कोणतेही शहर परिचयाचे करून घ्यायचे असेल तर चालत ते शहर पाहावे. प्रत्येक वेळी काहीतरी नवीन नक्की सापडते. काही दिवसांपूर्वी मी अशीच बेंगलोरमध्ये चालत असताना एम जी रोडच्या बाजूला अचानक एक पुतळा दिसला. हातात पुस्तक घेतलेला हा पुतळा कोणाचा म्हणून कुतूहलाने त्या पुतळ्याजवळ गेले आणि खरोखरीच आश्चर्यचकित करणारी माहिती तिथे होती. तो पुतळा होता रेव्हरंड फर्डीनंड कित्तेल यांचा. १८३२ साली जर्मनीत जन्मलेले कित्तेल धर्मोपदेशक म्हणून १८५३ साली कर्नाटकात आले आणि चक्क इथल्या भाषेच्या प्रेमात पडले आणि ही भाषा शिकून त्यात काही कविता करण्यापर्यंतच थांबले नाहीत तर त्यांनी ७०००० शब्द असलेली कन्नड -इंग्रजी डिक्शनरी तयार केली. १८९४ साली त्यांनी केलेली डिक्शनरी ही कन्नडमधील इंग्रजीसाठीची आद्य डिक्शनरी मानली जाते. १९०३ साली कित्तेल यांचे जर्मनीत निधन झाले; मात्र कन्नडिगा त्यांना विसरले नाहीत. भर वस्तीत त्यांचा पुतळा उभारून त्यांनी त्यांच्याबद्दल प्रेम,आदर व्यक्त केलेला आहे.
जसे मुंबईवर ब्रिटिशांनी प्रेम केले तसेच काहीसे मला बेंगलोरबद्दल वाटते. चेन्नई, कोलकाता व्यवसायासाठी चांगले असतील; पण बेंगलोरमधील हवेमुळे अनेक साहेब लोक या शहरात रमले. फक्त रमलेच नाहीत; तर ही शहरे सुंदर, परिपूर्ण करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, त्यांच्या परीने त्यांनी या शहराला काही देण्याचा प्रयत्न केला आणि या शहराने अजूनतरी त्यांची आठवण स्मारके/ रस्त्याचे नाव अशा रूपात जपून ठेवली आहे.
१८७६-७८ साली कर्नाटकात भयंकर मोठा दुष्काळ पडला होता. अनेक लोक मृत्युमुखी पडले; मात्र त्या वेळी बेंगलोर शहराची पाण्याची गरज पूर्ण करण्यासाठी काही तलाव खोदले होते. त्यातलाच एक तलाव आज ब्रिटिशांच्या एक अधिकाऱ्याच्या नावाने ओळखला जातो. पूर्वी लोकवस्तीच्या जरा लांब असणारे ‘सॅंके टॅंक’ आज शहराच्या मध्यवस्तीत आले आहे. मूळचे आयरिश रिचर्ड सॅंके हे १८४८ मध्ये भारतात नोकरीला आले. १८५७ च्या युद्धात त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीसाठी मोठी कामगिरी पार पाडली होती. उत्तरेकडची हवा मानवली नाही म्हणून १८६२मध्ये त्यांची मद्रास प्रांतात बदली झाली आणि साधारण १८८४ साली निवृत्त होईपर्यंत ते मुख्यत्वे मद्रास प्रांतातच होते. दुसऱ्या अँग्लो-अफगाण युद्धातसुद्धा त्यांनी भाग घेतला होता; आताच्या चेन्नई मधील अनेक वास्तू, बागा यांच्या रचना केल्या होत्या. नंतर त्यांची मैसूरला चीफ इंजिनियर म्हणून बदली झाली तेव्हा सर्वप्रथम त्यांनी इरिगेशन डिपार्टमेंटसाठी पाण्याच्या संवर्धनासाठी काही प्रकल्पांत काम केले. बेंगलोरमधील मेयो हॉल, बेंगलोर म्युझियम, कबन पार्क यांसारख्या आजही मानबिंदू असणाऱ्या इमारतींचे, जागांचे आरेखन केले होते, त्याचबरोबर दुष्काळानंतर बेंगलोरमधील पाण्याची गरज भागवण्यासाठी म्हणून जो तलाव खोदला त्याला आता त्यांचेच नाव दिले आहे. सदाशिवनगर भागात असलेला सॅंके टॅंक आकाराने आता लहान झाला असला तरीही शहराच्या वैभवात भर घालत आहे.
बेंगलोर शहराचे वैशिष्ट्य म्हणजे या शहराच्या मधोमध असलेल्या बागा! लालबाग आणि श्री चामराजेंद्र बाग. बेंगलोरमध्ये वर्षानुवर्षे राहणाऱ्या अनेकांनादेखील कदाचित माहीत नसेल – कागदोपत्री कबन पार्कचे नाव आहे श्री चामराजेंद्र बाग. १८०२साली भारतात आलेल्या मार्क कबन यांनी कोलकातातून नोकरीस सुरुवात करून नंतर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडल्या. १८३१ च्या सुमारास मैसूर राजावरील जनतेचा रोष वाढला आणि उठावाची कुणकुण लागताच राजाने कंपनी सरकारकडे मदत मागितली. या असंतोषाची कारणे शोधण्यासाठी जी कमिटी स्थापन केली गेली होती त्यात मार्क कबन यांचा समावेश होता. प्रशासकीय अव्यवस्थेमुळे हे सर्व होत आहे हे लक्षात घेऊन तिथे ‘पूर्ण वेळ कमिशनर’ असे पद तयार केले गेले आणि कालांतराने ते पद कबन यांना मिळाले. सर्वप्रथम त्यांनी सर्व शासकीय कागदपत्रे कन्नड अथवा मराठी या दोन भाषांमध्येच असतील असा फतवा काढला. त्यानंतर स्थानिक लोकांच्या मदतीने लोकोपयोगी निर्णय घेतले. ते स्वतः चर्चमध्ये जात नसले तरीही रविवारी शासकीय कार्यालयांना सुट्टी दिली. इतरांच्या धार्मिक बाबींत ढवळाढवळ केली नाही. मैसूर राजांकडून धार्मिक ठिकाणी ज्या देणग्या दिल्या जात त्या तशाच सुरू ठेवल्या. केवळ मैसूर, बेंगलोरच नव्हे तर शिमोगा, सिमसा, होसकोटे, हिरीयूर अशा अनेक ठिकाणी शेतीसाठी पाण्याची व्यवस्था लावून दिली, रस्ते तयार करून घेतले. शेतकऱ्यांना शेतीच्या पद्धतीत आधुनिक बदल घडवून आणण्यासाठी प्रोत्साहन दिले. या सगळ्यामुळेच बहुधा १८५७ च्या उठावाचे पडसाद मैसूर प्रांतात फारसे पडले नाहीत; एखाद् दुसरे प्रयत्न झाले ते त्यांनी स्थानिकांच्या मदतीने दाबले. या प्रांतातल्या जनतेने कंपनी सरकारमुळे झालेला बदल, प्रगती बघितली होती; बघत होते. विदेशी सहकाऱ्यांपेक्षा त्यांनी कायम स्थानिक जनतेला प्राधान्य दिले, त्यांना स्थानिक लोकांबद्दल अनुकंपा होती. १८५९-६० मध्ये त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणाने राजीनामा दिला. १८६१ साली इंग्लंडला परत जात असताना सुवेजपाशी बोटीतच त्यांचे निधन झाले. १८७०मध्ये सॅंके यांनी १०० एकराच्या बागेची योजना तयार केली, अर्थात बाग पुढे वाढवण्यासाठी देखील त्यात तरतूद होती. या बागेला तत्कालीन कमिशनर मीड यांचे नाव दिले; मात्र नंतर ठराव मांडून कबन यांचे नाव या बागेला दिले गेले. १९२७ मध्ये मैसूर राजा कृष्णराज वडेयार यांनी या बागेचे नाव बदलून श्री चामराजेंद्र असे ठेवले कारण श्री चामराजेंद्र यांच्या कारकिर्दीत या बागेची निर्मिती झाली होती. मात्र या बागेचे लोकांच्या तोंडी असलेले कबन पार्क हेच नाव जास्त लोकप्रिय आहे. याच बागेच्या शेजारी संग्रहालयदेखील आहे. कबन यांनी इथे राहून इथल्या लोकांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवले; इतकेच नाही तर कन्नड भाषेतील भगवद्गीतेच्या पुस्तक प्रकाशनासाठी आर्थिक मदतदेखील केली होती.
याच मांदियाळीतले पण थोडेसे अलीकडच्या काळातले आणि ब्रिटिश किंवा आयरिश नसलेले उलट ब्रिटिशांच्या रोषाला कारणीभूत ठरलेले, बेंगलोर सुंदर करण्यात ज्यांचा मोलाचा वाटा आहे अशा गुस्ताव कृंबिगेल यांच्या उल्लेखशिवाय हा लेख अपूर्ण ठरेल. अनेकदा सोशल मिडियावर बेंगलोरमध्ये फुललेल्या गुलाबी रंगाच्या झाडांचे, रस्त्यांचे फोटो, व्हिडिओ दिसतात; तर कधी निळ्या-जांभळ्या रंगाचे जॅकरंडा, तर कधी पिवळी ट्रंपेटची फुले आणि गुलमोहर तर असतोच असतो. यांतली बहुतांश झाडे ही भारतीय मुळाची नाहीत; मात्र तरीही ती आता इथल्या सुंदर जैवसृष्टीचा भाग बनली आहेत. गुस्ताव कृंबिगेलही जर्मन वनस्पतितज्ज्ञ होते. त्यांनी लंडनमध्ये हाइड पार्कमध्ये लॅंडस्केप गार्डनर म्हणून काम केले; मात्र त्यानंतर १८९३ मध्ये ते बडोदा संस्थानात नोकरीसाठी आले. पुढे १९०७मध्ये मैसूर राजाने जास्त पगाराची नोकरी देऊ केल्यावर ते इकडे रुजू झाले. त्यांनी तत्पूर्वी उदगमंडलम – म्हणजे उटीमधील बागेसाठीही काम पाहिले होते. मैसूर संस्थानात नोकरीला रुजू झाल्यावर त्यांनी लालबागची जबाबदारी तर घेतलीच; त्याखेरीज मैसूरमध्ये मुघल गार्डनच्या धर्तीवर वृंदावन गार्डन तयार केले. आजही मैसूरच्या प्रमुख आकर्षणांमध्ये त्याचा समावेश होतो. त्यांनी १९१२ मध्ये मैसूर हॉर्टिकल्चर सोसायटीची सुरुवात करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांचा जगभरातील इतर वनस्पतितज्ञांशी संपर्क होता आणि त्यामुळेच त्यांनी काही खास भारतीय वाण उदा. बांबू राईस, आंब्याच्या प्रजाती भारताबाहेर पाठवल्या आणि बाहेरच्या देशांमधील सुशोभनासाठी वापरली जाणारी झाडे आपल्याकडे आणली. बेंगलोरमध्ये वर्षभर कोणती ना कोणती फुले फुललेली असावीत ज्यामुळे हे शहर आणखी सुंदर दिसेल अशा हेतूने येथील झाडांची रचना केली होती. दुर्दैवाने त्यांतील अनेक झाडांना विकासाचे बळी ठरावे लागले आहे. गुस्ताव कृंबिगेल हे जर्मन असल्यामुळे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात त्यांना चक्क राजबंदी म्हणून कैदेत ठेवले होते; तेव्हा मैसूर राजाने शब्द टाकून त्यांची सुटका करवून घेतली होती. मैसूरचे तेव्हाचे राजे कृष्णराज वडेयार यांची त्यांच्याशी मैत्री होती. खास मान होता कृंबिगेल यांना राजदरबारी आणि त्यामुळेच ते त्यांच्या शेवटच्या श्वासापर्यंत भारतातच राहिले होते. शहर म्हणजे फक्त रस्ते, इमारती नसतात – तिथल्या बागा, झाडे, जीवसृष्टी या सगळ्याचा विचार करणारा राजा होता आणि त्यासाठी लागणारी माणसे गोळा करून त्याने शक्य ते सारे प्रयत्न केले होते त्यामुळेच आजही मैसूरच नाही तर जुन्या बेंगलोरमधील अनेकांसाठी वडेयार महाराज हा एक हळवा कोपरा असतो.
हडसन सर्कल, रिचमंड सर्कल, बोवरिंग इंस्टिट्यूट अशा अनेक प्रकारे या शहरावर प्रेम करणाऱ्या, या शहराला काही दिलेल्या, या शहराचा चेहरा बदलण्यासाठी कारण ठरलेल्या व्यक्तींची नावे आजही बेंगलोरमध्ये जपली जात आहेत. या सगळ्या व्यक्ती परदेशी मुळाच्या होत्या; कदाचित त्यांच्या इतर काही निर्णयांनी तत्कालीन लोकांना त्रासही झाला असू शकेल, त्यांचे काम तेव्हा न आवडणारेही अनेक असतील. खासकरून ते बाहेरचे आहेत म्हणून त्यांच्या उद्देशावर शंका घेणारे तेव्हाही असणार आणि आजही असतील; मात्र त्यांनी त्यांच्या कृतीतून शहर घडवण्यात मदत केली, काहींचे काम आज शतक- दीड शतकानंतरही दिमाखात उभे आहे. त्यांचे नाव देऊन स्मारके जपण्यात त्यांना वाहिलेली ही आदरांजलीच आहे. फक्त पुतळे उभारून स्मारक उभे राहत नसते, त्या स्मारकांचा भविष्यात काय उपयोग होईल हे लक्षात घेऊन तशी स्मारके उभारली तर इतिहास आपोआप आठवला जातो, स्मरला जातो, पूजला जातो. बेंगलोर काही एका रात्रीतून उभे राहिलेले शहर नाही, आजचा लेख हा एक छोटासा प्रयत्न होता इथल्या नसून इथल्या झालेल्या काही लोकांना आठवण्याचा. तुमच्या शहरात आहेत का अशा काही खुणा?
(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)
मार्क कब्बन
डॉ. फर्डिनांद कित्तेल
गुस्ताव कृंबिगेल Gustav Krumbiegel
