कूटकाव्य : उत्तरे

१)उत्तर : फुलातला/कमळातला  मध प्यायला बसलेला भुंगा. 

पाकळ्या मिटल्याने ज्यात जेवत होता त्याच पात्राने त्याला गिळलं. 

 २)पहिली ओळ : सह्याद्री पर्वताची कन्या म्हणजे नदी, तिचा पती  समुद्र, त्याचा सुत म्हणजे चंद्र, त्याची ललना म्हणजे रात्र जेव्हां यौवनात येते,  (म्हणजे मध्यरात्री )

दुसरी ओळ : रामाची स्त्री (सीता), तिच्या नावातला काना काढून टाकला तर उरतं ‘सीत’ (म्हणजेच, शीत (संस्कृत)  म्हणजे गारठा, आम्हांला त्रास देतं सारांश, आम्हांला खूप थंडी वाजते! 

तिसरी ओळ : हत्तींच्या समुदायाचा अन्तक (अंत करणारा) असा सिंह, ज्याचे फक्त मुख असलेला म्हणजे नरसिंह – त्याचा शत्रू म्हणजे  हिरण्यकश्यपू, त्याच्या नावातला पूर्वार्ध म्हणजे हिरण्य, म्हणजे सोनं  आमच्याकडे नाही. ( आम्ही गरीब आहोत.) 

चौथी ओळ :  म्हणून क्षमेची (पृथ्वीची) मुलगी म्हणजे  सीता, तिचा शत्रू रावण त्याचा धाकटा भाऊ म्हणजे कुंभकर्ण, त्याची  सखी म्हणजे झोप झोप येत नाही.

सारांश :  मध्यरात्री खूप थंडी वाजते. , आमच्याकडे (उबदार कपडे घ्यायला)  पैसे नाहीत म्हणून आम्ही  कुडकुडत बसलो आहोत.

३)अलि म्हणजे भुंगा त्याचे वहन म्हणजे कमळ त्याचे वहन म्हणजे पाणी आणत होते. ज्याच्या डोईवर चंद्र आहे अशाच्या  म्हणजे शंकराच्या वहनाने म्हणजे बैलाने मार्गात ताडिले. नदिपति म्हणजे समुद्र ज्याचा शत्रू तो अगस्ती. त्याचा तात म्हणजे पिता… अगस्तीचा जन्म कुंभातून झाला होता. अगस्तीचा तात म्हणजे तो कुंभ – मडकं भंगलं आणि रविसुत म्हणजे सूर्याचा मुलगा कर्ण त्या कुंभाचा कान महिसंगे – जमिनीवर तुटून पडला. 

४)८५+९+२ शहाण्णव सोंगट्यांच्या पटाची घरे, १६ वधू म्हणजे सोंगट्या, ३ रिपू म्हणजे पट्टे, केला वधू म्हणजे वध केला – मारलं

५)चार चंद्र =रामचंद्र, सीतामुखचंद्र, चंद्र, चंद्रहार

रावणास हृदयीं धरले यात रावण या शब्दाचा अर्थ पदर. 

 ६)रामा म्हणजे कोकिळा 

यम म्हणजे कावळा

सूर्या म्हणजे कावळी

कोकिळेचा पिता आणि कावळ्याचा पिता हे दोन भाऊ. कावळी( सूर्या) यमाची(कावळ्याची) आई

सूर्याचा – कावळीचा पुतण्या – यमाला(कावळ्याला) म्हणतो मी तुझा बाप आहे.

शब्दांचे शुचि शातकुंभ शिपणे शोभे शुभाशारदा 

साहित्यासमवेत संकलनही  संगीतसंपन्नता

रोगज्ञानहि राजकारण रसास्वादार्थ  रेखाटने

नेमे नित्य नवाच ‘नाद’ निघतो नावा नरऽ नोळखे?

७)सुवर्णासारखे झळझळीत शब्द, जुन्या गोष्टींचं संकलन, संगीत, रोगज्ञान, देशविदेशांतील राजकारण, रेखाटने अशा विविध साहित्याने नटलेला 

‘अंतर्नाद अंक’

संकलन, रचना

सुषमा जोशी 

Author

Leave a Reply