राम दिखाया पत्थरों ने : ( ५)

राम दिखाया पत्थरों ने : ५

रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत; त्यांमध्ये  शिल्पकला हाही  एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन  अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर  रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते.  या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे  चित्रण आहे. या आगळ्या रामकथेचे निरूपण करताहेत नीलिमा थत्ते. 

“भूवरी रावणवध झाला” ही बातमी सीतेपर्यंत पोचली. आता रामाला पाहण्यासाठी, भेटण्यासाठी ती आसुसली होती; पण तिच्या यातना अजून संपायच्या होत्या आणि याची तिला अजिबात कल्पना नव्हती. वाल्मीकि रामायणाच्या युद्धकाण्डातला हा भाग दुःखदायक आहे. श्रीराम तिला सरळ सांगतात, “हे सागर ओलांडून लंकेत येऊन जे युद्ध केलं ते तुझ्याविषयीच्या प्रेमामुळे नव्हे – माझ्या घरातून माझी राणी रावणाने पळवली; त्यामुळे माझ्या नावाला, रघुकुलाच्या कीर्तीला कलंक लागला. तो दूर करण्यासाठी मी हे केलं; अधर्म, अनीतीला संपवण्यासाठी केलं. युद्ध जिंकून मी तुला परत मिळवलं आणि कलंक धुऊन काढला. आता सारं जग तुला मोकळं आहे. तुला हवं तिथे तू जा. रावणाने तुझ्याकडे वाईट दृष्टीने पाहिलं, तुझ्या कमरेभोवती हात टाकून तो तुला घेऊन गेला आणि इतके दिवस त्याच्या महालात ठेवलं. अशा कलंकित तुला मी माझ्याबरोबर नेणार नाही.”

सीतेला अर्थातच हे सगळं असह्य झालं आणि लक्ष्मणाला चिता रचण्यास सांगून तिने अग्नीत प्रवेश केला. सर्वसाक्षी अग्निदेव साक्षात प्रकट झाले आणि तिच्या पावित्र्याची त्यांनी ग्वाही दिली; मग मात्र श्रीरामांनी तिचा स्वीकार केला आणि म्हणाले की मला माहीतच होतं की ती पवित्र आहे; पण जगाला हे कळण्याची गरज होती.

यानंतर बिभीषण व राम यांना पट्टाभिषेक करण्यात आला. होसहोललु आणि पट्टडकल इथे ही दोन शिल्पं दिसली.

दश वर्षसहस्राणि दश वर्षशतानि च| भ्रातृभिः सहितः श्रीमान् रामो राज्यमकारयत्।।

युद्धकाण्डाच्या शेवटच्या सर्गातला हा श्लोक – इथेच रामकथा संपते. रामाने भावांसहित अनेक वर्षे(नेमके सांगायचे तर ११हजार वर्षे) राज्य केले. यापुढच्या श्लोकांत रामायण ऐकणे, वाचणे, म्हणणे याचे फळ सांगितले आहे.

पुढची कथा उत्तरकाण्डात येते. हा भागही अर्थातच दुःखद आहे.

कुण्या एका परटाच्या बोलण्याने व्यथित होऊन राजा रामाला सीतात्यागाचा कठोर निर्णय घ्यावा लागतो. सुमंत्राच्या मदतीने तिला रथातून वाल्मीकिंच्या आश्रमात सोडण्याची आज्ञा लक्ष्मणाला मिळते.

“पती न राघव केवळ नृपती, 

बोलता पुन्हा ही जीभ थटे, 

मज सांग लक्ष्मणा जाऊ कुठे?”

सीतेने कळवळून विचारलेल्या या प्रश्नाचे उत्तर बिचाऱ्याकडे नव्हते. तो अत्यंत जड अंतःकरणाने केवळ राजाज्ञेचे पालन करत होता तो. हंपीला ही पुढची कथा बघायला मिळाली..

“सरले जीवन सरली सीता, 

पुनर्जात मी आता माता, 

जगेन रघुकुलदीपाकरिता…” 

या निश्चयाने सीता आश्रमात राहिली.

“एवं कुशलवौ नाम्ना तावुभौ यमजातकौ।”

वाल्मीकिंच्या आश्रमात यथावकाश लवकुशांचा जन्म झाला आणि योग्य शिक्षणही सुरू झाले. दोन उत्तम ऋषिकुमार तसेच उत्तम योद्धे तयार झाले. हेही हंपीलाच बघायला मिळाले.

इकडे अयोध्येत अश्वमेध यज्ञाची तयारी सुरू झाली. यज्ञाचा अश्व लवकुशांनी पकडला आणि कसलेल्या वीरांचा अगदी तोडीस तोड प्रतिकार केला. शत्रुघ्न तर मूर्च्छित झाला. याचेही शिल्पांकन हंपीचेच.

“पुत्र सांगती चरित पित्याचे, 

ज्योतीने तेजाची आरती, 

कुशलव रामायण गाती”

वाल्मीकिंच्या आज्ञेने लवकुश अयोध्येला गेले, रामकथेचे गायन केले, त्यांचे रामाशी मिळतेजुळते रूप पाहून प्रजाननांत चर्चा रंगली, श्रीरामांना ते आपलेच पुत्र असल्याची खात्री पटली. वाल्मीकि सीतेसह तिथे आले, श्रीरामांनी तिचा स्वीकार करण्याची इच्छा प्रकट केली; पण सीतेने भूमातेच्या कुशीत परतण्याचा निर्णय घेतला. आता पुन्हा कुठलेही दिव्य करण्याची, परीक्षा देण्याची इच्छा नव्हती तिची…

यथाहं राघवादन्यं मनसापि न चिन्तये। तथा मे माधवी देवी विवरं दातुमर्हति।।

मनसा कर्मणा वाचा यथा रामं समर्थये। तथा मे माधवी देवी विवरं दातुमर्हति।।

यथैतत् सत्यमुक्तं मे वेद्मि रामात् परं न च। तथा मे माधवी देवी विवरं दातुमर्हति।।

सीता नाहीशी होताच श्रीराम आधी दुःखी मग क्रोधित झाले. 

“समुद्रालाही मी नमवलं आणि विशाल सागर पार करून सीतेला परत मिळवलं; मग भूमीत गेलेली सीता मिळवणंही शक्य आहे मला,” असं म्हणून थेट भूमातेकडेच बाण रोखला त्यांनी. तेव्हा मात्र सर्व ऋषी-मुनी समजावतात आणि वस्तुस्थिती स्वीकारण्यास सांगतात. याची झलक फक्त हंपीतच दिसली. एकच छोटंसं शिल्प – पण रामबाणाला निष्प्रभ करणारा सीतेचा बाणा दाखवणारं… मला आवडणारं..

बस्स! शिल्पांतली रामकथा इतकीच. वेरूळच्या मोठ्या शिल्पपटात ती एकत्रित दाखवलेली आहे; पण ही अशी विविध ठिकाणी विखुरलेली शिल्पं गोळा करून पाहताना वेगळाच आनंद मिळाला. या निमित्ताने त्या त्या ठिकाणच्या कलाकारांची कल्पनाशक्ती, छोट्याशा जागेत मोजक्याच गोष्टी दाखवून नेमका आशय सांगणारी त्यांची कला आणि स्थानिक दगडांच्या प्रकारांनुसार खुलणारं शिल्पसौंदर्य हे सगळं अनुभवता आलं. वाचकांनाही हा आनंद मिळेल अशी आशा आहे.

वेरूळचा रामायणाचा शिल्पपट्ट

समाप्त. 

Author

Leave a Reply