झणझणा झोंबरा वारा
थरथरते अंबर सारे
चराचर कापती धारा
जग गिळले अंधकारे ||
गडगडा गरजती मेघ
दिक्काल चिरडण्या येती
कडकडा कोसळे लोळ
भयकंपित सारी सृष्टी ||
उसळते रक्तिम पाणी
वेढते वाढत्या वेगे
स्थिर जे उच्च ठिकाणी
दशदिशा फेकले गेले ||
जल निर्मल जीवनदायी
रसरसती, फुलती वेली
स्वमग्न कृद्ध तांडवी
बनतसे विनाशक काली ||
चिंब भिजून वर्षावात
मी होतो-नव्हतो झालो
माते निश्चिंत मनाने
तव कुशीत झेपावलो ||
तू क्रूर, रौद्र, भीषण
तू गुणमयी, निर्गुण
कल्लोळ अंती शमता
तू गौरी, दुर्गा, शांता ||
खदखदा हसती जगती
वदती हा ठार खुळा
गुंत्यात गुंतती, रमती
तवकृपे मी मोकळा ||
