुरंदरदास यांनी त्यांना आलेल्या अनुभवांचे जे वर्णन केले आहे ते जवळजवळ सारखेच आहे. वरील तीन संत भारताच्या वेगवेगळ्या भागांत व निरनिराळ्या काळांत जन्मले होते तरी त्यांचे अनुभव एकच आहेत. याचाच अर्थ त्यांनी एकच गोष्ट अनुभवली असली पाहिजे. हे शास्त्रीय तत्त्वाला धरूनच आहे; शिवाय अनुभवामुळे त्यांच्या स्वभावात व वृत्तीत झालेला बदलही सारखाच आहे. गुरुदेव रानडे यांनी आत्मानुभावाच्या सत्यतेचे निकष सांगितले आहेत ते असे :
१) आत्मानुभव हा अखंड – आत व बाहेर सारखाच असतो व तो प्रत्यक्ष ज्ञानाच्या स्वरूपाचा असतो.
२) आत्मानुभावाची सार्वत्रिक एकरूपता
३) आत्मानुभावी माणसाच्या स्वतःच्या जीवनावर जो सुपरिणाम झालेला असतो तो असा :
अ) आत्मानुभावी माणूस सदैव समाधानी व आत्मतृप्त असतो
आ) त्याला कशाचीही गरज लागत नाही. इ) एकही वासना त्याच्या अंतरी उरत नाही.
ई) त्याचे मन व आचरण पवित्र व शुद्ध असते.
उ) त्याला पाहिल्यावर कसल्या तरी आनंदमय भव्योदात्त संशयातीत परम सत्याची प्राप्ती झाली असली पाहिजे या विषयी आपल्याला संशय उरत नाही.
ऊ) आत्मानुभवी सदैव भयमुक्त व चिंतामुक्त असतो.
सर्व संतांना हे वर्णन तंतोतंत लागू पडते. असो!
परत एकदा पुस्तकाकडे वळू या ‘द इंडियन माईंड’ या निबंधामध्ये प्रत्येक भारतीयाच्या अंतर्मनात लपलेले सांस्कृतिक बंध कक्कर उघड करतात. मोक्षप्राप्तीचा आग्रह धरणारा भारतीयांचा जन्मजात दृष्टिकोन ते समजावून सांगतात. कर्मफलाचा सिद्धांत, पुनर्जन्म अशा संकल्पनांच्या आधाराने भारतीय आपले आयुष्य कसे जगतो याचे चित्र या निबंधात उभे राहते. चांगले व वाईट यांमधील निवड भारतीय कशी करतो याचा सुंदर ऊहापोह कक्कर यांनी केला आहे. जगातील अनेकांना भारतीय माणूस दांभिक, खोटारडा वाटतो. त्याच्या वागण्या-बोलण्यात सुसंगती नसते असे म्हटले जाते. कक्कर यांनी मात्र याकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन मांडला आहे. भारतीय संस्कृतीनुसार कोणत्याही कार्याची परीक्षा ही देश, काल, श्रम व जन्मजात गुण यांच्या संदर्भात होत असते. त्यामुळेच प्रत्येक कर्माला सारखीच कसोटी लावता येत नाही. कोणत्याही कामाचा वरील चौकटीतच विचार करीत असल्याने व ही चौकट सतत बदलत असल्याने भारतीयांचा अभ्यास करणारे अनेक जण गोंधळात पडतात. अनेक उदाहरणे देऊन कक्कर यांनी हा मुद्दा समजावून सांगितला आहे. सामाजिक जीवनाशी संबंधित सर्वांनी हा निबंध आवर्जून वाचावा असा परीक्षणकर्त्याचा सल्ला आहे.
भारतीयांचे दोष दाखविणारी छिद्रान्वेषी वृत्ती कक्कर यांच्याकडे नाही. दोष दाखवताना त्यांची दृष्टी आस्थेवाईक असते कुटुंब ते अध्यात्म यामध्ये असंख्य दृष्टिकोनांचा किती अजब ठेवा आपण स्वतःशी बाळगला आहे आणि रोजच्या व्यवहारातून तो कसा प्रकट होतो हे कक्कर यांच्या लेखनातून कळून येते. संदर्भांची लयलूट करीत, ललित शैलीने करून दिलेले भारतीयांचे मनोविश्लेषण वाचकाला समृद्ध करून जाते. हे परीक्षण अंतर्नादच्या वाचकांना नक्कीच विचार प्रवृत्त करेल असा माझा विश्वास आहे. मूळ पुस्तक मी जरी वाचले नाही तरी मला त्याची भुरळ पडली आहे. या विचारप्रेरक परीक्षणातून प्रेरणा घेऊन मी माझे पुढील विचार मांडत आहे.
खूप दिवसांपासून माझ्या मनात एक विचार घोळत होता; तो म्हणजे भारतीय माणूस हा दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे. या गोष्टीचा कक्कर यांनी त्यांच्या पुस्तकात मागोवा घेतला आहे; परंतु मी त्याचा स्वतंत्ररित्या मागोवा घेण्याचा प्रयत्न करणार आहे. मी श्री. कक्करांचे पुस्तक वाचलेले नाही त्यामुळे त्यांच्या विचारांची छाया माझ्या विचारांवर पडण्याची शक्यता नाही.
भारतीय माणूस दुभंगलेल्या व्यक्तिमत्त्वाचा आहे असा विचार माझ्या मनात येण्याची कारणे म्हणजे
१) माझ्या माहितीप्रमाणे भारत हा जगातील एकमेव देश असा आहे की ज्या देशाला इंग्रजीत ‘इंडिया’ म्हणतात आणि भारतीय भाषांमध्ये ‘भारत’ म्हणतात. आपण आपल्या देशाचे एकच नाव का ठेवू शकत नाही? याच्या उलट श्रीलंकेने त्यांचे इंग्रजांनी ठेवलेले ‘सिलोन’ हे नाव एका झटक्यात बदलून टाकले. ब्रिटिश भारतात येण्याआधी आणि नंतरसुद्धा सर्व जग आपल्याला ‘हिंदुस्तान’ या नावाने ओळखत होते. हे नाव आपण बदलले कारण आपल्याला हिंदू म्हणून घेण्याची लाज वाटत होती व आजही वाटते. ज्यांच्या भीतीने आपण हे नाव बदलले ते मुस्लीम जग आपल्याला, “हिंदुस्थान से आये हो?” असेच विचारते ‘हज’ला जाणाऱ्या भारतीय मुसलमानाला हाच प्रश्न विचारला जातो. मध्य आशियातील पाच मुस्लीम देशांची नावे तुर्कमेनिस्तान, उझबेकिस्तान, किरगीजस्तान अशी आहेत. या नावातील स्तान म्हणजे स्थान हा संस्कृत शब्द त्यांना काढावासा वाटला नाही; कारण पूर्वापार त्यांची याच नावाने ओळख होती. ती त्यांनी तशीच सहजपणे चालू ठेवली. आपण मात्र न्यूनगंडाने पछाडलेलो असल्याने ‘जग काय म्हणेल?’ याची आपण उगीच काळजी करतो. असो.
२) ‘जन गण मन’ हे गीत व ‘वंदे मातरम्’ या दोन गाण्यांपैकी कोणते गाणे राष्ट्रगीत म्हणून घ्यावयाचे यावरून आपण भरपूर गोंधळ घातलेला आहे.
३) तिरंगा किंवा भगवा ध्वज यावरही अजून मतभेद आहेतच.
४) हिंदू धर्मात अनेक स्त्रीदैवते आहेत. या देवींची आपण पूजा करतो; परंतु समाजात स्त्रीला मानाचे स्थान देत नाही.
असे अनेक विरोधाभास दाखवता येतील. हे सर्व भारतीय माणसाच्या मानसिक गोंधळाचे द्योतक आहे. या मानसिक गोंधळामागील कारणांचा मागोवा घेण्यासाठी भारताचा इतिहास,भूगोल व सांस्कृतिक जडणघडण याचा विचार करावा लागेल.
१) प्रसिद्ध पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉक्टर ढवळीकर यांनी दाखवून दिलेले आहे की इसवी सनपूर्व ५०० ते इसवी सन ५०० ही हजार वर्षे भारतीय उपखंडातील पर्यावरण अगदी उत्तम होते. पाऊस नियमितपणे पडत होता. त्यामुळे या काळात भारतात समृद्धी होती व राजकीय शांतता होती. शक- कुशाणांची आक्रमणे सांस्कृतिक दृष्ट्या भारतीयांनी पचवून टाकली. कुशाण राजांनी बौद्ध किंवा हिंदू धर्म स्वीकारला. एका तऱ्हेने हा भारतीयांच्या सांस्कृतिक वर्चस्वाचा व सहिष्णुतेचा विजय होता. समृद्धीमुळे सहिष्णुता येते. ही समृद्धी शेकडो वर्षांची असेल तर तो माणसांचा स्थायीभाव होतो.
२) आपले सनातन धर्माचे (हिंदू धर्माचे) उपनिषदातून प्रकट होणारे जे तत्त्वज्ञान आहे ते प्रश्न विचारायला शिकवते. आम्ही – म्हणजे ऋषीमुनी सांगतात म्हणून विश्वास ठेवू नका. स्वतः अनुभव घ्या.
(उपनिषदातील मार्गाने जाऊन) व मग स्वीकार करा. या तत्त्वज्ञानाचा परिणाम असा झाला की विचारस्वातंत्र्य समाजात रुजले. अनेक देवदेवता निर्माण झाल्या. ‘एकम् सत् विप्रा बहुधा वदन्ति’ या विचारधारेच्या अतिरेकामुळे आजही भारतीय माणसाला एकमत निर्माण करणे कठीण जाते. विचारस्वातंत्र्याला विवेकाचा लगाम हवा ही गोष्ट भारतीय विसरले.
३) भारतीय विचारधारा ही व्यक्तिकेंद्रित आहे. कोणत्याही अन्यायाचा सामना करण्यासाठी त्यांना एक व्यक्ती लागते. त्यातूनच अवतार निर्माण झाले. आपल्याला सामूहिकरित्या कृती करणे सहजपणे जमत नाही. त्याचे प्रतिबिंब आपल्या संगीत, नृत्य,खेळ यांच्यात पडलेले दिसेल. अपवाद आदिम जमातींची नृत्ये. आपल्या संगीतात एक मुख्य गायक असतो, नृत्यातसुद्धा एक मुख्य नर्तक असतो, आपल्याकडे सांघिक खेळ खूप कमी आहेत. क्रिकेट या खेळात वैयक्तिक कामगिरीला महत्त्व असल्याने आपल्याला तो खेळ जमतोही आणि आवडतो ही संघटना बांधता न येणे या भारतीयांच्या वैगुण्याला भगवान बुद्धांनी पहिला छेद दिला.
१) बुद्धम् शरणम् गच्छामि
२)संघम् शरणम् गच्छामि
या दोन क्रांतिकारक वाक्यांच्या जोरावर त्यांनी भिक्षुसंघ निर्माण केले व भिक्षुसंघाची एक साखळीच निर्माण केली बौद्धधर्माचा जो सार्वत्रिक प्रसार झाला त्याला हे संघ जबाबदार आहेत असे मला वाटते; याशिवाय बौद्ध धर्माची जी उपासना पद्धती आहे त्यात एकत्र येऊन उपासना करणे याला महत्त्व असल्याने संघभावना निर्माण होण्यास मदत झाली. हिंदू धर्मात उपासना किंवा साधना ही वैयक्तिक स्वरूपाची असल्याने संघभावना निर्माण होत नाही.
४) भारतीय माणसावर आध्यात्मिक विचारांचा प्रचंड पगडा आहे; परंतु उच्चतम अध्यात्मिक तत्त्वे व व्यावहारिक वास्तव यांची सांगड घालणे भारतीयाला अजून जमलेले नाही त्यामुळे भारतीय माणूस बोलतो एक आणि करतो वेगळेच. भारतीय माणसाला उक्ती व कृती यांच्यात एकवाक्यता आणता येत नाही. त्यातून दांभिकता येते.
५) मुस्लीम आक्रमणानंतर भारतीय माणसाचे जीवन पार ढवळून निघाले. मुस्लीम कट्टरतेपुढे भारतीय माणसाची सहिष्णुता लुळीपांगळी झाली. त्यांना मुस्लीम समाजाशी कसे वागावे हे अजून कळलेले नाही. मुस्लीम समाज फक्त सामर्थ्य जाणतो हे आपल्याला कळलेले नाही. मुस्लीम राजवटीच्या काळात जिवाच्या भयामुळे कातडी बचाऊपणा, ढोंगीपणा हे अवगुण आपल्याला चिकटले. दक्षिण भारतात विजयनगर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे मुस्लीम राजवटीची पकड उत्तर हिंदुस्थानापेक्षा ढिली असल्यामुळे उत्तर हिंदुस्थानात व दक्षिण भारतातील माणसांच्या स्वभावात फरक पडलेला आहे असे आपल्याला जाणवेल.
६) इंग्रज राज्यकर्त्यांच्या काळात त्यांनी आपल्या शिक्षण व्यवस्थेत बदल करून आपल्यात एक न्यूनगंड निर्माण केला आहे. त्यातून आपण अजून बाहेर आलेलो नाही.
बौद्धिक न्यूनगंड भारतीयांमध्ये निर्माण होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पाश्चात्त्यांनी केलेली तंत्रज्ञानातील प्रगती आणि आपली या क्षेत्रातील अधोगती; पण आपण येथे एक गोष्ट विसरतो की तंत्रज्ञान, साहित्य, काव्य निर्माण होण्यास सुबत्ता व राजकीय स्थैर्याची आवश्यकता लागते. इसवी सन ११०० नंतर झालेल्या मुस्लीम आक्रमणामुळे आपण ही सुबत्ता व स्थैर्य गमावले. आर्यभट, वराहमिहिर, ब्रह्मगुप्त, भास्कराचार्य,कालिदास हे इसवी सन ४७६ ते इसवी सन ६८० या गुप्त राजांच्या काळात होऊन गेले. भारतातील गुणशीला, वल्लभी, तक्षशिला, कांची, नालंदा ही विद्यापीठे इसवी सन १२०० पर्यंत बंद पडली. हे वास्तवही आपण लक्षात घेतले पाहिजे.
वर वर्णन केलेल्या मुद्द्यांच्या समर्थनार्थ अनेक उदाहरणे देता येतील परंतु विस्तारभयास्तव तसे केले नाही. मी माझ्या अल्प अभ्यासातून भारतीय मनाचा धांडोळा घेण्याचा प्रयत्न केला आहे. अंतर्नादच्या सुजाण वाचकांनी त्याचे मूल्यमापन करावे.
