मधमाश्यांची गुणगुण, गाईचे वासराला चाटणे, मोराचे नाचणे, सापाचे फुत्कार करणे, लाजाळूचे लाजणे, ट्रॅफिकच्या सिग्नलचे दिवे, शाळेची घंटा, इंजिनाची शिट्टी, कंडक्टरचे चिमटा वाजवणे या आणि अशा कितीतरी गोष्टी काही ना काही कोणाला तरी सांगत असतात. याखेरीज करपल्लवी, देहबोली या परीनेही आपण बोलतो. म्हणजेच अशा अनेक भाषा असतात. अगदी ‘शब्देविण संवादू’ घडवू शकणाऱ्या अनेक भाषा चराचरामध्ये सतत व्यवहारात असतात. त्या माणसांमध्ये असतात तशाच वनस्पती, प्राणिजगतातही असतात. भाषा संस्कृतीच्या अनेक संकेतांनी घडवलेल्या असतात; तरीही आपण सामान्यपणे भाषा म्हणतो, ती शब्दांनी, वाक्यांनी नावारूपाला येते आणि दोन व्यक्तींमध्ये परस्पर सामंजस्याने अर्थवहन करते. त्यातील अर्थाचे सूचन हे बोलणाऱ्या आणि ऐकणाऱ्या व्यक्तींमधील पूर्वसंमत सामाजिक संकेतांद्वारे घडत असते म्हणूनच दोन मराठी व्यक्ती ‘झेंडा’चा जो अर्थ समजतील तोच अर्थ समजण्यास दोन इंग्रजी व्यक्ती ‘फ्लॅग’ शब्द वापरतील. हे पूर्वसंकेत प्रत्येक भाषेमध्ये पिढ्यान् पिढ्यांचा, शतकानुशतकांचा वारसा म्हणून वापरले जातात. त्यात क्वचितच काही बदल होतात. काही नव्या संकेतांची भर पडते; तर काही संकेत कालबाह्य होऊन वापरातून बाजूला पडतात. उदाहरणार्थ : ज्ञानेश्वरांच्या किंवा शेक्सपियरच्या काळाची मराठी किंवा इंग्रजी भाषा आज पूर्णांशाने जशीच्या तशी वापरली जात नाही; तरीही त्यांच्यासारख्या सारस्वतांचा आजच्या मराठी व इंग्रजी भाषेच्या घडणीवर मूलगामी असा प्रभाव आहेच. भाषाशास्त्रांचे अभ्यासक शब्दा-वाक्यांच्याही अलीकडे प्रत्येक शब्दाच्या उच्चारणामध्ये जे ध्वनिसमूह एकवटतात त्यांचाही अभ्यास करतात. आपल्याकडे न्याय या तत्त्वप्रणालीनुसार ईश्वरेच्छेमुळे त्या त्या ध्वनिसमूहातून अर्थबोध होतो, असं समजलं जातं. वैयाकरणवादींनी शब्द, अर्थ आणि बोध यांच्या संकरातून संकेत-अर्थ निपजतो, असं प्रतिपादन केलेलं आहे. असे संकेत अर्थ रूढ होत जाऊन भाषेला स्थिरपणा येतो. रोजच्या व्यवहारांमध्ये आपल्याला एखाद्या शब्दाच्या अर्थाबाबत शंका कुशंका घेण्याचं काही कारण नसतं. जेव्हा आपण ‘खुर्चीची पाठ’ किंवा ‘टेबलाचे पाय’ असे शब्दप्रयोग करतो तेव्हा त्यांचा अर्थ रूढ – रुळळेलाच असल्यामुळे ते शब्द रूपकाश्रयी असूनही तसे वाटत नाहीत; पण एखाद्या कवितेत ‘चांदण्यांचे हात’ किंवा ‘कळ्यांचे निश्वास’ असे कवी म्हणतो, तेव्हा मात्र आपण सावध होतो.
रोजच्या व्यवहाराची भाषा ठरावीक शब्दांनी, वाक्यांनी निश्चित स्वरूपाचं अर्थवहन करीत असते; तर साहित्य आणि काव्याच्या भाषेवर ती घडवणाऱ्या लेखक-कवींच्या विचारप्रणालींचा, भावभावनांचा एक व्यक्तिविशिष्ट असा ठसा असतो. त्यांच्या शब्दा-वाक्यांच्या घडणीत कधी अनपेक्षितता असते; तर कधी वैशिष्ट्ये, कधी श्लेष असतो; तर कधी धूसरपणे अनेक अर्थ एकाच वेळी प्रतीत होतात. आपल्या साहित्यशास्त्रामध्ये अभिधा, लक्षणा आणि व्यंजना शक्तींवर भर दिला जातो. उदाहरणार्थ : आपण एखाद्याचे डोळे वाहू लागले असे न म्हणता ‘डोळ्यांतून गंगा यमुना वाहू लागल्या,’ असे म्हणतो तेव्हा लक्षणेचा वापर करतो आणि ‘डोळ्यांतील गंगा-यमुनेमध्ये गाव वाहून गेले,’ असे म्हटले तर नुसते दुःखच अभिव्यक्त न होता त्या दुःखाची – एखाद्या व्यक्तीवर होणाऱ्या परिणामाचीही त्यात व्यंजना होते. असे परिणाम साधण्यासाठी भाषेला वहिवाटीचा धोपट मार्ग सोडून आडवाटा शोधाव्या लागतात. त्यातूनच विविध अलंकार आणि वृत्ते निपजतात; म्हणूनच तुकोबामधला कवी ‘मनाच्या तळमळे चंदनेही अंग पोळे’ अशा शब्दांतून विरही अवस्थेचे उत्कट वर्णन करून जातो किंवा ‘नाही काष्टाचा गुमान,गोवि भ्रमरा सुमन’ यातील भ्रमराचा दृष्टांत आणि ‘सुमन’वरील श्लेष आपण उलगडून दाखवतो तेव्हा आगळा सौन्दर्यबोध होतो.
भगवद्गीतेमध्ये चौथ्या अध्यायामध्ये कवी हा शब्द ‘तत्त्वज्ञ’ या अर्थाने योजला आहे; तसेच आयुर्वेदामध्ये ‘चिकित्सक वैद्य’ या अर्थाने कविराज शब्द येतो यात फार मोठं तथ्य दडलेलं आहे. जीवनानुभवाचे निव्वळ कथन किंवा चित्रण कवितेला जन्म देत नाही; तर त्याला निसटतं का होई ना, काही इंगित, काही चिंतन स्पर्शले असेल तर ती कृती काव्य होते. भाषेच्या उपलब्ध पर्यायांपेक्षा ताजेपणाने नवनव्या वाटा शोधित शब्दांच्या वाक्यांच्या तार्किकतेला ओलांडताना भाषा ओसंडून येते, तेव्हा ती कृती गद्यात आहे, पद्यात आहे की मुक्तच्छंदात आहे हे पाहणे तुलनेने गौण ठरते. कवीच्या आशयाच्या आवश्यकतेनुसार ते ठरेल. ते किती लोकांना किती काळपर्यंत हृदयंगम वाटेल त्यावर त्या काव्यकृतीची श्रेणी, अक्षर साहित्यातलं तिचं स्थान ठरतं म्हणूनच बी कवी म्हणतात :
काव्य नव्हे शब्दांचा सुंदर नाद मधुर मेळ
अर्थ चमकृतीचाही नोहे डोंबारी खेळ
निसर्गसृष्टीची सादृश्ये नीतिपाठ भव्य
घाटदार थाटाची रचना केवळ नच काव्य
ऐश्वर्यात्मक सामर्थ्याची निर्माण क्षमता
अंतरंग ओथंबुन ओसंडे ती सुंदरता
केवळ सौंदर्याची स्फुरणे प्रस्फुरणे दिव्य
जिव्हार हेच स्वानंदाचे, सौंदर्याची काव्य
कवितेतून सौंदर्यबोध किंवा सौंदर्यप्रत्यय येणे हे तिच्या यशस्वितेचे गमक आहे असा बोध तांब्यांच्या ‘रुद्रास आवाहन’ या कवितेतल्या जोरकस रौद्र रसाच्या अभिव्यक्तीने होतो; तर मर्ढेकरांच्या
‘जशी पाप्याची नजर फिरावी
अनोळखीच्या उरावरुनी,
त्या साऱ्यांची भेकड वृत्ती
वावरते तशी जगण्यांमधूनी’
अशा ओळींतून उमटणाऱ्या कडवट जुगुप्सेनेही होतो. शब्दांचे त्रिविध गुण काव्याच्या प्राणतत्त्वाचे संवर्धन करतात आणि सौंदर्यप्रत्यय घडवतात. हे गुण म्हणजे माधुर्य, ओज आणि प्रसाद गुण. आशयाच्या आवश्यकतेनुसार ते भाषाशैलीतून आपोआप जाणवतात.
उदाहरणार्थ :
‘हिरवे हिरवे गार गालिचे,
हरित तृणांच्या मखमालीचे’
यासारख्या बालकवींच्या ओळी इंद्रियगम्य आल्हाद निर्माण करतात. त्यातील हिरवे, हिरवे, हरित यांतील द्विरुक्ती आणि वर्णानुप्रास, गार आणि मखमाली हे शब्द
नेत्रसुखद, स्पर्शसुखद हिरवळीचा हवाहवासा मधुर प्रत्यय रसिकाला देतात.
‘सकल चिंतामणी शरीर,
जरी जाय अहंकार आशा समूळ’
अशी तुकोबांची उक्ती प्रसादगुणांनी परिपूर्ण असते. प्रत्येक शब्दाला त्याचा म्हणून एक नाद असतो. तो कोणत्या संदर्भामध्ये वापरला आहे त्यानुसार एक किंवा अनेक ध्वनीही त्याच्याशी निगडित असतात. कवितेच्या ओळींना, कडव्यांना एक अंतर्गत अंतर्लय असते. ती लय आशयाचा ओघ अक्षुण्ण ठेवते. कवितेतील नाद आणि ध्वनी आशयाला संपन्नता, घनता देतात.
बोरकरांच्या अनेक कवितांतून असे जादूभरे भरलेपण अनुभवाला येते. उदाहरणार्थ :
‘फांदीसारखी झुकते सांज
जांभळासारखे पिऊन ढग,
हवेत गारवा जड होऊन,
पेंगुळ पांगळे होते जग,
गगन भरल्या आठवणींचे
गर्द झाडीत शिरती थवे,
ओला काळोख आळत येतो
उकत्या झाकत्या काजव्यांसवे’
यातील ढग – जग, थवे – सवे या यमकांखेरीज पहिल्या ओळीतील फां सां जां हे अनुस्वार, दुसरीतील पेंगुळपांगळे मधील ‘प’,’ळ’ आणि अनुस्वार, तिसऱ्या ओळीतला ‘ग’, चौथ्या ओळीतील ‘ळ’ या ध्वनींच्या वृत्तीतून ती गहिरी होत जाणारी.
पु. शि. रेगेंच्या अल्पाक्षरी शैलीमध्येदेखील हा नाद-विभ्रम चतुरपणे विणलेला आहे.
‘डोळ्यांमध्ये डोळ्यांपाशी
झननझांजरे
ओठांमध्ये
ओठांपाशी
ठिबकठाकडे
मानेखाली किंचित वक्षी
बहर बावरे
हे शब्द स्वच्छ उघडपणे काहीच सांगत नाहीत; तरीही समांतर नादप्रतिमांतून सुंदर प्रतिभावाची नादमधुर लय उलगडत जातात. त्यातून आपण एक नाट्यमय उत्सुकता अनुभवतो. केशवसुतांची ‘तुतारी’ किंवा बापटांचे ‘जिंकू किंवा मरू’ हे समरगीत ओजगुणांनी परिणामकारक ठरतात. प्रत्येक शब्दाला त्याचा म्हणून एक नाद असतो. तो कोणत्या संदर्भामध्ये वापरला आहे त्यानुसार एक किंवा अनेक ध्वनीही त्यांच्याशी निगडित असतात. या विवेचनातून एक मुद्दा लक्षात येतो की कवितेची भाषा असे काही ठोकताळे किंवा निष्कर्ष काढणे अशक्य आणि अनावश्यकही असते. काव्याच्या प्रकारानुसार भाषेची निवड, योजना आपोआप होत जाते.
पोवाडे, आख्याने या वर्णनपर नाट्यमय काव्यप्रकारांतील भाषेत दृश्यप्रतिमा अधिक असतील; तर गझल सुनीते भावकविता यांतून व्यक्त होणाऱ्या भावभावनांचा परिपोष करीत एकजिनसीपणाचा तरल प्रत्यय देण्याकडे भाषेचा कल असतो. ओवी, अभंग, साकीच्या भाषेत एक सूत्रमयता, सारमयता जाणवते; तर सामाजिक आशयाच्या कवितेतून थेट संवादाचा प्रत्यय, आवेशपूर्ण विधाने, उपरोधाने विचारलेले प्रश्न डोके वर काढतील. माडगूळकर, शांता शेळके, पाडगांवकर, भट यांची गीते- गजला सहजपणे कानावरती रेंगाळणारी शब्दकळा वापरतात. आरती प्रभू, ग्रेस यांसारखे कवी तीच भाषा वेगळ्या संदर्भांमुळे आडवळणात नेऊन गूढ-गंभीर प्रत्ययाने भारावून सोडतात. जुनेच पदबंध,वृत्ते वापरून मर्ढेकर नव्या आशयाच्या नागर प्रतिमांनी दचकवतात; तर सुर्वे, ढसाळांसारखे कवी रोखठोक भाषेतून माणसाच्या असण्याच्या कळीच्या प्रश्नाला हात घालतात. रजनी परुळेकरांसारखी एखादी कवयित्री भावकवितेचा नाजूक आशयही तार्किक प्रतिमांतून तटस्थपणे जाणवून देईल; तर यशोधरा साठे यांच्या कवितेतील ‘कमळ’ सगळ्या वैषम्यावर मात करून उरणाऱ्या सुंदर जिजीविषेचा प्रत्यय देईल; खरेतर हाताशी असलेली पूर्वसुरींनी कमावलेली आणि गमावलेली भाषा निरुपयोगी आहे, असेच प्रत्येक नव्या रचनेच्या काळात कवींना भासत असेल!
अलीकडच्या काळातील कवी भाषेविषयी अधिक सजग असले तरीही संशयमग्न वाटतात. मनातील जटिल भाव-विचारांचे संक्रमण अशक्यप्राय वाटावे असा एकटेपणा या नव्या कवींमध्ये जाणवतो. वाचकाशी संवादापेक्षा त्यांच्या प्रतिमा त्यांच्याच निर्मितिक्षम ‘स्व’शी बोलत असतात. ‘त्यातून वाचकापर्यंत नेमकेपणे काही पोहोचलेच पाहिजे असे नाही,’ असे त्यांचे म्हणणे पुरेसे खरे नाही. कविता काही निव्वळ डायरीतील नोंदी नाहीत; पण ज्या आत्मविश्वासाने केशवसुत ‘पद्यपंक्तीची तरफ आमच्या करी विधीने दिली असे,’ ‘आम्ही कोण म्हणुनि काय पुसता’ असे लिहीत होते तसा एकजिनसी आत्मप्रत्यय आताच्या जीवनसरणीमध्ये दुर्लभ झाला आहे; त्यामुळे विलास सारंगांसारखा एखादा कवी म्हणतो :
‘शब्दांना अर्थाची पर्वा नसते
शब्दांची पावलं उलटी पडतात
शब्दाने शब्द वाढतो
कवित्व सरलं तरी शब्द मागे उरतात’
किंवा एखादा सदानंद डबीर हळहळतो :
शब्द धावती आलिंगाया
तिज कवळाया
तेव्हा कोठे
पदर निसटतो येऊन हाती
दूर पुन्हा ती
तेव्हा कोठे
कवितेच्या भाषेला असे अनंतपदरांचे अनंताचेच वरदान लाभ लेले असते म्हणूनच कुसुमाग्रज म्हणतात
‘काव्याच्या या विरहकाळी
सहस्र व्याख्यांचा असतो बळी
उमलता ही आकाशकळी
व्याख्यातीत होत असे’
ज्युलिया ख्रिस्तेवा या फ्रेंच विदुषीने ‘डिझायर इन लँग्वेज’ आणि ‘रेवोल्युशन इन पोएटिक लँग्वेज’ या दोन ग्रंथांमध्ये काव्याची भाषा कवितेपुरती मर्यादित नसून मालार्मेसारख्या श्रेष्ठ साहित्यिकांच्या गद्यातही ती प्रत्ययाला येते असं उदाहरणांसहित विवेचन केलं आहे. ते वाचताना मला चिं. त्र्यं. खानोलकरांच्या ‘गणुराया’ लघुकादंबरीच्या सुरुवातीच्या पानांतली भारलेली, चित्रमय, नादवती भाषा आठवली. कवी साहित्यिकांजवळ जनसामान्यांपेक्षा वेगळी उत्कट संवेदनशीलता असते. कवितेच्या भाषेची व्याख्या एखाद्या रजनी परुळेकरांनाच थोडीफार करता येईल. त्या म्हणतात :
ओळींनो
वाढत जा
रानवेलींप्रमाणे
लपलेल्या झऱ्यांचा शोध घ्या.
शंख शिंपल्यातले नाद साठवा नसानसात
समुद्रवेलींची मैत्रीण व्हा
माळी झुडपांना आकार देत आहेत
ठोकळेच आधारस्तंभ होत आहेत
शब्दच का, भिवयाही कोरल्या जात आहेत
लव कापली जाऊन अंगे तुळतुळीत होत आहेत
वयात आलेल्या कुमारिकांसारख्या वाढत जा
पाताळापर्यंत
वाटेत वृक्ष भेटतील
त्यांना कवटाळू नका
यातील सच्चेपणा,आवेग, कळकळ प्रत्ययाला येते. पूर्वसूरींच्या प्रस्थापित सौंदर्य-संकेतांच्या प्रलोभनांना बळी न पडता आपले असणे शोधणे आणि जोपासणे हे कवीसाठी अगत्याचे आहे. भाषेच्या व्यवहारातले व्याकरणादींच्या सौन्दर्यसंकेतांच्या कसोट्यांतून निसटून आपली संवेदना दुसऱ्यापर्यंत पोहोचवण्याची इच्छाच त्यांच्या भाषेचा घाट घडवते किंवा बिघडवते आणि रसिक वाचकालाही नवं भोगण्याची, जाणण्याची जी काही मानसिक ओढ असते, त्यामुळे त्यांना कवीच्या नित्य नव्या भाषेचा उमज पडतो. क्रिस्टेवांचे प्रतिपादन आपल्या रससिद्धांताशी बरेच मिळते जुळते आहे हे ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्यायातील काव्य विचारांवरून दिसून येईल; ते असे :
माझा मराठाची बोल कौतुके
परी अमृतातेही पैजा जिंके
ऐसी अक्षरे रसिके
मेळवीन
जिये कोवळिकेचेनी पाडे
दिसती नादींचे रंग थोडे
वेधे परिमळाचे बीक मोडे
जयाचेनी
सहजे शब्द की विषय श्रवणाचा
परि रसना म्हणे रस आमुचा
प्राणाशी भाव जाय
परिमळाचा
ऐका रसाळपणाच्या लोभा
की श्रवणची होती जिभा
बोले इंद्रियां लागे कळंभा
एकमेका.
यापरते कवितेच्या भाषेचे समर्पक विवेचन इतरत्र कुठे सापडेल?
