पुनर्भेट नॅशनल पार्कची(१०)

श्रावणात पाहिलेले विरही प्राणी

 

रिमझिम पाऊस  सुरू झाला.                                

पाऊस पडत असतानाच पडणाऱ्या लख्ख उन्हाने श्रावणाची वर्दी आसमंतात पोहोचवली. जांभळ्या तुऱ्यांनी बहरलेली एक ताम्हण आमच्या हॉस्पिटलच्या खिडकीतून माझे लक्ष वेधून घेते. मी दीड वर्षांपूर्वी कोकणात होते. तिथे ताम्हणीचा बहर वैशाखाच्या  शेवटी संपून जायचा आणि श्रावणात त्यावर चिकूच्या आकाराची गोल फळं दिसू लागायची; पण इथे उद्यानात वैशाखात सुरू झालेला ताम्हणीच्या फुलांचा  बहर अजून संपलेला नाही. पाऊस पडू लागला, की पिवळसर पांढऱ्या रंगाची, ८ ते १० मि.मी. व्यासाची, पाच पाकळ्यांची व मध्यभागी गडद पिवळ्या रंगाचे पुंकेसर असलेली ह्सोलीची चिमुकली फुले फुलू लागतात. मध्यम उंचीचं हे झाड पावसाळ्यात हिरव्यागार पानांनी आणि पिवळ्या फुलांनी बहरून येतं. हिरव्या पानांच्या पडद्याआड लपलेली पिवळी फुलं झाडावरच्या पिवळ्या ठिपक्यांप्रमाणे वाटतात. गूगलवर शोधलं तर याचं  शास्त्रीय नाव Microcos Paniculata  असल्याच कळलं. आषाढात फुलायला सुरुवात झालेलं हे झाड श्रावण आला तरी फुलतच आहे. आषाढात काळ्या मेघांनी भरलेलं आकाश आता अध्येमध्ये निळ्या निरभ्र रंगाचंही दर्शन देऊ लागलं आहे. उन्हाळ्यात पिवळ्या फुलांनी बहरलेल्या बहाव्यावर आता लांब नळीच्या आकाराच्या हिरव्या शेंगा दिसू लागल्या आहेत. या शेंगा म्हणजे माकडांच्या आवडीच्या!  श्रावणात बहाव्याच्या शेंगा तोडून खाणारी बॉनेट माकडं उद्यानात हमखास दृष्टीस पडतात. 

            उद्यान आणि आजूबाजूला मानवी वस्तीत ही बॉनेट माकडं फिरत असतात. मानवी वस्तीत जाऊन माणसांना त्रास देणारी  माकडं बऱ्याचदा पकडावी लागतात; परंतु या श्रावणात दुसऱ्या प्राण्यांशी  संघर्ष निर्माण झालेली एक माकडीण आम्हांला मानवी वस्तीत जाऊन पकडावी लागली.

त्याचं असं झालं –  संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूलाच काजूपाडा नावाचा एक भाग आहे. या काजूपाड्यात  माकडं कायम फिरत असतात. उद्यानाच्या बाजूलाच असल्याने या भागातील माणसं प्राण्यांबाबत बरीच संवेदनशील आहेत. याच वस्तीतून आम्हांला एकदा फोन आला की एक माकडीण कुत्री आणि मांजरांची पिल्लं घेऊन पळते. ती त्या पिल्लांना काही इजा करत नाही – केवळ सोबत घेऊन फिरते; पण या पिल्लांना काही खायला द्यायला पाहिजे हे तिच्या लक्षात येत नाही. मग दोन दिवसांत पिल्लू मरून जातं. त्यानंतर दुसऱ्या मांजरी किंवा कुत्र्याचं पिल्लू घेऊन फिरते. एखाद्या दहा-बारा वर्षांच्या मुलाच्या खांद्यावर उडी मारते. त्याच्या केसांत बघत राहते. तो मुलगा घाबरून तिला बाजूला करायचा प्रयत्न करू लागला तर त्याला घट्ट पकडून राहते.  मला ही माकडिणीची केस खूप विचित्र वाटली. मी आमच्या रेस्क्यू पथकाला घेऊन  त्या  माकडिणीला पकडण्यासाठी निघाले. बोरिवलीला स्थानिक स्तरावर प्राण्यांसाठी काम करणाऱ्या मिता मालवणकर त्या माकडिणीच्या मागावर होत्या. एके ठिकाणी घराच्या छपरावर ती बसल्याचा निरोप आम्हांला त्यांनी दिला. आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो; तर एक विचित्र दृश्य दिसलं. ती माकडीण एक कुत्र्याचं पिल्लू घेऊन घराच्या छपरावरून पळत होती आणि त्या पिलाची आई मोठ-मोठ्याने भुंकत तिच्या मागे पळत होती. त्या भागातील अनेक भटकी कुत्री एकत्र येऊन   माकडिणीवर भुंकत होती. तिच्या हातातील त्या गोजिरवाण्या पिलाला हे काय सुरू आहे हे कळतच नव्हतं. आम्ही त्या पिलाला प्रथम त्या माकडिणीपासून सोडवलं.  ते थोडंसं जखमी झालं होतं. त्याच्यावर उपचार करण्यासाठी पाठवून दिलं. मग त्या माकडिणीला डार्ट मारण्यासाठी तिच्या मागून हळूहळू फिरू लागलो. वैभव पाटीलच्या गनच्या टप्प्यात ती आली. तेवढ्यात ती माकडीण आमच्यासोबत असलेल्या नवनाथच्या खांद्यावर चढली. तो स्तब्ध उभा राहिला. ती त्याला काहीच इजा करत नव्हती. उलट त्याच्या केसात बघू लागली. आम्ही ती खाली उतरण्याची वाट बघू लागलो. ज्या क्षणी ती नवनाथच्या खांद्यावरून खाली उतरली त्या क्षणी वैभवने तिला डार्ट मारला. ती थोड्याच वेळात बेशुद्ध झाली. तिला पकडून आम्ही पार्कमध्ये आणली. पिंजऱ्यात ठेवलेल्या त्या माकडिणीला बघताना मला प्रश्न पडतो – ही माकडीण अशी का वागत असावी? एक तर तिचं पिल्लू मेलं असावं. माकडाचं पिल्लू लहान असताना आईच्या पोटाशी बिलगलेलं असतं. पिल्लू मेलं तरी माकडिणी मेलेलं  पिल्लू घेऊन फिरताना दृष्टीस पडतात. या माकडिणीचं पिल्लू कशाने तरी नाहीसं झालं असावं; मग ती आपली वात्सल्याची भूक कुत्र्या-मांजरींची पिलं पोटाशी कवटाळून भागवू लागली असावी. तिच्यासोबत तिचा कळप नव्हता. तिच्या अशा वागणुकीमुळे तिच्या कळपानेही बाहेर काढलं असावं. अपत्य गमावल्यावर वेड लागलेल्या स्त्रिया आपण पाहतो. प्राण्यांमध्ये असं अपत्याच्या मृत्यूने वेड लागत असावं का? पिंजऱ्याच्या गजाला पकडून  बसलेल्या  त्या  माकडिणीने त्या दिवशी माझ्या मनात प्रश्नांचं मोहोळ उठवलं . 

       अपत्य-मृत्यूमुळे विचित्र वागणारी माकडीण पाहिली त्याच्या दुसऱ्याच दिवशी आयुष्यभर वांझ राहिलेल्या वाघिणीला दुसऱ्या लेकुरवाळ्या वाघिणीबद्दल असलेल्या  तीव्र द्वेषाचं दर्शन घडलं. त्या दिवशी मी माझ्या रोजच्या राउंडला निघाले होते. वाघांच्या पिंजऱ्यावर असलेल्या वनरक्षक साळवींचा फोन आला, “मॅडम, टी-1 वाघिणीच्या पंज्यातून रक्ताची धार लागली आहे. तुम्ही ताबडतोब या.” मी ताबडतोब वाघांच्या पिंजऱ्याकडे पोहोचले. प्राणिरक्षकांनी  टी-1  वाघिणीला उपचार पिंजऱ्यात घेतले होते. तिच्या पुढच्या उजव्या पंज्यातून रक्ताची धार लागली होती. होत असलेल्या वेदनांनी  ती भयंकर चिडली होती. सतत मोठमोठ्याने डरकाळ्या फोडत होती. वेदना आणि अपमान यांनी निर्माण झालेला तीव्र त्वेष तिच्या डोळ्यात उतरला होता. आम्ही ताबडतोब रक्त थांबवणारी इंजेक्शन्स तिला दिली. पंज्यावर औषध मारलं. थोड्या वेळाने रक्त थांबलं. आता मी चौकशी केली, की हे कशाने झालं असावं? तेव्हा तेथील मजूर सांगू लागला, ‘टी-1  ज्या पिंजऱ्यात होती त्याच्या पलीकडच्या बाजूला टी -3 वाघीण आपल्या पिलांसह सोडली होती. दोघींच्या मध्ये भिंत होती. भिंतीत उंचावर एक छोटीशी खिडकी होती. खिडकीला गज होते. त्या खिडकीवर पुढचे दोन पाय टेकवून टी-1  आतून टी -3कडे बघून गुरगुरली. पिलांसह असलेली टी -3 लगेच सावध झाली. तिने खिडकीवर आपले पुढचे दोन्ही पाय टेकवून टी-1 च्या खिडकीतून बाहेर आलेल्या  पंज्याचा चावा घेतला. तशी टी-1  मागे झाली. तिच्या पंज्यातून रक्ताची धार लागली . टी-1  ही उद्यानात जन्माला आलेली वाघीण होती. मी मागच्या वेळी जेव्हा उद्यानात होते तेव्हा  बसंती वाघिणीच्या पोटी टी-1 चा जन्म झाला होता. टी-1  आता जवळजवळ चौदा वर्षांची म्हणजे वाघांच्या दृष्टीने वयोवृद्ध होती. तिच्या संपूर्ण आयुष्यात तिला योग्य असा जोडीदार मिळाला नव्हता. त्यामुळे तिला पिल्लं होऊ शकली नव्हती. त्यामुळे कदाचित ती लेकुरवाळ्या  टी -3चा  दुस्वास करायची. ती लांबून जरी दिसली तरी तिच्याकडे बघून डरकाळी  फोडायची.  आमच्याकडे इतर वाघिणी होत्या; पण त्यांच्याशी काही तिचं फार वाकडं नव्हतं  आणि स्वभावानेही ती शांत आहे.  फक्त टी -3 तिला डोळ्यांसमोर नको असते. याच कारणाने आज टी-1  तिच्यावर  गुरगुरली; परंतु तरुण टी -3 ने  टी-1 च्या पायाचा चावा घेऊन तिला इशारा दिला, की माझ्या नादाला लागू नकोस!

         अपत्याच्या विरहाने कुत्र्या-मांजरांची  पिल्लं उचलून  पळणारी  माकडीण एका बाजूला तर अपत्यच न झाल्याने लेकुरवाळ्या वाघिणीचा दुस्वास करणारी वाघीण दुसऱ्या बाजूला. प्राण्यांच्या मानसशास्त्राचा नव्याने विचार करायला लावणाऱ्या  दोन घटना या श्रावणात मला बघायला मिळाल्या.  

Author

Leave a Reply