फांद्यावरी बांधिले ग मुलींनी हिंदोले
पंचमीचा सण आला, डोळे माझे ओले
श्रावणाच्या शिरव्यांनी आनंदली धराराणी
माझे पण प्राणनाथ घरी नाही आले
जळ भरे पानोपानी, संतोषली वनराणी
खळाखळा वाहतात धुंद नदीनाले
पागोळ्या गळतात, बुडबुडे पळतात
भिजलेल्या चिमणीचे पंख धन्य झाले
आरशात माझी मला पाहू बाई किती वेळा
वळचणीची पाल काही भलेबुरे बोले
गीतकार : ग दि माडगूळकर, संगीत व स्वर गजानन वाटवे यांचा.
पूर्वी नागपंचमीच्या सुमारास हे गाणे आकाशवाणीवर हमखास लागायचे. वाटव्यांचा सुरेल व भावोत्कट स्वर श्रावणातल्या नागपंचमीचे चित्र डोळ्यांसमोर उभा करायचा. माझे वडील हे गाणे सुरेलपणे गुणगुणतात. लहानपणी काॅलेजच्या रस्त्यावर किंवा प्लॅटफॉर्मच्या जवळपास गारुडी दिसायचा. तेव्हा येऊ घातलेल्या नागपंचमीची चाहूल लागायची. नागपंचमीचा आईचा खास मेनू म्हणजे खांडवी. आघाडा व दुर्वा वाहिलेला जिवतीचा कागद व त्यासमोर रांगोळीने काढलेला नागोबा. याला दूध, लाह्या व खांडवीचा नैवेद्य दाखवायचा; मग गरमागरम खांडवीवर तुपाची धार धरून आडवा हात मारायचा.
लग्न होऊन पंढरपूरला आले. पहिल्या नागपंचमीला मला वेगळाच माहोल पाहायला मिळाला. नागपंचमीच्या आदल्या दिवसापासूनच मुली व बायका रात्री रस्त्यावर वेगवेगळे खेळ खेळत होत्या. झिम्मा,फुगडी,फेर धरत होत्या. मला हे सारे नवीनच होते.
या सगळ्याजणी त्या दिवशी उपवास करतात भाजका किंवा एकादशीसारखा. त्याला ‘भावाचा उपवास’ म्हणतात. भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी हा उपास. या वेळी म्हटल्या जाणाऱ्या काही भावपूर्ण ओव्या मला कै. मानसीताई केसकर यांनी सांगितल्या होत्या.
माझ्या गं दारावरून॥
रंगीत गाड्या गेल्या॥
॥ भावानं गं बहिणी नेल्या पंचमीच्या सणाला गं ॥
चाट्याच्या गं दुकानी भाऊ
बसला गादीवरी ॥
॥हिरवी पैठणी मांडीवरी हरणीच्या लाडासाठी ॥
नागपंचमीच्या दिवशी सकाळी आमच्याकडे स्वयंपाक करणाऱ्या कमलकाकू मला कासाराकडे बांगड्या भरायला घेऊन गेल्या, दुपारी सासूबाईंनी नवीन साडी दिली, थोड्या वेळाने दोघी नणंदा आल्या. येताना मेंदीचे कोन, नेलपेंट एक ना अनेक वस्तू भेट देऊन गेल्या; कारण काय तर माझी पहिली नागपंचमी.
एकंदरीत पंढरपूरमध्ये नागपंचमी खूपच उत्साहात साजरी होते. यासाठी खास आलेल्या माहेरवाशिणींचे लाड करायचे, त्यांना मनसोक्त खेळू द्यायचे, खाऊपिऊ घालायचे, संध्याकाळी देवळात जायचे, तेथे सभामंडपातही सर्व खेळ खेळायचे. घराजवळ कासारांची खूप दुकानं आहेत. चार दिवस तेथे बायकांची अक्षरशः जत्रा असते. पंचक्रोशीतील बायका-मुलीही बांगड्या भरायला येतात. गल्ली-बोळांतून महिलांचे खेळ चालू असतात. मुख्य रस्त्यावर मुलांच्या सूरपाट्या रंगतात. रस्त्यावरच चुन्याने मोठमोठे चौकोन रंगवून हा खेळ खेळला जातो. चापल्य,दमदारपणा,व बुद्धिकौशल्य या तिन्ही गोष्टींचा कस लावणारा, अत्यंत वेगवान व नेत्रदीपक असा हा खेळ आहे. रस्त्यावर जाग्या असणाऱ्या या तरुणाईने गल्लीबोळात खेळणाऱ्या महिलांना आपसूकच संरक्षण मिळते. माहेरी जरी खांडवी असली तरी सासरी मात्र पुरणपोळी किंवा दिंडं करायची पद्धत.
नागपंचमीच्या दुसऱ्या दिवशी देवळात श्रीरुक्मिणी-पाडुरंगापुढे मातीची गजगौरी मांडतात. गजारूढ गौरीशंकराची मूर्ती हाताने माती कालवून बनवली जाते. यात या विधीचे मुख्य यजमान पाटील; तर सर्व बारा बलुतेदारांचा सहभाग असतो. गावातील कुंभार माती आणून देतात. चितारी( वीणा,मृदुंग पखवाज बनवणारे) मातीचा हत्ती घडवतात. याला लागणारे लाकूड पाटील पुरवतात;तर डोळे म्हणून कवड्या वापरतात. मूर्ती तयार झाली की त्याला कुंची व केवड्याची कलगी घालतात. अशा प्रकारे सुस्थापित मूर्तीच्या अग्रपूजेचा मान चितारी यांचा. त्यांना पाटलांकडून मानाचा नारळ दिला जातो. सर्व ग्रामस्थ दिवसभर या गौरीच्या दर्शनासाठी येतात. महालक्ष्मीप्रमाणे याही गौरीला दोरे वाहण्याची प्रथा आहे.
पंढरपुरातील गजगौरी
आपल्या गावगाड्यात देऊळ हे एक सांस्कृतिक केंद्र आहे, मुक्तद्वार आहे. घरात जशी आत्मीयता असते तशीच ती देवळातही असते; त्यामुळे सगळ्या माहेरवाशिणी व सासुरवाशिणी मिळून मनसोक्त खेळ खेळतात. मावळतीपूर्वी या गौरीचे विसर्जन करतात. विसर्जनावेळी भोई समाज लाकडी पाटावर मूर्ती वाहून नेतो. वाजंत्री,जरीपटके,अब्दागिरी, छत्री अशी मोठ्या थाटात मिरवणूक निघते. स्थानिक घडशीसमाज वाजंत्री वाजवतो. रस्त्यात मिरवणुकीपुढे लोणार तालमीतील मुले दांडपट्टा, लेझीम,काठी असे मर्दानी खेळ खेळतात. मिरवणूक पुढे वाळवंटात जाते. तेथे कोळी समाज आपल्या नावा पताका व फुलांनी सजवतात. वाळवंटात बुरूड समाज बांबू रोवून झोपाळे बांधतात. हे सर्व मुली व महिलांसाठी असते. तेथेही फुगड्या व इतर खेळ खेळले जातात. शेवटी विसर्जनाचा मान कोळी बांधवांचा. गौरीची कुंची व केवड्याची कलगी मात्र तशीच वाजतगाजत परत नेऊन देवळातील महालक्ष्मी पुढे ठेवतात.
मिरवणुकीत खेळ सादर करणाऱ्या वस्तादालाही मानाचा नारळ देतात. प्रत्यक्ष खेळ करणाऱ्या ५० ते १०० पैलवान मुलांचे काय? अर्थात त्यांचीही काळजी घेतली जाते. पाटलांच्या वतीने १० ते २० किलो हरभरा डाळ भिजवून त्याची उसळ प्रसाद म्हणून द्रोण भरून वाटली जाते. ही आरोग्यदायी प्रथा आजही चालू आहे.
सामाजिक ऐक्य जपणाऱ्या या परंपरा आपण समजून घेतल्या पाहिजेत, त्यात डोळसपणे वेळोवेळी कालसुसंगत बदलही केले पाहिजेत व या बदलांसह त्या जतनही केल्या पाहिजेत नाही का?
शुभांगी जोशी

खूप सुरेख लेख. ‘फांदया वरी ‘ या गाण्याची आणखी एक फार थोड्यांना माहित असलेली गंम्मत आहे. या गाण्याच्या चालीचा हिंदी सिनेमातील दोन संगीतकारांना इतका मोह पडला की त्यांनी तिच्यावरून दोन अप्रतिम गाणी तयार केली. Ek: ‘पंछी बनू उडती फिरू मस्त गगन में ‘ आणि dusare: झुकती घटा गाति हवा सपने जगाये ‘!!!