वामन पंडित आणि २५ वृत्तांचा पट
संस्कृत पंडित असलेल्या वामनांचं मराठी भाषेवर उदंड प्रेम होतं. मराठी भाषेबद्दल ते म्हणतात —
ऐसी ही नवयुवा सुंदरी॥ वाग्विलासें नृत्य करी॥
भाषा संस्कृताभीतरी|| गूढध्वनी||
तें सकळां नकळें॥
संस्कृतातलं हे गूढ उकलणं महत्त्वाचं.
म्हणोनी ओवियें गाइलें॥
प्राकृत जन भोळे ॥
तृप्त कराया ||
ते म्हणतात, मराठी भाषा इतकी गोड आहे, की
अमृतही लाळ घोटी ॥
ज्ञानिये टकमक दृष्टी ॥
भांबावती॥(तत्त्वविवेक)
झाडें पुण्यफळें करूनि सुफळें
केळीं बरीं पोफळें
नारेळें सजळें विचित्र उजळें
ही रम्य सीताफळें
तैसीं हीं प्रबळें स्वसंचितबळें जी तुंबळें जांबळें
पुष्पे हीं विमळें अशोक बकुळें कुंदादिकांचीं कुळेंअशी अस्सल मधाळ मराठी काव्यरचना करणाऱ्या वामन पंडितांच्या वृत्तबद्ध काव्यात कृत्रिमता, कधी ऱ्हस्व – दीर्घांची ओढाताण होते असा आरोप जरी खरा असला; तरी गेयतेमुळे पाठांतर होतं आणि आशय, तत्त्व मनावर लवकर बिंबतं हेही तितकंच महत्त्वाचं आहे. वामन पंडितांनी स्वतंत्र रचना केल्या आहेतच; त्याचबरोबर कधी समवृत्त अनुवाद केले आहेत, कधी अनुवादात वृत्तस्वातंत्र्यही घेतलं आहे. त्यांच्या वृत्तांमधून दिसणारं शब्दभांडार बघून थक्क व्हायला होतं. या लेखात आपण वामन पंडितांच्या वृत्तवैभवाचा विशाल परीघ अनुभवणार आहोत.
गणसंख्येनुसार वृत्तांची मांडणी केली आहे त्यामुळे सुरुवात अनुष्टुभ छंदापासून –
अनुभूतिलेशाचं समवृत्त भाषांतर करताना सूर्यप्रकाश आणि चैतन्यप्रकाश यांची तुलना करणारा हा श्लोक. अनुभूतिलेशातील सर्वच श्लोक चिच्छक्तीच्या अनुभूतीविषयी आहेत. त्याच्या अर्थाच्या तपशिलात जाणे हा आत्ता विषय नाही; पण समवृत्त भाषांतराचं अवघड शिवधनुष्य त्यांनी लीलया पेललेलं दिसतं.
(चाल: भीमरूपी महारुद्रा)
सूर्यप्रकाश अंतातें
न पावे दृष्टिगत् दुरी।
चित्प्रकाशीं मती धांवे
पुढें त्या तो तसा असे ॥२७८॥
भोंदू गुरूंवर हल्ला चढवताना ते इंद्रवज्रा वृत्त वज्रासारखं रोखतात.
(चाल : ज्या ज्या ठिकाणी मन जाय)
हे तो गुरू पापतरू म्हणावे
अंधासवे अंध तसे गणावे
हे प्रीति रामीं गुरू तोच साच
श्रुत्यर्थ इत्यर्थ असे असाच
उपजातीमधून पोताचा (मशालीचा) दृष्टान्त देत म्हणतात,
आली जरी कष्टदशा अपार
न टाकिती धैर्य तथापि थोर
केला जरी पोत बळेंचि खाले
ज्वाला तरी ते वरती उफाळे
कावळे आणि हंस यांच्या दृष्टान्तातून लाचार आणि मानी माणसांतील भेद ते चपखलपणे समजावतात. उष्ट्या अन्नावर झडप घालणारे लाचार कावळे आणि तेजस्वी हंस यांच्या रूपकातून मनुष्यस्वभावाकडेही निर्देश केला जातो.
उच्छिष्ट ताटांतिल अन्न सांचे
धुतां जळीं त्या मग वायसांचे
समूह तें घेउनि तृप्त जाती
न पाहती ते शुक हंस जाती|३८(द्वारकाविजय २ सर्ग/३८
उपेंद्रवज्रा वृत्तात सु+उपराम = सूपराम – चांगला मृत्यू – असा चातुर्यपूर्ण संधी करून दशरथाच्या मृत्यूची बातमी देतात. वाचकांच्या मनात रामा आणि सूपरामा यांचं यमकही ठसतं.
पिता सुखी कीं म्हणतांचि रामा
रडोनि त्या सांगत सूपरामा
रडे अहो रामहि लोक–रीती
स्त्रिया पुन्हा शोक महा करीती||
शालिनी वृत्ताचे गण मततगग
यात सुरुवातीची पाच अक्षरे गुरू असतात. अशी रचना हे अवजड धनुष्य पेलण्यासारखं; पण या वृत्तातही त्यांनी अनेक रचना केल्या आहेत. वानगीदाखल दोन रचना
( चाल : टेंबे स्वामिकृत घोरात्कष्टात्)
सीता हेतू| क्लेश आद्यंत रामा|
एवं लोकीं| दुःखमूळाच रामा|
थोरां थोरां| कष्ट यांच्याचि संगें|
दावी ऐसें| राम सीता – प्रसंगें ॥१७||
राम – भरत भेटीच्या वेळी भरताची शोकाकुल आणि संतप्त अवस्था या वृत्तयोजनेमुळे मनाला सहज भिडत जाते. जहाजातला ज आणि जगदंबेतला ज यांची वृत्तातली गुंफण चमत्कृतिपूर्ण ठरते.
कैकेयीच्या| दुष्ट भावे जळाला|
इच्छी रामाच्या पदाच्या जळाला|
तों स्वामीच्या देखिलें| आश्रमातें|
कांही चित्तें टाकले हो श्रमातें|
कष्ट, इच्छी, चित्तें अशा चपखल जोडाक्षरांमुळे आधीचं अक्षर गुरू होणं हाही विशेष इथे साधलेला आहे.
दिग्विजयावेळचं वर्णन रथोद्धता (रनरलग) वृत्तात मांडतात.
गोपुरें उपरमाडिया सभा
हेम–कुंभ वरि देति यास भा
मंदिरीं सुर–गृहीं ध्वजाचि या
साउल्या निबिड नित्य ज्यांचिया ॥२७॥भा. रा.३
रामजन्माला स्वागता (रनभगग) वृत्ताने त्यांनी नटवलं आहे.
बुंग बुंग रवतुंग मृदंगीं
संग संग नटती स्वहृदंगी
अंगभंग बहु दाविती रंगीं
रामरंग सुख सिंधुतरंगीं|
( द्वारकाविजय ४ सर्ग)
एरवी भारदस्त, संस्कृताचा प्रभाव असलेली रचना करणारे वामन पंडित याच वृत्तात गलुलावली (गरुडावरी), साकल, खोबलेसारखे बोबडे बोलही गुंफतात. श्रीकृष्णाचं लहान मुलांत मूल होणं चालीवर वाचायला गोड वाटतं. साहित्यातील विविध रसांमध्ये हा मधुर रसही पाझरतो.
बोबडी करुनि दाटुनि वाणी बोलतो परम–कौतुक–बाणी बाळ बोलति तसेंच हरी तो बोलतो गृहिणि–चित्त हरीतो ॥२०॥
उचचि नावद–साकल खोबलें खजुल देउनि गाय बलें बलें
बसुनियां मग तूं गलुलावली मजपुलें उलबीं बलि वावली ॥२१॥
चालीलिया देइन गोल गोला गोलांबिया देइन फालफाला
मी ईहुनी आवलतों खलें कीं ऐसा हली खेलवि लेंकलें कीं ॥२२॥ (द्वावि३)
एखादं तत्त्व सांगताना भुजंगप्रयाताची (यययय) सुटसुटीत रचना सुयोग्य ठरते. बारा अक्षरी सोप्या वृत्तात रज्जूसर्प न्याय ते विशद करतात –
(चाल मनाचे श्लोक)
जिये दृष्टिनें रज्जुचा सर्प केला
तिने दोर देखूनि तो नाशियेला
करें निर्मिलें तें करें भग्न व्हावें
तसें काळ कर्तृत्व काळेंचि जावें
भामाविलासात सत्यभामा ‘महाक्रोध दावीत’ असतानाचे वर्णन – द्रुतविलंबित वृत्तातून (नभभर) रौद्ररस साकारत नाट्य उभं केलं आहे.
गडबडां धरणीवरि लोळते
वदवती न कवीसही लोळ ते
रडत मूर्च्छित होय घडीघडी
पवन निश्चळ नेत्र न ऊघडी
अलक हार गळ्यांतिल तोडिते
कुरळ केश मुखावरि सोडिते
कर-युगें उर मस्तक ताडिते
वसन आणिक कंचुकि फाडिते||
याच वृत्तात वीचितरंग न्यायाची पूर्णपणे विरुद्धार्थी रचनाही तितक्याच चपखलपणे बसवली आहे. लौकिक गोष्टींच्या पलीकडे असलेले हे विश्व! समुद्र आणि लाट दिसायला वेगळे दिसले तरी ते मूलतः एकच!
तरि समुद्र – तरंग जळीं मुरे|
मग दुजेपण त्यांत कधीं नुरे
मन मुरे स्वचिदात्मपणीं जरी|
कळणियांत तयांत नुरे उरी॥
(ब्रह्मस्तुति चरण १, भाग१)
सर्वे गुणाः कांचनम् आश्रयन्ते या सुभाषिताचं रूपांतर करताना वंशस्थाच्या (जतजर) प्रत्येक ओळीतील बारा अक्षरांमध्ये तिरकस छटा देत ते जनरीत दाखवून देतात.
असे जयाला धन तोचि पंडित
कुलीन तो तोचि बहुश्रुत
सुपूज्य तो सुंदर तो विचक्षण
धनाश्रयें राहति सर्वही गुण
काव्यातील या तिरकसपणातून उपरोध रस स्रवतो.
इंद्रवंशा (ततजर) वृत्तातून दीर्घकाळाने भेटलेल्या रामरायाचं स्वागत करणाऱ्या स्त्रियांचं चित्र रेखत आनंदरसाचा शिडकावा केला आहे. यात काळे बहु म्हणजे खूप काळा असा अर्थ नसून खूप काळाने असा अर्थ अभिप्रेत आहे.
देखोनि काळें बहु राघवास त्या|
त्या पाहती टाकुनियां गृहा सत्या|
ज्या सुंदरी वेंधति मंदिरोपरी|
पुष्पे बहू वर्षति हो परोपरीं||३०|| भारा ३)
शिक्षणानेच पुरुषांना शोभा येते हे सांगताना सांगोपांग नटलेल्या पुरुषाचं चित्र रेखतात आणि तो हा नव्हेच अशी शाब्दिक काट मारत खरं सौंदर्य कशात आहे ते वसंततिलकेतून (तभजजगग) उलगडतात.
सद्रत्न हार मणि ताइत बाहु-दंडीं
कीं स्नान चंदन फुलें आणि लांब शेंडी
यांनीं खरी घडतसे पुरुषा न शोभा
वाणीच भूषण सु-शिक्षित शब्द– गर्भा
इथे आणि व सुशिक्षित या शब्दांमुळे गण चुकले आहेत; पण अर्थाला प्राधान्य असल्याने अशा चुका गौण ठरतात.
रुक्मिणी श्रीकृष्णाला पत्र पाठवून त्याच्यावर तिचं मन गेलं आहे हे कळवते. हे खरंतर प्रेमपत्र! पण वसंततिलकेतील या प्रेमपत्रात ती म्हणते
आराधिला जरि गदाग्रज म्यां अगण्यें
पूर्तेष्ट दत्त नियमादि बहूत पुण्यें
येऊनियां करिं धरीं मज चक्र-पाणी
चैद्यादि दुष्ट हरि हे न धरूत पाणी
या प्रेमपत्रातील पूर्त नियम म्हणजे लोकोपयोगी कार्य
(वापी कूल तडागादि, देवतायतनानि च।
अन्न प्रदानमाराम: पूर्तमित्यभिधीयते।।)
इष्ट म्हणजे यज्ञयाग,
(अग्निहोत्र तप: सत्यं वेदनां चैव पालनम्।
आतिथ्यं वैश्वदेवश्च, इष्टमित्यभिधीयते।।)
दत्त म्हणजे देणे-दान
रुक्मिणी पत्रिकेतून अशा कामांचंही महत्त्व वामन पंडित ठसवतात.
मालिनी (ननमयय) वृत्तातून भावनांचा प्रकर्ष साधला जातो. वामन पंडितांनी मालिनी वृत्त विविध रसांसाठी उपयोजिलेलं दिसतं.
भरतभावात भरत कैकेयीची कानउघाडणी करत म्हणतो,
न कळत पतिताचें खादलें अन्न वोकीं
तरि पतित नव्हे तो पाप–रूपे अवो कीं|
म्हणुनि उदरिं तूझ्या देह हा जन्मला गे
त्यजिन तरि मला हें पाप तूझें न लागे ॥१०॥
क्रोध व्यक्त करण्यासाठी योजलेलं हेच मालिनी वृत्त
नृसिंहावताराच्या वर्णनात रौद्ररस स्रवतं.
पसरट मुख मोठें
आंत दाढा कराळा
परम चपळ जिव्हा
खड्ग जैसा निराळा
नयन-युगुल जाणों
तापले हेम – पाणी
बहु भुज नख शस्त्रे
देखिला चक्रपाणी||६१
हेच वृत्त प्रसंगी करुण होतं
पद – युग मृदु जें कां पल्लवां तुल्य वाटे|
तदपि तुडवि कांटे दंडकाऽरण्य – वाटे|
स्मरत चरित त्याला ठेउनी तोचि ठेवा|
गमन करि मनीं ते लोक हो पाय ठेवा ॥१९॥
आणि कधी बीभत्सही होतं
मलिन रुधिर – मांसावेगळें हाड दैवें
अवचट मिळतां तें श्वान संतोष पावे
क्षुधितहि गज–हंता जंबुकातें न मारी
अवसरि समजावी क्षुद्रता आणि थोरी||
पंचचामरासारख्या जोरकस वृत्तात (जरजरजग चाल : रावणरचित शिवतांडव)
कर्मतत्त्वाचं निवेदन ठाशीव केलं आहे.
सुधार्थ हा उलंडुनी अलौकिकार्थ खंडुनी
अदृष्ट अर्थ धुंडुनि
प्रयत्न – भेद मांडुनी
स्वयेंचि जीव – ईश्वरा प्रसिद्ध भेद पामरा
असेंचि तत्व तत्परा निरूपती अहो परा ॥४॥ (कर्मतत्त्व – वेदतत्त्व)
शिखरिणीमधून (यमनसभलग)
लोकां सांगे ब्रह्मज्ञान अशा भोंदू गोसाव्यांपासून दूर राहण्याचा इशारा वामन पंडित देतात.
मुखें ब्रह्मज्ञाना
कथिति कर जोडोनि सकळा
जगा दावीती ते
कुशळ कविता गायनकळा
स्वयें आशाबद्धें
सततचि धनालागिं यजिजे
नव्हे ते गोसांवी
विविध – जन – भोंदू समजिजे|
पदें नाना ओव्या –
विविध पथिंचे – श्लोक शिकुनी
कथा कीजे तेणें
धन मिळविती लोक ठकुनी
नसे प्रेमा चित्तीं
अभिनष महा दाविति जना
असे हे गोसांवी|
रहित समजा रामभजना
स्फुट श्लोक ७,८
राम वनवासातून परतल्याचा आणि भरतभेटीचा आनंद पृथ्वीवृत्तातून (जसजसयलग) वर्णिला आहे.
धरी भरत पादुका व्यजन चामरें विंजिती
विभीषण कपींद्रजे निज सुखें तयाच्या जिती
सुधाऽकर धरी मरुत्सुत सिताऽतपत्रा कृती
प्रवेश करि राघव स्वनगरीं पवित्राऽकृती ॥१९॥ अध्याय २-१९ भारा
जीवतत्त्व समजवण्यासाठी मंदाक्रांता (मभनततगग) उपयोजिलं आहे. हा अवघड विषय चालीवर म्हणताना त्यातली गूढता थोडी सौम्य होत जाते असं वाटतं.
नाडिद्वारा म्हणति फिरतो जीव हा तेथतेथें
देहामध्यें असुख सुख घे कारणें होति जेथें
एके काळीं नघडति तरी शीत – उष्णादि बाधा
तर्के ऐशा करुनि अणुता या स्वजीवासि साधा ॥४०॥
शार्दूलविक्रीडित आणि पुष्पक यमक असं अतिशय अवघड काव्य वामन पंडितांनी रचलं आहे. प्रत्येक यतिवरती अतिशय सुरेख अंत्यानुप्रास साधला आहे.
दुर्गें सर्व चुरा
करी सहमुरा
मर्दूनि भौमासुरा
निर्दाळी असुरां
सुखी करि सुरां
साधूजनां भूसुरां
भौमाच्या कुमरा
समर्पुनि धरा
जाऊनि त्याच्या घरा
धाडी स्वाऽत्मपुरा
स्त्रिया निजपुरा
सोळा सहस्रावरा
भौमक्ष्माधिपती –
स्त्रिया कुळवती
सोळा सहस्रा सती
आणी शौर्यगती
हरूनि कुमती
तों पावला श्रीपती
रुक्म्याची अनुजा
समुद्र-तनु जा
दे पत्र रामानुजा
धाडी गुप्त अजा
समीप नृपजा
नामें सुदेवा द्विजा
तेव्हां श्री-गिरिजा–
गृहीं स्व सहजा
आणी सुधा सिंधुजा
मर्दी अश्वगजा चमू निजभुजा –
वीर्ये हरी पद्मजा
(द्वारकाविजय प्रथम सर्ग)
याच वृत्तातून खमंग अन्नरसही घमघमत येतो.
भाज्या साठिभरी तयांतहि परि रांधूनि शाकंबरी
पात्रें तेचि करीं घरी तदुपरी
वाटी स्वशाकंबरी
वामांकीं नवरी घराप्रति हरी दिव्यासनाऊपरी
त्यातें हें अमरी असे सुखकरी वाढूनि कोशिंबरी ॥३७॥ (द्वारकाविजय १)
स्रग्धरा(मरभनययय) या घवघवीत मोठ्या वृत्तात त्यांनी संक्षिप्त रामकथा गुंफली आहे.
(चाल: ध्यायेदाजानुबाहुं)
टाकी ताताऽर्थ राज्या
वन वन विचरे त्या पदीं ज्यांस वाटे
सीता- हस्ताऽब्ज भारी अनुज कपि पती
सेविती नित्य वाटे
बोले निर्नाशिकेच्या
असुर जनक – ज्याने तंई क्रोध लेशें
बांधे दापूनि सिंधू
वधि रिपु – कुळ त्या
रक्षिलें कोशलेशें ॥९॥(भारा. अ१)
मदिरा (भ-७) या एकवीस अक्षरी वृत्तातही अनुप्रास आणि पुष्पक यमक साधले आहे.
तो दशकंठ अकुंठ विसांभुजिं तें विषकंठ – धनू उंचली
कष्टत कोष्ठवरि द्विज ओष्ठहि चावुनि
ज्या जरिनें खचली
चाय उरीं दडपे झडपे मग आनन – पंक्ति धरे रचली
वासुनि दांत मुखांत दहांत पडे मति गाढ नमीं पचली॥१०
सीतास्वयंवर
पुष्पिताग्रा या क्वचित योजल्या जाणाऱ्या अर्धसमवृत्तातील वीररस
मुरडुनि नरडी करें दुजानें
धरुनि असें धरिलेंच पुच्छ ज्यानें
रगडुनि फणि-कंठ कैटभारी
उपरि चढे करि नाट्यनीट भारी
यथार्थदीपिकेतील ओव्यांची जातकुळी परखड आहे. भाषा थेट आहे. सहाव्या अध्यायातील युक्ताहारविहारस्य या श्लोकाचं ओवीबद्ध निरूपण करताना खादाड माणूस नजरेसमोर उभा करतात :
अर्जुना जो अत्यंत भक्षी
तो स्वरूपात काय लक्षी
तटतटती ज्याच्या कुक्षी
बोट न रुते रोवितां||३२७||
अति खाणाऱ्याला योग साधत नाही आणि अन्नावीण विकळ होत अंतःकरण असं समजावत ते पुढे म्हणतात,
भक्षिता अन्न फार
पासला पडो पाहे नर
डरडरां येती ढेकर
योग कैंचा तयासी
अशा स्वभावचित्रणातून गंभीर विषयालाही विनोदाची जोड देत ओवीतून मंद हास्यरस निर्माण करतात.
ओवी छंदात अंत्यानुप्रास ते कटाक्षाने साधतात. मायादेवीचे वर्णन करताना त्यांची प्रतिभा वेगवेगळे विभ्रम धारण करते. आकाशीच्या फुलांची माला धारण करणारा वांझेचा पुत्र आणि मृगजळातल्या कासवीचं दूध अशा अतर्क्य कल्पनाही ओवीत गुंफतात.
खपुष्पाच्या माळा
सुखें घाली वांझपुत्राचे गळां नाना मृगजळींच्या कासवीला
दुग्धवती म्हणा ॥१९८॥
( महाभूतविवेक ४१-४४)
समरा समरा समरा समरा
अशा गोड तोटक वृत्तात मधुरा वृत्ती आणि परुषावृत्ती अनुप्रास गुंफून गुणगुणत राहावी अशी मधुर रचना त्यांनी केली आहे.
मुनि मानस वृंदचि कंदुकसे
यदुनंदन कंदुक तेचि कसे
करिं घेउनि नंदन खेळवि तो
प्रभु तो मनिं चिज्जड खेळवितो||२४||
भनकंटुक ते करिचे पडती विषय क्षितितें तरी जडती पडतांचि चिदंबरिं जे उडती हरितें अजि ते बहु आवडती ॥२५॥ (द्वारकाविजय३ सर्ग)
घनाक्षरीचं वैशिष्ट्य म्हणजे पहिल्या तीन ओळींत अंत्यानुप्रास असतो आणि प्रत्येक चौथ्या चरणात अंत्यानुप्रास असतो. वामन पंडितांनी घनाक्षरी वेगवेगळ्या प्रसंगांसाठी योजली आहे. वानगीदाखल
सीतास्वयंवरातील एक प्रसंग. पहिल्या चरणांत ड चा अंत्यानुप्रास आणि तीन चरणांत ‘डिलें’ असं यमक आणि पुढे ‘वा’ चा अंत्यानुप्रास आहे. राम-रावणाच्या वर्णनातून जोश निर्माण करणारी ही घनाक्षरी
करीती खळासि दंड
ऐसे राम – बाहुदंड
तिहीं मृड चाप चंड
मोडितां कडाडिलें||
भांड ब्रम्हांड अखंड
साता द्वीपां खंड खंड
होऊं पाहे खंड खंड
गगन गडाडिलें||
राक्षसांत मुंड मुंड
रावणादि पुंड पुंड
होती त्यांचे पिंड पिंड
हृदय तडाडिलें
भ्याले भूप लंड भंड
गज दिग्गज उदंड
तोंडीं उगळितां गंड
शोणित भडाडिलें||
घंटा ज्यासी जडजड पताकांची फडफड
करी चाप कडकड
मोडी राम जेधवां
अब्जजादि तडतड
गिरीवरी खडखड
नक्षत्रांचे घडघड
लोळे व्योम चांदवा
भ्याले वीर धडधड
ज्यांचे मनीं धडधड
राक्षसांचे धडधड
कांपले हो तेधवां||
रावणाची बडबड
राहे पडे हडबड
काळघन गडगड
आटले हो तेधवां ॥५२॥
पहिल्या आणि तिसऱ्या चरणात १२ मात्रा, दुसऱ्यात १८ व चौथ्यात १५ मात्रा असतात असं काव्य म्हणजे आर्या. वामन पंडितांनी आर्येची शेवटची पंक्ती १८ मात्रांची केली आहे.
(गोपाळकाला२६६)
रे सहदेवा सत्वर
पुष्कळसा आग्नि आण जाच कसा
जाळूं दे याचे कर,
आम्हां हा सोसवेल जाच कसा
वामन पंडितांच्या काव्यातील अलंकार, यमके, वृत्तं यांची ही छोटीशी झलक. ओवीच्या एकसुरीपणातून बाहेर पडलेलं काव्य काळानुसार चमत्कृतीपूर्ण होतं, आधी लिहिल्याप्रमाणे काव्य फुलत जाण्याची ती एक सुंदर अवस्था होती, त्यात कृत्रिमता होती असं म्हणण्यापेक्षा रसिकांना अशा चमत्कृतीतून काही संदेश देणं, आनंद देणं, पुढच्या कथाकाव्याची उत्सुकता निर्माण करणे हा उद्देश होता; त्यामुळे वामन पंडितांसारखा कवी मराठी काव्यरचनेच्या वाटचालीतला अमूल्य टप्पा आहे. वामन पंडितांच्या रचनांचा अभ्यास करून लेख लिहिताना माझी भूमिका महाभूतविवेक प्रकरणातल्या
“सदैव सोम्येदमग्र आसीत्”
इत्यादि घेउनी श्रुतिसिद्धार्थ
नानापक्वान्नें करीत श्रीविद्यारण्यमुनी ॥४॥
तेथें मी वाढपी झालों ॥ चौगुणें वाढुं लागलों ॥
श्रोतसमुदाय लागला डोलें ॥ आनंदानें ॥५॥
अशी आहे. जे वामन पंडितांनी लिहिलं ते माझ्या मतीने रसिकांपुढे वाढलं… येथे मी वाढपी झाले!
वाचक समुदायाला आवडलं तर ते वाढप्याचं कौशल्य नसून रांधप्याचं आहे.
इति अलम्|
सुषमा जोशी
