निसर्ग हा अफलातून कलाकार आहे. त्याने सजवलेल्या विविध रूपांमुळे, अनोख्या जडणघडणीमुळे, अनेक दृश्य-अदृश्य पैलूंमुळे माणूस मंत्रमुग्ध होऊन जातो. कधीकधी तर त्याचे वर्णन शब्दांमध्ये करणेही शक्य होत नाही. भारत देशावर निसर्गाने मुक्त उधळण केली आहे. बऱ्याचदा वाटते, काही भारतीयांना या विशाल समृद्धतेची जाणीवदेखील नाही. काही देशांमध्ये कंटाळवाणे फक्त दोनच ऋतू असतात; तर भारतामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा असे तीन ऋतू आहेत.
मे महिन्याच्या प्रखर तापलेल्या उन्हामध्ये खूप चालावे लागले आणि जवळपास एखादे झाड किंवा पेलाभर पाणीदेखील प्यायला मिळाले नाही की माणूस अस्वस्थ होतो. उन्हाच्या या तप्त झळांमुळे जिवाची प्रचंड काहिली व्हायला लागल्यानंतर मग पावसाचे वेध लागू लागतात. जून महिना सुरू होऊन कधी एकदाचा पाऊस सुरू होतो आणि सगळीकडे गारवा पसरतो असे वाटते. अर्थात काही जणांना हा पाऊस खूप आवडतो तर काही जणांना अजिबात आवडत नाही.
मला पाऊस खूप आवडतो. माझ्यातील चित्रकाराला पावसामुळे नव्या चित्रांच्या तयारीचे वेध लागतात.
परमेश्वराजवळ माझे न लिहून पाठवलेले असंख्य तक्रारअर्ज आहेत; पण एका गोष्टीसाठी मात्र मी त्या विश्वनिर्मात्याचा खूप आभारी आहे : त्याने माझे बालपण, तरुणपण पाचगणी, महाबळेश्वर,वाई या निसर्गाने समृद्ध असलेल्या परिसरात घडवले. आपण ज्या परिसरात वाढतो त्या देशाचा, राज्याचा, जिल्ह्याचा, गावाच्या आजूबाजूच्या नैसर्गिक वातावरणाचा आपल्यावर सतत प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे खूप प्रभाव पडतो. माझ्यावर तर या परिसरातील निसर्गदैवतांचे अनेक उपकार, आशीर्वाद आहेत. मी माझ्या चित्रातून नेहमीच त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त करतो.
लहानपणापासून पाचगणीत वाढलो. या गावाला अचंबित करणारे सपाट डोंगराचे ‘टेबललँड’ नावाचे पठार देवाने उदारपणे बहाल केले आहे. आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे पठार म्हणून ते प्रसिद्ध आहे. उन्हाळ्यात या पठारावरून फेरफटका मारताना लक्षात येते पूर्वेकडचे मांढरदेवीचा डोंगर, पांडवगड, कमळगड, नवरा-नवरीच्या डोंगरांच्या रांगा, पश्चिमेकडच्या भिलार, तायघाट गावच्या परिसरात व दक्षिणेकडे राजपुरी खिंगर परिसरातील डोंगरात लागलेल्या वणव्यांमुळे वनश्री भकास दिसत असते. त्यातील हिरवाई पूर्णपणे नष्ट होऊन काळेकभिन्न झालेले डोंगर पाहताना संवेदनशील पर्यटकही खूप नाराज झालेले असतात; पण पावसाळ्यात मात्र येथे निसर्गाच्या चमत्काराला सुरुवात होते आणि या डोंगर-परिसरातील सृष्टिसौंदर्य स्वर्गालाही लाजवणारे ठरते .
पाचगणीत महाबळेश्वरच्या मानाने खूपच कमी पाऊस पडतो. महाबळेश्वरमध्ये नीरस, उदास व जनजीवन विस्कळीत करणारे वातावरण प्रचंड पावसामुळे सुरू होते. असे हवामान मात्र पाचगणीला नसते. महाबळेश्वरला एकदा पावसाने जोर धरला की चार-पाच दिवस संततधार पावसाने खूप कंटाळा येतो. काही जण घराला प्लास्टिक कापडाचे आवरण लावतात, काही जणांच्या घराला गवताच्या पेंड्या बांधून केलेले संरक्षण असते; तर काही इमारतींना पत्र्याची उभी पाने लावून संरक्षक तटबंदी तयार केलेली असते; त्याशिवाय घर सुरक्षित राहू शकत नाही; कारण पावसामुळे सगळ्या भिंतींना ओल पसरून घरातच थंडीचे कुबट वातावरण तयार होते. आता नव्याने आलेली इलेक्ट्रॉनिक माध्यमे व इंटरनेट, मोबाईल यांच्यामुळे निदान चांगला टाइमपास – थोडी करमणूक तरी होते; पण पूर्वीच्या काळात महाबळेश्वरच्या पावसामुळे अनेकांच्या जीवाचे हाल होत असत व आजारपणामुळे ते तात्पुरते स्थलांतरही करत असत. पाचगणीचा पाऊस आरोग्यदायी आणि उत्तम प्रकृती ठेवणारा आहे. तिन्ही ऋतूंमध्ये येथील वातावरण आल्हाददायक आहे – याचा अभ्यास करून ब्रिटिशांनी येथे मुला-मुलींच्या शाळा वसवल्या. त्यांपैकी सेंट जोसेफ, किमिन्स स्कूल, बिलिमोरीया स्कूल, बाथा स्कूल. नुकतेच आम्ही शिकत असलेल्या संजीवन विद्यालय या शाळेनेही १०० वर्षे पूर्ण करून नव्या शतकात यशस्वी पदार्पण केले आहे.
मी मराठी शाळेतून संजीवन या मोठ्या शाळेत मराठी माध्यमातच शिकण्यासाठी गेलो. शाळा गावापासून थोडी लांब होती. घनश्याम करंजकर, संजय भिलारे,विलास निंबाळकर व मी अशी आमची एक छानपैकी चौकडी जमली होती. आम्ही एकत्र शाळेत जायचो. आत्ताच्यासारखे त्या वेळी उंच फुटपाथ बांधलेले नव्हते. रस्त्याच्या बाजूला चांगली मोठी खोदलेली गटारे होती. पावसाळ्यात वाहत्या पाण्यामध्ये आम्ही चौघेजण कागदाच्या बोटी करून सोडायचो. या बोटीच्या वेड्यावाकड्या प्रवासातील गंमत न्याहाळत आमचा शाळेमध्ये प्रवेश व्हायचा. आमच्याकडे हॉकी खेळण्यासाठी स्टिक्स नव्हत्या; मग पावसाळ्यातील मोठ्या छत्र्यांच्या दांड्याने आम्ही प्लास्टिक पेपरचा गुंडाळा केलेल्या बॉलने भर रस्त्यातच खेळत खेळत शाळेतून घरी यायचो. हॉकीची लाकडाची खरी स्टिक नाही याची आम्हांला कधीही खंत नव्हती.
याच काळामध्ये मला बहुधा चित्रकार व्हायचे वेड लागले. मी पावसाची चित्रे काढायचा प्रयत्न करायचो, खूप आटापिटा करायचो; पण चित्रात खऱ्या पावसासारखे इफेक्ट यायचे नाहीत. लहान असल्याने व चित्रतत्रांची माहिती नसल्याने पावसाची चित्रे प्रभावी व्हायची नाहीत.
माझा मित्र घनश्याम एकदा नखशिखांत ओलाचिंब होऊनच माझ्या घरी आला. अस्ताव्यस्त झालेले केस, त्यावरून ओघळणाऱ्या पाण्याच्या धारा पाहून मी त्याला चांगलेच फैलावर घेतले, “कशाला असा मोठ्या पावसात भिजत आलास?”
तर तो सहजपणे म्हणाला,
“असा भिजलो नसतो तर कविता कशी सुचली असती?”
मग माझ्याकडून एक कोरा कागद घेऊन त्याने पावसाची एक सुंदर अप्रतिम कविता लगेच लिहून काढली व मला म्हणाला,
“पावसाची चित्रे,
पावसाची गाणी,
पावसावरचे काव्य,
पावसाचे लेखन या असं घरात बसून निवांत करायच्या गोष्टी असतात का? चित्रासाठी एकदा तरी चिंब भिजून खरा पाऊस कधी अनुभवलास का? एकदा माझ्यासारखा नखशिखांत भिजलास, पावसाला मनापासून मित्र मानलेस की तुला खरा पाऊस कसा असतो ते कळेल.”
मग मात्र मी पावसात भिजलो, व्हॅलीमध्ये भरपावसात भिजत भ्रमंती केली, कोसळणाऱ्या पावसाच्या सरी अंगावर घेऊन त्या धुक्याच्या साम्राज्यात हरवून जायला शिकलो; मग मात्र पाऊस माझा व मी पावसाचा – एकमेकांचे खरे मित्र झालो.
पावसाची चित्रे काढण्याचा सपाटा लावला; मग चित्रातही पाऊस डोकावू लागला.
पाचगणी गाव ते दांडेघरचा जकात नाका यांमध्ये रस्त्याच्या दोन्ही बाजूला उंचच उंच अशी वडाची अनेक झाडे आहेत. त्या झाडांची भिजलेली, हिरवट झालेली मोठी खोडे, त्यांच्या विशाल फांद्या, रस्त्यावर चमकणारे पाणी, झाडांची रस्त्यावर पडलेली प्रतिबिंबे मला आवडू लागली. हळुवार जपून चालणारे सायकलस्वार, छत्री घेऊन लगबगीने चालणारी चौकातील माणसे, काळ्या पिवळ्या रंगातील वडापच्या जीपगाड्या, रेनकोट घालून बोट धरून चालणारी छोटी छोटी मुले व त्यांच्यासोबतचे पालक, कधी धावणारे पर्यटक रंगवताना मजा यायची. टेबललॅंडचे उंच पसरलेले कडे व त्यांमधले धुक्याचे थर, एम.आर.ए. सेंटरची धुक्यातून चमकणारी इमारत, त्याच्या बाजूला असलेली सिल्वर ओक्स व इतर प्रचंड मोठ्या वृक्षांची झाडी, पावसात चमकणारे कृष्णा नदीचे धरणातील पात्र, नगरपालिकेच्या आंबेडकर उद्यानाजवळची झाडे, रस्त्यातून भर पावसात वेगाने पाणी उडवत जाणारी वाहने, एखादा लाल किंवा निळ्या रंगाचा टेंपो, छत्री घेऊन गडबडीने जाणारी बाजारपेठांमधील माणसे, पांगारी, तायघाट गावाजवळची व सिडने पॉइंटच्या परिसरातील कृष्णा व्हॅलीतील घरे, भाताच्या शेतीसाठी तुंबवलेली छोटी छोटी शेततळी, दरीवर ढगांचा तयार झालेला राक्षसासारखा आकार किंवा प्राण्यांसारखे दिसणारे वेगवेगळे भव्य आकार चित्रातून दर्शवताना मजा यायची. आकाशात चाललेले धुके व ढगांच्या वेगवेगळ्या आकारांचा हा नयनरम्य खेळ जाणीवपूर्वक निरखताना बऱ्याच वेळा मी तहानभूक विसरून जायचो. महाबळेश्वरला तर धुक्याचे साम्राज्य सगळीकडे पसरले की चित्रातही ग्रे कलरचे आकाश यायला लागायचे. एकदा मित्रासोबत एलफिन्स्टन पॉइंटला गेलो होतो; पण आकाशात ढगांचे इतके मोठमोठे पुंजके, धुकेच धुके पसरले की जणू पृथ्वीवरच संपूर्ण आकाश उतरले की काय असे वाटू लागले. पुढे असणारा रस्ताही दिसेनासा झाला.
ऑर्थरसीट पॉइंटच्या दरीतून निळ्या-जांभळ्या ढगांच्या कापसासारख्या हळुवार लाटा पाहिल्या की आपण स्वर्गात दिसणारा अनोखा जादूचा खेळ खालून पाहतो की काय असे वाटते. केट्स पॉइंट, लॉडविक पॉइंट, वेण्णा लेक व इतर पॉइंट्सचा परिसरही मला चित्र काढण्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरतो. वाईला अधूनमधून जोराचा पाऊस पडतो; त्या वेळी गणपती घाट, गंगापुरीचा घाट व धोम धरणाचा परिसर एका वेगळ्याच कलर स्कीममध्ये चित्रात दाखवता येतात.
कोकणात जाताना ताम्हिणी घाटातील धबधबे, समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, आकाशातील ढगांचे रौद्ररूप, कोळी व त्यांच्या बोटी, त्या बोटींवरचे वेगळ्या रंगांतील झेंडे, उन्हाने चमकणारे समुद्रकिनारे, कोळ्यांच्या जाळी फेकण्याच्या, बोटी ढकलणाऱ्या हालचाली मला पावसात चित्रे काढण्यासाठी प्रोत्साहित करतात.
महाबळेश्वरचा लिंगमळ्याचा धबधबा, भिलारचा वॉटरफॉल, पोलादपूर महामार्गावरचे धबधबे, डोंगर-कपाऱ्यांवरून पडणारे पाणी पाहिले की मला आपण माणसे निसर्गापुढे किती छोट्या उंचीची व खुज्या व्यक्तिमत्त्वाची आहोत याची प्रकर्षाने जाणीव होते.
पाऊस मला आवडतो त्यामागे आणखी एक खरे कारण आहे. ज्यांच्याबरोबर मी लहानाचा मोठा झालो ते माझे सख्खे तीनही मित्र आता माझ्यासोबत नाहीत. तिघांच्याही बाबतीत काळाने मोठा विचित्र आघात केला आणि तिघांचेही निधन झाले. माझ्यावर नितांत प्रेम करणारी स्वातीची आई या जगातून निघून गेली. माझ्या काळजाचा तुकडा असलेली माझी एकुलती एक छोटी मुलगी ‘दिशा’ आम्हांला दिशाहीन करून कायमची पैलतीरी गेली.
ज्या जवळच्या मित्रांनी फसवले, अगदी जवळच्या नातेवाइकांनी संकटकाळात माझ्याकडे पाठ फिरवली, माणसांच्या वाईट व्यवहारामुळे, कृत्यांमुळे कधीकधी मला जीवन नकोसे झाले, माझे मन उदास व सैरभर झाले, माझे आर्थिक शारीरिक, मानसिक नुकसान झाले – त्यांनी दिलेल्या वेदना, दुःख आठवून अनेकदा अचानक डोळ्यांत अश्रू येतात. जी जवळची माणसे मला कायमची दूर सोडून गेली त्यांच्या आठवणींनी माझे मन गदगदून, गलबलून, गहिवरून येते आणि डोळ्यांत पुन्हा खूप अश्रू दाटतात; डोळे सतत पाणावतात. या सगळ्या दुःखदायक घटना मी दरवर्षी पूर्णपणे विसरून जातो व परत नव्या दमाने, नव्या जोशाने पुन्हा पावसात भिजतो आणि मनातला पाऊस चित्रामध्ये रंगविण्यास सुरुवात करतो .
दरवर्षी सगळ्या वाईट आठवणी मनातून हद्दपार करून मी नव्याने पावसात भिजतो, नव्याने पुन्हा पाऊस अनुभवतो; मग परत नवीन चित्रे रेखाटायला, आयुष्यातील घडलेल्या वाईट घटना विसरायला मनाला प्रेरणा आणि नवी उभारी मिळते.
मला पाऊस आवडतो; कारण डोळ्यांतून वाहणारे अश्रू पावसात फिरताना कोणालाही दिसत नाहीत.
डोळ्यांत आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात.
डोळ्यांत आलेले हे अश्रू पावसातच पुन्हा वाहून जातात.
म्हणून मला मनातला पाऊस चित्रात रंगवायला खूप खूप आवडतो.

अतिशय हृद्य