वाघिणीचं बाळंतपण
बाजीराव आणि श्रीवल्ली यांच्या मिलनाबद्दल मी पूर्वीच लिहिलं आहे. आता आम्हांला उत्सुकता होती ती गरोदर आहे की नाही याची. तिच्याजवळ नेहमी काम करणारा गोपाळ म्हणाला, “मॅडम तिच्या पोटाची वाढ झाल्यासारखी वाटते आहे. ती शांत झाल्यासारखी वाटते आहे.” वाघांच्या पिंजऱ्याची स्वच्छता आणि त्यांना रोजचं बीफ देणं ही कामं गोपाळ करतो; त्यामुळे त्याला वाघांच्या वागणुकीबाबत चांगलं ज्ञान आहे. श्रीवल्लीच्या गरोदरपणाची खातरी करण्यासाठी आम्ही तिची सोनोग्राफी केली. सोनोग्राफीसाठी आम्ही नेहमीप्रमाणे डॉ.वाकणकर सर व डॉ. प्रज्ञा पेठे यांना बोलावलं. सोनोग्राफी करण्यासाठी तिला उपचार पिंजऱ्यात घ्यायला हवं होतं; परंतु दोन दिवस प्रयत्न करून ती उपचार पिंजऱ्यात येत नव्हती. शेवटी उपचार पिंजऱ्याच्या दरवाज्याला लांब दोरखंड बांधण्यात आला. त्याचं एक टोक पकडून एक मजूर दूरवर बसला. वाघिणीला तो आता दिसत नव्हता. पिंजऱ्यात कोंबडी ठेवण्यात आली होती. अखेर पाच सहा तासांच्या प्रतीक्षेनंतर श्रीवल्ली उपचार पिंजऱ्यात आली. दोरखंड पकडून बसलेल्या माणसाने दरवाजा पटकन बंद केला. तशी तिने पिंजऱ्यात मोठी डरकाळी फोडली. आम्ही तिला शांत होऊ दिलं त्यानंतरच सोनोग्राफी सुरू केली. सोनोग्राफीचा प्रोब तिच्या पोटावरून फिरवला. बाजूला असलेल्या स्क्रीनकडे आम्हां साऱ्यांचे डोळे रोखून पाहत होते. गर्भाशयाच्या डचमळणाऱ्या पाण्यात वाघिणीच्या पोटातील पिल्लांचे छोटेसे पाठीचे मणके दिसू लागले आणि सगळ्यांच्याच तोंडून आनंदोद्गार बाहेर पडले. तो गुढीपाडव्याचा दिवस होता. येणाऱ्या नवीन वर्षाची इतकी सुंदर भेट कोणाला मिळाली असेल – असं वाटून गेलं. आम्ही ताबडतोब तिला वाघांच्या पिंजऱ्याच्या बाजूला असलेल्या डेनमध्ये ठेवलं. डेन म्हणजे वाघांची बाळंतपणाची खोली. या खोलीत श्रीवल्ली राहू लागली. तिला आता बीफबरोबर कोंबड्यांचा अतिरिक्त आहार व औषधं सुरू केली. आम्ही उत्सुकतेने वाट बघत होतो. हळूहळू तिचे दिवस भरले; पण तरीही नेमका दिवस कधी येणार हे कोणीच सांगू शकत नव्हते. तो १७ मेचा दिवस होता. माझा सकाळचा राउंड सुरू होता. अचानक मला गोपाळचा फोन आला, “मॅडम, श्रीवल्लीला पिल्लं होत आहेत. मी ताबडतोब वाघांच्या पिंजऱ्याकडे धाव घेतली. डेनच्या बाजूला लावलेल्या सी. सी. टीव्हीमध्ये आम्ही मोठ्या उत्सुकतेने पाहू लागलो. तिचं बाळंतपण व्यवस्थित पार पडत आहे की नाही हे पशुवैद्य म्हणून बघणं ही माझी जबाबदारी होती. त्यामुळे मी सीसीटीव्हीच्या समोर बसून बारकाईने तिचं निरीक्षण करत होते. ती अस्वस्थ झाल्यासारखी उठ-बस करत होती. नुकतंच झालेलं एक पिल्लू तिच्या बाजूला जमिनीवर पडलं होतं. तिच्या गर्भाशयातून आणखी एक पिल्लू बाहेर पडत होतं. आम्ही स्तब्ध होऊन तो निसर्गाचा सर्जनाचा सोहळा बघत होतो. मला सुमित्रा भावेंचा ‘दिठी’ हा सिनेमा आठवला – त्यातील पुत्रनिधनाने दुःखाच्या गर्तेत अडकलेला रामजी आठवला. अडलेल्या गाईचं बाळंतपण करताना रामजीच्या वठलेल्या मनाला नवी पालवी फुटते. वाघिणीचं बाळंतपण बघताना मला पांढऱ्याशुभ्र फुलांच्या प्राजक्ताचं झाड फुलल्याचा भास झाला. जवळजवळ दोन तासांच्या कालावधीत तिने एकूण चार पिलांना जन्म दिला. मांसाचे चार गोळे तिच्यासमोर पडून होते. ती पिल्लांना चाटू लागली. तिने पिलांना चाटून स्वच्छ केले. पिलांना हळुवारपणे आपल्या स्तनांजवळ सरकवले. पिले दूध पिऊ लागली. आता वाघीण स्वस्थ बसली होती. वाघिणीच्या मागील बाळंतपणात तिला दूध आलं नव्हतं; त्यामुळे मागच्या वेळी तिची तीन पिलं मेली होती. एक पिल्लू बाहेरच्या दुधावरच वाढवलं होतं. त्या मादी पिलाचं नाव आम्ही शक्ती ठेवलं होतं. आता नवजात चारी पिलांना दूध पिताना बघून मला हायसं वाटलं. चारी पिलांचा सुरक्षित जन्म झाल्यावर मी सीसीटीव्ही समोरून उठले. तिला खाण्यासाठी आम्ही डेनमध्ये चिकन टाकलं. सतरा तारखेला तिने पिलांना नीट दूध पाजलं पण अठरा तारखेच्या रात्री एक पिल्लू सरकत सरकत तिच्या पाठीमागे गेलं. तिच्या समोर तीन पिलं होती. वाघीण पाठीमागे सरकली आणि एकदम त्या पाठच्या पिलावर बसली. पिल्लू जोराने ओरडलं. ती चटकन बाजूला झाली आणि त्या पिलाला चाटू लागली; पण तिचं वजन त्या पिलाच्या डोक्यावर पडलं होतं. पिल्लू हालचाल करेनासं झालं. आम्ही त्या पिलाला बाहेर काढलं. ते मृत झालं होतं. त्याचं शवविच्छेदन केलं तर त्याच्या डोक्याच्या मध्यभागी मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झालेला दिसला. आम्ही जड अंत:करणाने त्या पिलाचे दफन केले. वाघांना मोजता येत नसावं. आपलं एक पिल्लू मृत पावल्याची जाणीव तिला झाल्याचे दिसत नव्हते. बाकीच्या तीन पिलांची चांगली वाढ होत होती. दिवसातील बराच काळ पिले झोपून असायची. त्यांच्या दुधाची वेळ झाली की वाघीण त्यांना चाटून उठवायची. लगेचच पिलं तिच्या स्तनाला लुचू लागायची. आठ-दहा दिवसांनी पिलांचे डोळे उघडले. आता ती डेनमध्ये सगळीकडे फिरू लागली. डेनमध्ये दोन खोल्या होत्या. दोन खोल्यांच्या मध्ये असलेल्या दरवाज्याला बाहेरून सरकतं हँडल होतं; त्यामुळे आम्ही तो दरवाजा हवा तेव्हा बाहेरून उघडू किंवा बंद करू शकायचो. एकदा वाघीण आतल्या रूममध्ये पिलांसोबत होती. मला बाहेरच्या खोलीची स्वच्छता तपासायची होती म्हणून मी मजुरांना मधला दरवाजा बंद करायला सांगितला. मजूर तो दरवाजा बंद करायला लागले पण तिला तो दरवाजा बंद करायला नको होता. तिने दरवाज्याच्या बाजूला पाय दाबून धरला आणि तोंडातून अस्फुट डरकाळी फोडली. आम्ही बाहेर उभे होतो. ती उघड्या दरवाज्यातून बाहेरच्या खोलीत आली. बाहेरच्या दरवाज्याच्या फटीतून आमच्याकडे रोखून बघत हळू आवाजात गुरगुरली – जणू सांगत होती, “माझ्या परवानगीशिवाय माझ्या घराचा दरवाजा असा अचानक बंद करायचा नाही.” मला तिचा इशारा कळला. मी मजुरांना सांगितलं, “यापुढे तिच्या डेनचा दरवाजा बंद करायचा असेल तर तिच्याशी हळुवारपणे बाहेरून बोलायचं.” मला माहीत होतं की तिला आमचं बोलण कळायचं. आम्ही हाक मारली की ती हुंकार द्यायची.
एक दिवस तिला डेनच्या बाजूच्या बंदिस्त असलेल्या; पण मोकळ्या हवेत सोडलं होतं. समोरच्या पिंजऱ्यात तिचं गेल्या वर्षीचं पिल्लू त्या दिवशी सोडलं होतं. ते मादी पिल्लू शक्ती आता सव्वा वर्षांचं झालं होतं. शक्ती निवांतपणे पिंजऱ्यात फिरत होती. वाघिणीने अचानक शक्तीला पाहिलं आणि ती अस्वस्थ झाल्यासारखी तिच्याकडे बघू लागली. केवळ एकच दिवस शक्ती तिच्यासोबत होती. आता सव्वा वर्षाने ती तिच्या नजरेस पडली होती. तिच्या मेंदूतील वासाची इंद्रियं जणू तिला सांगत होती, ‘ही तुझी छावी आहे.’ तिने शक्तीला ओळखलं. शक्तीकडे बघत जाळीच्या कडेने अस्वस्थ झाल्यासारखी ती फेऱ्या मारत होती. तोंडातून अस्फुट आवाजही काढत होती. शेवटी ते तिचं पहिलं-वहिलं बाळ होतं. सव्वा वर्षांपूर्वी शक्तीचे डोळेही उघडलेले नव्हते त्या वेळी दूध नसल्याने तिला आईपासून दूर करावं लागलं होतं. आता बालपण आणि तारुण्याच्या सीमारेषेवर असलेली वाघीण तिच्या आईसमोर उभी होती. आई आपल्या पिलाला विसरली नव्हती; पण पिलाला आईची ओळखच नव्हती. ती वाघिणीच्या आवाजाने घाबरली आणि दूर पळाली. डेनमध्ये आताची पिलं दुधासाठी चुळबूळ करू लागली होती. आम्ही वाघिणीला डेनमध्ये येण्यासाठी डेनचा दरवाजा उघडला; पण एक दिवसातच दुरावलेल्या पहिल्या पिलाकडे ती व्याकूळपणे बघत होती. तिचा वर्तमानकाळ आत डेनमध्ये होता; तर भूतकाळ त्या पहिल्या पिलाच्या रूपाने बाहेर उभा होता. वर्तमानकाळ आणि भूतकाळामधील सीमारेषा म्हणजे जणू डेनचा दरवाजा आमच्या हातात होता. तो उघडून आमचे पिंजऱ्यावरचे मजूर तिला हाक मारत होते; तरीही ती आपली नजर त्या पहिल्या पिलावर रोखून उभी होती. शेवटी आम्ही शक्तीला आतल्या पिंजऱ्यात घेऊन तिच्या नजरेआड केलं, तेव्हा कुठे तिला आपल्या डेनमधील तीन पिलांची आठवण आली. भानावर आल्यासारखी ती डेनच्या दरवाजातून आत जणू आपल्या वर्तमानकाळाकडे परत फिरली आणि त्या पिलांना दूध पाजू लागली.
