| द्वितीय महायुद्धाच्या विध्वंसक परिणामांनंतर जर्मनी व जपान या दोन्ही देशांची स्थिती अत्यंत बिकट झाली होती. त्यांची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली होती, संरचना नष्ट झाल्या होत्या आणि त्यांची प्रतिष्ठा धुळीस मिळाली होती. या परिस्थितीतून उभारी घेऊन या दोन्ही देशांनी केलेले पुनरुत्थान हे आधुनिक इतिहासातला एक महत्त्वाचा अध्याय आहे.जर्मनीने नवीन तंत्रज्ञानावर भर दिला आणि ऑटोमोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स आणि रसायनशास्त्र या क्षेत्रांत प्रगती केली. जर्मनीत होणारी जागतिक प्रदर्शने हा हे तंत्रज्ञान जगाला विकण्याचा एक मार्ग होता. ह्या प्रदर्शनांचे स्वरूप कसे होते ते या टिपणातून समजून येईल. : संपादक . |
गोष्ट आहे १९६५ सालची. त्या वेळी मी ४-५ महिने आमच्या कंपनीच्या कामासाठी हॅंबुर्गला राहिलो होतो. जानेवारी ते मार्च कडाक्याच्या थंडीत गेल्यावर एप्रिल महिना आला म्हणजे जर्मनीत थंडी खूप कमी होत जाते व त्यामुळे औद्योगिक प्रदर्शने सुरू होतात. हॅनोव्हर येथील औद्योगिक प्रदर्शनतर फार प्रसिद्ध. माझा मित्र कुर्टला आल्सलेबनला या प्रदर्शनाचे बोलावणे आलेले होते व त्याच्याजवळ पास होते. मग काय! ठरले हॅनोव्हरला जायचे. आमचे दुसरे ज्येष्ठ फोरमन हेर फ्रांक्ले हेही येणार होते. हॅंबुर्ग हॅनोव्हर ऑटोबान आहे. तो तर युद्धाचे आधीच बांधला गेला. यामुळे उत्तम स्थितीत! व तिथपर्यंतच्या प्रवासाला फार वेळ लागत नाही, मग सकाळी लवकर जायचे व संध्याकाळी उशिरा परत यायचे म्हणजे तेथे मुक्काम करावयाचा नाही असे ठरले.
आमच्या दोन गाड्या जाणार होत्या. एक कुर्टची व दुसरी फ्रांक्ले यांची. त्या वेळी प्रदर्शनात भाग घेणाऱ्या कंपन्या येण्याचे निमंत्रण देत व त्यासाठी आधीच पासेस पाठवत. एरवी प्रदर्शनास जाण्यास तिकीट लागत असे; पण पास असल्यावर प्रवेश विनासायास असे. फ्रांक्ले यांची त्यावेळची प्रसिद्ध बीटल म्हणजे VOLKS WAGEN गाडी होती. या गाडीचा इतिहास वेगळाच आहे. हिटलरने मोठे हमरस्ते बांधले अर्थात ते सैनिकी ताफे जलद हलविण्यासच होते; पण लोकांसाठी काही करतोय असे दाखविण्यास बीटल ही गाडी काढली गेली. अगदी छोटी – पती, पत्नी, दोन मुले यांना पुरेशी. त्याचे इंजिन मागे व गाडी लहान असल्याने पार्किंगला सोयीची. ही गाडी पुढे बरीच वर्षे चालली व शेवटी ती ब्राझीलमध्ये तयार होऊ लागली. आम्ही एकूण ५ जण होतो. सकाळी नाश्ता झाल्यावर कुर्ट आला व आम्ही निघालो. मोठा रस्ता असल्याने व वेगावर नियंत्रण नसल्याने फक्त छोटासा थांबा घेतला. विश्रांतिस्थानावर हॉटेलही होते. फक्त अडीच तासांत आम्ही पोहोचलो.
हेर फ्रांक्ले व मी प्रवास करताना कुर्टचे गाडीजवळ
युद्ध समाप्त झाल्यावर अगदी काही वर्षांतच हॅनोव्हर प्रदर्शन भरू लागले. जर्मनीला विकास जोरात करावयाचा होता त्यामुळे व्यापार वाढविणे जरूर होते. या प्रसिद्ध प्रदर्शनास जगातील खूप देशांतून उद्योजक आपले उत्पादन दाखविण्यास येत. जेथे प्रदर्शन भरते ती जागा प्रचंड मोठी आहे. त्या वेळी प्रदर्शनासाठी काही दिवसांपुरती तात्पुरती बांधकामे बांधली जात; पण नंतर येथे कायमच्या मोठ्या इमारतीच बांधल्या गेल्या आहेत; त्यामुळे सर्व सोय असतेच. बहुतेक सर्वजण गाडीने येणार; त्यामुळे काही हजार गाड्यांची पार्किंगची सोय होती. इतक्या मोठ्या प्रमाणावरचे प्रदर्शन बघण्याचा मला हा मोठा योगच होता. जर्मनीत या प्रमाणे आणखीही काही शहरांत अशी प्रदर्शने भरतात व त्यांना प्रचंड प्रतिसाद असतो. आम्ही गाड्या पार्क करून पास दाखवून आत गेलो. मला रासायनिक उत्पादनासाठीचे प्लांट बघण्यात रस होता. या प्रदर्शनात इंजिनियरिंगच्या सर्व शाखांचा समावेश असतो; त्यामुळे शोधून काढावे लागते. वेळही कमी असतो. त्या वेळी टेलिफोनी फार प्रगत नव्हती. साधे टेलीफोन वापरले जात. संगणक तर नव्हतेच; त्यामुळे e हा प्रकार नव्हताच. मोठमोठ्या मशीन्स मोकळ्या जागेवर ठेवून प्रात्यक्षिके दाखवली जात होती. बांधकाम क्षेत्रात त्या वेळी चलती होती. रस्ते व पूल बांधण्यासाठीची अवजारे, क्रेन्स इत्यादी. माझ्या खालील फोटोवरून ते दिसेलच. स्टॉलवर लोकांशी चर्चा करण्यास केबिन असत, लिहिणे मात्र नेहमीच्या पद्धतीने. टेलिफोन हेच जास्तीत जास्त दळणवळणाचे साधन व ते त्या वेळी फार पुढे गेलेले नव्हतेच. आम्ही आमचे स्टॉल शोधून काढले; कारण पासवर नकाशा होताच. त्या वेळी पर्यावरण संरक्षण हा फार मोठा विषय नव्हता. नुकती कुठे सुरुवात झाली होती. या प्रदर्शनात जपानी स्टॉलही होते. जपानलाही युद्धाची झळ बसली होती; पण तेही पुढे चालले होते. मी मला लागणारी माहितीपत्रके जमविली. बरीच माहिती करून घेतली याचा मला पुढे खूप उपयोग झाला. तरुण वयात जगातील प्रसिद्ध व प्रगत तंत्रज्ञान बघण्याची मजा औरच.
प्रदर्शनात रेस्तोरांची सोय होती. त्यामुळे दुपारचे जेवण तेथेच घेतले. एकूणच अशी प्रदर्शने बघून बरीच माहिती मिळते याची खातरी झाली. भारताचा स्टॉल कोठे आहे हे बघितले. तो सापडला. तेथे हस्तकलेच्या वस्तू, गालिचे, मसाल्याचे पदार्थ, चहा इत्यादी होते. त्या वेळी भारत तांत्रिक बाबतीत नुकतीच सुरुवात केलेला देश त्यामुळे फारसे तांत्रिक स्टॉल्स नव्हते. माझ्यासारख्या तरुण तंत्रज्ञास अशी प्रदर्शने बघून फार चांगली माहिती मिळाली. त्या वेळी भारतात अशी प्रदर्शने होणे शक्यच नव्हते. आपला देश सोडल्याशिवाय जगात काय चालले आहे ते त्या काळी कळणे इतके सोपे नव्हते. दळणवळण इतके प्रगत नव्हते. माहिती मिळवण्यास फार थांबावे लागे व तीही पुरी मिळेल याची खातरी नसे. परदेश तर सोडाच स्वदेशातीलही माहिती मिळवणे त्या काळी फार जिकिरीचे होते. देशांतर्गत प्रवासही फार होत नसे; कारण प्रवास म्हणजे खूप वेळ हे समीकरण होते. अशी परिस्थिती असताना जागतिक प्रदर्शन बघावयास मिळणे ही एक पर्वणीच होती असे म्हटले तर फारशी अतिशयोक्ती ठरणार नाही. एकूणच त्या वेळची तांत्रिक प्रगती आजच्या मानाने काहीच नाही असेच म्हणावे लागेल; पण जुन्या आठवणींची मजा न्यारीच.
अर्थात प्रगतीला दोन बाजू आहेत. एक मनुष्याला उपयोगी व दुसरी चंगळवादासाठी. सध्या ती दुसऱ्या प्रकाराने फार मोठ्या प्रमाणात होत आहे, हे खेदजनक आहे. आता साठ वर्षांनी मला वाटते, की त्या वेळी जर्मनीची जी प्रगती होती तीही आत्तापर्यंत आपल्याला जेमतेमच गाठता आली आहे. १९९१ पर्यंत फक्त परमिट राज्य चालवून तथाकथित चांगल्या साम्यवादाची कास धरली गेली. अर्थात हे परमिट राज फारसे उपयोगी पडले नाही हे तर सिद्ध झाले आहे. नंतर मात्र भारताची प्रगती होऊ लागली ही गोष्ट वेगळी व ती अशीच चालू राहो हीच इच्छा !
मी जेवढे काही बघता येईल तेवढे बघून घेतले, संध्याकाळी थोडे उशिरा घरी पोहोचले तर मला ते चालण्यासारखे होते. जर्मनीत ACHEMA म्हणूनही फार मोठे प्रदर्शन फ्रँकफुर्टला तेथील उन्हाळ्यात भरते; पण ते दर ३ वर्षांनी व साधारण जून महिन्यात असते. मला अर्थात त्या वेळी हे शक्यच नव्हते. सर्वजण नंतर एकत्र आल्यावर निघालो. येतानाही फारसा वेळ लागला नाही. कारण त्या वेळी जर्मनीत शनिवार व रविवारी मालवाहतुकीच्या ट्रक्सना मोठ्या हमरस्त्यावर परवानगी नव्हती. हे चांगले होते.
लेखक क्रुपचे स्टॉलजवळ
२०२४ सालच्या याच प्रदर्शनाची एक झलक :
मा.वि. वैद्य
निवृत्त कार्यकारी संचालक बहुराष्ट्रीय कंपनी पुणे
