संपादकीय : स्वप्न ते वास्तव

पुद्दुचेरीची ही दुसरी भेट. पुद्दुचेरीपेक्षा पॉंडिचेरी हा शब्द अजूनही थोडासा जवळचा वाटतो.  आमच्या शालेय पुस्तकांत तो शब्द असाच लिहिला जायचा  हेच त्याचे प्रबळ कारण असावे.   एक केंद्रशासित प्रदेश आणि योगी अरविंद व माताजी  यांच्याशी निगडित हा प्रदेश. अरविंदांविषयी  विशेष  कुतूहल असण्याची विविध कारणे आहेत.  घोडेस्वारीची परीक्षा न दिल्यामुळे त्यांचे अपूर्ण राहिलेले  आय. ए.  एस., भारतीय राजकारणातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व,  भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात सशस्त्र संघर्षात घेतलेला भाग ते एक योगी अशी त्यांची वाटचाल. अलीपूर तुरुंगामधील  त्यांचे  वास्तव्य, त्यांना मिळालेली एकांतवासाची शिक्षा, त्या वेळी झालेले साक्षात्कार आणि अग्रणी क्रांतिकारक ते योगी अशी त्यांची विस्मयकारक  वाटचाल. या त्यांच्या वाटचालीत बडोद्यामधल्या विष्णू भास्कर लेले या मराठी योगसाधकाशी त्यांची झालेली ओळख. लोकमान्य टिळक त्यांना राजकारणाकडे खेचत होते; तर लेले योगसाधनेकडे. ही दोन्ही मराठी माणसे हा आणखी एक योगायोग. स्वामी विवेकानंद, अरविंद यांसारख्या माननीय व्यक्तींना व्यक्तिगत फायद्यापेक्षा समाजाचे, जगाचे उत्थान  आणि विश्वबंधुत्व  जास्त महत्त्वाचे वाटत होते.  हे साध्य करण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या रचना प्रस्तावित  केल्या.  बेलूर मठ आणि आरोविले या अशाच दोन रचना आहेत.  हे दोन्ही महात्मे आणि विशेषतः अरविंद यांच्या बाबतीत त्यांच्या शिष्या – माताजी या जोपर्यंत हयात होत्या तोपर्यंत ही स्वप्ने चालली.  नंतर या स्वप्नांचा जगरहाटीने घास घेतला का?  अरविंद यांच्याजवळच अड्यारला बेझंट बाईंच्या   थिओसॉफिकल  सोसायटीच्या रूपाने अशीच एक रचना उभी आहे.

     योगी  अरविंद कलकत्त्याहून पांडिचेरीला का आले?   सगळ्यात महत्त्वाचे कारण राजकीय दृष्ट्या त्या काळचे पॉंडिचेरी हे  इंग्लंड आणि भारत यांच्या संघर्षापासून थोडेसे का होई ना दूर होते हे असावे. भारतीय दर्शनांमध्ये काही दार्शनिक एखाद्या पक्ष्याची  कल्पना केंद्रस्थानी ठेवून विचार करतात व उपदेश करतात. योगी अरविंद व माताजी यांचा विचार समजून   देण्याची माझी पात्रता नाही; परंतु या संदर्भात दिला जाणारा दोन पक्ष्यांचा  दृष्टांत हा तसा समजायला सोपा असल्याने त्यांच्या विचारांची दिशा समजण्यासाठी हा सिद्धांत उपयोगाचा आहे.  एका झाडाच्या फांदीवरती दोन  एकसारखे पक्षी बसलेले असतात. एकाची नजर दूरवर अज्ञाताकडे असते तर दुसरा उपजीविकेसाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी करत असतो.  प्रत्येक माणसाच्या मनात असे दोन पक्षी असतात.  या दोन पक्ष्यांचा अंतःसंबंध आणि त्यांचा जगाशी असलेला संबंध याचा विचार  वेगवेगळे तत्त्ववेत्ते  करत राहतात. हीच संकल्पना थोडी विस्तृत करून आत्मा, परमात्मा आणि जग यांच्या परस्पर संबंधांचा अभ्यास करून त्याबाबतची वेगवेगळी मते पुढे येतात.  द्वैत,अद्वैत, विशिष्ट अद्वैत वगैरे वगैरे नावांनी आपण त्यांना ओळखतो.

   हे सगळे विचार मनात येण्याचे कारण म्हणजे ‘ऑरोविले.’ ‘विविधतेतील एकतेवर आधारित मानव्य’ अशा भव्य संकल्पनेवर आधारित असे हे एक शहर आहे. पन्नास हजार लोक राहू शकतील अशी क्षमता निर्माण  करण्याचे नियोजन करीत हे शहर वाढते आहे. या शहरात अध्यात्म आहे; परंतु कुठला विशिष्ट असा धर्म नाही  असे सांगितले जाते. युनेस्को आणि भारत सरकार यांच्या मान्यतेने चाललेला हा एक आंतरराष्ट्रीय प्रयोग आहे. हे शहर माताजींच्या स्वप्नांचा आविष्कार म्हणून पुढे येत आहे. अखिल मानव समाजातील एकता हा या संकल्पनेचा मूलाधार आहे. हा प्रयोग नंतर जगभर जाईल आणि त्याच्या माध्यमातून मानवसमाज एक होईल हे स्वप्न. १९६० च्या दशकात हे सुरू झाले.  आम्ही २०२४ साली या शहरात होतो. ध्यानमंदिराची भेट हे या भेटीचे केंद्रस्थान होते.  या ध्यानमंदिरात आत जाऊन ध्यानधारणा करायची असेल तर त्यासाठी आधी संपर्क करून वेळ घ्यावी लागते.  ज्यांना हे जमत नाही त्यांना या ध्यानमंदिराच्या जवळ जाऊन बाहेरून ते मंदिर पाहावे लागते.  आम्ही पूर्वनियोजन केले नसल्याने अर्थातच आम्हांला दुरून हे ध्यानमंदिर पाहावे लागले. 

या गावाचे किंवा संकल्पनेचे प्रतीक म्हणून माताजींनी स्वतः मान्य केलेले हे चित्र वापरले जाते.  केंद्रस्थानी एकात्म मानवता,  त्याभोवती या  गावाचे वर्तुळ व त्याभोवती अभिव्यक्ती व अनुभूतीच्या पाकळ्या असे या चित्राचे काव्यात्म वर्णन केले जाते.  ध्यानमंदिराभोवतीच्या रचनेबद्दलही माताजींनी सूचना देऊन ठेवलेल्या आहेत व त्यानुसार तिथे वेगवेगळी कामे चालू आहेत. आमच्या भेटीत आम्हांला कमी वेळ असल्याने या नगरीच्या नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधता आला नाही;  परंतु जागतिक शांतता येईल, प्रस्थापित होईल असे काही येथे चालू आहे असे  तेथील  अल्प वास्तव्यात तरी जाणवले नाही. तेथून जवळ असलेल्या उपाहारगृहात जेवण घेतले.  आवतीभोवती असलेल्या विविध  कलावस्तूंच्या दुकानांतून काही खरेदी केली व आमची भेट संपली. प्रयोगाची सद्यःस्थिती  जाणून घेण्यासाठी येथे येऊन काही दिवस निवांतपणे राहायला पाहिजे हे जाणवले;  तरीही या अल्प कालावधीच्या दोन भेटींत साठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत या प्रयोगातून काय मिळाले असेल असा विचार मनात येत राहिला . माताजींच्या पश्चात या प्रकल्पाचे  वैचारिक नेतृत्व कोण  करते आहे तेदेखील मला या भेटींदरम्यान स्पष्टपणाने समजले नाही. 

    दुसऱ्या दिवशी अरविंद-आश्रमाला भेट दिली.  तेथील शांतता वैशिष्ट्यपूर्ण वाटली.  आश्रमातून बाहेर आलो.  फ्रेंच टाऊन बघायचे होते.

 त्यासाठी सायकल रिक्षा उपलब्ध होती. आम्ही जास्त लोक असल्यामुळे तीन रिक्षा लागणार होत्या.   एक रिक्षा उपलब्ध होती तिचा मालक  पन्नाशीतील एक व्यक्ती होती.  तिने झटपट फोन करून आणखी दोन रिक्षा  बोलवून  घेतल्या.  एका तासाची भ्रमंती करण्याचे ठरले.  रिक्षाचालकाला कामचलाऊ इंग्रजी येत होते. तो आम्हांला वाटेत लागणाऱ्या वेगवेगळ्या इमारती दाखवत त्यांची यथाशक्ती माहिती सांगत होता.  सफर  संपता संपता तुम्ही येथे खूश आहात का?   असा एक प्रश्न त्याला विचारला. “हो, मी येथे अतिशय समाधानी आहे. अधिक पैशांसाठी अन्यत्र कुठे जाण्याची माझी इच्छा नाही.  आमचा केंद्रशासित प्रदेश आहे; त्यामुळे आम्हांला जास्त पैसे मिळतात; त्यामुळे आमच्याकडे रस्ते वगैरे चांगले आहेत,” असे मत त्याने व्यक्त केले. आमच्या केंद्रशासित प्रदेशात फक्त चारच जिल्हे येतात ही माहितीदेखील त्याने आम्हांला दिली.  हे सर्व सांगत असताना त्याच्या चेहऱ्यावरचे समाधान पाहण्यासारखे होते.  त्याला कदाचित त्या फांदीवर बसलेल्या दोन पक्ष्यांमधला समन्वय साधला होता.

Author

One thought on “संपादकीय : स्वप्न ते वास्तव

  1. स्वप्न ते वास्तव हा प्रवास कदाचित स्वप्नपुर्ती करणार नसेल पण तो ही एक वेगळाच खेळ असतो

Leave a Reply