सुनीलच्या म्हणजे माझ्या यजमानांच्या घरची वडिलोपार्जित जमीन अबलोलीच्या पुढे कोळवली या गावी आहे, असं काही वर्षांपूर्वी समजलं होतं. तिकडे कधीच कुणी गेलेलं नव्हतं. आमची ही जमीन बघायला जायचा घाट आम्ही घातला, तेव्हा गुहागर या गावाशिवाय आजूबाजूचं आम्हांला काहीच माहीत नव्हतं.
गुहागरला जाताना वाटेत अबलोली गावाकडे जाण्याचा फाटा लागतो. तिथून पुढे – म्हणजे अबलोलीच्याही पुढे – गाडी न जाणाऱ्या ठिकाणी ही जमीन आहे. सुनीलने शेती विषयातली पदवी घेतली, तेव्हा शेतकी कॉलेजला प्रवेश घेताना सुनीलला किंवा त्याच्या घरात कुणालाच या जमिनीविषयी काही माहीत नसल्यामुळे घरची जमीन असल्याने मिळणारे जास्तीचे पंधरा टक्के गुण न मिळून त्याचा प्रवेश घेताना जवळजवळ शेवटचा नंबर होता! बाबांची इच्छा होती, ‘जाऊन एकदा जमीन बघून तरी यावी…’ – तशी सुनीलचीही होती; म्हणून हा दौरा काढला. तेव्हा सुनीलचा एक भाऊ बरोबर होता.
जागा शोधून काढणं अशक्यच होतं.
चिपळूणमधील एका दूरच्या नातलगांना ती जागा माहीत होती. तसं त्यांचं वय झालेलं; पण ते बरोबर यायला तयार झाले. त्यांना वाटेतून एका बसस्टॉपवरून बरोबर घेऊन, तहानलाडू – भूकलाडू सोबत घेऊन पुढे गेलो. बसचा थांबा अबलोलीपासून थोडा पुढे; पण आमच्या अलीकडच्या गावात, म्हणजे तिथल्या घरापासून खूपच दूर होता. सकाळी एकच बस गावात येणार, तेवढीच परत जाणार. स्वतःची गाडी या बसस्टॉपपेक्षा थोडी पुढे जाऊ शकत होती, म्हणून गाडी घेऊन निघालो होतो. तिसऱ्याच संबंधित नसलेल्या एका माणसाने नामसाधर्म्य असल्यामुळे आमची जमीन एका शाळेला दान दिली होती, तिथे त्यांच्या नावाची पाटीसुद्धा लावलेली होती; ती जाताना दिसली. रस्ता बरा होता. सकाळी सकाळी वातावरण छान होतं. गाडीच्या आवाजातही पक्ष्यांचं कूजन छान ऐकू येत होतं. एक मोठ्ठा पक्षी अगदी जवळून उडत गेला. सूर्यप्रकाशात तो मला सोनेरी गरुडासारखा भासला. हे गरुड म्हणे फक्त हिमालयात दिसतात. हा इथलाच गरुड असेल; पण उन्हात मस्त चमकून गेला.
मधून एक ओढा वाहत होता. तिथे गाडी लावून ओढा ओलांडून पुढे २५ – ३० मिनिटं चालत गेलो. मध्ये साधारण निम्म्या अंतरावर गावची वस्ती आहे. तिथे एक देऊळ… तिथल्या सपाट जागेला सहाण असं म्हणतात. त्यानंतर काही अंतरावर घर लागण्याआधी खऱ्यांचंच लक्ष्मीनारायणाचं छोटंसं देऊळ लागतं. आत डोकावलो, तर ती दगडातली मूर्ती चक्क नारायणाने लक्ष्मीला कवेत घेतलेली होती! नुकतीच पूजा झालेली असावी. ताजी फुलं, दरवळणारी उदबत्ती आणि तेवत असलेलं निरांजन… वातावरण प्रसन्न होतं. बिनवस्तीचं थोडंसं अंतर ओलांडल्यावर घरं दिसू लागली.
कोकणातलं असतं तसंच देखणं, उतरत्या छपराचं, सारवलेल्या अंगणाचं घर. कुंपण असं नव्हतं. कमी उंचीचा ओटा ओलांडून अंगणात गेलो. घराच्या मागच्या बाजूला दूरवर खाली चंद्राकृती खाडीचं पाणी उन्हात चमकत होतं. सुखद वारा वाहत होता. दृश्य छान होतंच; पण घर आतून बघितल्यावर लक्षात आलं, थोडी डागडुजी करून घेतली तर राहायलाही आवडण्यासारखं आहे.
तिथे नेहमीच राहत असणाऱ्या दूरच्या नातलग माहितगाराला बरोबर घेऊन तुकड्यातुकड्यांनी विखुरलेली जमीन बघत फिरलो.
पडझड झालेले जमिनीचे बरेच तुकडे होते. त्यावरचा एखादा पूल, त्याला लागून असलेली पडकी भिंत अशीही एक जमीन होती. इतर ठिकाणची अतिक्रमणं बघितली. गडगे घातलेल्या जमिनीत शेती चालू होती. त्यात अर्धी जमीन आमचीच असेल. तिथेच राहून लक्ष घातलं असतं तर त्यांनी कदाचित आपणहून सोडून दिलं असतं; नाहीतर पीक आमच्याच जागेवरचं आहे, म्हणून वेळ पडली तर आम्ही ते आमचंच म्हणून काढूनही घेऊ शकलो असतो. आत्ता कष्ट घेतले आहेत तेवढं घ्या, मग परत लावू नका, असंही सांगता आलं असतं. कोर्ट-कचेऱ्यांची वेळ मात्र आम्हीही येऊ दिली नसती.
तिथे राहून जागेची देखभाल करणारा माणूस तिथे एकटाच राहायचा. आम्ही बरोबर जेवणाचा डबा घेऊनच गेलो होतो; त्यात त्याच्यासाठीही होतं; पण आता सुट्टीला म्हणून त्याचा मुलगा येऊन राहिला होता. त्या जुन्या, डागडुजी न केलेल्या घरात जेवणासाठी शांतपणे बसलो तेव्हा बरंच थंड वाटत असल्याचं लक्षात आलं. बाहेरच्या गरमीचा तिथे मागमूसही नव्हता.
तो सगळ्यांची जमीन बघतो म्हणून आमचे बाबा त्याला दर महिन्याला एक मनीऑर्डर पाठवायचे; पण खूप उशिरा लक्षात आलं की त्याला त्याची काहीच किंमत नव्हती किंवा त्याच्या ते गावीही नव्हतं. पुढे सुनीलच्या एका काकांचे आणि त्याच्या वडिलांचे नाव सारखे असल्याचा फायदा घेऊन त्याने त्या जमिनीवर स्वतःचे नाव लावून घेतले. तेही जमिनीवर राहायला बरीच वर्षं होते, म्हणजे त्यांचाही काही संबंध असेलच; पण ही कुठली, कितवी पिढी, नक्की काय नातं, काय संबंध हा आता उत्खननाचाच विषय होईल. तोच तिथे कायम राहत असल्यामुळे त्या विषयी काही बोलण्याचा प्रश्न नव्हता. अर्थात सुनील सोडला तर त्याच्या भावंडांपैकी इतर कुणी त्या जागेकडे बघेल अशीही खात्री नव्हती. तो सगळा विषय आमच्यासाठीही नवीनच होता.
दमणूक पुष्कळ झाली होती. दुपारीच परत फिरलो असतो तर आजोबांना वेळेवर त्यांच्या घरी सोडून जेवणासाठी गुहागर गाठता आलं असतं. वाटेत सहाणेवरच्या गणपतीचं देऊळ बघून दर्शन घेतलं. चालत चालत गाडी गाठली. रस्त्यात करवंदीची जाळी दिसली. उतरून काटे टोचून घेत करवंदं खाल्ली. गाडीत बसलेल्यांनाही दिली. अचानक तहान कमी झाल्यासारखी वाटली, पाय दुखायचे थांबले, थकवा गेला. तेव्हापासून रानमेवा नक्की खायचा, हे ठरून गेलं.
शक्य झालं तर इथे येऊन राहायचं, पडतील ते कष्ट घेऊन ही वडिलोपार्जित जमीन जतन करायची, असं सुनीलने मनाशी पक्कं ठरवलं.
हा सगळा विषय सुरू होण्यामागे एक महत्त्वाचं कारण होतं. सुनील शेतीची पदवी घेऊन आला, इतरांची शेतं मॅनेज करू लागला. काही वर्षांत सगळ्या प्रकरचा अनुभव घेऊन झाला. तीन चार मित्रांनी मिळून जमेल तेवढी जमीन घेऊन आपल्या मनाप्रमाणे शेती करावी अशी इच्छा मनात घट्ट रुजली होती. घराची जमीन आहे हे समजल्यानंतर जमिनीसाठी पैसे घालावे लागले नसते, हा मोठाच फायदा होणार होता; पण आता मित्रांना घेण्याऐवजी सगळ्या आत्ते – चुलत भावंडांशी बोलणं भाग होतं. त्यांना याविषयी सांगितलं. तिथे जाऊन कोणीच राहणार नव्हतं; पण त्यांनी हक्क-सोडपत्र दिलं असतं तर तिथे राहून अतिक्रमणं सोडवून घेऊन वडिलोपार्जित जमीन जतन करता आली असती; पण ते सहज होणार नव्हतं. सगळ्यांचे खूप प्रश्न, वेगवेगळ्या अटी समोर येऊ लागल्या. कुणाला स्वतः तिथे न जाता आपल्या नावाने शेतकरी दाखला काढून हवा होता. कुणाला लहर येईल तेव्हा जाऊन राहता यावं म्हणून तिथे एखादी खोली बांधून हवी होती. कुणी म्हणालं, “तू कधीच ती जमीन विकायची नाहीस.” अटी घालण्यापूर्वी निदान पुढच्या पिढीसाठी म्हणून तरी त्या सातबाऱ्यात आपलं नाव आहे की नाही एवढं बघण्याची तसदी त्यांनी घ्यायला हवी होती. एकूण रागरंग पाहून तो नाद सोडून दिला. जमीन अशीच चोरापोरी जाणार अशी एक कडू खूणगाठ मनाशी बांधली. पुन्हा कोळवलीला जायची वेळ काही आली नाही.
.
