प्रश्नोपनिषद : सप्टेंबर  २०२४

मंडळी, 

 आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक दृष्ट्या महत्त्वाचा एक प्रश्न आम्ही तुम्हांला विचारू.  त्यावरचे आपले मत आम्हांला जरूर कळवा. 

 या वेळच्या प्रश्नाची थोडीशी पार्श्वभूमी अशी :

मराठीतील एक ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर सुधीर रसाळ यांनी  मागील महिन्यात ९१व्या वर्षात पदार्पण केले आहे. तब्बल ३७ वर्षे रसाळ सरांनी मराठी साहित्य आणि भाषेचे अध्यापन केले. शिकवण्याबरोबरच रसाळ सर रमले, ते समीक्षा आणि साहित्य संस्थात्मक कामात. मराठवाडा साहित्य परिषद, अखिल भारतीय महामंडळ, साहित्य संमेलन यांत त्यांनी वेळोवेळी आपला सहभाग नोंदवला. रसाळ सरांना अंतर्नाद परिवारातर्फे हार्दिक शुभेच्छा ! 

एका नुकत्याच झालेल्या साहित्यविषयक परिसंवादात त्यांनी खालील विचार मांडला : 

वाङ्मय  म्हणजे जे भाषेत आहे ते. कथा कादंबरी नाटक निबंध  इत्यादी  सर्व भाषेतच असल्यामुळे ते सर्व वाङ्मयाच्या  कक्षेत येते. कादंबरी किंवा नाटक  जेव्हा वाचतो तेव्हा आपण शब्दाकडून ते शब्द ज्या वास्तवाचा निर्देश करतात त्या वास्तवाकडे जातो. मग त्या शब्दांचे कार्य संपते. कवितेत मात्र आपण शब्दातच राहतो कारण कविता ही शब्दांचे जे अनेकविध भावनिक अर्थ असतात  त्याची संघटना असते. म्हणून काव्य हेच परिपूर्ण वाङ्मय  आहे. म्हणून समीक्षेला  ‘काव्यशास्त्र’  म्हणतात. 

 तर मंडळी, 

 आपण डॉक्टर रसाळ यांच्या मताशी सहमत आहात का?    

उत्तरासाठी शब्द मर्यादा  ३०० शब्द.

रसाळ सरांच्या प्रतिपादनाला  मार्गदर्शक भानू  काळे यांनी दिलेला प्रतिसाद :  

सुधीर रसाळ यांच्याविषयी मला आदर आहे; पण त्यांच्या वरील दोन्ही विधानांशी मी सहमत नाही.  त्यांचे संपूर्ण भाषण वाचले तर कदाचित त्यांना नेमके काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट होईल.

शेकडो वर्षांपूर्वीचे वाङ्मय आपण आजही पुस्तकरूपात वाचू शकतोच की! मुद्रणशास्त्राने शब्दाला दीर्घायुष्य दिले आहे. 

कविता मला आवडतात; पण  कथा, कादंबरी, ललित गद्य, निबंध अशा  इतरही सर्व प्रकारचे साहित्य मला आवडते. ते नगण्य कसे ठरवता येईल?

The Pilgrim’s Progress ही जॉन बुनियन याने १६७८ मध्ये लिहिलेली कादंबरी जगातील पहिली कादंबरी मानली जाते. ती आजही उपलब्ध आहे.  

शेक्सपिअरचा कालखंड  १५६४ ते १६१६ हा आहे. त्याची नाटके आजही उपलब्ध आहेत. 

हे साहित्य दीर्घायुषी आहे आणि महत्त्वाचेदेखील आहे. 

आपली उत्तरे/प्रतिसाद  सदराच्या खाली कॉमेंट स्वरूपात देऊ शकता किंवा ई-मेल द्वारा jaysss12@gmail.com या पत्त्यावर पाठवू शकता. 

आपले मत आपण 9422647283 या क्रमांकावर व्हॉट्सॲपद्वारादेखील पाठवू  शकता. 

आणि हो, 

 या सदरासाठी आपल्याला पडलेले अशा प्रकारचे प्रश्नदेखील आपण पाठवू शकता. 

संपादक 

Author

Leave a Reply