रद्दीतील रत्ने ( ५ )

येरे येरे ओबामा 

    दिनांक १९.७.२०१५ या दिवशीच्या मुंबई सकाळच्या सप्तरंग पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या  लेखावर आधारित मी हा लेख लिहीत आहे. सप्तरंगमध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखाचे शीर्षक आहे ‘येरे येरे ओबामा.’

 नागराज शंकर सिद्दी या नव्या मुंबईतील हॉटेल रॉयल ट्युलिपमध्ये  वेटर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीच्या  सस्मित चेहऱ्यात  व अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांच्या चेहऱ्यात  लक्षवेधी साम्य आहे;  त्यामुळे नागराजचे सहकारी त्याला “ओ बराक, ओ बराक” अशी हाक मारतात. “येरे येरे ओबामा,” या लेखाचे मूळ लेखक श्री. संजय आवटे यांनी ओबामाचा  भारतीय अवतार नागराज सिद्दी  याच्याविषयी दिलेली माहिती त्यांच्या शब्दात जाणून 

घेऊ –  

   “नव्या मुंबईतील खारघरच्या हॉटेल रॉयल ट्युलिपमध्ये डिनरसाठी गेलो आणि मला भेटला हा कारवारचा बराक ओबामा. मी जेव्हा त्याला ‘हाय बराक’ असे म्हणालो त्यावर त्याने अस्खलित इंग्लिशमध्ये माझ्याशी संवाद सुरू केला.  त्याचे मूळ नाव नागराज शंकर सिद्दी.  नागराजचे केस ओबामा यांच्यासारखे बारीक आणि कुरळे आहेत, नाकही तसंच आहे. उंची पाच फूट अकरा इंच.  कर्नाटकातल्या कारवारचा हा २५ वर्षांचा पोरगा नवी मुंबईत वेटर म्हणून काम करतो.  तो ओबामांसारखा दिसतो हा काही निव्वळ अपघात नव्हे!

 नागराज ज्या सिद्दी   जमातीचा आहे ती जमात फार कमी ठिकाणी आढळून येते.  भारतात या जमातीचे लाखभर लोक असतील – त्यांपैकी ३० ते ४०% लोक  कर्नाटकात आहेत. कारवार तालुक्यातल्या अंकोला या गावात या जमातीचे बरेच लोक आहेत. नागराजसुद्धा तिथलाच.  अंकोल्यात गेल्यावर आपल्याला आपण आफ्रिकेत आलो आहोत असे वाटते.  इथे नागराजसारखे बरेच ओबामा  आहेत.  हे सारे इथिओपिया  देशातले.  त्यांना पोर्तुगिजांनी गुलाम म्हणून गोव्यात आणले असे नागराज सांगतो.  ते गोव्यात रमले नाहीत.  ते पळाले शेजारच्या जंगलात.  अंकोला हेसुद्धा तिकडच्या जंगलासारखे जंगल.  आजही  हे  जंगल आहे. त्यांच्यापैकी काहीजण अंकोल्यात हल्ली येल्लापूर  येथे स्थिरावले; तर अनेक जण नंतर पाकिस्तानातही गेले. ते ज्या ठिकाणी पळाले तिथला धर्म त्यांनी स्वीकारला. अंकोल्यातील लोक हिंदू म्हणून हेही हिंदू.  येल्लापूरमध्ये ख्रिश्चनबहुल भागात  हे ख्रिश्चन  झाले. हलियाळमध्ये हे मुस्लीम झाले; त्यामुळे नागराजचा एक काका ख्रिश्चन, एक मावशी मुस्लीम आणि नागराज हिंदू.  

   अंकोल्यात जो नृत्य प्रकार आहे – सिद्दडमामी तोच आफ्रिकेतही आढळतो.  ‘ओये लकी’ फेम   स्नेहा खानविलकर हिने या नृत्य व संगीतावर आधारित सिद्दी लोकसंगीताचा एक एपिसोड एम टीव्ही साठी केला.  यातील ‘येरे येरे हे’ गाणं म्हणजे धमाल आहे.  मराठी, कोकणी, कन्नड अशा अनेक भाषा बोलणाऱ्यांना आपलेसे वाटावे असे हे गाणे आहे.  नागराज या संगीताविषयी, नृत्याविषयी भरभरून बोलत असतो.  तोही ढोलकी सुरेल वाजवतो.  

  या नागराजची आणखी एक मजा – तो बोलतो अस्खलित इंग्लिश; पण शिकलाय मात्र कन्नड माध्यमातून. त्याच्या शिक्षणाचीही   एक स्टोरी आहे. त्याच्या अख्ख्या गावात, संपूर्ण जमातीत कोणीही शिकलेले नव्हते. १९८० च्या दशकात बास्को नावाचा युगांडाचा एक ख्रिश्चन तरुण यांच्या गावात आला. तो पुण्याला एम. एस. डब्ल्यू. करीत होता. त्याला ही आफ्रिकी जमात एवढी आपलीशी वाटली की तो तिथल्या एका कन्येच्या प्रेमात पडला व तिच्याशी लग्न करून आता तो तिथेच राहतो. याने ‘हेल्पिंग हँड’ सोसायटीच्या मदतीने  तिथं शाळा तर सुरू केलीच; पण गुणी मुलांना हेरून त्यांच्या शिक्षणासाठी प्रायोजक शोधण्यास सुरुवात केली.  त्यामुळे २१ व्या शतकात अंकोल्याला बाहेरचं वारं समजलं; मग या जमातीतील मुलं शिकू लागली. या प्रायोजक योजनेमुळे नागराज तामिळनाडूतील कुडीकाडू या गावातील थॉमस स्कूलमधून दहावी झाला. या सर्वव्यापी संचारामुळे नागराज तब्बल सात भाषा बोलतो : कन्नड, तामिळ, मराठी, कोकणी, हिंदी, इंग्लिश व किंचित गुजराती.  फाइव स्टारमध्ये काम करणारा पहिला थोर माणूस म्हणून गावाने त्याचा सत्कार केला आहे.  या तऱ्हेने  शिकलेली अंकोल्याची रेखा ही तरुणी वाशीच्या फोर पॉईंटमध्ये काम करत आहे. ती नागराजची गर्लफ्रेंड आहे.  इथं भरपूर काम करून ग्रॅज्युएशन पूर्ण करून रेखासह भव्य दिव्य  काहीतरी करणार असं तो स्वप्नाळू सुरात हळुवारपणे सांगतो. आता मला सांगा या बहुभाषक, बहुविध अशा आणि बदलाचं स्वप्न बघणाऱ्या सदाबहार नागराजला कुणी ‘बराक’ अशी हाक  का नाही मारणार?

    बराक ही व्यक्ती नाही – ती अभिव्यक्ती आहे… जगाच्या समग्रतेची मानववंशशास्त्रीय ओळख. हा तरुण आजच्या ग्लोबल युगाचा प्रतिनिधी आहे.”

Author

Leave a Reply