युद्ध : एक परिवर्तन बिंदू

   माध्यान्ह उलटून गेली होती. आभाळ कसं पसरट लांबलचक झालं होतं आणि  त्याला मनोहर केशरी रंगाची छटा येऊ लागली होती. कलिंग देशात घडलेल्या ताज्या रणधुमाळीचे लोटही त्यात मिसळू पाहत होते जणू! त्यामुळे त्या संध्यासमयातून रम्यतेची जागा खिन्नतेने घेतली होती.

सम्राट-महासम्राट-चक्रवर्ती अशी चढत्या क्रमाची बिरुदं मिरवणारा अशोक राजा एका उंच टेकाडावर मनगट हनुवटीखाली धरून कसल्यातरी गहन विचारात गढून गेला होता. कलिंगचा विजय हा नेहमीसारखा त्याला का कोण जाणे सुखावत नव्हता. त्याचे डोळे झपाटल्यासारखे काहीतरी शोधत होते. हवं होतं ते आपल्याला मिळालं का, या प्रश्नाने त्याला पछाडलं होतं. काय असते विजयाची व्याख्या ? आत्ममग्न सम्राटाच्या चेहर्‍यावर झाकोळ दाटलेलं होतं. राजचिन्हं म्लान झाली होती. उत्तर जवळपासच लपलं असावं; पण लपाछपी खेळत होतं त्याच्याशी. युद्ध तर शांतवलं गेलं होतं; पण शांतता कुठेच नव्हती – ना मनात ना आसमंतात. विचार घुमत होते उलटसुलट. शेवटी त्या विचारांचा एका बिंदूत छेद झाला आणि त्याला एक कच्चा मार्ग – धूसर का असेना – दिसू लागला.

आजवरच्या आठ वर्षांच्या कारकिर्दीत आपण अनेक युद्धे  लढलो; सामर्थ्याने, कधी क्रूरतेने, कपटाने ती जिंकत गेलो; सम्राट झालो; ‘अजेय राजा’ हा बहुमान मिळवला; स्वकर्तृत्वाने जवळजवळ हिंदुस्थानावर आपल्या सत्तेची मोहोर उठवली. म्हणजे हा आपला काही पहिलाच विजय नव्हे  की पहिलेच युद्धही नव्हे; मग ही खिन्नता का यावी? तंद्री भंग होताच त्याने १८० अंशांत मान हळूहळू फिरवली. सभोवार रणभूमी रक्तरंजित या एकाच रंगात माखली होती. त्यात शत्रू-मित्र असा कोणताच भेदभाव उरला नव्हता. माणसांच्या, प्राण्यांच्या हाडामासांच्या चिंधड्या उडालेल्या होत्या जिकडेतिकडे. वित्तहानीही कमी झाली नव्हती. कोणाला वीरगती प्राप्त झाली होती आणि कोणी अजूनही वेदनेने विव्हळत होता. कोणा वीराची पत्नी त्याचं कलेवर हृदयाशी धरून ओक्साबोक्शी रडत होती. कुणाची आई तरुण मुलाच्या वियोगाने हंबरडा फोडून रडत होती. कित्येक लाख लोक मृत घोषित झाले होते आणि त्याहून अधिक जखमी होते. घायाळांच्या छावण्या आक्रोशांनी दणाणत होत्या. दूरवरून त्या मागे उरलेल्या असहाय  बायाबापड्यांचे मूक दु:ख सांडून रक्तासारखे वाहत होते. त्याची एक नदीच झाली होती. हा असतो का विजय? अशोक आता स्वत:लाच विचारत होता. इतक्या लोकांचे मृत्यू मोजतोय मी, हा विजय आहे? कुणावर? उरलेल्या जखमी वीरांवर? की मृतांच्या पत्नी माता आणि कुटुंबियांवर? आणि यात शत्रुपक्षाची माणसं मेलीत त्याएवढीच माझ्या राजपक्षाचीपण गेलीत. माझ्या अमात्यांची, मंत्र्यांची मुलं मेली. माझ्या आप्तस्वकीयांनापण आज वीरगती प्राप्त झालीय; मग हे सगळं मी कोणासाठी करतोय नक्की? हा विजय कशावर आहे ? अशोकाचं राज्य जवळजवळ भारतवर्षभर पसरलं होतं.  आता तो भारत देशाचा जबाबदार अधिपती होता; इतकंच नव्हे तर तो तसा स्वतःला मानतही होता. त्याला  अशी जाणीव होणं  उत्तम शासनकर्त्याचं लक्षण होतं. जणू अख्खा देश त्याच्या विचारमंथनातून जन्मणाऱ्या नवनीत निश्चयाची वाट पाहत होता.

अशोकाचं आत्मभान जागं होत होतं. रात्रभर मृदू शय्येवर त्याचा देह तळमळत होता. मन आत अपार होरपळलं होतं; पण पश्चात्तापाने आता त्यावर चंदनी लेप लावला होता आणि जेव्हा मनाची निद्रा संपते तीच खरी पहाटवेळ. खरेच उष:प्रहर झाला होता. अशोकाचे प्रजाजन विजय साजरा करण्यासाठी सज्ज होत होते. अशोकाचं गुणगान सर्वत्र सुरू होतं. त्याच्या राज्यात पण जीवितहानी अतोनात झाली होती; पण ते राजासाठी लढले ना, हाच समज सर्वत्र रूढ होता. शत्रूचे कित्येक लोक कैदेत होते. कितीक युद्धात   मारले गेले होते, किती बेपत्ता झाले होते – गणनाच नको त्याची; पण जिथे आपल्यांसाठी शोक करत बसत नाहीत तिथे शत्रूचा कुठला कळवळा! अशोकाला या सार्‍या क्रूरतेचा तिटकारा आला होता; कारण ती आता त्याच्या राज्याच्या मानसिकतेचा भाग बनली होती आणि हे अतिशय अमानुषतेचं दर्शन होतं.  सगळ्याचं अवलोकन करून आता त्याचा स्वतःशी काही निश्चयही झाला होता.

तातडीने त्याने राज्यसभा बोलावली. एकेक शब्द मनाच्या तळातून उमटत होता. युद्धबंदी जाहीर करून त्याने शस्त्र उचलणार नाही, मनुष्य किंवा जनावर कोणाचीच  हत्या होऊ देणार नाही – हे व आणखी काही नियम करून अशी एक नियमावलीच राज्यभरात राबवली गेली पाहिजे असा आदेश त्याने दिला. प्रजा ऐकून अवाक झाली. एवढ्या दिग्विजयानंतर राजा असा पवित्रा घेऊ शकेल हे कोणाच्याही अवधानात आलं नव्हतं. त्यावर अनेक मतमतांतरं झाली; पण राजा निश्चयी होता आणि त्याच्या निर्णयावर ठाम होता. इतका की त्याने राज्यभर अहिंसा राबवायला घेतली. खूप अवघड होतं हे शिवधनुष्य उचलणं.  असे नियम आपण पाळणंही  किती अवघड असतं; इथे तर ते त्याच्या देशभर पसरलेल्या  महाकाय राज्यात पाळणं अपेक्षित होतं.

अशोकाची एक पत्नी बौद्ध धर्माची चाहती होती. अशोकाच्या मनाच्या या वेळच्या नाजूक अवस्थेला बौद्ध धर्माचं महत्त्व समजलं आणि त्याने धर्मांतर करायचा निश्चय केला. त्याच्या  नव्या विचारांशी मिळताजुळता, शांत, अहिंसक धर्म त्याला पटला, भावला. त्याने बौद्ध धर्म स्वीकारला आणि ठरल्याप्रमाणे राज्यात तर नियमावली राबवलीच; पण राज्यसीमांवर त्याने राज्यात येऊ पाहणार्‍या लोकांना त्याच्या राज्यातले नियम समजावेत म्हणून  दगडांवर शिलालेख लिहून ठेवले. राज्यात कुणीही प्राणिहत्या करता नये – केल्यास दंड भरावा लागेल, स्त्रिया, मोठी माणसे यांचा आदर करायला हवा. राज्यात कुणीही कुणावर शस्त्र उचलता कामा नये. यावर कडक सजा फर्मावली जाईल. आपणही कसे आधी प्राणी मारून खायचो; पण आता राजवाड्यात अजिबात प्राणी मारले जात नाहीत — हे निषिद्ध आहे असे स्वत:पासूनच उदाहरण देऊन लोकांना अहिंसापालनाचे आवाहन त्याने या शिलालेखांमधून केलेले आजही सापडते.  उत्तरेत अगदी गांधार प्रदेशापासून दक्षिणेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटकापर्यंत त्याचे मोठ्या पाषाणांवर कोरून घेतलेले शिलालेख म्हणजे अशोक  एक उत्तम धर्मप्रसारक तसेच कडक राज्यकर्ता होता याचा दस्तऐवज  ठरले आहेत.

घनघोर युद्धानंतर एवढं मनपरिवर्तन झालेला दुसरा राजा याआधी कधी झालेला स्मरत नाही; ना नंतर कधी झाला. नंतर हजारो वर्षं उलटली. अनेक राजे होऊन गेले राजवटी होऊन गेल्या. त्यांच्या पिढ्या भारतभर सुखाने नांदल्या; पण अशोकासारखा सकारात्मक परिवर्तनशील राजा मात्र झाला नाही. अर्थात एवढ्या टोकाच्या विचाराचे परिणामही भोगावे लागतातच. तसे त्यालाही त्यातून जावे लागले. शस्त्र उचलणार नाही म्हटल्यावर सेनापती आणि एरवी अतिशय आक्रमक समजले जाणारे अशोकाचे सैन्य निष्क्रिय झाले. आळशी झाले. परिणामी, शत्रूचे फावले असेल यात नवल नाही. राज्याच्या सीमा अशा ढिल्या पडल्यावर आतली जनता भयग्रस्त झाली. अशोकाचा निश्चय मात्र ठाम होता. युद्ध न करता राज्य करण्याचा त्याचा निग्रह त्याने शेवटपर्यंत कायम ठेवला.

बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर त्याने  त्या धर्माची सगळी सूत्रे अंगिकारून प्रसार करायचे ठरवले. जागोजागी, गावोगावी स्तूप उभारले. बौद्धवचनांचा जाहीर प्रचार सुरू केला; इतकेच नव्हे तर आपली मुले राजपुत्र महेंद्र व राजकन्या संघमित्रा यांना बौद्ध धर्माची दीक्षा देऊन श्रीलंकेत प्रसारासाठी पाठवले होते अशी इतिहासात नोंद आहे. आतापर्यंत केलेल्या मानवसंहाराचे प्रायश्चित्त म्हणून त्याने आपल्या परीने केलेले कार्य बौद्ध धर्मात नक्कीच उच्च दर्जाचे ठरले आहे; पण युद्ध करू नये, संहार करू नये याचा अतिरेक होऊन सैन्याच्या सामर्थ्यावर विपरित परिणाम व्हायचा तो झालाच. तलवारही वापरली नाही, तेलपाणी केलं नाही; तर गंज चढतोच ना तसेच काहीसे झाले. चक्रवर्ती राजा अशोकाच्या पुढच्या काहीच पिढ्यांनंतर मौर्य वंशाचं साम्राज्य संपुष्टात आलं. मथितार्थ, युद्ध नको कारण संहार अपरिहार्य असतो हे ठीक आहे, सामंजस्याने प्रश्न शक्यतोवर सोडवावेत, सीमारक्षण करावे; पण कुणावर  शस्त्र उचलू नये – हे अगदी आदर्शवादी विचार आहेत, चांगलेच आहेत; पण प्रत्यक्षात असं समूहाने जगणं शक्य होतंच असं नाही. पण अशा विचारांचा आग्रही पुरस्कार करण्याचं धाडस अशोकाने दाखवलं आणि राजा असल्यामुळे ते  अमलात आणण्याचा प्रयत्नही केला हे नि:संशय कौतुकास्पद आहे.

तरीही भारतवर्षात  त्यानंतर युद्धे  झालीच नाहीत असे मात्र घडले नाही. बौद्धविचार मात्र दूरवर पोहोचले. काळ भरभर पानं पालटत राहिला. युगानुयुगे लोटली. मध्ययुग आलं. बहामनी आणि इतर शाह्या आल्या. अफगाण, चीन आदी दूरच्या देशांमधून निरनिराळे उपरे क्रूर सत्ताधीश आले. त्यांच्यासोबत त्यांच्या  सल्तनती आल्या. आक्रमणांवर आक्रमणं झाली. अत्याचारी अघोरी राजे भारतावर राज्य करू लागले. या कालखंडात अहिंसा पाळून सहन करणं केवळ अशक्य होतं. तलवार  परजून उपसून मुकाबला करून मातृभूमी वाचवणं हे कर्तव्यच होतं. वेळोवेळी भारताचे सुपुत्र युद्धांमध्ये आपली कामगिरी प्राण पणाला लावून करत आले. संरक्षण हे आद्य कर्तव्य मानत आले आणि यात कोणतीच चूक नाही; परंतु  केवळ महत्त्वाकांक्षेपोटी परक्या मुलखावर स्वारी करून तोपण आपल्या टाचेखाली यावा, म्हणून युद्ध घडवून आणणं आणि त्या योगाने संहार होऊ देणं हे केव्हाही वाईटच. कारण यात अनेक निष्पाप बळी पडतात. त्यांचं मतही विचारात घेतलं गेलेलं नसतं. तरी युद्धे  होतच राहिली आहेत. अशोकाच्या आधीही आणि नंतरही.

कारणं काही का असेना पण आपल्याला महाभारत- रामायणाने युद्धपरंपरा शिकवली. बऱ्याच वेळा वैयक्तिक सूड आणि द्वेष, दुसर्‍याकडे आहे ते आपल्याला हवे ही मनीषा बाळगणं यापोटी घडलेली ही महायुद्धं. कदाचित या तीन गोष्टी अस्तित्वात नसतील तर युद्धच होणार नाहीत. एखादा मनुष्य सूडबुद्धीने दुसर्‍या वरचढ माणसाचे नुकसान करतो; मग तो दुसरा मनुष्य निष्कारण डिवचला जातो. साधी गोष्ट आहे, कोणी धनाने, सौंदर्याने, गुणाने दुसऱ्यापेक्षा निराळा असतो. हा भेद सृष्टीच्या निर्मात्याने कदाचित मुद्दाम केला गेला असावा; पण सहसा माणूस त्याची तुला स्वतःशी करून कमी व जास्त असा फरक करू लागतो. यापेक्षा आपण तमक्याहून निराळे बनले आहोत हा विचार किती छान आहे! पण नाही, त्याच्याकडे असं काय आहे जे माझ्याकडे नाही हा शोध सुरू होतो – विनाकारण. यातून दुसऱ्याकडचं मला मिळालं तर मी त्याच्यापेक्षा वरचढ होईन ही भावना जन्म घेते आणि ती मग त्याची स्वस्थता हिरावून घेते; त्याला पुरती घेरते; मग छुपे चोरटे हल्ले, हेर पाठवून त्याच्या बातम्या काढणं,पाळत ठेवणं, त्याचे कमजोर दुवे जाणून घेणं यात माणूस आपली निसर्गदत्त अमूल्य बुद्धी वेड्यासारखी खर्च करत राहतो. एका विशिष्ट वेळी तो सज्ज होऊन युद्ध पुकारतो. समोरचा तुल्यबळ असला तरी हकनाक प्रतिस्पर्धी म्हटला जातो. मग स्वाऱ्या आल्या, शक्तिप्रदर्शन आलं, लुटी आल्या नि पळवापळव्या आल्या, युद्धाचा  अविभाज्य भाग म्हणून मग संहार आले, शस्त्रं आली, योद्धे आले. एक जिंकतो, एक हरतो, कधी तोलामोलाचे ठरले तर तह जन्माला येतात.  तरी प्रतिशोधाची ज्वाला आत धगधगत असतेच. दुर्दैवाने हे चक्र अव्याहत सुरू आहे.

सूड उगवणारा जर सामंजस्याने ऐकेनासा झाला की त्याविरुद्ध युद्ध करून त्याच्यासकट त्याचे विचारही नष्ट करता येतात हे युद्ध शिकवतं. मराठा काळ, ब्रिटिश काळ आला आणि गेला. अनेक मोठ्या स्मरणीय लढाया त्या कालखंडात घडून आल्या. पुन्हा कारण तेच. महत्त्वाकांक्षा ! सूड ! असूया ! दोन देशांमध्ये घडलं तर ते युद्ध आणि अनेक देश मिळून दोन तट पडले तर महायुद्ध असा एक संकेत आहे. समविचारी देश सहसा एकत्र येतात आणि त्यांचा एक मित्रपक्ष होतो. त्यांच्या विचारांशी अजिबात सहमत नसणारे देशपण उघड एकत्र येतात. एवढ्यावरच थांबत नाही हे. एखाद्या देशाच्या अधिपत्याखाली दुसरा देश असायचे दिवस होते पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धांचे. त्यामुळे काही करार करून बलवान देशाने गुलाम देशांना पण मदत म्हणून या महायुद्धांमध्ये ओढलं.  

पहिलं महायुद्ध घडलं तेव्हा लोकांच्या लक्षात आलं की आपण लढाई आणि युद्धं पाहिली, ऐकली; पण तीन चार किंवा अधिक सत्ता एकत्र येऊन तशीच फळी दुसर्‍या बाजूला अशी  महाकाय परिसर व्यापणारी , दीर्घकालीन युद्धेपण असतात. त्याचे परिणाम एकच नाही अनेक देश भोगतात. युद्धाच्या  पूर्वीच्या सगळ्या सीमा, ठोकताळे ओलांडून देशच्या देश घशाखाली घातले जातात, काबीज होतात. असा युद्धकाळ अधिक तापदायक असतो.

आणि ते ‘युद्धस्य वार्ता रम्या’ म्हणतात खरं; पण आपण त्या युद्धात   होरपळले जात नसतो तेव्हा,त्याच्या धगीचा इतकासाही दाह आपल्यापर्यंत पोहोचत नाही तेव्हा. रेशन शिधा मर्यादित मिळू लागतो, सक्तीने आपला देश युद्धात  गुलाम म्हणून ओढला जातो, जुलमाने आपली माणसं युद्धमोहिमांवर पाठवली जातात, त्यांचं नावनिशाण नंतर ऐकू येत नाही त्या वार्ता रम्य कशा काय असतील? रेडिओला कान लावून जीव गोळा करून मृतांमध्ये आपल्या कुटुंबियाचं नाव तर नाही ना म्हणून दिवसेंदिवस वाट पाहणार्‍या माता, घरातली उरलेली माणसं युद्धाचा  नक्कीच निषेध करत असतील.

पहिल्या महायुद्धातून  जग सावरू पाहत होतं. औद्योगिक, शेतीजगतात क्रांती होत होती. शिक्षणाचं महत्त्व प्रमुख राष्ट्रांबरोबर त्यांच्या ताब्यातल्या देशांनाही आता समजू लागलं होतं. रसायनांचं रोजच्या व्यवहारात महत्त्व वाढू लागलं. प्रयोगशाळांमध्ये अनेक प्रयोग होत होते. अशातच पुन्हा एक ठिणगी पडली आणि दुसरं महायुद्ध पुकारण्यात आलं. तेही तब्बल चार-पाच वर्षं चाललं. मात्र तेव्हा एक अशी घटना घडली जी त्या महाभयंकर युद्धघटनांना अगदी विसंगत होती.

जपानने पर्ल हार्बरवर हल्ला करून जगातल्या बलाढ्य अमेरिकेशी वैर पत्करलं आणि इटली, जर्मनी आदी मित्रराष्ट्रांमध्ये (ॲक्सिस पॉवर) देशसमूहात आपला समावेश नोंदवला. युद्धाचेच  दिवस ते. अमेरिकेने आपली बलाढ्यता प्रस्थापित करण्याची हीच संधी समजून अणुबॉंबचा वापर करायचे गुप्तपणे ठरवले. नीट नियोजनपूर्वक काहीच दिवसांत अमेरिकेने ‘फॅट बॉय’ आणि ‘लिट्ल मॅन’ या दोन नावांनी अणुबॉंब जपानच्या हिरोशिमा व नागासाकी या मोठ्या शहरांवर टाकले. अणुबॉम्बचा वापर या आधी कोणत्याच युद्धात केला गेला नव्हता.

या कृत्यातून मानवी विचारसरणीचे पराकोटीचे विध्वंसक दर्शन जगाला घडले. आपल्या सत्तासाम्राज्याचं असं विघातक प्रदर्शन अमेरिकेने जपानला दाखवण्याच्या निमित्ताने एकंदर जगावर वचक निर्माण करायचा प्रयत्न केला. या घटनेचे परिणाम जपानसाठी दूरगामी ठरले. अणुशक्तीची ताकद जपानच्या देशवासींना चांगलीच समजली. बाँबस्फोटाचे परिणाम त्यांच्या अनेक पिढ्या भोगत राहिल्या. त्यांच्या त्या वेळच्या गर्भवती महिलांच्या गर्भांमध्ये तर्‍हेतर्‍हेच्या विकृती निर्माण झाल्या. त्या पुढच्या पिढ्यांमध्ये झिरपत गेल्या. नुसतीच मनुष्यहानी होणे यापलीकडची क्रूरता जगाला दिसली. जग हादरलं.

जपान उद्ध्वस्त झाला आणि महायुद्ध स्तब्ध झालं. जागतिक पातळीवर जपानला साहजिक सहानुभूती मिळाली आणि अमेरिकेविरुद्ध अनेक देशांनी निषेधाची काळी निशाणं फडकवली. त्यांच्याशी व्यापारसंबंध थांबवले. युनोमधून अमेरिकेला रद्दबातल करण्याची सूचना देण्यात आली. जपानला नुकसानभरपाई द्यायला लावली आणि पुष्कळ अटी अमेरिकेवर लादण्यात आल्या.  दुसऱ्या महायुद्धाच्या  समाप्तीचं हे मोठं कारण ठरलं; पण या सगळ्यात एक आश्चर्यकारक घटना घडली ज्याने या आधीची अमेरिका तीच होती का असा प्रश्न जगाला पडला. अमेरिकेने जपानशी तह करायचं ठरवलं. दोन लहान मुलं भांडत असतात. एक थोडं वडील असतं. मुलं-मुलं भांडत असतात तेव्हा मोठे शांत असतात; पण पराकोटीच्या भांडणात हद्द पार केली जाते तेव्हा मात्र वयस्क माणसं मध्यस्थी करून त्यांना दूर करतात. एकमेकांशी मिठ्या मारून पुन्हा दोस्ती करायला लावतात. तसं काहीसं घडलं असावं हे. अमेरिकेने जपानला आपला लहान भाऊ असल्यासारखं जपायला सुरुवात केली. त्याचं रक्षण करायची हमी घेतली. एवढेच नव्हे तर जपान हा आशिया खंडात आपला एक मित्र देश निर्माण केला. जपाननेसुद्धा अढी न ठेवता अमेरिकेने मित्रत्वाचा पुढे केलेला हात हातात घेतला. त्यांच्या देशावर श्रद्धा ठेवली. त्यानंतर आजतागायत कधीही अमेरिकेने जपान विरुद्ध कारवाया केल्याचं ऐकण्यात नाही. जपान तर नंतर कोणत्याच युद्धात  पडला नाही; पण म्हणून तो गाफील राहिला नाही. स्वसंरक्षण केलं – जे केलंच पाहिजे; पण जपानने स्वतःला काही काळ कोशात गुरफटून घेतलं. मोठं कौतुक म्हणजे संपूर्ण देश राज्यकर्त्यांच्या पाठीशी उभा राहिला. पूर्णपणे आत्मबळावर जपानने कात टाकल्यासारखी प्रगती केली. कृषी, तंत्रविज्ञान, उत्पादन, कारागिरी, शिक्षण सगळ्या क्षेत्रांत जगात सर्वोत्कृष्ट म्हणून त्याने स्वत:ला सिद्ध केले. ही आत्मसिद्धी आणि ध्येयाचा पाठपुरावा हे महायुद्धाचे  एक फलित म्हणता येईल.  

असं होऊ शकतं. असं दोन वेळा इतिहासात स्पष्टपणे घडले आहे. सम्राट अशोकाचं हृदयपरिवर्तन आणि अमेरिका-जपान सलोखा ही याची उत्तम उदाहरणं आहेत. कुणी शस्त्रास्त्रं अधिक कौशल्याने बनवण्याकडे लक्ष केंद्रित करतो, तर एखादा देश नोकरी व्यवसायाच्या नव्या संधी निर्माण करण्यात मग्न होतो. पारतंत्र्यातल्या देशांनी अशा वेळी संधी साधून बंड पुकारलं. आपला देशही त्यात अग्रेसर होता. युद्धात मदत म्हणून सामील होताना  ब्रिटिशांवर अटी घालण्यात आल्या. त्यांतली प्रमुख अट भारताला स्वातंत्र्य ही होती. महात्मा गांधी, नामदार गोखले, नेहरू, बोस आदी देशसेवकांच्या या पावित्र्यामुळे स्वातंत्र्य अगदी जवळ येऊन ठेपलं. युद्धाचे  परिणाम सहसा दूरगामी असतातच; पण ते असेही होऊ शकतात आणि ते सकारात्मक आहेत; फक्त ओळखता यायला हवेत. तेवढी समज परस्पर गटांमध्ये यायला हवी आणि त्यानंतरचं आलेलं शहाणपण राबवण्याचं धाडसही अंगी हवं. तेवढा आत्मविश्वास हवा. जो सम्राट अशोकाने दाखवला, दुसऱ्या महायुद्धानंतर भारताच्या नेत्यांनी आणि अमेरिका-जपानने दाखवला.

युद्धबंदी जाहीर होते तेव्हा सगळे नि:श्वास सोडतात. आयुष्यं रुळावर येऊ पाहत असतात. रात्री कितीही भांडणं झाली तरी पहाट झाल्यावर नित्यकर्मं आटपून नवा दिवस आशेने माणसं सुरू करतात तसेच हे; पण कुणी त्या भांडणांत इतकं भाजून निघालेलं  असतं की वीट येऊन कायमचाच भांडणाला पूर्णविराम देऊन नवं आयुष्य सुरू करतं. ती खरी पहाट आणि तीच खरी युद्धबंदी!!

Author

Leave a Reply