तमिळनाडू : परंपरा आणि आधुनिकता  

हल्ली बऱ्याच मोठ्या प्रमाणावर  मराठी माणसे परदेशी जात असतात.  प्रवासी कंपन्यांच्या मोठमोठ्या जाहिरातींवरून ते लगेचच लक्षात येते. 
ते स्वागतार्हच आहे; पण आपला मायदेश तरी त्यांतील किती जणांनी डोळसपणे बघितला असतो? 
ती उणीव लक्षात घेऊन ‘अंतर्नाद’कार भानू काळे सध्या भारतातील वेगवेगळ्या प्रांतांत प्रवास करत आहेत.  त्यांतील तमिळनाडूप्रवासावर आधारित तीन  लेख आम्ही मागच्या अंकांत प्रकाशित केले होते. 
त्याच मालिकेतील त्यांचा ‘तमिळनाडू : परंपरा आणि आधुनिकता ‘हा चौथा  लेख या अंकात आम्ही प्रकाशित करत आहोत. 
केवळ प्रवासवर्णन नव्हे तर त्याच्या जोडीला असलेले समाजचिंतन ही या लेखनाची खासियत आहे – संपादक 

   चेन्नईला पोचलो त्याच दिवशी मायलापूरचे कपालीश्वरर मंदिर पुन्हा एकदा बघायची माझी खूप इच्छा आहे असे मी आपटेंना म्हणालो होतो आणि ते लक्षात ठेवून एका सकाळी ते आम्हांला तिथे घेऊन गेले. हा परिसर इंग्रजांनी सतराव्या शतकात वसवलेल्या मद्रास शहराच्या खूप पूर्वीपासून अस्तित्वात होता. 

   मी पूर्वी आलो होतो त्या वेळी हे शंकराचे मंदिर जसे होते तसेच ते आजही आहे; फक्त आजूबाजूच्या दुकानांची संख्या बरीच वाढल्यासारखी वाटली. या देवळाला मोठा इतिहास आहे. कपाल म्हणजे कपाळ आणि ईश्वरर म्हणजे ईश्वर असे दोन शब्द इथे जोडले आहेत. एकदा शंकर आणि पार्वती इथे एकत्र गप्पा मारत असताना पार्वतीचे लक्ष शेजारीच बागडणाऱ्या मोरांकडे अधिक होते, त्यामुळे चिडलेल्या शंकराने तिचे रूपांतर एका मोरात केले. त्यानंतर पश्चाताप झालेल्या पार्वतीने कठोर तपश्चर्या केली आणि त्यामुळे संतुष्ट होऊन शंकराने तिला याच जागी पुन्हा मूळ रूप दिले. तेव्हापासून हे मंदिर इथे आहे. या गावात खूप मोर असत म्हणून त्याला मायलापूर (म्हणजे मोरांचे गाव) असे नाव पडले. अर्थात ही केवळ एक आख्यायिका आहे. चेन्नईतील हे सर्वांत प्रसिद्ध शिवमंदिर मानले जाते. दरवर्षी मार्च-एप्रिलच्या दरम्यान इथे ब्रह्मोत्सव साजरा होतो आणि त्या वेळी देवळातील अनेक मूर्तींची भव्य मिरवणूक निघते. 

   सुमारे एकशे वीस फूट (म्हणजे साधारण दहा मजली) उंचीची दोन सुंदर गोपुरे देवळाला आहेत – एक पूर्वेला आणि एक पश्चिमेला; त्याशिवाय मध्यभागी एक मध्यम आकाराचे प्रवेशद्वार आहे. आतील मंडपम खूप लोक एकाच वेळी सहज बसू शकतील इतका प्रशस्त आहे. बाहेरच्या बाजूला मोठे तळे आहे. गोपुरांवर आणि मंडपमच्या खांबांवर सुरेख कोरीव काम केलेले आहे; देवादिकांची अनेक रंगांतली चित्रे आहेत. अलीकडे प्राचीन मंदिरांना केलेली रंगरंगोटी मंदिराची मूळ शोभा घालवते, दगडी मंदिराची नैसर्गिक शोभाच खूप आकर्षक असते, असे माझे तरी मत आहे; पण तमिळनाडूमधील सगळ्याच प्राचीन मंदिरांना असे नव्याने लाल, भगवा, पिवळा, निळा असे भडक रंग दिले गेले आहेत. तमिळनाडूतील बहुतेक सगळ्या हिंदू देवळांचे प्रशासन राज्य सरकारकडे आहे. 

   इथे शंकराचे, पार्वतीचे, गणपतीचे आणि कार्तिकेयाचे अशी स्वतंत्र उपमंदिरे आहेत. इथे एक महत्त्वाचा पण फारसा कुठे उल्लेख न होणारा मुद्दा मांडायला हवा. आपल्याकडे गणपती हा खूप लोकप्रिय देव आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ‘श्रीगणेशाय नमः’ अशी केली जाते. त्या मानाने गणपतीचा भाऊ कार्तिकेय तितकासा पूजला जात नाही. कार्तिकेयाला आपण कार्तिकस्वामी म्हणतो आणि ते विशेषण सामान्यतः स्त्रियांपासून दूर राहणाऱ्या पुरुषाला उद्देशून वापरले जाते. इथे मात्र गणपतीपेक्षा कार्तिकेय खूपच अधिक पूजला जातो. सरवणा, मुरूगन, सुब्रमण्यम, अरुमुगम ही सगळी कार्तिकेयाचीच नावे आहेत. आम्ही गेलो त्या वेळी देवळात गर्दी फारशी नसल्याने आम्ही विनासायास दर्शन घेऊ शकलो. प्रसाद घेऊन बाहेर थोडे विसावलो असताना देवळात चाललेली भजने, पूजापाठ, घंटानाद आणि सोबतची सनई-मृदुंग यांसारखी पारंपरिक वाद्ये वगैरे कानावर पडत असताना, उदबत्त्यांचा वास नाकात घमघमत असताना माझे मन आपोआपच मागे गेले, मुंबईतले बालपण आठवू लागले. मी राहत होतो त्या किंग्जसर्कल भागाला माटुंगा असेही म्हणत आणि मुंबईतील तमिळ संस्कृतीचा तो अगदी बालेकिल्ला होता.

    अय्यर आणि अय्यंगार हे त्यांच्यातील दोन भाग होते ही गोष्ट आम्हांला बर्‍याच उशिरा कळली; अर्थात ती कळली नसती तरी काहीच फरक पडला नसता कारण आमच्या दृष्टीने त्यांच्यात काहीच भेद नव्हता – दोघेही ‘मद्रासीच’ होते! दोघांचीही राहणी सारखीच साधी असायची. प्रत्येकाच्या कपाळावर गंध म्हणजे त्यांच्या भाषेत नामम असायचे. शैव (म्हणजे अय्यर, आडवे गंध लावणारे) बहुसंख्य होते, तर वैष्णव (म्हणजे अय्यंगार, उभे गंध लावणारे) अल्पसंख्य होते. एके काळी त्यांच्यात बरेच वादविवाद व्हायचे पण आता ते सगळे इतिहासजमा झाले आहे. तमिळनाडू मुख्यतः शैवपंथी आहे. राम, विष्णू, श्रीकृष्ण यांच्यापेक्षा शंकर, पार्वती, कार्तिकेय यांची देवळे इथे बरीच अधिक आहेत.       

   मायलापूरच्या देवळातून बाहेर पडताना त्या सगळ्या आठवणी माझ्या मनात जाग्या झाल्या होत्या, रुंजी घालत होत्या. माटुंग्याची त्यांची ती देवळे, तेथील भक्तांची वर्दळ, जिथे सकाळ-संध्याकाळ नारळ फोडला जायचा ते राममंदिर, मोठ्याने स्तोत्रे म्हटली जात तो शंकर मठम, तेथील मोठा फूलबाजार – मुंबईतील सर्वांत मोठा, केळ्याचे कोंभ वापरून केलेली सजावट, त्यांचे मसाले, फिल्टर कॉफीचा वास! कमालीची साधी राहणी. बाहेर कितीही मोठा अधिकारी असला तरी घरी आला रे आला की साधी लुंगी नेसणार. वर उघडाच. जमिनीवर मांडी घालून बसणार. इडली, डोसा, सांबार, रस्सम – त्याचा दरवळणारा वास. घरात देवदेवतांची चित्रे. बऱ्याच नंतर आमच्या लक्षात आले की ती कदाचित तमिळ ब्राह्मणांची संस्कृती होती – ज्यांना हल्ली टॅम-ब्रॅम म्हणतात त्यांची संस्कृती – तीच संस्कृती समाजाच्या सर्वच स्तरांत कमी-अधिक प्रमाणात झिरपत होती. 

   त्यांनी काही उत्तम संस्था उभारल्या : इंडियन जिमखाना, तमिळ संघम, साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (एस.आय.इ.एस.), त्यांची शाळा आणि कॉलेज, षण्मुखानंद हॉल – त्या वेळी तरी तो भारतात  सर्वांत मोठा होता. काळाच्या ओघात किंग्ज सर्कलला राहणारे बरेचसे मद्रासी चेंबूर-घाटकोपर आणि काही तर पार डोंबिवलीपर्यंत गेले. त्यांची पुढची पिढी मोठ्या प्रमाणावर आज परदेशी स्थायिक झालेली आहे. जिथे कुरण अधिक हिरवे दिसते तिथे जाण्याची ओढ माणसात निसर्गतःच असावी.

    माटुंग्याच्या त्या संस्कृतीचे माहेर म्हणजे चेन्नईमधील मैलापूरची संस्कृती – मला माझ्या बालपणात नेणारी. तिथे वावरताना मला आतूनच मन शांत झाल्यासारखे वाटत होते.  

   शनिवारी संध्याकाळी चेन्नई येथील प्रसिद्ध महाराष्ट्र मंडळात माझी मुलाखत ठेवलेली होती. ‘बदलता भारत’ हा विषय होता. अनिल जोशी स्वतःच मुलाखत घेणार होता आणि त्याने पूर्वीच प्रश्न काढले होते, त्यावर आमची चर्चाही झाली होती. त्यामुळे तसा मी निवांत होतो. 

   या महाराष्ट्र मंडळाची स्थापना १९२६ साली झाली. ‘मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा’ हे संस्थेचे ब्रीद आहे. इतर शहरांतील महाराष्ट्र मंडळांप्रमाणेच इथेही गुढी पाडवा, गणेश चतुर्थी, दसरा, दिवाळी असे सण इथे साजरे केले जातात. धार्मिक उत्सव हे आजही लोकांना एकत्र आणण्याचे सर्वांत महत्त्वाचे साधन आहे – विशेषतः परप्रांतात. त्याशिवाय अनेक बारीकसारीक कार्यक्रम होतच असतात. शहराच्या वेपेरी या मध्यवर्ती भागात त्यांच्या स्वतःच्या दोन इमारती आहेत. पार्किंगची उत्तम सोय आहे. एका इमारतीत प्रत्येकी अडीचशे आसनक्षमतेची दोन सभागृहे आहेत; तर दुसऱ्या इमारतीत वीस वातानुकूलित खोल्या असलेले होस्टेल आहे. सभागृह सांस्कृतिक कार्यक्रमांना भाड्याने दिले जाते. होस्टेलमध्ये दिवसाचे हजार ते दीड हजार रुपये भरून खोल्या मिळू शकतात. होस्टेलमध्ये तळमजल्यावर भोजनगृहदेखील आहे. चेन्नईला येणाऱ्या प्रवाशांसाठी ही उत्तम व्यवस्था आहे. महाराष्ट्र शासनातर्फे विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना एकदा संस्थेला काही लाख रुपयांची देणगी दिली गेली होती; पण तो एक अपवाद आहे. एरवी संस्थेला स्वतःच खर्च भागवावा लागतो. एका कुटुंबासाठी वर्षाला एक हजार रुपये वर्गणी आहे. साधारण अडीचशे कुटुंबे सदस्य आहेत असे मी ऐकले. अर्थात चेन्नईमध्ये फ्लोटिंग पॉप्युलेशन म्हणतात तसे तात्पुरते वास्तव्य करणारेही अनेक असतात. ती मंडळी एखाद-दुसरे वर्ष सदस्य असतात; पण इथे काही पिढ्या वास्तव्य असलेले आपटेंसारखे काही मूठभर लोक आहेत आणि अशी मंडळी हाच संस्थेचा खरा आधारस्तंभ आहे.

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला संक्रांतीचे हळदीकुंकू ठेवले होते. हे आधीच ठरलेले असावे कारण बहुतेक जणी बऱ्यापैकी नटूनथटून आल्या होत्या. नंतर सगळ्यांना तिळगूळ वाटला गेला. आधुनिक असूनही परप्रांतातील मंडळी परंपरा जपतात; किंबहुना महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठी माणसांपेक्षा परप्रांतातील मराठी माणसे अधिक उत्साहाने परंपरा जपतात हे नक्की. परदेशातील मराठी बांधवांच्या बाबतीतही हे खरे आहे. अंतरामुळे प्रेम वाढत असावे. 

   काही तरुण जोडपीही कार्यक्रमाला आली होती. काही जण नुकतेच चेन्नईमध्ये नोकरीसाठी आले होते आणि शहरातील इतर मराठी माणसे कशी आहेत हे जाणून घेण्याचे कुतूहल त्यामागे असावे. मातृभाषेचे आकर्षण हा घटक असतोच. कारण सगळे जण आवर्जून मराठी बोलत होते. हल्लीच्या प्रथेप्रमाणे  व्हॉट्सॲपवरच सगळी आमंत्रणे गेली होती; तरीही सत्तर-ऐंशी उपस्थिती होती. माझ्या मते ती चांगलीच होती. इथे आलेल्या अनेकांना तमिळ भाषा अवगत नव्हती हेही माझ्या लक्षात आले. तशीही ती भाषा शिकायला अवघड आहे. लहानपणी माझ्या शेजारीच एक तमिळ कुटुंब राहत असल्याने मी ती भाषा शिकायचा बराच प्रयत्न केला होता. इंगे वा (इकडे ये), पिनाडी पो (मागे जा), अम्मा कुपडा (आई बोलवतेय), पाल कुडं (दूध दे), कुंचम कुंचम (थोडे थोडे), इल्ले (नाही), वांडा (नको), वणक्कम (नमस्ते) असे काही फुटकळ शब्द सोडले तर अधिक प्रगती होऊ शकली नव्हती. अर्थात तरुण मंडळींच्या बाबतीत हा काही प्रश्न नव्हता; त्यांच्या कॉर्पोरेट जगात फक्त इंग्रजीचाच वापर होत होता!

    मुलाखत साधारण तासभर चालली आणि नंतर अर्धा-एक तास श्रोत्यांचे प्रश्न आणि उत्तरे यांत गेला. बोलताना दक्षता आयोगाचे माजी प्रमुख एन. विठ्ठल यांच्याबद्दल मी आवर्जून बोललो. वीस वर्षांपूर्वी मी त्यांची चेन्नईमध्ये विस्तृत मुलाखत घेतली होती. ‘बदलता भारत’ पुस्तकातील ‘एन. विठ्ठल : भ्रष्टाचाराशी लढताना’ हे संपूर्ण प्रकरण त्या मुलाखतीवरच आधारित आहे. त्या वेळचा एक प्रसंग मी भाषणात सांगितला. जवळजवळ तीन तास चाललेली आमची मुलाखत संपली आणि मी उठून दाराकडे जाता जाता म्हटले, “हे सगळं अंतर्नाद या मराठी मासिकात येणार असल्याने तुम्हांला ते वाचता येणार नाही याचं वाईट वाटतं.” 

   “असं का म्हणता? छापून झाला की अंक पाठवा माझ्याकडे. मी प्रयत्न करीन वाचायचा. अहो मी पण मूळचा महाराष्ट्रातलाचा आहे,” ते हसत हसत सांगू लागले. “माझं मूळ आडनाव राव. माझ्या बायकोचं होणावळकर. आम्ही मूळचे देशस्थ ब्राह्मण. बऱ्याच पिढ्यांपूर्वी आमचे पूर्वज महाराष्ट्रातून तमिळनाडूत आले. आज तसं मराठी येत नाही मला; पण माझी पार्श्वभूमी तुम्हांला सांगतो,” असे म्हणत मला पुन्हा कोचावर बसवून त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. नंतर त्यांनी पुरवलेली माहिती मला खूप रोचक वाटली. 

   एकोजी राजे यांनी १६७५ मध्ये तंजावर येथे स्वतःची गादी स्थापन केली आणि १८५५ साली ब्रिटिशांनी त्यांचे राज्य ताब्यात घेतले. दरम्यानच्या काळात मोठ्या प्रमाणावर मराठी भाषक तमिळनाडूत स्थायिक झाले. तमिळ जनतेनेही त्यांचा मनापासून स्वीकार केला. १६७५ पासूनच्या साडेतीनशे वर्षांत त्यांनी महाराष्ट्रात परत जावे, असे म्हणणारी कुठलीही ‘तमिळ सेना’ निर्माण झालेली नाही. कर्नाटकी संगीत टिकवण्यासाठी तंजावर घराण्याने मोठे योगदान दिले आहे. एक विशेष म्हणजे ३ ऑक्टोबर १६७७ रोजी शिवाजी महाराजांनी चेन्नईच्या थंबू चेट्टी रस्त्यावरील कालिकाम्बिका देवळाला भेट दिल्याची कागदोपत्री नोंद आहे. अनेक मूळ मराठी बांधवांनी तमिळनाडूत मानाचे स्थान प्राप्त केले आहे – विशेषतः शासकीय सेवेत. एक वेळ अशी होती की बहुसंख्य उच्च शासकीय अधिकारी महाराष्ट्रातून इथे आलेल्या समाजातीलच असायचे. तमिळ सिनेमातील सर्वश्रेष्ठ कलाकार मानला गेलेला अभिनेता शिवाजी गणेशन हा मूळचा मराठीच. त्याने वठवलेली शिवाजीची भूमिका पाहून खूश झालेल्या पेरियार यांनी त्याला सर्वप्रथम शिवाजी गणेशन म्हणायला सुरुवात केली. तमिळ सिनेमाचा आजचा सुपरस्टार रजनीकांत हादेखील मूळचा कोल्हापूरचा. त्याचे खरे नाव ‘शिवाजी गायकवाड.’  शेवटी मी निघालो तेव्हा विठ्ठल यांनी मला त्यांनी लिहिलेले ‘Maharashtrians in Tamil Nadu’ हे पुस्तक त्यांच्या सहीसह भेट दिले. ते वाचल्यावर तमिळनाडूमधील मराठी बांधवांविषयी मला खूप अभिमान वाटला होता. 

   आपण परप्रांतीयांवर खूपदा टीका करतो, आपल्या नोकर्‍या ते हिरावून घेतात म्हणून आपल्याला राग येतो; पण जेवढे परप्रांतीय महाराष्ट्रात राहतात त्याच्यापेक्षा अधिक मराठी माणसे परप्रांतांत राहतात हे या पुस्तकात विठ्ठल यांनी सरकारी आकडेवारी देऊन दाखवून दिले आहे. नोकरीसाठी एके काळी मोठ्या प्रमाणावर तमिळ तरुण मुंबईत येत. त्यांतले बरेच जण टायपिस्ट-स्टेनोग्राफर असत. मद्रास-दादर एक्सप्रेसला बाळासाहेब ठाकरे ‘स्टेनोग्राफर एक्सप्रेस’ म्हणायचे! तमिळ लोकांचा उल्लेखही कधीकधी ‘यंडू-गुंडू’ किंवा ‘लुंगीवाले’ असा उपमर्दकारक केला जायचा. आज मात्र तमिळनाडूचा चांगला विकास होत असल्याने तमिळ तरुणांना कनिष्ठ स्तरावरील नोकरीसाठी बाहेर कुठे जायची आवश्यकता उरलेली नाही. उच्चपदावरील नोकर्‍यांसाठी मात्र कुठलेही तरुण जगभरात कुठेही जाणार हे स्वाभाविक आहे. 

   भाषण आणि प्रश्नोत्तरे संपल्यानंतर तिथेच जेवणही ठेवले होते. त्या वेळी काही जणांशी गप्पा मारायची संधी मिळाली. त्यांच्यातील एक तर चक्क आयपीएस अधिकारी होते – तेही कमिशनरच्या हुद्यावरचे. मूळ नागपूरचे पण त्यांनी तमिळनाडू कॅडर मागून घेतले होते. अर्थात इथे केवळ एक मराठी माणूस या नात्याने ते आले होते. ते तसेच त्यांचा ड्रायव्हरदेखील साध्या कपड्यांतच होता. मोटारीवरचे हुद्दा दर्शवणारे स्टारही झाकलेले होते. कसलाच बडेजाव नाही, उगाच मिरवणे नाही. दुसरे एक गृहस्थ मूळ मंचरचे होते. गेली पन्नास-एक वर्षे चेन्नईत राहत आहेत. फळांचे मोठे व्यापारी आहेत. त्यांच्या तोंडी ‘अय्या’ शब्द दोन-तीनदा ऐकला तेव्हा नवल वाटले होते; आपल्याकडे मुलींच्या तोंडी तो शब्द असतो! पण नंतर कळले की तमिळमध्ये ‘अय्या’ हा शब्द ‘साहेब’ या अर्थाने वापरला जातो! ते सांगत होते, “माझा मार्केटमध्ये खूप लोकांशी सतत संबंध येत असतो. इथे आपल्याप्रमाणे नाव आणि आडनाव असा प्रकार नाही. आडनाव हे खूपदा गावाचे किंवा पंथाचे नाव असते. पहिले नाव आणि इनिशियल्स एवढेच असते; पण पहिल्या नावाने हाक मारताना मला खूप अवघडल्यासारखे वाटते म्हणून मी सर्वांना ‘अय्या’च म्हणतो.” दैनंदिन अडचणींतून मार्ग कसा काढायचा ते व्यापाऱ्यांकडून शिकावे! 

   बघता बघता आमचे दहा दिवस संपत आले. शेवटच्या दिवशी अगदी आवर्जून अण्णांचा कारखाना बघायला गेलो. इतके दिवस बाकी सगळे करताना ते राहूनच गेले होते. त्यांच्या वडिलांनी स्थापन केलेल्या या कंपनीची काही खास रबर उत्पादने आहेत, ज्यांना फारशी स्पर्धा नाही. कारखाना बघताना अण्णा सांगत होते, “आमच्याकडचे सर्व दहा-बारा कामगार हे ओरिसाचे आहेत. एकही स्थानिक कामगार नाही. स्थानिक कामगारांच्या कटकटी फार. हे परप्रांतातले कामगार जास्त चांगलं काम करतात. त्यांच्या मागण्याही कमी असतात. मी इथेच त्यांची राहण्याचीदेखील सोय केलेली आहे.” हे ऐकताना मला एकदम माझ्या मुंबईतील प्रिंटिंग प्रेसची आठवण झाली. आमच्याकडे तीन तमिळ कामगार होते आणि इतर सर्व स्थानिक मराठी कामगारांपेक्षा ते अधिक चांगले काम करत. कधी उशिरा थांबावे लागले तरी कुरबुर न करता थांबत; वरचेवर दांडी मारत नसत. मुंबईत तमिळ कामगार अधिक चांगले काम करत होते; पण तेच तमिळ कामगार चेन्नईमध्ये मात्र कामचुकार होते! स्थानिक कामगारांपेक्षा परप्रांतातून आलेले कामगार अधिक कष्टपूर्वक काम करतात हेच खरे असावे! 

   इथे व्यवसाय करताना मराठी असल्याचा काही त्रास होतो का असे विचारले असता अण्णांचे उत्तर ‘अजिबात नाही’ असे होते. “अगदी शिवसेना ऐन भरात असतानाही आम्हांला आमच्या मराठीपणाचा कधीच त्रास झालेला नाही. एकतर मी चांगलं तमिळ बोलतो, माझे पार्टनर तमिळच आहेत; शिवाय धंदा करताना भाषेचा मुद्दा महत्त्वाचा नसतो. तुम्ही योग्य किमतीत चांगला माल देता की नाही हेच बघितलं जातं.” मी इथे अनेक मराठी लोकांना भेटलो. त्यांच्यापैकी एकालाही ते मराठी असल्याचा चेन्नईमध्ये काही त्रास झाला नव्हता. 

   कारखान्यातून घरी आल्यावर पटापट आधी पॅकिंग करून घेतले. आमची परतीची फ्लाइट संध्याकाळची होती, अण्णा स्वतःच आम्हांला सोडायला येणार होते. त्यांच्यासारखे आतिथ्य आजकाल खरेच खूप दुर्मीळ  आहे. जरा विश्रांती घ्यावी म्हणून थोडा वेळ आडवा झालो. गेल्या दहा दिवसांतील अनेक प्रसंग मनात घुटमळत होते. तमिळनाडूची वैशिष्ट्ये काय म्हणता येतील याचा विचार करू लागलो. 

   एक वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या राजकारणातील नाट्यपूर्णता. करुणानिधी आणि जयललिता ही त्याची उत्तम उदाहरणे म्हणता येतील. दोघांचेही आयुष्य नाट्यपूर्ण घटनांनी खचून भरलेले आहे. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी करुणानिधींनी पक्षाचा युवक विभाग सुरू केला आणि त्याच वेळी पक्षाचे मुखपत्रही सुरू केले. शिक्षण अर्धवट सोडून प्रत्यक्ष आंदोलनात ते सहभागी झाले. पुदूचेरी येथील पक्षाच्या एका सभेत कॉंग्रेस विरोधकांकडून त्यांना इतका मार पडला की ते बेशुद्ध पडले. ते बहुधा मरण पावले असे समजून मारेकऱ्यांनी त्यांना रस्त्याच्या कडेला एका गटारात लोटून दिले आणि ते पुढे निघून गेले. त्या वेळी एका वृद्ध महिलेने त्यांना बाहेर काढले आणि ती त्यांना पेरियार यांच्याकडे घेऊन गेली. पेरियार यांनी त्यांच्यावर औषधोपचार केले आणि त्यांना बरे केले. अशा घटना लोक कधीच विसरत नाहीत. आपल्या समर्थकांना करुणानिधी वरचेवर पत्रे लिहीत आणि त्यांची सुरुवात ‘उडन पिराप्पे’ (‘माझे रक्ताचे बंधू’) अशी केलेली असे. अशी त्यांनी एकूण ७,००० पत्रे लिहिली आणि त्यांचे सात खंड प्रसिद्ध आहेत! दुसऱ्या कुठल्या राज्यातील प्रमुख नेत्याने पक्ष उभारण्यासाठी असे काही केले असेल असे वाटत नाही. 

   जयललिता यांचेही जीवन अशाच नाट्यपूर्ण घटनांनी भरलेले आहे. अभ्यासात हुशार असूनही त्यांना गरिबीमुळे शिक्षण अर्धवट सोडावे लागले आणि आपले, तसेच विधवा आईचे पोट भरता यावे म्हणून लहान वयातच सिनेमात काम करणे भाग पडले. अशा परिस्थितीत जे-जे सहन करावे लागते ते-ते त्यांनी सहन केले. पुढे एमजीआर यांची पत्नी जानकी हिचा कडवा विरोध असूनही त्यांनी एमजीआर यांची साथ सोडली नाही. एमजीआर यांच्या प्रेताशेजारी त्या दुःखी चेहऱ्याने पण जिद्दीने उभ्या आहेत, तेथून हलायला तयार नाहीत, हे चित्र  घराघरांत पोचले होते. त्यांनी एकटीच्या बळावर निवडणुका जिंकून दाखवल्या. या बाबतीत त्यांची तुलना केवळ ममता बॅनर्जी यांच्याशी होऊ शकेल. पुढे करुणानिधी सत्तेवर असताना एकदा त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. ‘ज्या कोठडीत मला महिनाभर फरशीवर झोपावं लागलं आणि ज्या पत्र्याच्या थाळीत मला जेवावं लागलं त्याच कोठडीत मी त्यांनाही पाठवेन आणि त्याच थाळीतून त्यांनाही जेवायला लावेन,’ असे त्या वेळी त्या म्हणाल्या होत्या आणि पुढे त्यांनी ते खरेही करून दाखवले. करुणानिधीही इतके मुरब्बी की त्यांनी त्या अटकेचा पुरेपूर राजकीय फायदा उठवला. ७८ वर्षांचे वृद्ध करुणानिधी पोलिसांशी झटापट करत आहेत, पोलीस त्यांना ओढून नेत आहेत, ‘हे लोक मला ठार मारणार आहेत’ वगैरे करुणानिधी मोठमोठ्याने ओरडून सांगत आहेत, याचा व्हिडिओ देशभरातल्या सर्व टीव्ही चॅनेल्सवरून पुढचे दोन-तीन दिवस सतत दाखवला जात होता – करुणानिधींच्या त्या ठरलेल्या काळ्या गॉगल्ससह. आपापल्या परीने दोघांनीही मीडिया ‘मॅनेज’ केला होता! मेलोड्रामा हा आजही तमिळ सिनेमाइतकाच तिथल्या राजकारणाचाही स्थायीभाव आहे.   

   आत्यंतिक विभूतिपूजा हे तमिळनाडूचे मला जाणवलेले आणखी एक ठळक वैशिष्ट्य. सलग तेरा वेळा करुणानिधी विधानसभेवर निवडून गेले; एकदाही पराभूत झाले नाहीत – हाही एक विक्रमच. पन्नास-साठ वर्षांपूर्वी डीएमकेचे प्रमुख नेते मुख्यमंत्री अण्णादुराई जसे दिसायचे तसेच दिसायचा त्यांचे अन्य नेते प्रयत्न करत. नेडूनचेझियन नावाच्या एका डीएमके नेत्यांना सत्तरच्या दशकात भेटायचा योग आला होता. माझ्या आठवणीप्रमाणे त्या वेळी ते राज्याचे शिक्षणमंत्री होते. त्या वेळचे त्यांचे रूप माझ्या आजही लक्षात आहे – कमरेला स्वच्छ पांढरी वेश्टी, अर्धा पांढरा सदरा, खांद्यावर पांढरे अंगवस्त्रम. (आपल्याकडे त्या शब्दाचा अर्थ अगदी वेगळा आहे; पण तमिळमध्ये उपरण्याला अंगवस्त्रम म्हणतात.) आणि विशेष नजरेत भरलेल्या म्हणजे काळ्याकुट्ट मिशा – जणू नुकत्याच रंगवलेल्या. बहुतेक सगळे डीएमके नेते साधारण असाच पोशाख करायचे आणि आजही करतात. हा बहुधा पक्षनिष्ठेचाच एक भाग असावा! आपल्या नेत्यापुढे अक्षरशः लोटांगण घालून कार्यकर्ते आपली निष्ठा व्यक्त करत असतात. नेत्यांसाठी ते आत्मदहनही करतील. डिसेंबर २०१६ मध्ये जयललिता यांचे निधन झाले तेव्हा शोकावेगाने त्यांचे ५९७ समर्थक मरण पावले होते. त्यांची यादीही तमिळनाडू सरकारतर्फे प्रसिद्ध झाली आणि त्या प्रत्येकाच्या कुटुंबाला सरकारतर्फे तीन लाख रुपये दिले गेले. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये करुणानिधी यांचे निधन झाले तेव्हा त्यांचे २४८ समर्थक दुःखावेगाने मरण पावले. हाही अधिकृत सरकारी आकडा आहे. त्यांना सरकारतर्फे प्रत्येकी दोन लाख रुपये दिले गेले. इतर राज्यांतही वेळोवेळी वेगवेगळे नेते खूप लोकप्रिय होते; पण त्यांच्या निधनानंतर अन्य कुठल्याही राज्यात असे काही घडल्याचे माझ्यातरी ऐकिवात नाही.   

   खूप भावनाशील आणि उत्कट स्वभाव हेदेखील इथल्या समाजाचेच एक वैशिष्ट्य मानता येईल. प्रेमाचा अतिरेक आणि रागाचाही तेवढाच अतिरेक. श्रद्धा म्हटली की तीही अगदी टोकाची. देवादिकांचे   रथ चालले की भक्तगण अगदी अहमहमिकेने रस्त्यावरून लोळत जाणारच. आवडता नट आजारी पडला तर शेकडो चाहते त्याच्यासाठी उपासतापास करणार. या स्वभावाचे प्रतिबिंब तमिळ चित्रपटांत प्रकर्षाने जाणवते. प्रेमही अचाट आणि हिंसाही अचाट. त्या चित्रपटांमध्ये जाणवतो तो भडकपणा, मेलोड्रामा किंवा अतिरंजितता हे येथील समाजाचेच एक प्रतिबिंब मानता येईल; किंवा कदाचित तो चित्रपटांचा समाजमनावर आणि राजकारणावर झालेला परिणामही असू शकेल.   

   सामाजिक न्यायाची चाड हे येथील राजकारणाचे आणखी एक वैशिष्ट्य मानता येईल. याचे एक कारण म्हणजे डीएमकेचे बहुतेक सर्व जुने नेते अतिशय गरिबीतून वर आले होते. पुढे अर्थातच इतर राज्यांतील राजकारण्यांप्रमाणे त्यांनीही अफाट माया जमा केली, त्याबद्दल काहीच शंका नाही; पण बालपणी सोसलेल्या गरिबीची आणि अन्यायाची त्यांना प्रखर जाणीव होती. मागासवर्गीयांना शिक्षणात आणि नोकऱ्यांत आरक्षण हे इतर कुठल्याही राज्याच्या पूर्वी, म्हणजे अगदी १९२१ सालापासून मद्रास प्रेसिडेंसीमध्ये सुरू झाले. आज तिथे नोकऱ्यांमध्ये ६९ टक्के आरक्षण आहे. एक वेळ आपल्यालाही जेवायची भ्रांत होती याची आठवण ठेवून जयललिता यांनी अम्मा कँटिन सुरू केले. फक्त एक रुपयात दोन इडल्या आणि दोन रुपयांत सांबार-भात मिळायची राज्यभर सोय केली. आपल्या राज्यात कोणीही उपाशी राहणार नाही याकडे त्यांनी लक्ष दिले. सर्वच डीएमके नेत्यांनी अशा कल्याणकारी योजना राबवल्या. चेन्नईच्या कानाकोपऱ्यांत मी फिरलो पण अन्य शहरांप्रमाणे इथे कुठेही मला झोपड्या आढळल्या नाहीत. अगदी साधे का असेना; पण प्रत्येकाला पक्के घर आहे. मुंबई-पुणे-बंगळुरू यांच्या तुलनेत चेन्नईमध्ये उंच इमारती खूपच कमी दिसल्या. खूप श्रीमंती नाही दिसली; पण अंगावर येणारी गरिबीही दिसली नाही. विषमता ही देशात तशी सगळीकडेच आहे; पण तमिळनाडूमध्ये ती तुलनेने कमी वाटली. 

   येथील राजकारणातील एक गोष्ट मात्र मला खटकते; ती म्हणजे नव्याने येत असलेली घराणेशाही. सध्याचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी आपला वारसदार म्हणून आपले पुत्र उदयनिधी यांचे नाव जाहीर केले आहे आणि त्यांना उपमुख्यमंत्री बनवलेदेखील आहे. याला पुरोगामी समजल्या जाणाऱ्या सत्तारूढ पक्षात कोणीच फारसा आक्षेप घेतल्याचेही माझ्यातरी वाचनात आलेले नाही. असो, देशाच्या इतर राज्यांत याहून वेगळे काही घडत आहे असे नाही.    

   तमिळ नेत्यांना अधिक स्वायत्तता हवी आहे हे नक्की. परराष्ट्रधोरण, संरक्षण आणि तशी तीन-चार इतर क्षेत्रे सोडून इतर सर्व बाबतींत केंद्राचा हस्तक्षेप कमीत कमी असावा असे त्यांना वाटते. त्यांच्या मते उत्तर भारतापेक्षा ते अधिक प्रगत आहेत; अधिक स्वायत्तता मिळाल्यास त्यांचा आजही देशात पहिल्या पाचांत असलेला विकासदर आणखी जास्त असेल. लोकसभेच्या मतदार संघांची २०२६ साली पुनर्रचना होणार आहे आणि त्या वेळी दक्षिण भारतीय खासदारांची टक्केवारी उत्तर भारतीय खासदारांपेक्षा बरीच कमी होईल असेही त्यांना वाटते; दक्षिण भारतातील राज्यांनी आपली लोकवस्ती नियंत्रणात ठेवली यामुळे जणू त्यांचा तोटाच होणार आहे! पण अधिक स्वायत्तता हवी आहे म्हणजे त्यांना भारतापासून फुटून निघायची इच्छा आहे असे मात्र अजिबात नाही. मला तरी ती भावना इथे कधीच आढळली नाही.

   तमिळ लोकांच्या मनात हिंदीद्वेष आहे हाही गैरसमज असावा. कदाचित एके काळी तसे असेलही; पण मला तरी तसे कुठे दिसले नाही. तमिळ भाषा हिंदीपेक्षा खूप प्राचीन आणि श्रेष्ठ आहे ही भावना इथे आहे; पण याचा अर्थ हिंदीचा त्यांना द्वेष वाटतो असे नाही. हिंदीला जो विरोध आहे तो केवळ उत्तर भारतीय आपल्यावर ती सक्तीने लादत आहेत या भावनेमुळे. पण सक्तीचा भाव नसेल तिथे, म्हणजे दैनंदिन जीवनात, लोक थोडेफार तरी हिंदी नक्की बोलतात.  

   हे खरे आहे की अयोध्या येथील राममंदिरात रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना १८ जानेवारीच्या गुरुवारी झाली ती घटना देशभर टीव्हीवर आणि लोकांच्या चर्चेत जितकी गाजत होती, तशी ती इथे मात्र गाजत नव्हती; त्या मानाने मी आलो तेव्हाचा पोंगल इथे जास्त जोरात साजरा झाला होता; पण अन्य देशापासूनचे तमिळनाडूचे एके काळचे तुटलेपण आता नक्कीच कमी झाले आहे. मे २०२३ मध्ये भारताच्या नव्याने उभारलेल्या लोकसभेत सेंगोल (राजदंड) ठेवला गेला हे मला महत्त्वाचे वाटते. पाच फूट लांबीचा आणि दोन इंच व्यासाचा तो सुवर्णमंडित राजदंड भारत स्वतंत्र झाला त्या वेळी तंजावरमध्ये बनवला गेला होता आणि पंडित नेहरूंना तेथील तमिळ धर्मगुरूंनी भेट दिला होता. अनेक वर्षे तो अलाहाबाद येथील आनंदभुवनमध्ये पडून होता. चोला राजांच्या वेळी न्यायाने चालणाऱ्या शासनाचे ते प्रतीक मानले जाई. पण १९४७ साली त्याचे महत्त्व तत्कालीन राज्यकर्त्यांना जाणवले नव्हते. आता मात्र त्याचे महत्त्व जाणून त्याला देशाच्या लोकसभेत सभापतींच्या शेजारी मानाचे स्थान दिले गेले आहे. उत्तर व दक्षिण भारत अधिकाधिक जवळ यावेत या दृष्टीने ते प्रतीकात्मक पाऊल उपयुक्त आहे. 

   ज्याला आपण सामान्यतः भारतीय संस्कृती म्हणतो तिची जपणूक तमिळनाडूमध्ये अन्य भारतापेक्षा अधिक कसोशीने झालेली आहे असे म्हणता येईल. शाळेत पहिली ते चौथी सगळ्यांना संगीत हा विषय आहे. मुलींना भरतनाट्यमदेखील शिकवले जाते. त्यांतील बऱ्याच जणी ‘अरंगेत्रम’पर्यंत प्रगती करतात.  ‘अरंगेत्रम’ म्हणजे त्या नृत्यशिक्षणाची परिपूर्ती मानले जाणारे आणि गुरूच्या उपस्थितीत जाहीर कार्यक्रमात सादर केले जाणारे नृत्य. गेली पन्नास-साठ वर्षे मूलतः नास्तिक अशा डीएमके पक्षाची सत्ता तमिळनाडूमध्ये आहे आणि तरीही या राज्याच्या कानाकोपऱ्यात तुम्हांला देवळे (आणि मशिदी व चर्चेससुद्धा) दिसतील आणि तिथे होणाऱ्या धार्मिक विधींना समाजाच्या सर्व स्तरांतील लोकांची बऱ्यापैकी उपस्थिती असते. आयटीमध्ये उच्चपदी असलेल्या इंजिनियर कविता कल्याणने हिंदू पुराणांचाही सखोल अभ्यास केला होता. इथल्या एका प्रसिद्ध हॉटेलात आम्ही जेवायला गेलो होतो तेव्हा फोंदूसारखी दुर्मीळ  व महागडी स्विस डिश आम्हांला खायला मिळाली आणि त्याच वेळी भिंतींवर रंगवलेले कृष्णाच्या आयुष्यातील अनेक प्रसंगही बघायला मिळाले. अनेक विख्यात कंपन्यांचे सर्वोच्च तमिळ अधिकारी रोज पूजा करतात, कपाळावर गंध लावतात आणि त्याच वेळी कोट्यवधी डॉलर्सचे आंतरराष्ट्रीय व्यवहारही व्यवस्थित करतात. परंपरा आणि आधुनिकता तमिळनाडूमध्ये सहजगत्या एकत्र नांदतात.

लेखात चेन्नई महाराष्ट्र मंडळात झालेल्या मुलाखतीचा उल्लेख आहे. ती मुलाखत पाहायची असल्यास त्याचा दुवा खालीलप्रमाणे :      

Author

One thought on “तमिळनाडू : परंपरा आणि आधुनिकता  

Leave a Reply