माय,मला येळ वाडा वो
दादा, दे की जरा तुज्जोळचा येळ
ए मैतरनी,अगं एss भयनी,
अगं घाल की उलुसा येळ माझ्या वाडग्यात
काय म्हंता दादा,
काय म्हंता ताई
माज्जोळ तं म्वाप वाडगा भरून सांडुस्तो
हाय की वेळ
हा हा हा
बरूबर हाय बगा तुमचं
सकाळी उठल्यापासून रात्री कवातरी
झोपूस्तो हा ss इथून तिथ्थोर
हातपाय पसारल्याला येळच येळ हाय वो,
पन एकलाच हाय
पाठचं पोटचं कुनीच न्हाई
पांगळा हाय त्यो
आंधळा बी
कोनतरी संगट आस्लं म्हंजी कसं
दुखलं खुपलं सांगता येतंय,
मनातलं इस्कटून बोलाय येतंय
आपुनच बोलावं नि आपुनच आयकावं
कट्टाळला त्यो,
तुमच्यातला वाढा की वो माय,
माझ्या येळंला चव ईल बगा
न्हायच म्हंता व्हय ?
जीवा,
ग्येले समदे
समदेच कशे येवडे भिकारी
एका आण्याचा की नाण्याचा बी येळ न्हाई
माज्या वंजळीत टाकाया
आसु दे तिकडं
उद्याच्याला पुन्ना पटकूर पसरू
आन म्हनू की घसा तानून
येळ वाडा वोss माय…!
