कूटकाव्य
ही कोडी आहेत वृत्तबद्ध, संस्कृतप्रचुर.
म्हटलं तर अवघड; पण मजेशीर.
विठ्ठल कवी सहा महिन्यांत कोडी सोडवायला सांगतो. अंतर्नादच्या रसिक वाचकांना एवढा वेळ नक्कीच लागणार नाही.
करा बघू प्रयत्न…
( उत्तर इतरत्र)
(टीप : पुस्तक जीर्ण झाल्याने काही ठिकाणी शब्द दिसत नाहीत; तिथे जागा सोडली आहे. कोडं सोडवताना त्या न कळणाऱ्या शब्दांची गरज भासत नाही.)
१)शार्दूलविक्रीडित
कोणे एक वनीं विचित्र पुतळा जेवावया बैसला
पात्रीं जेवण जेवितां, अति बळें पात्रेंचि तो भक्षिला
त्याची जे वनिता वनांत फिरतां सूर्यास प्रार्थी सदा;
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मासिंचा वायदा||
२)स्रग्धरा वृत्त
येते सह्याद्रिकन्यापतिसुतललना यौवानामाजिं जेव्हां
रामस्त्रीनामकाना त्यजुनि उरत जे पीडिते फार आम्हां
हस्तिहस्तेन्द्रवृन्दान्तकमुखरिपुचे नामपूर्वार्ध नाही
यालागी क्षमासुतेषां अरिअनुजसखी स्वल्पहि येत नाही
३)मालिनी वृत्त
अलिकुल वहनाचे वहन आणीत होते
शशिधर वहनाने ताडिले मार्गपंथें
नदिपति रिपु ज्याचा तात भंगोनि गेला
रविसुत महिसंगे फार दुःखित झाला.
४)शार्दूलविक्रीडित
पंचाय्शीं नव दोन गृह नवरा
त्यामाजि सोळा वधू
त्यामागे रिपु तीन तीन … त्या त्यांत केला वधू
याचा अर्थ करा तुम्ही चतुर हो थोडी असे आपदा
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा षण्मासिंचा वायदा
५)शार्दूलविक्रीडित
चारी चंद्र समान भूतलवटीं एके दिनीं देखिले
रामासन्मुख रावणासि हृदयीं सीता धरी आदरें
हे तो चित्र विचित्र… बरवें वर्तत आसे सदा
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा ष्णमासिंचा वायदा
६) शार्दूलविक्रीडित
रामाचा जनिता तथा यमपिता हे दोन बंधू कसे?
सूर्याची भगिनी यमाचि जननी हें नातें ऐसें कसें?
सूर्याचा पुतण्या यमासि म्हणतो मी बाप तूझा सदा;
बोले विठ्ठल हा पदार्थ उमगा ष्णमासिंचा वायदा
७)शार्दूलविक्रीडित
शब्दांचे शुचि शातकुंभ शिपणे शोभे शुभाशारदा
साहित्यासमवेत संकलनही संगीतसंपन्नता
रोगज्ञानहि राजकारण रसास्वादार्थ रेखाटने
नेमे नित्य नवाच ‘नाद’ निघतो नावा नरऽ नोळखे?
