बेंगलोर डायरी :९

बेंगलोर हे एक स्वप्न आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही – म्हणजे हैद्राबादमध्ये कितीही चांगल्या आयटी कंपन्या का असेनात किंवा चेन्नई भारतातले प्रमुख शहर का असेना किंवा ‘गॉड’स ओन कंट्री’ म्हणून ओळखले जाणारे केरळ कितीही सुंदर का असेना; तरी या सगळ्या भागांतल्या लोकांची सुप्त इच्छा असते बेंगलोरला जाण्याची – भले प्रत्येकाची कारणे वेगळी असोत; पण बेंगलोरला आमचे नातेवाईक आहेत, घर आहे किंवा आम्ही नोकरीला आहोत हे सांगण्यात एक वेगळाच आनंद असतो. त्यातूनच मग ‘बेंगलोर डेज’ या नावाचा नितांत सुंदर चित्रपट मल्याळम भाषेत तयार होतो. आता नुकताच आलेला ‘आवेशम’ देखील बेंगलोरमध्येच घडतो. आता तेलगू किंवा तमिळ लोक त्यांचे बेंगलोरवरचे प्रेम असे इतके सहज दाखवत नसले; तरीही बेंगलोरमध्ये या राज्यांतून येणाऱ्या लोकांची संख्या – मग कधी शिकण्यासाठी; तर कधी नोकरीसाठी – त्यांचे हे प्रेम समजण्यासाठी पुरेशी आहे. हे शहर अत्यंत मोकळे-ढाकळे आहे. नवीन प्रयोग अगदी सहजपणे इथे स्वीकारले जातात. जणू त्यामुळेच याला स्टार्ट अपची राजधानी असेही गमतीत म्हणले जाते. दक्षिण भारताचा melting pot असलेल्या या शहराची स्वतःची अशी खाद्यसंस्कृती आहे. इथल्या प्रसिद्ध हॉटेल्सबद्दल नंतर कधी तरी लिहेन. आज मी लिहिणार आहे ते काही खास बेंगलोरी पदार्थांबद्दल!
बेंगलोरमध्ये येऊन MTR मध्ये न जाणे हा अतिशय गंभीर गुन्हा मानला जातो. लालबागजवळ असणाऱ्या एका इमारतीतून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता इतका पसरला आहे की बेंगलोरच्या अनेक भागांत त्यांच्या शाखा आहेत. MTR मध्ये दुपारी दिले जाणारे जेवण कोणे एके काळी म्हणे चांदीच्या ताटात द्यायचे. ‘गेले ते दिन’ म्हटलं; तरीही लालबागजवळच्या MTR मध्ये आजही जेवणाच्या आधी ज्यूस चांदीच्या ग्लासात देतात! तर या MTR ने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात एक नवीन पदार्थ जन्माला घातला. महायुद्धाच्या काळात तांदुळाचा पुरवठा मर्यादित केला गेला होता. अशा वेळेस MTRने गव्हाच्या रव्यापासून इडल्या तयार करण्यास सुरुवात केली आणि ‘रवे इडली’ हा नवीन पदार्थ बाजारात आणला. गव्हाच्या रव्यापासून तयार केल्या जाणाऱ्या या इडल्यांचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यात अनेक ठिकाणी शेपू घातला जातो. गाजर, टोमॅटोदेखील या इडल्यांमध्ये घातले जातात. आता बेंगलोरमध्ये गल्लोगल्ली ‘रवे इडली’ मिळते; मात्र या पदार्थाच्या निर्मितीचे सारे श्रेय जाते MTRला.
बेंगलोरच्या अय्यंगार बेकऱ्या हा एक रंजक विषय आहे. अय्यंगार – त्यातही खास करून हासन भागातले – हेच प्रामुख्याने या व्यवसायात उतरलेले दिसतात. बेंगलोरमध्ये असलेल्या काही बेकऱ्यांमध्ये तिसरी पिढी आता कार्यरत असताना दिसते. यांतल्या पहिल्या बेकारीच्या इतिहासाबद्दल असे म्हणतात की, ती बेकरी स्थापन करणारा मूळ पुरुष फ्रेंच लोकांसोबत पॉंडिचेरीमध्ये कामाला होता. तिथून तो या व्यवसायाचे ज्ञान घेऊन आला आणि शाकाहारी लोकांसाठी म्हणून त्याने व्यवसायाला सुरुवात केली. आता ‘बेंगलोर’स अय्यंगार बेकरी’ हे जणू ट्रेडमार्क शब्द झालेत. बेंगलोरमधील निरनिराळ्या बेकरींमध्ये एक अफलातून पदार्थ मिळतो जो दिल खूश करतो. दिल खूश करणाऱ्या या पदार्थाला ‘दिलखुश’ किंवा ‘दिलपसंद’ म्हणतात. साधारण खारी करतात ती पेस्ट्री शीट पोळीसारखी गोल लाटून त्याच्यामध्ये ओला नारळ, ट्रुटीफ्रुटीचे सारण घालून ते बंद करून भाजतात; मग या गोलाकार दिलखुश / दिलपसंदचे चार तुकडे करून विकतात.
बकलावा हा पिस्ता भरून नजाकतीने केलेला तुर्कीमधला गोड पदार्थ; तर दिलखुश हा इथल्या मातीतला त्याचा रांगडा सवंगडी असे म्हणता येईल. महाराष्ट्रात बेकरीमध्ये जे पॅटीस मिळतात त्याला इथे पफ म्हणतात. व्हेज पफ, पनीर पफ, आणि एग पफ असे पफचे प्रकार मिळतात इथे. शाळा, कॉलेज सुटल्यावर जवळच्या बेकरीत जायचे एक पफ खायचा आणि मग ते तिखट लागले की दिलखुश खायचा, मग परत गोड वाटले म्हणून एक ‘पल्या बन’ खायचा. पल्या बन म्हणजे आपल्या वडापावाचे चुलत भावंड. पाव भाजतानाच त्यात बटाट्याची भाजी घालायची आणि तो पाव भाजला की मग झाला पल्या बन तयार! कन्नडमध्ये पल्या म्हणजे भाजी. ही जरी बटाट्याची भाजी असली तरीही ही भाजी मसाला डोशाच्या भाजीपेक्षा पूर्ण वेगळी असते.
आपण अनेकदा दाक्षिणात्य उपहारगृहांना सरळ सरळ उडुपी उपहार गृह म्हणून ओळखतो, पण यातील सगळीच उडुपी उपहारगृह नसतात. म्हणजे काही तमिळ पद्धतीची असतात तर काही मैसूर पद्धतीचा स्वैपाक रांधणारी. उडुपी हे एक गाव आहे मेंगलोर भागात. त्या भागाची वैशिष्ट्ये जपत सांबार आणि इतर पदार्थ ज्या ठिकाणी मिळतात ती उडुपी उपाहारगृहे; तर बेंगलोरमध्ये फक्त दाक्षिणात्य उपाहार गृहे म्हणजेच उडुपी उपाहार गृहे असे मात्र नसते. खूप प्रयत्नपूर्वक मी उपाहारगृह शब्द वापरत आहे; कारण आमच्याकडे याला सररास ‘दर्शनी’ म्हणतात; म्हणजे इथे आधी पैसे द्यायचे आणि मग घेऊन खायचे. या सगळ्या ठिकाणी बसायला जागा असेलच असे नाही आणि असली तरीही कोणी निवांत बसत नाहीत. आपण यायचे,खायचे आणि जायचे. इथे साधारण दिवसभर इडली, डोसा, वडे मिळतात; मात्र संध्याकाळी मस्त भजी, मसाला पुरी, आणि बोंडा सूप मिळते. बोंडा सूप हीदेखील खास इथली गोष्ट. पावसाळी संध्याकाळ किंवा छान गार झालेली थंडीतली संध्याकाळ आणि पुढ्यात बोंडा सूप असले की जे सुख मिळते ते अनुभवायची गोष्ट आहे; तर हे बोंडा सूप म्हणजे उडदाचा वडा; मात्र हा मेदूवड्यासारखा मध्ये गोल भोक करून न करता बटाटावड्यासारखा गोल करतात आणि जे सूप म्हणतात ते म्हणजे असते मसालेदार वरण. काही ठिकाणी मूग डाळीचे वरण असते; तर काही ठिकाणी तुरीचे; तर क्वचित तूर आणि मुगाचे. आले, हिरवी मिरची लसूण, टोमॅटो घातलेल्या फोडणीत शिजलेले वरण घालून हे सूप तयार करतात.
इथेदेखील चाटचे वेगवेगळे प्रकार मिळतात. फक्त ते इथल्या चवीचा साज अंगावर चढवतात; म्हणजे भेळ इथेपण खातात; फक्त त्या भेळेत कधी काकडी, तर कधी बीटरूट तर कधी गाजरसुद्धा घालतात. इथे मिळणारी रगडा पुरी – जिला मसाला पुरी म्हणतात – तीसुद्धा मसालेदार असते. गमतीत आम्ही त्याला घरी ‘सांबार पुरीच’ म्हणतो. उकडलेले दाणे हादेखील इथला अतिशय आवडता खाऊ आहे आणि त्यामुळेच छोट्या चुलीवर भुईमुगाच्या शेंगा उकडणारे बघायला मिळतात. इथे काही खास चाटची दुकाने आहेत जिथे पायनॅपल चाट, बोटी चाट, निप्पट मसाला, कॉंग्रेस मसाला अशा अगम्य नावाचे प्रकार मिळतात. यांतले बोटी म्हणजे बॉबी – ज्याला काहीजण पोंगा पण म्हणतात ते; तर कॉंग्रेस म्हणजे मसाला लावलेले दाणे आणि निप्पट म्हणजे मठरीसारख्याच पण तांदळाचे पीठ घालून केलेल्या कडक पुऱ्या. संध्याकाळच्या चहाबरोबर आवडीने खाल्ले जातात निप्पट; तर निप्पट मसालामध्ये निप्पट वर कांदा, टोमॅटो, वेगवेगळ्या चटण्या घालून चाट तयार केला जातो. तसेच पायनापल चाटमध्ये अननसाच्या चकत्या केल्या जातात आणि त्यावर सगळा मालमसाला, शेव घालून पायनापल चाट दिला जातो. पाणीपुरीमध्ये तर कोलारची म्हणून एक खास चव आहे, त्यातले तिखट पाणी हे अगदी पारदर्शक असते.अजिबात कोथिंबीर, पुदिना नसलेल्या या पाण्याची एक वेगळीच चव आहे. उत्तर भारतीय पाणीपुरीचे ठेले गेल्या पंधरा वर्षांत खूप वाढले आहेत, क्वचित कुठे गोंधराज लिंबू पिळून पुचका खिलवणारा बंगाली भय्यापण असतो किंवा पाच चवींचे पाणी देणारे राजकोट, काठियावाडचे पाणीपुरीवालेपण असतात.
दुपारच्या जेवणाच्यावेळी अनेक गाड्यांवर ‘रागी मुद्दे’ मिळतात. हे रागी मुद्दे मंड्या हासन भागाचे मानबिंदू आहेत. चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी अचानक नाचणीकडून गव्हाकडे लोक वळायला लागले. नाचणी स्वस्त होती; त्यामुळे गरिबांचे खाणे म्हणून जरा उपेक्षेने बघितले जायचे याच्याकडे; पण मग मधुमेह्यांचे प्रमाण वाढल्यावर अचानक परत नाचणीकडे लोक वळायला लागले आणि मग रागी मुद्द्यांना परत प्रतिष्ठा मिळायला लागली; त्यामुळेच दुपारच्या जेवणासाठी अनेक गाड्यांवर रागी मुद्दे, सांबार, भाजी असे जेवण १०० रुपयांत मिळते.
मैसूर डोसा असतो, दावणगिरी डोसा असतो; मात्र आमच्या बेंगलोरमध्ये बॉंबे सागू मिळतो. सागू म्हणजे रसभाजी. कधी ती कूर्मा स्टाइल करतात; तर कधी बॉंबे सागू. तर हा बॉंबे सागू साधारणपणे रवे इडलीबरोबर असतो. हो, इथे रवे इडली घेतली तर सांबार देत नाहीत, चटणी आणि सागू असतो. तसेच सेट डोशाचेपण! सेट डोसा म्हणजे दोन किंवा तीन छोटे मऊ लुसलुशीत डोसे. तर सेट डोशाबरोबरही सांबार नसते; चटणी आणि सागू असतो; पण बऱ्याचदा हा सागू म्हणजे व्हेज कूर्माच्या जवळ जाणारी भाजी असते. गाजर, मटार, नवलकोल, फ्लॉवर घालून ही भाजी केली जाते; तर बॉंबे सागू म्हणजे कांदा टोमॅटोच्या थोड्या पातळ पिठल्यात उकडलेला बटाटा कुस्करून केलेली भाजी. गरम गरम बॉंबे सागू आणि पोळीसुद्धा मस्त लागते. आता याचे नाव बॉंबे सागू का पडले असावे याचे मी शोधलेले कारण असे की, या भागात बेसन, चण्याची डाळ गोड पदार्थ वगळता फारशी वापरली जात नाही; त्याउलट, महाराष्ट्र, उत्तर कर्नाटक इथे मात्र बेसनाचे पीठ सररास वापरले जाते आणि पिठलेदेखील खास महाराष्ट्रातला पदार्थ! तेव्हा तो सगळा भाग मुंबई इलाखा किंवा बॉंबे स्टेट म्हणून ओळखला जायचा. तिथे कोणीतरी पिठले खाल्ले असणार आणि मग इकडे येऊन त्यात स्वतःचा प्रयोग करून हा पदार्थ तयार केला असणार. मूळ बॉंबेचे नाते कायम राहावे म्हणून याला मग त्या बल्लवाचार्याने ‘बॉंबे सागू’ असे नाव दिले असावे.
खूप लिहिण्यासारखे आहे, खूप अनुभवण्यासारखे आहे. पुढच्या भागात इथल्या काही खास जागांबद्दल लिहेन. तोपर्यंत तुम्हांला ही डायरी आवडते की नाही ते जरूर कळवा.


(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)

Author

One thought on “बेंगलोर डायरी :९

  1. अंक मिळाल्यावर सर्वप्रथम बेंगलोर डायरी वाचली जाते. या शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक पैलूंचे दर्शन घडवणारी लेखमाला. 👌

Leave a Reply