एक दक्षिणी लग्न

ह्यूस्टनमधली आर्द्रतेची शाल पांघरलेली सकाळ! हिम सूर्यकिरणांनी वितळतं; ही आर्द्रता आणखीनच घन होत जाणारी… हवेला जडशीळ करणारी! मर्टलची जागोजागी फुललेली प्रसन्न मोठाली झाडं, काही वृक्षागतदेखील. आमच्या ॲरिझोनातील नेहमीच्या पालो वेर्दे, फायकस, कॅक्टस या सदाहरितांपेक्षा कितीतरी वेगळी. या झाडाफुलांमधून व्यक्त होणारी भूमीची भाषा मला अनोळखी आणि म्हणून आकर्षक. लाल विटांच्या इमारतीत लग्नासाठी भरजरी कपडे घालून घाम टिपत शिरताना मन नवीन अनुभवाला उत्सुक होतं. आतमध्ये सुखद गारवा. फुलांच्या माळांनी तयार केलेल्या सुशोभित पडद्यासमोर पूजा मांडलेली. कपाळावर भस्माचे पट्टे, अंगात जानवं, सिल्कचं जांभळं धोतर नेसलेले भटजी एकाग्रतेने संस्कृत श्लोक दणदणीत आवाजात म्हणताहेत. शुभकार्य दर्शवणारं दक्षिणी वाद्यसंगीत स्वतःचा शतकानुशतकांचा आब राखत या चित्राला चौकट देत आहे.

हे सूरपण वेगळे…नुसत्या रेशमाच्या लड्या उलगडाव्यात तसे नसून त्यांच्यावर प्रत्येक श्वासागणिक एक तालाची गाठ बांधून त्यांची सुंदर रांगोळी तयार केलेली. हे संगीत आग्रही ! तबल्याची प्रत्येक थाप सैरभैर धावणाऱ्या मनाला वर्तमानात स्थिर व्हायला भाग पाडणारी. हळूहळू पाहुण्याचं बोलणं विरत जातं. अपेक्षित परिणाम साधून संगीत जाणतेपणी मागे सरतं. आता वातावरणात उदबत्तीचा मंद वास आणि संस्कृतमधले एका विशिष्ट लयीत म्हटले जाणारे मंत्र…फक्त एवढंच ! 

एखादी लस चांगल्या परिणामांची खातरी बाळगून टोचावी त्याप्रमाणे ते निष्ठापूर्वक म्हटलेले शब्द मनात सामावत जात होते – एक शुभ, पवित्र भावना पसरवत!  त्या मंत्रांचा नाद आसमंतात भिनला, खिडकीतून दिसणाऱ्या झाडांच्या पानांतून स्रवू लागला. भूतकाळात रचला गेलेला, आता वर्तमानात विद्यमान असणारा हा नाद. भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांची सांगड घालायला काळाच्या वस्त्राला चुण्या पाडत अखंड पुढे धावत राहणारा धागा म्हणजे हा नाद !  

त्या नादाला शब्दांची गरज उरली नाही. तो नाद हृदयाला काबीज करून शेवटी पेशींपर्यंत पोचला आणि तिथे स्थिरावला. 

पेशींच्या आवरणातून होणाऱ्या प्रक्रियांना जर आवाज असता तर तो हाच, अशी त्याची ओळख पटली. ह्या प्रक्रिया त्या पेशीची आणि म्हणून शरीराची समस्थिती राखतात. हा समतोल राखणारा नाद, या प्रक्रियांची गती राखणारा नाद ! गतीलाच महत्त्व. 

आयुष्याच्या सुरुवातीला मिळणाऱ्या गतीला, विसर्जित रक्षेला मिळणाऱ्या गतीला. तिथे आनंद-दुःख नाही. फक्त गती ! 

हलकेच ह्या नादाचं रूपांतर चैतन्यात झालं आणि…आणि केवळ विरून न जाता पेशींचा भाग झालं.

पूजा संपल्यावर लक्षात आलं की काचांच्या भिंतींमधून बाहेरचं दृश्य फारच रमणीय दिसत होतं. एक शांत तळं, त्याच्या काठावर असलेली हिरवीकंच झाडं, हिरव्यागार गवतावर विहरणारी पांढरी शुभ्र बदकं आणि तिथे खेळणारी अमेरिकन मुलं- सोनेरी केसांची, काळ्या सरळ केसांची, काळ्या कुरळ्या केसांची ! आतमध्ये परंपरेच्या गाठी बांधल्या जात असताना बाहेर कुठल्या गाठी सुटत होत्या बरं ? 

परत पाहुण्यांची हालचाल, गप्पा सुरू झाल्या. हास्यांचे फवारे उडू लागले, गाण्याचे झरे वाहू लागले. तेलुगू भाषेतील संभाषणं मी काहीएक कळत नसताना सहज मनातल्या मनात भाषांतरित केली. एखादी व्यक्ती कोणाची कोण असावी, याचापण अंदाज बांधला. एक कोडंच जणू मी सोडवत होते. काही शब्द ओळखीचे अगदी मराठीत असावे असे वाटणारे तर काही संस्कृतोद्भव म्हणून दोन्ही भाषांना जोडणारे. बराच वेळ ही संभाषणं ऐकल्यानंतर तेलुगू भाषेला जर शब्दांच्या चाळणीतून काढली तर खाली मराठी भाषा उरेल का, असा विचार मनात तरळून गेला. 

तिथे आलेल्या मद्रदेशीय स्त्रियांमध्ये मी नकळत चांदोबातील स्त्रिया शोधू लागले. माझा हा बालीश मापदंड लागू पडे ना; कारण बहुतांशी स्त्रियांनी आधुनिक कपडे घातले होते. फक्त परंपरागत पोशाखात नटलेली नवरी चांदोबातील राजकन्येसारखी सुंदर दिसत होती. भारी कपडे व दागिने घालून घोळक्याने बसलेल्या बायका-मुली सोनेरी परडीत ठेवलेल्या गोकर्णाच्या फुलांसारख्या मोहक दिसत होत्या. त्यांत एक मोगऱ्याच्या फुलागत दिसणारी साडी नेसलेली गोरी अमेरिकन मुलगीपण होती. पुरुषांनीदेखील मोत्यांच्या माळा गळ्यांत घातल्या होत्या. (थेट चांदोबातून उचललेली फॅशन!) पाळण्यातील नातवापासून व्हीलचेयरमध्ये बसलेल्या आजोबांपर्यंत सर्व पिढ्या तिथे हजर होत्या. ते सर्व एकमेकांशी एका अंतःसूत्राने बांधल्याचं जाणवत होतं. जणू काही एक अदृश्य नाजूक जाळीदार वस्त्रच त्यांच्या पूर्वजांपासून पाळण्यातील पिढीपर्यंत विणलं जात होतं आणि ह्या आणि अशा अनेक शुभ घटना म्हणजे त्या वस्त्रावर केली जाणारी कलाबतू होती. ह्या अस्पष्ट, अनुस्यूत जाणिवेत 

समाधान आणि सुरक्षितता होती, हे थोरल्या पिढीच्या चेहऱ्याकडे पाहून कळत होतं. 

ह्या सर्व आनन्दसोहळ्याचं चित्रीकरण काळे पोशाख परिधान केलेले मेक्सिकन, मंगोलियन, युरोपिअन वंशाचे लोक करीत होते. ते खरे वाटू नयेत इतक्या अलिप्तपणे, अबोलपणे आणि स्वतःला अदृश्य मानून काम करीत होते. त्यांचं तिथे असणं हे जागतिकीकरणाचं प्रतीक. त्यांच्यामुळे हे चित्र पूर्ण होत होतं. त्यांच्यामुळे हा अमेरिकेतला आनंदसोहळा आहे ह्याचं भान राहत होतं.

                          *****************************************

Author

Leave a Reply