गाव करी ते राव न करी

हिवतर गाव – एका अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी म्हणजे शुकाचार्यांच्या डोंगरापासून चार किलोमीटरवर  असलेले एक गाव. पावसाळा चालू असल्याने हिरवेगार. रस्त्याच्या दुतर्फा मका, ऊस आणि झेंडूचे मळे.  गावाचा उंबरा १०० ते १२०. प्रत्येक घरात शेळ्या, मेंढ्या, गाई,म्हशी.  फुलांनी भरलेली जास्वंद,  पानागणिक लागलेली सीताफळे  लक्ष वेधून घेत होती.  दारात छोटेखानी मांडव घातला होता. लायगर  नावाचा एक भला मोठा अल्सेशियन  कुत्रा या सर्वांवर नजर ठेवून होता.

  घरातला छोटा बाहेर येऊन आम्हांला म्हणाला, “तुम्ही घाबरता म्हणून आमच्या लायगरला  बांधून ठेवायला लागलंय बघा.  आमची गाय शिंगा मारते.  त्यामुळे ती तुम्हांला काय नेता येणार नाही बरं  का! आमच्या  इनामात डाळिंबी हायेत, टमाटी, मिरची, कांदा,लसूण समदं हाय.” 

मी चेष्टेने विचारलं त्याला, “यांतले  आम्हांला काय काय मिळणार आहे?”

 संभाव्य धोका ओळखून तो म्हणाला, “टमाटी भाजी करून संपली आहेत आणि डाळिंब नुकतंच  फवारलंय बगा!” 

      अशा शेतकरी कुटुंबामध्ये डोहाळे जेवणाचा कार्यक्रम नेहमी दुपारी एकनंतर असतो असे तेथील यजमानीणबाईंनी सांगितले.  सकाळी शेतातली कामे आटोपून गावातल्या बायका कार्यक्रमाला येतात – त्यांची ही सोय.  नीटनेटक्या साड्या नेसून,  हातभर चुडे घालून,  पायांत  जोडवी, साखळ्या इत्यादी घालून नटूनथटून बायका कार्यक्रमाला आल्या होत्या.  त्यांच्या चेहऱ्यावरती कष्टाचे एक वेगळे तेज दिसत होते. प्रत्येकीने आपापल्याबरोबर ओटीचे सामान आणले होते.  त्यात साडी, खण, नारळ, शिवारातली केळी, पेरू, सीताफळ असा रानमेवा असं सगळं घेऊन त्या आल्या होत्या.  दुपारी दीडच्या सुमारास कार्यक्रम सुरू झाला. मोठमोठ्या पाट्यांमध्ये पुरणाची पोळी, बाजरीची भाकरी, धपाटे, कानवले, लाडू, जवस – कारळ्याची  चटणी, आंब्याचे लोणचे, मटकीची उसळ, चकली, लाडू असे मांडून ठेवले होते.  इकडे ओटी भरण्याचा कार्यक्रम चालू असताना एका मोठ्या  पाटीत  आलेल्या साड्या ठेवल्या जात होत्या.  टोपी, टॉवेल, पंचा वेगळ्या पाटीत  ठेवला जात होता.  पाट्या म्हणजे मोठमोठी घमेलीच. पहिल्या पाच जणींच्या ओट्या भरून झाल्यानंतर समोर मांडण्यात आलेल्या शिदोरी किंवा बुत्तीमधले जिन्नस आलेल्या सर्व बायकांना वाटण्याचा कार्यक्रम सुरू झाला. हे वाढपसुद्धा एका विशिष्ट पद्धतीने होत होते.  प्रथम पोळी, त्यावर पुरणाची पोळी, त्यावर बाजरीची भाकरी, त्यावर धपाटे, धपाट्यावर मटकीची उसळ, दोन चटण्या, लोणचे कडेला चकली, कानोला आणि लाडू.  वाढपात कोठेही प्लास्टिकचा फारसा  वापर नव्हता.  अशा प्रकारे तयार झालेली शिदोरी प्रत्येक महिलेच्या हातात दिली जात होती. 

       आता थोडे शिदोरीविषयी सांगते.  यजमान बाईंच्या घरी गेले तीन दिवस रोज दुपारी वावरातल्या सर्व बायका एकत्र येत होत्या.  त्या सर्वजणी मिळून हे सर्व पदार्थ रांधत होत्या.  काही जात्यावर दळून, काही गिरणीतून आणून सगळ्यांनी मिळून ही शिदोरी तयार केली होती.  त्यामुळे प्रत्येकीच्या हाताची चव व प्रेम त्यात उतरले होते.  मला असे वाटते की या बारीकसारीक गोष्टी आपल्याला खूप काही शिकवून जातात.  समाज बांधून ठेवायची प्रचंड ताकद या उपक्रमांमध्ये असते.  गावगाडा म्हणजे काय त्याचे हे साक्षात प्रात्यक्षिक. ही शिदोरी खाऊन झाल्यानंतर मधल्या काळात मी तुम्हांला सांगितल्याप्रमाणे अहेराचा  कार्यक्रम झाला.  आलेला अहेर पाट्यांमध्ये एकत्र झाला.  घरातल्या यजमानीणबाईंनी दोन सुनांना आलेल्या पाहुण्यांना हळदी -कुंकू लावून ओटी भरण्याचे फर्मान काढले.  आता खरी गंमत आहे.  पाट्यात गोळा झालेल्या आलेल्या अहेरामधूनच  प्रत्येकीला सरसकट साडीचा परतीचा आहेर दिला जात होता. ही अत्यंत कल्पक व नावीन्यपूर्ण कल्पना पाहून मी अवाक झाले. कुठलाही रुसवा फुगवा या प्रकारात नव्हताच.  आमच्या गावाची ही रीतच आहे – आलेला अहेर  आणि शिदोरी अशा प्रकारे वाटायचा. या सर्व कार्यक्रमात चार कधी वाजले कळलेच नाही.  आम्ही सर्वजण या कार्यक्रमाच्या आनंदात मश्गूल  झालो होतो.  चार वाजता पत्रावळ्या घेऊन बायकांची पंगत बसली.  आश्चर्य म्हणजे पंक्तीत वाढण्याचे काम  पुरुष करत होते. गरम गरम  पदर सुटलेल्या पोळ्या,  डाळ, छोटे बटाटे वडे, मसालेभात, लोणचे, मटकीची उसळ, पनीरची भाजी  असा अत्यंत रुचकर बेत होता. पनीरची भाजी नेहमीच्या पंजाबी पद्धतीने न करता गावाकडच्या खास पद्धतीने केली होती.  सर्व अन्नाला एक आगळीवेगळी चव होती. असे एकदम हट के डोहाळेजेवण माझ्या पाहण्यात पहिल्यांदाच आले. येथे श्रीमंतीचे प्रदर्शन नव्हते; तर होता आपुलकीचा ओलावा.  सगळे गाव एकत्र येऊन गावच्या लेकीचे कौतुक करत होते.  गावकरी मंडळी पेशाने शेतकरी होती; परंतु जवळपास सर्व कुटुंबांत पदवीधारक होते;  त्यांतले काही नोकरीनिमित्त शहरात स्थायिक झाले होते; तरीही गावाची व शेतीची नाळ त्यांनी कायम ठेवलेली जाणवत होती.  याच गावात ‘एक गाव एक गणपती’ ही संकल्पना राबवली जाते ही माहितीदेखील चर्चेदरम्यान समजली.    

गाव करी ते राव न  करी म्हणजे काय ते आज समजले ! 

Author

Leave a Reply