तस्मै श्री गुरवे नमः 

आपल्या आयुष्याच्या जडणघडणीत शिक्षकांचा सिंहाचा वाटा असतो. आज पंचाहत्तरीत मागे वळून पाहताना,आयुष्याचा जमाखर्च मांडताना मला आठवतात ते माझे निवडक शिक्षक. त्यांतील बहुतेक आज हयात नाहीत; पण आयुष्यातील त्यांचे स्थान ध्रुवासारखे अढळ आहे. शाळेतले शिक्षक तर कुणालाच विसरता येत नाहीत. सुरुवात तिथूनच करतो. कायमचा ठसा उमटवणारे दोन शिक्षक – याचा अर्थ ज्यांच्या विषयी लिहिले नाही त्यांचे महत्त्व कमी होते असे नाही; पण काही ठसे अमीट असतात.

नगर पालिकेच्या प्रायमरी शाळेतले एक पाठक सर सोडले तर दुसरे कुणीही आठवत नाही. प्रायमरी शाळेत मी वर्गात शिकवत असे, इतर विद्यार्थ्यांचे पेपर तपासत असे! म्हणजे माझे पाय पाळण्यात नव्हे शाळेतच दिसले – जणू मी पुढे शिक्षक होणार हे तेव्हाच ठरले.

हायस्कूलमधील भाषेचे शिक्षक मला सर्वार्थाने घडवून गेले. त्यांतले एक पंचवटीकर सर – ते इंग्रजी शिकवायचे; अतिशय कडक –  त्यांची भीती वाटायची. धोतर,पांढरा शर्ट, ठेंगणी मूर्ती. खुर्चीत बसून शिकवायचे. त्यांची पद्धत वेगळी : आले की ठरावीक एक-दोन मुलांपैकी एकाला उभे करायचे. मी त्यांपैकी एक. आल्या आल्या मला, “उठा पंढरीनाथ,वाचा,” अशी आज्ञा करायचे; मग मी एकेक वाक्य वाचणार, ते त्याचा संदर्भासहित छान अर्थ स्पष्ट करणार; म्हणजे ते म्हणतील ती वाक्ये मी घोकायची त्यांच्या नंतर… असा प्रकार… हे करताना, वाचताना, उभे राहून मी वहीत नोट्सदेखील काढत असे! तेव्हाच जलद गतीने लिहायची सवय लागली. तेही त्यांच्याकडे बघत लिहायचे,खाली वहीत न बघता! याचा परीक्षेत खूप फायदा झाला. त्यांनी शिकवलेले धडे अजूनही आठवतात. आर. एल. स्टीवन्सनचा निबंध,पी. जी. वूडहाऊसचा ‘अंकल पोजर हॅन्ग्स  ए पिक्चर,’  रवींद्रनाथ यांची पोस्टमास्तर कथा हे सारे आठवते, यातच सारे काही आले. शब्दाचे अचूक उच्चार,वाक्याची, परिच्छेदाची नीट मांडणी, व्याकरणातले बारकावे त्याच वर्गात नीट समजले. माझ्या लिहिण्या-बोलण्यातल्या भाषेच्या प्रभुत्वाचे श्रेय याच सरांना जाते; पण गुण देण्याच्या बाबतीत त्यांच्याइतका कंजूष गुरू मी पाहिला नाही. ते अर्धा, पाऊण असे गुण द्यायचे. पन्नासपैकी वर्गात हायेस्ट गुण पंचवीस-सव्वीस एवढेच. दुसऱ्या सेक्शनचे इंग्रजीचे शिक्षक पंचेचाळीसपर्यंत हायेस्ट द्यायचे. त्याचा क्रमांकाच्या स्पर्धेवर परिणाम व्हायचा. माझे बोर्डातले इंग्रजी विषयातले प्रावीण्य केवळ एका गुणाने – शाळेतले गुण कमी असल्याने गमावले होते; पण त्याचे वाईट वाटले नाही; कारण  पंचवटीकर सरांची शिकवण आहे. 

दुसरे आठवणारे शिक्षक मराठीचे – मोहरीर सर. मी पुढे  लेखक झालो, बत्तीस पुस्तकं लिहिली त्याचे श्रेय यांनाच. त्यांचे शिकवणे तितके प्रभावी नव्हते; पण शाळेतल्या वक्तृत्व, निबंध, वादविवाद अशा सर्व स्पर्धांची तयारी तेच करून घ्यायचे;   त्यामुळे माझी लिहिण्या-बोलण्याची मराठी भाषा प्रवाही झाली, लालित्यपूर्ण, सुंदर झाली. आमच्या शाळेत अरुणोदय नावाचे वार्षिक हस्तलिखित निघायचे. नववी ते अकरावी अशी तीन वर्षे त्याचा मीच संपादक होतो. इतर विद्यार्थ्यांचा लेखनातील सहभाग फार कमी असे;  त्यामुळे संपूर्ण सजावट अन् अर्धे अधिक लेखन मलाच करावे लागे! मी आणखीन एक नवा प्रयोग केला त्या काळात. माझे वाचन प्रचंड होते. ज्या लेखक /कवींचे आम्हांला धडे होते त्यांची इतर पुस्तकं मी वाचून काढली. त्यांची शैली नीट अभ्यासली अन् मग प्रश्नांची उत्तरे लिहिताना ज्या धड्याचे प्रश्न सोडवायचे त्याची उत्तरे त्याच लेखकाच्या शैलीत लिहायची असा प्रयोग  केला. हे प्रयोग करताना मोहरीर सरांची खूप मदत झाली. माझे त्यांच्या कुटुंबाशी चांगले संबंध होते. त्यांची सर्व मुले मेरिटमध्ये आली. मोठा मुलगा तर पहिला आला. तो पुढे हैद्राबादला आल्याने संबंध वाढले. मोहरीर सरांच्या लिखाणाचे, नोट्सचे पुस्तक त्यांच्या मुलांनी काढले. त्याला मी प्रस्तावना लिहावी हा त्यांचा आग्रह! शिष्याने गुरूचे ऋण असे फेडले!

शाळेनंतर इंजिनियरिंग कॉलेजचे प्राध्यापक नवे जग दाखवायला आले… त्यांत आठवतात ते फिजिक्स अन् गणिताचे शिक्षक – प्रा पिंगळे, प्रा.के. जी. देशमुख, प्रा. मोहरीर. इंजिनियरिंग विषय शिकविण्यात आनंदी आनंद होता. सगळा नवी विटी नवे राज्य असा प्रकार. कॉलेज नव्या परिसरात नव्याने सुरू झालेले. अनेक शिक्षक तरुण होते. त्यांतले प्रा. पंडित, प्रा. देशपांडे( एम. यू. या नावाने प्रसिद्ध ), प्रा. गरुड हे अपवाद सोडले तर कसे शिकवू नये याचा उत्तम धडा देणारे शिक्षक मिळाले! पुढे मी शिक्षक होणार असे आधीच नियतीने ठरवले असल्याने कसे शिकवू नये हे शिकणे जास्त महत्त्वाचे होते असे आता वाटते.( पुढे मी काही दशकांनंतर याच स्वायत्त संस्थेचा डायरेक्टर झालो. त्यात वर उल्लेख झालेल्या एम. यू. सरांचा अदृश्य हात होता, त्यांनीच माझा बायोडेटा मागवला होता हा योगायोग!)

पदवी घेतल्यानंतर आय. आय. टी खरगपूरला लाभलेल्या बंगाली प्राध्यापकांनी माझ्या प्रोफेशनल करियरला  खरा आकार दिला. आमचे पदवीचे शिक्षण आय. आय. टी.च्या तुलनेत अगदीच सुमार होते; त्यामुळे आम्हांला पहिल्याच सत्राला खूप त्रास झाला; पण तेथील शिक्षकांनी आमची अडचण समजून घेतली अन् जादा क्लासेस, प्रयोगशाळा घेऊन खूप मदत केली. प्रा.सन्याल विभागप्रमुख होते. ते माझ्या मार्गदर्शक गुरूंचे  – म्हणजे प्रा. बी. एन. दास यांचेही गुरू होते – सर्वोत्तम शिक्षक, उत्तम हस्ताक्षर, आवाजात देखणे मोड्यूलेशन. जगात त्यांच्या विषयातले  पाच उत्तम शिक्षक निवडायचे म्हटले तर त्यांत त्यांचा नंबर नक्कीच   लागेल. ते स्वतः पी. एच. डी. नव्हते; पण त्यांनी अनेकांना पी. एच. डी. साठी मार्गदर्शन केले! ते पुढे आय. आय. टी.चे निर्देशकदेखील झाले! (आता नियमाप्रमाणे हे शक्य नाही!) 

प्रा. सन्याल यांचे व्यक्तिमत्त्व अतिशय देखणे, भुरळ पाडणारे होते. ते नेहमी सूट-बूट टाय अशा अद्ययावत पोशाखात असायचे. प्रा.सन्याल याच पोशाखात स्नानदेखील करतात असे विनोदाने म्हटले जायचे! त्यांचा विषय समजायला अतिशय कठीण; पण ते अगदी सोपा करून शिकवायचे. एका सेमिस्टरला त्यांनी फक्त एकच प्रकरण शिकवले. अभ्यासक्रमात चार प्रकरणं होती. आम्हांला समजे ना, परीक्षेला कसे सामोरे जायचे? आम्ही घाबरून त्यांना भेटलो. अडचण सांगितली. त्यांचे मार्मिक उत्तर होते, “मीच सगळे शिकवले तर तुम्ही स्वतः काय शिकणार?” आम्ही आपल्या परीने कसाबसा अभ्यास केला. त्या विषयात कुणीही नापास झाले नाही!

प्रा. सन्याल यांचा वेगळा दरारा होता. त्यांच्यासमोर सेमिनार देणे किंवा लेक्चर देणे दिव्य असायचे. त्यांचे गणिताचे ज्ञान,कंसेप्ट स्फटिकासारखे स्पष्ट,स्वच्छ होते; त्यामुळे बाहेरून आलेले मोठमोठे प्राध्यापक त्यांच्यापुढे लेक्चर द्यायला घाबरायचे. कारने येणारी ही एकमेव व्यक्ती होती त्या वेळी! अपवाद डायरेक्टरचा अर्थातच!

पुढे मी याच विभागात लेक्चरर झाल्यानंतर थेट त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करायला मिळाले. टेक्निकल प्रपोजल, रिपोर्ट कसे लिहायचे, त्याचे प्रभावी सादरीकरण कसे करायचे, पत्रे कशी ड्राफ्ट करायची हे प्रशासनातील बारकावे मी त्यांच्याकडूनच शिकलो. काही काम असेल तर ते तुम्हांला ऑफिसमध्ये बोलवणार नाहीत – स्वतः तुमच्याकडे येतील. तुमचा हात हातात घेतील किंवा खांद्यावर हात ठेवतील अन् मग काय ते काम समजावून सांगतील! व्यक्तिमत्त्वातील हे औदार्य अफलातून होते. ते शेवटचा श्वास घेईपर्यंत – नव्वदी पार केल्यानंतरदेखील आय. आय. टी.त कार्यरत होते. माझ्यावर त्यांनी पुत्रवत प्रेम केले. त्यांची शेवटची भेट झाली तेव्हा ते आय. आय. टी.च्या आय सी यू त होते; पण त्या वेळी नव्वदी पार केलेले प्रा. सन्याल नर्सचा सल्ला झुगारून भरभरून बोलले. माझा अख्खा बायोडेटा त्यांना पाठ होता त्या वयात! त्या परिस्थितीतदेखील त्यांनी मला गणिती विषयातले गुंतागुंतीचे प्रश्न विचारले अन् म्हणाले, “सोपे प्रश्न कुणीही सोडवू शकतो; पण गुंतागुंतीचे कठीण प्रश्न फार कमी जण सोडवू शकतात. तुझा जन्म कठीण प्रश्न सोडविण्यासाठी झालाय. साईबाबा तुम्हारा भला करेगा|” त्यांचा तो आशीर्वादाचा स्पर्श, त्यांचे शेवटचे बोल माझ्यासाठी आयुष्यभर अमोल ठरले. मी त्यांची कार्बन कॉपी आहे हे कबूल करण्यात कमीपणा न वाटता अभिमान वाटतो!

त्यांचे शिष्य,ज्युनियर प्रा. बी. एन. दास हे माझे एम. टेक. अन् नंतर पी. एच. डी. चे मार्गदर्शक होते. अतिशय कडक,रागीट स्वभाव!  प्रसंगी तितकेच मऊ,गोड. फणसाची उपमा त्यांना फिट बसणारी… वर्गात शिकवताना बरेच विषयांतर व्हायचे. इतिहास,साहित्य यांची प्रचंड आवड. आमच्याबरोबर असले की शिवाजी, पेशवे, मराठा, यांच्याबद्दल बोलायचे! भरपूर माहिती. ते मूळ बांगला देशातून आलेले. सामान्य परिस्थितीतल्या कुटुंबातले;  त्यामुळे डाऊन टू अर्थ असे! माझा पी. एच. डी. चा विषय किचकट, अतिशय गुंतागुंतीचा(कॉंप्लेक्स); पण त्यांच्यामुळे सोपा झाला. संशोधनाच्या बाबतीत अतिशय डिमांडिंग – कुठेही चालढकल खपवून घेणार नाहीत. माझा एम. टेक. चा प्रबंध त्यांनी मला पंधरा वेळा लिहायला, सुधारायला लावला. आश्चर्य म्हणजे शेवटी पहिला लिहिलेला ड्राफ्ट मंजूर केला! मी ते नंतर त्यांच्या लक्षात आणून दिले. तेव्हा तेही हसून म्हणाले… “त्याशिवाय तुम्ही उत्तम लिहायला शिकणार कसे?”

आश्चर्य म्हणजे माझा पी. एच. डी. चा प्रबंध त्यांनी एका महिन्यात जसाच्या तसा मंजूर केला! पण तत्पूर्वी आंतरराष्ट्रीय स्तरावर चार-पाच पूर्ण रिसर्च पेपर्स प्रसिद्ध करायला लावले. ते खरे दिव्य होते; कारण अमेरिकन, युरोपियन जर्नलमध्ये एखाद-दोन रिविजन असतच. त्यांत वेळ जायचा. त्या वेळी इंटरनेट, ईमेल काहीही नव्हते; त्यामुळे परदेशी पाठवलेल्या प्रबंधांचे तज्ज्ञांचे रिपोर्ट्स यायलादेखील वेळ लागायचा. ती एक प्रकारची अग्निपरीक्षा असायची. मला आठवते, माझे पी. एच. डी. चे रिपोर्ट्स आल्यावर प्रा. दास यांनी मला बोलवून घेतले अन् म्हणाले, “आता तू शांत झोपू शकतोस. तुझे सर्व रिपोर्ट्स क्लीन आहेत.”

क्लीन याचा अर्थ एकही उणीव नाही कुठे. एरवी रिपोर्टमध्ये कुठेही निगेटिव्ह विधान असले की ते काम पूर्ण करावेच लागे… पुन्हा परीक्षा… पुन्हा विलंब…त्या मानाने आता सारे अगदी सोपे झाले आहे. दुधात भरपूर पाणी घातल्यासारखे! 

प्रा. दास यांच्या हाताखाली प्रबंध,पेपर्स लिहिण्यात मी इतका तज्ज्ञ झालो की त्यांचे नंतरचे विद्यार्थी प्रबंध,पेपर्स लिहायला लागले की ते प्रा. दास आधी माझ्याकडे पाठवत तपासायला!

आधी विद्यार्थी, नंतर तिथेच प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्यावर सहकारी असे दुहेरी नाते होते आय. आय. टी. तील शिक्षकांशी. बंगाली माणसे तशीही मुळात हुशार,कलाप्रेमी, स्वभावाने प्रेमळ, मोकळी.  प्रा दास यांना दोन मुले होती – मी तिसरा – असे आमचे नाते झाले पुढे… आम्ही कौटुंबिक स्तरावर एकमेकांशी बोलायला लागलो, मोकळे व्हायला लागलो. मी उस्मानियात आल्यावरदेखील त्यांना दोन-तीन वेळा व्याख्यानासाठी बोलवले. अगदी शेवटच्या व्याख्यानाच्या वेळी ते भरकटल्यासारखे वाटले. बोलण्यातदेखील विस्कळीतपण जाणवले. ती  शेवटची भेट ठरली.

प्रा. जे. दास हेदेखील विभागातले ज्येष्ठ प्राध्यापक होते. त्यांचा सगळ्यांना प्रचंड धाक. त्यांच्याशी बोलायलादेखील सारे घाबरायचे; पण मी त्यांच्याबरोबर दोन वर्षे पी. जी. ला शिकवले. त्या वेळी आय. आय. टी त एक विषय ज्युनिअर टीचरने सिनियर टीचरबरोबर शिकवायची प्रथा होती. त्यात कमीपणा वाटत नसे – उलट बरेच काही शिकायला मिळे. त्या काळात जे. दास यांच्याशी माझे जिव्हाळ्याचे नाते निर्माण झाले. अगदी मैत्रीचे. भीती केव्हाच पळाली! त्यांनी मला सुंदर प्रशस्तिपत्र दिले होते जे पुढे बरेच ठिकाणी उपयोगी पडले. प्रा. सन्याल, प्रा. जे. दास, प्रा. बी. एन. दास यांचा विद्यार्थी, कलीग म्हणवून घेणे हीदेखील फार मोठी अभिमानाची गोष्ट होती त्या काळी!

ही माणसे मनानेदेखील फार मोठी होती. माझे आय. आय. टी. त प्रमोशन झाले तरी काही तांत्रिक कारणामुळे कुलसचिव ऑर्डर काढत नव्हते – चालढकल करीत होते. त्याच वेळी प्रा. सन्याल डेप्युटी डायरेक्टर झाले. त्यांनी जॉईन होताच एका तासात माझ्या नियुक्तीचे पत्र मला दिले! प्रा. जे.  दास यांचे तर बंगाली शिष्यांपेक्षा जास्त प्रेम,मराठी,तेलुगु विद्यार्थ्यांवर होते! माझी उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून नियुक्ती झाली तेव्हा प्रा. बी दास हे वृत्त सगळ्या आय.आय. टी ला सांगत सुटले! तेही या शब्दांत, “ज्या वयात मी असिस्टंट प्रोफेसरदेखील झालो नाही त्या वयात माझा विद्यार्थी प्रोफेसर झालाय… माझ्यासाठी अत्यंत अभिमानाचा क्षण!”

असे शिक्षक लाभणे याला फार मोठे भाग्य लागते.

पुढे उस्मानिया विद्यापीठात प्राध्यापक म्हणून जॉईन झाल्यावर जे सिनियर सहकारी लाभले त्यांच्याकडूनदेखील खूप शिकता आले. प्रा. डी. सी. रेड्डी, प्रा उमापती रेड्डी यांच्याच प्रयत्नांमुळेच मी केवळ चौतीस वर्षे वयात पूर्ण प्राध्यापक झालो तेही उस्मानियासारख्या जुन्या प्रतिष्ठित विद्यापीठात. दोन्ही रेड्डी प्राध्यापक माझे जन्माचे गाढ मित्र झाले, वयाने ज्येष्ठ असूनही त्यांनी मला सन्मानाने वागवले. दोन वर्षांत विभागप्रमुख व्हायला भाग पाडले! प्रा. डी सी रेड्डी कुलगुरू झाले तेव्हा तर मी त्यांचा उजवा हात म्हणून प्रसिद्ध होतो. ज्येष्ठ डीन या नात्याने आमच्यात मतभेद व्हायचे – चक्क भांडणे व्हायची; पण ती तात्त्विक  असायची. मनात काही साठवून ठेवायचे नाही कुणीच! आमच्या विभागात त्या वेळी अल्लाडी प्रभाकर हे सर्वांत ज्येष्ठ प्राध्यापक होते. त्यांचाही मला भरपूर स्नेह लाभला. तेदेखील प्रा. सन्यालसारखे नेहमी थ्री पीस सुटाबुटांत असायचे. उत्तम शिक्षक. सर्वांशी प्रेमाने वागणारे, जॉली स्वभावाचे. आमच्या शैक्षणिक चर्चा छान रंगायच्या. त्यातूनही खूप शिकता आले. मी संशोधनासाठी विभागात करोडो रुपयांचे प्रोजेक्ट्स आणले, प्रयोगशाळा अत्याधुनिक केल्या याचे या सर्वांना फार कौतुक होते; कारण मी येईपर्यंत संशोधन काहीच नव्हते; नंतर त्याला गती मिळाली. माझा आय. आय. टी.चा अनुभव कामी आला. त्यामुळे आऊट सायडर( म्हणजे मराठी)असूनही इथल्या प्रशासनाने मला अक्षरशः डोक्यावर घेतले. त्या वेळी प्रा. नवनीत राव हे कुलगुरू होते. माझे त्यांचे फार जिव्हाळ्याचे संबंध. त्यामुळे माझ्या मागणीची फाईल डायरेक्ट त्यांच्याकडे जात असे, क्षणात मंजूर होत असे. ते म्हणायचे, “वरिष्ठांना असे पत्र लिहा की नकार देताना कठीण व्हावे!”

हे असे खूप शिकता आले ज्येष्ठ प्राध्यापक सहकाऱ्यांकडून…शिक्षकांबरोबर माझ्या विद्यार्थ्यांनीदेखील मला घडवले. मला शिकताना ज्या अडचणी आल्या त्या माझ्या विद्यार्थ्यांना येऊ नयेत याची दक्षता घेत शिकवले. शिकवताना माझेच शिक्षक माझ्यात संचारत होते! इतके ते सगळे माझ्या आयुष्याचा अभिन्न भाग झाले होते!

आजन्म त्यांच्या ऋणात राहावेसे वाटते.

Author

Leave a Reply