जुगलबंदी अशीही… डावे उजवे ते मुक्त आणि बद्ध!
फरीद झकारिया माल्कम ग्लॅडवेल
माल्कम ग्लॅडवेल आणि फरीद झकारिया ही अमेरिकन साहित्यवर्तुळातील दोन मातब्बर नावे. माल्कम ग्लॅडवेल हे मूळचे कॅनडाचे; तर फरीद झकारिया भारतवंशीय – औरंगाबादचे. माल्कम ग्लॅडवेल यांच्या नावावर अनेक अत्यंत लोकप्रिय पुस्तके जमा आहेत. ‘The Tipping Point : How Little Things Make a Big Difference’ (2000), ‘Blink : The Power of Thinking without Thinking’ (2005), ‘Outliers : The Story of Success’ (2008) आणि ‘What the Dog Saw : And Other Adventures’ (2009) ही त्यांतली विशेष गाजलेली चार पुस्तके. पठडीबाहेर जाऊन विचार करणे हे त्यांचे वैशिष्ट्य.
रफिक आणि फातिमा झकारिया यांच्या पोटी जन्माला आलेले फरीद हे अमेरिकन दूरदर्शन पत्रकार व लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. सी.एन.एन.वर होणारा त्यांचा ‘जीपीएस’ हा कार्यक्रम लोकप्रिय आहे. येथे थोडेसे त्यांच्या आई वडिलांविषयी सांगावे लागेल. रफिक झकारिया हे काँग्रेस पक्षाचे नेते होते. स्वातंत्र्य चळवळीत त्यांनी भाग घेतला होता आणि इस्लामचे एक अभ्यासक म्हणून ते प्रसिद्ध होते. ते स्वतः एक चांगले लेखक होते. मुस्लीम चळवळ, फाळणी या विषयांवरही त्यांनी पुस्तके लिहिली आहेत. फरीद यांची आई फातिमा यादेखील एक पत्रकार होत्या. मुंबई टाइम्स आणि नंतर टाइम्स ऑफ इंडियाची रविवार आवृत्ती यांचे संपादन त्या करत असत; त्यामुळे लेखन आणि पत्रकारिता यांचा समर्थ वारसा फरीद यांना मिळाला आहे आणि तो ते अत्यंत सजगपणे पुढे नेत आहेत. त्यांचीही अनेक पुस्तके यापूर्वी प्रसिद्ध झाली आहेत व गाजली आहेत. जागतिक राजकारणाचे भान हे त्यांच्या लिखाणाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य. Ten lessons for the post-pandemic world, In Defense of a liberal education, The Post American World, The Future of Freedom ही त्यांची काही गाजलेली पुस्तके. पुस्तकांच्या नावांवरून झकारिया यांची विचारांची पद्धती स्पष्ट व्हावी. त्यांनी अमेरिकन नागरिकत्व स्वीकारले आहे. अमेरिकन ड्रीम या संकल्पनेवर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. त्याबद्दल ते वेळोवेळी लिहीत असतात.
‘Age Of Revolutions : Progress and Backlash, From 1600 to Present’ असे काहीसे लांबलचक नाव असणारे त्यांचे ताजे पुस्तक नुकतेच बाजारात आले आहे. अमेरिकेत असे एखादे नवीन पुस्तक आले की त्याचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी प्रकाशक व लेखक दोघेही जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. वृत्तपत्रे व समाजमाध्यमे यांचा यासाठी पुरेपूर वापर होतो; त्यामुळे पुस्तक प्रत्यक्ष वाचण्यापूर्वीच वाचकांची मनोभूमिका थोडीफार तयार होते.
या पुस्तकाचा पुरस्कार करण्यासाठी माल्कम ग्लेडवेल आणि फरीद यांनी परस्परांशी एका यू ट्यूब चॅनेलवर गप्पा मारल्या. या पुस्तकात सतराव्या शतकातील हॉलंडमधली आर्थिक क्रांती, अठराव्या शतकातील फ्रांसमधील राजकीय क्रांती, एकोणिसाव्या शतकातील इंग्लंडमधील औद्योगिक क्रांती यांचा अभ्यास करून त्यांचा मानवाच्या प्रगतीवर झालेला परिणाम सांगितला आहे. या चार ऐतिहासिक क्रांतींच्या पार्श्वभूमीवर सद्यःस्थितीत आपल्यासमोर असेच चार क्रांतिकारी विषय उभे आहेत : तंत्रज्ञान, जागतिकीकरण, स्वत्वाचा शोध आणि भूसामरिक राजकारण हे ते चार विषय. एकंदरीत सोळाशे सालापासून आजपर्यंत झालेल्या व होऊ घातलेल्या क्रांती हा या पुस्तकाचा विषय आहे.
या एक तासाच्या मुलाखतीतील पहिली चाळीस मिनिटे लेखक फरीद झकारिया यांची जडणघडण कशी झाली हे प्रेक्षकांना समजावे म्हणून माल्कमने बरेचसे व्यक्तिगत प्रश्न विचारले आहेत. पुस्तक आणि लेखकाच्या मुखवट्यामागची व्यक्ती यांचा अनुबंध समजणे हे पुस्तक समजण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे; हेच माल्कमने यातून आपल्याला सांगितले आहे. प्रश्नांना फरीदने उत्तर दिल्यावर त्या उत्तरांशी आपले व्यक्तिगत अनुभव माल्कम पडताळून पाहतो आणि त्यावरची आपली निरीक्षणे नोंदवतो. माल्कम आणि फरीद हे कॅनडा आणि भारत या दोन वेगळ्या देशांतून अमेरिकेत आलेले आहेत आणि अमेरिकन समाजजीवनात त्यांनी स्वकर्तृत्वाने स्थान निर्माण केले आहे. एकाच वेळी भारत, कॅनडा व युनायटेड स्टेट्स यांच्यामधील सांस्कृतिक वातावरणाची तुलना ऐकायला मिळते व त्यामुळे ही सर्व चर्चा ऐकणे फार मनोरंजक झाले आहे.
भारतातले बालपण व तरुण वयात युरोप – अमेरिकेत केलेले पर्यटन, अमेरिकेत आल्यानंतर प्रिंस्टन युनिव्हर्सिटीत वडील रफिक झकारिया यांच्यासोबत केलेले पर्यटन, हिंदुत्वाची व्याख्या, सर्वसमावेशक हिंदुत्व म्हणजे काय हे फरीदने त्याच्या खास शैलीत मांडले आहे. ‘माझे वडील आज हयात नाहीत ते फार बरे आहे; नाहीतर त्यांना आत्ताची हिंदुस्तानातली परिस्थिती पाहून खूप मानसिक त्रास झाला असता.’ हे त्याचे विधान क्लेशकारक आहे.भारतातून अन्यत्र होणाऱ्या बौद्धिक संपदेच्या पलायनाविषयी विचारले गेल्यावर भारतातून अन्यत्र गेल्यानंतरच लोक का चमकतात त्याचा विचार करायला पाहिजे असे काहीही तिरकस उत्तर बरेच काही सांगून जाते. भारतात बुद्धिवंतांची कमतरता नाही; त्यांना प्रगतीसाठी अनुकूल वातावरण मिळत नाही ही खरी अडचण आहे हे फरीदने ठासून सांगितले. तथाकथित ब्रेन ड्रेन नंतरही भारतात प्रचंड प्रमाणावर गुणवत्ता आहे. या गुणवत्तेचा वापर करण्यासाठी पोषक वातावरण नाही हा खरा प्रश्न आहे.
पुस्तक अजून वाचलेले नाही तरीही पुस्तकाबाबत बरेच वाचले आहे. फरीद झकारिया यांनी एक सिद्धांत मांडला आहे. तंत्रज्ञानामुळे भौतिक प्रगती होते. या भौतिक प्रगतीमुळे सुबत्ता येते. अशी सुबत्ता आली की माणसाला विचार करायला वाव मिळतो, निवांतपणा मिळतो आणि एक प्रकारची स्फूर्तीही मिळते; त्यातून स्वत्वाचा शोध घेण्याची प्रेरणा निर्माण होते. या शोधातून आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अशी काहीशी भावना निर्माण होते आणि त्यातून बरेच प्रश्न निर्माण होतात आणि हे चक्र एक प्रकारे चालूच राहते. यातून निर्माण होणारे ‘आपण आणि ते’ हे विभाजन हा आजच्या तारखेला आपल्या पुढचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो जगात ठिकठिकाणी उभा आहे. हा दुभंग ते आणखी एका प्रकारे मांडतात. तंत्रज्ञानामुळे प्रचंड भौतिक प्रगती साध्य झालेला असा एक वेगळा वर्ग निर्माण होतो, तो शहरात जातो, आर्थिक दृष्ट्या संपन्न होतो आणि बऱ्याच वेळा तो परमतसहिष्णू होतो. तंत्रज्ञानामुळे श्रीमंत झालेल्या या वर्गाविषयी नाराजी असलेला, खेड्यापाड्यांतून मागे राहिलेला असा दुसरा वर्ग आपोआपच तयार होतो आणि ‘कानामागून आले तिखट झाले’ या भावनेतून या दुसऱ्या वर्गाचे पहिल्या वर्गाशी वर्तन होत राहते आणि मग या दुसऱ्या वर्गाचा अनुनय करणारी विचारधारा त्या त्या देशात प्रबळ होते. प्रत्येक वेळी ही विचारधारा उजवी असतेच असे नाही; काही ठिकाणी ती डावीकडे झुकणारीदेखील असते. या दोन वर्गांतील विसंवाद पेटता ठेवणे ही एक राजकीय गरज होऊन राहते आणि या दुसऱ्या वर्गाचा राजकीय फायदा घेण्याची स्पर्धा सुरू होते. हे विभाजन कसे थांबवायचे हा आजचा खरा प्रश्न आहे. अब्राहम हॅरोल्ड माजलो (Maslow) या मानसशास्त्रज्ञाने मानवी विकासाचे पाच टप्पे सांगितले आहेत. प्राथमिक गरजांची पूर्तता ते स्वतःच्या क्षमतांचा पूर्ण विकास अशी माणसाच्या विकासाची वाटचाल होते असा त्याचा सिद्धांत आहे. लिंगभेद, जातिभेद, वर्णभेद यांच्या पलीकडे मानवाला नेणे हा आतापर्यंततरी राजकारण आणि समाजकारणाचा हेतू होता व त्यानुसार राजकीय प्रक्रिया राबवल्या जात होत्या. व्यक्तीचा विकास व स्वातंत्र्य हे या विचारधारेच्या केंद्रस्थानी आहे. झालेल्या या प्रगतीमुळे आपला आपल्या संस्कृतीशी, आपल्या मुळांशी असलेला संबंध तुटतो आहे काय, अशी काहीशी भावना लोकांमध्ये निर्माण होते आहे का? असा प्रश्न ते उपस्थित करतात. डाव्या विचारधारेने सांस्कृतिक युद्ध जिंकले, उजव्या विचारधारेने आर्थिक युद्ध जिंकले; तर मध्यम मार्गी लोकांनी राजकीय युद्ध जिंकले अशी काही वर्षांपर्यंत जगाची परिस्थिती होती; परंतु आता डावी विचारधारा हे सांस्कृतिक युद्ध हरते की काय अशी भीती वाटू लागली आहे. दुसरे महायुद्ध भांडवलशाहीने जिंकले असे आपल्याला वाटते; परंतु प्रत्यक्षात ते युद्ध सामाजिक लोकशाहीने जिंकले आणि स्वातंत्र्य, समता ,बंधुता या व्यक्तिस्वातंत्र्याचा विकास करणाऱ्या संकल्पना जगात सर्वत्र प्रभावीपणे वावरताना दिसू लागल्या. गेल्या ३०-४० वर्षांत झालेल्या प्रचंड भौतिक प्रगतीमुळे आता लोक स्वत्वाचा शोध घेण्याच्या मागे लागले आहेत. थोडक्यात व्यक्तिस्वातंत्र्यातून मिळणारे अनिर्बंध विचारस्वातंत्र्य त्यांना नकोसे झाले आहे. त्यांच्या वतीने निर्णय घेणारी व व्यापक स्वीकृती असलेली एखादी यंत्रणा असावी असे आता त्यांना वाटू लागले आहे. तात्पर्य हल्ली लोकांना ‘स्वातंत्र्यापासून सुटका’ हवी आहे.
ही सुटका कोण व कशी करणार यावर एका प्रकारे जगाचे पुढे काय होणार ते अवलंबून आहे.
पुस्तक वाचल्यावर आपल्याला या प्रश्नाचे उत्तर मिळेल का? कोणास ठाऊक!
Can freedom become a burden, too heavy for man to bear, something he tries to escape from?…Is there not also, perhaps, besides an innate desire for freedom, an instinctive wish for submission?
Erich Fromm

संपादकीय वाचले –
वाचताना खरेच रंगून गेले.नवीन दोन व्यक्तींविषयी माहिती मिळाली.
— सुबत्ता आली की स्वत्वाचा शोध घ्यायला प्रेरणा मिळते — हे थोड खटकल.
१-सुबत्ता आली की निवंतपणा येतो पण खरच माणूस विचार करायला लागतो का / लागला आहे का? आणि स्वत्वाचा शोध घेण्यासाठी माणसाला आधी ‘ मी कोण ‘ हा प्रश्न पडायला हवा.पण हल्ली तर बऱ्यापैकी सुबत्ता दिसते पण विचार किती जण करतात किंवा नवीन काही बघावे,वाचावे,माहिती मिळवावी असे मुलांच्यात दिसत नाही.( मी जे काही माझ्या आजूबाजूला बघते त्यावरून झालेले मत आहे.)
२- लिंग भेद,जाती भेद,वर्ण भेद याच्यापलिकडे मानवाला नेणे हा आत्तापर्यंत हेतू ——- हे आपल्या देशात लागू आहे का? आत्ता तर आपल्याकडे जातीचे राजकारण खूप गाजत आहे. आणि लिंग भेद म्हणताना स्त्री भ्रूणहत्या होत आहे.आणि तृतीपंथीचे प्रश्न सगळ्या जगात आहेतच.
३- स्वातंत्र्यापासून सुटका हवी आहे — वैचारिक स्वातंत्र्या पासून सुटका हवी आहे?आणि ती मिळवणार कशी?
कदाचित असे असेल भौतिक प्रगतीमुळे माणसाचा कल चंगळवादाकडे झालेला दिसतो.मग आलेली अशांतता त्यामुळे समाधान मिळत नाही.मग विचार करणेच थांबवता आले तर बरे होईल.
कदाचित माझे विचार चुकीचे पण असतील किंवा लेखाशी संबंधित नसतील — पण वाचताना हे सुचले म्हणून लिहिले.
संपादकीय आवडलं. विचार करायला लावणारे आहेत हे विचार. पण व्यक्तीस्वातंत्र्य , विचारस्वातंत्र्य याच्या आग्रहाचा अतिरेक करणाऱ्या अभिजनांना या स्वातंत्र्यापासून सुटका हवी अशी वेळ आली आहे का?
तसं वाटण्याइतकी सहृदयता शाबूत आहे का ?