संत, पंत, तंत  काव्यविषयक लेखमाला: ९

पंतकवी वामन पंडित – काव्यालंकार 

पद प्रमेयाचे गुंफणे|

श्यामाभुजबंधाते जिणे|

कोवळीक घाली सीरणे |

शिरीष पुष्पांसी|

कवितेतील शब्द आणि अर्थ यांचा सुरेल सुघड संयोग घडला की अशा काव्यसुंदरीपुढे अत्यंत देखण्या  श्यामसुंदरीचे आलिंगनही फिके पडते! महानुभाव भास्कर पंडित अलंकृत काव्याचं असं कौतुक करतात. 

अलंकारांनी विनटलेली ही कवितासुंदरी वामन पंडितांच्या काव्यात कशी प्रकटते ते या लेखातून अनुभवू या. 

कवीला अभिप्रेत असलेला आशय वाचकांच्या मनाला भिडावा, त्याचा रसास्वाद घेता यावा,  अर्थ  उलगडत जावा यासाठी अलंकारांनी काव्याला नटवलं गेलं.  अशी काव्यसुंदरी पूर्वसुरींच्या कवितेपेक्षा वेगळी उठून दिसू लागली; वाचकांना चकित करू लागली.  हे ल्यायलेले अलंकार कोणते  होते  हे बघण्याआधी मुळात अलंकार म्हणजे काय हे पाहू. 

अलम् + कृ = अलंकृ म्हणजे धारण करणे.   उपमा, रूपक, विरोधाभास, दृष्टान्त अशा विविध  मार्गांनी आशय अधिक उठावदारपणे पोचवणारी  शब्दपद्धती म्हणजे अलंकार अशी सोपी व्याख्या आपण करू आणि वामन पंडितांच्या अलंकारांचं रसग्रहण करू. 

अनुप्रास अलंकाराने सुरुवात करू या. अनु म्हणजे रसाला अनुकूल असलेला, प्र म्हणजे प्रकर्षाने चमत्कृती निर्माण करणारा  आस — रचना. समान अक्षरे पुन्हा पुन्हा आली की अनुप्रास निर्माण होतो. विविध अनुप्रासांची पखरण  वामन पंडितांच्या काव्यात  दिसून येते. खरंतर ओवी हा साधा – निरलंकृत काव्यप्रकार पण त्यालाही या कवीने अलंकार बहाल केले आहेत. 

शल्यादिक मातु|

भाऊ पुतणे पुत्रचि केव/

नातु कोवळे किर/ (अंकुर) 

सखे अश्वत्थामादिक|

ळच्या अशा सुंदर अनुप्रासाला ‘कोमलावृत्ती संश्रयी वृत्त्यनुप्रास’ असं भारदस्त नाव असलं तरी यातली वर्णयोजना मृदू असते.  य, ळची पुनरावृत्ती अपेक्षित संवेदना उमटवत जाते. 

ज्याचे डोळे व्याकुळ

ज्यात पूर्ण अश्रुजळ

कृपेने अविष्ट केवळ विषादयुक्त|

वनसुधेतही हा अनुप्रास  शार्दूलविक्रीडिताच्या संगतीने अधिक  कर्णमधुर ठरतो. 

पाळीयुक्त तळीं असीं न सुतळीं

स्वर्गीं न वा भूतळीं|

वायूतें विमळीं जळीं सकमळीं जीं पाळती शीतळीं|… किंवा

अम्लाना कमळांचिया अळिकुळीं माळा गळां घालितां… 

अनुप्रासाचा आणखी एक प्रकार म्हणजे मधुरा वृत्ती संश्रयी किंवा उपनागरिका अनुप्रास. वामन पंडितांनी  कसा सजवला आहे बघा… 

अनंगरंगांबुधिच्या तरंगी|

रंगी शुभांगी जडि अंतरंगी|

अनुस्वारांमुळे आणि ग च्या  पुनरावृत्तीमुळे ही काव्यरचना मधुर वाटते. 

परुषावृत्ती संश्रयी या तिसऱ्या प्रकारात  ओज गुण मुख्य ठरतो. वामन पंडित हा अनुप्रास कसा योजतात… 

मी विश्वाचें बीज

सर्व सामर्थ्य माझेंचि सहज

जेथें जें विशेष तेज

ते विभूत्यंश माझ्या तेजाचे

रफार, जोडाक्षरं आणि ज आणि त या वर्णांची पुनरावृत्ती यांमुळे ओजगुणाचं प्राबल्य मनाचा वेध घेतं. 

आतां कृद्ध म्हणून भृत्य वदती

टाकी तया दुर्जना

मुक्तद्वार महेशमंदिर सुखें जाऊनि सेवी जना 

मोठ्याने म्हणायला मजा येईल अशा आणखी काही पंक्ती

की अनंतवीर्य आणि| अमितविक्रम तू चक्रपाणि|

तृतीय चरणीं ऐसी वाणी|

बोले अर्जुनाची|

सहज सामर्थ्य ते वीर्य|

आणि त्या सामर्थ्ये घडोनि आले कार्य|

त्यास म्हणती ऋषिवर्य| पराक्रम म्हणोनि|

ही रेफची आणखी मौज! 

हरिपण हरिनामें धातुमूर्तीस आले, किंवा हरि नरहरि रूपें असा लाटानुप्रासाचा शिडकावाही त्यांच्या काव्यात शिंपलेला दिसतो. 

उमजला मजला हरि ज्या मुखें

गुरुच तो रुचतो हृदयीं सुखें

शिकवणे कवणें मज त्याविना

निजपणी जपणी जड दाविना

असा दोन वर्णांची पुनरावृत्ती एकदाच होणारा छेकानुप्रास ही वामन पंडितांच्या काव्यात  सहजी विहरतो. 

पंक्तीच्या शेवटच्या एकाच अक्षराची पुनरावृत्ती म्हणजे अंत्यानुप्रास, ओवीबद्ध काव्यात पहिल्या तीन पंक्तींत दिसतो. 

सिंहनादाची आरोळी

आणि शंख वाजवी महाबळी

कीं दुर्योधनाचे हृदयकमळीं

हर्ष उपजो||

  वामन पंडितांच्या काव्यात काही दुर्मीळ अलंकारही दिसतात. त्यांतले काही अलंकार :

जेव्हा एकच गोष्ट  वेगवेगळ्या लोकांना वेगळी भासते  तेव्हा ‘उल्लेख’ अलंकार होतो. श्रीकृष्णाचं रूप गोपिकांसाठी वेगळं, नागरिकांसाठी वेगळं, कंसासाठी आणखी वेगळं. कृष्णाची अशी विविध रूपे दाखवणारा हा उल्लेख अलंकार :

मल्ला वज्र गमे|नरा नृप गमे|

काम स्वयें स्त्रीजनां|

गोपां आप्त नृपा खळप्रभु शिशू 

मातापित्यांच्या मना|

कंसा मृत्यु अशक्त पामरजनां संतांसि सत्त्वामृत|

श्रीशेषासन यादवा हरि दिसे रंगात रामान्वित|

अतिशयोक्ती अलंकाराचा गमतीशीर   उपप्रकार  अक्रमातिशयोक्ती. सध्याच्या परिस्थितीतलं उदाहरण द्यायचं तर; 

‘डास मारला ही क्रिया, त्यानं डेंग्यूपासून माणूस वाचला.’ 

मृत्युं जे घडिस होय अघाला|

प्राण ते क्षणिच ये अनघाला|

दोन्हि एक समयीच कराया|

जाय त्यात म्हणतो शुक राया|

अघासुराला मारल्याने साधासुधा माणूस (आपोआपच) वाचला. असा हा उलटा क्रम म्हणून अक्रमातिशयोक्ती! 

सदसद्योग( समुच्चय) अलंकार हाही मजेशीर :   एखाद्या सुंदर स्त्रीने अचानक दातांची कवळी काढून ठेवली तर तिचा मुखचंद्रमा  सुरकुतलेले चेहरा बघून वाईट वाटेल; तसं ७ सुंदर गोष्टींचं वाईट वाटतं असं वामन पंडित सांगतात. 

चंद्राला दिवसा प्रकाश नसणे

ये कामिनीला जरा|

पद्मावीण जले, निरक्षर मुखी

जो साजिरा गोजिरा|

दात्याला धनलोभ नित्य असणे

दारिद्र्य विद्वज्जनी|

दुष्टांचा पगडा महीपति-गृही

ही सात शल्ये मनी||

काव्यात कधी एका विशिष्ट क्रमाने  गोष्टी दिलेल्या असतात त्यांच्या संबंधित गोष्टी पुढच्या ओळीत त्याच क्रमाने देतात. हा झाला यथासंख्य अलंकार. 

तृणे मृगाला सलिले झषाला|(मासा) 

संतोष हे वृत्ति महाजनाला|

तयास निष्कारण तीन वैरी|

किरात, कैवर्तक दुष्ट भारी||

हरणाला गवताने, माशाला पाण्याने आणि सद्गृहस्थाला शांततेने संतोष मिळतो; पण त्यांच्या आड येणारे अनुक्रमे भिल्ल, मच्छीमार आणि दुष्ट असा हा यथासंख्य अलंकार! 

वामन पंडितांची उपमा वेगवेगळ्या रसांचं दर्शन घडवते. 

याहूनि काय लंडीपण| 

हा नपुंसक गुण| 

नव्हे तुज योग्य’ अर्जुन हातपाय गाळून बसलेला असताना श्रीकृष्णाने केलेली ही कानउघाडणी अर्जुनाला झोंबली. त्याचं वर्णन करताना वामन पंडित ‘सरस’ उपमा देतात – आधीच घायाळ झालेला वीर त्यात त्याला लाथ घालावी अशी अर्जुनाची स्थिती 

घाय लागोनि जर्जर|

रणीं पडला जो नर|

त्यास करिजे लत्ताप्रहार

तैसे अर्जुना हे शब्द||

लोपामुद्रा संवादात सीता वनाच्या गोष्टी सांगताना  म्हणते, 

जसि बहु रवितप्ता साउली गोड वाटे|

तसि वनिं पति-लाडें मानितें कोड वाटे|” 

वनात असतानाही पतिप्रेमामुळे सगळंच गोड वाटतं, ही भावना आग ओकणाऱ्या सूर्याच्या आणि छायेच्या विरोधी उपयोजनातून आणि मालिनी वृत्ताच्या गोडव्यातून अनुभवता येते. 

नयनिं दावुनि लड्डुशर्करा|

जननि दे कडु औषध लेंकरा|

न फळ साखर औषधिचें

जसें श्रुति वदे फळ काम्य जगीं असें|

श्रुतिंमधला गहन विचारही सर्वसामान्यांना समजावा या हेतूने अशा घरगुती उपमाही ते सहजपणे देतात. आणखी एक गमतीशीर आणि विषयाचं गांभीर्य बाजूला सारून हसू फुटेल अशी अकल्पित येणारी उपमा –  खूप झोपणाऱ्या  माणसाला ते सांगतात, 

कीं जरी बहुतचि निजे|

तरी तमोगुणें चित्त भिजे|

भिजट फार होता न शिजे

डाळ तुरीची!’ 

तमोगुण आणि  स्वयंपाकघरातली तुरीची डाळ असा संयोग धक्कादायक आणि मजेशीर आहे. त्यांच्या अशा अकल्पित शब्दयोजनेमुळे, पांडित्यपूर्ण रचनेला वळसा घालून एकदम स्वयंपाकघरात उतरण्याचे पुढील काव्याविषयीची उत्सुकता वाढत राहते. 

स्वभावाचं हुबेहूब वर्णन करणारा स्वभवोक्ती अलंकार वामन पंडितांनी विविध प्रकारे रेखला आहे. 

मच्चित्ता मद्गतप्राणा बोधयन्तः परस्परम्‌ 

या गीतेच्या श्लोकाचंही स्वभावोक्ती अलंकारातून  रसाळ आणि चित्रदर्शी निरूपण वामन पंडित करतात. श्रीकृष्णाशी तद्रूप होण्यासाठी

गोप काय करतात – 

गाती, नाचती, उडती|

विविध माझे अभिनय दाविती|

ज्या ज्या प्रसंगी मी जे जे रीती

रमलो दाविती ते भाव|

मांडिती त्रिभंगी ठाण|

वेणु अधरी दाविती सुजाण|

कीं तेव्हां त्यांच्या मनाचे उठाण अंतरी तैसेचि| 

सलोकता, समीपता, सरूपता व सायुज्यता असे मुक्तीचे प्रकार आहेत. श्रीकृष्ण आणि सवंगडी एकाच लोकी (सलोक) होते, समीपही होते. श्रीकृष्णाच्या लीलांची आठवण काढत, त्याच्यासारखे त्रिभंगी उभं राहून, वेणुवादनाची नक्कल करताना ते  त्याच्यासारखे होत त्याच्यामध्येच विलीन झाले – सायुज्यता लाभली. अनुकरण करताना तो त्यांचा स्वभाव होऊन जातो – असा हा अध्यात्म पातळीवर नेणारा स्वभावोक्ती अलंकार! 

भगवद्गीतेचे महत्त्व आणि गीतेखेरीज ग्रंथांचं होणारं  वाङ्मयचौर्य याविषयी सांगताना स्वभावोक्ती अलंकाराचा मजेशीर वापर वामन पंडित करतात… हे वाङ्मयचोर काय करतात… 

आणि शंका इतरां पुराणीं

पुरातन श्लोक काढिती 

स्वकृत श्लोक घालिती

सभेत पुस्तकें काढूनि दाविती

प्रमाणें स्वकल्पितें

भगवद्गीतेत मात्र न फावे कुमत तस्करांतें

सभेत पुस्तके काढून श्रेय घेण्याचा आटापिटा करणारे मात्र भगवद्गीतेच्या श्लोकांमध्ये काहीही घुसडू शकत नाहीत हा भगवद्गीतेचाही ‘स्व’भाव त्यांनी दाखवून दिला आहे. 

‘हिचे मुख जणू चंद्रच आहे’ अशा उत्प्रेक्षा अलंकाराचा एक प्रकार म्हणजे हेतूत्प्रेक्षा.   एखाद्या घटनेचं वर्णन करताना कवी स्वतःच्या प्रतिभेतून प्रसंग चित्रित करतो. प्रतिभेची झेप दाखवणारा हा अलंकार. 

आभाळ दाटून आलं आहे, श्रीकृष्ण मुरली वाजवत आहे. अशा सुंदर वेळी ढगही मोठ्याने गडगडत नाहीत, ते जपून गडगडतात : श्रीकृष्णाच्या मुरलीहून आवाज मोठा व्हायला नको…

हळुहळू घन गर्जतसे नभीं

मुरलिहूनि चढेल म्हणोनि भी

श्रवणभक्ति अतिक्रम वर्जितो

करित कीर्तनही घन गर्जतो

व्याजस्तुती हा मनुष्यस्वभावाचे कंगोरे टिपणारा  एक मिस्कील अलंकार. वरवर स्तुती पण आतून द्वेष अथवा निंदा असा याचा पेहराव असतो. अर्जुनाला भीष्म म्हणतो, तू बलवान आहेस, तुझा सारथी स्वयं रमेश आहे आणि मी तर असा म्हातारा… पण मनात मात्र माझ्यापुढे तुझी काय टाप आहे!) 

पितामह वदे तदा प्रबळ तू पृथानंदना

रमेश रथिं सारथी चतुर वागवी स्यंदना

स्वयें गत वयस्क मी सरस वीर तूं रे नवा

भिडे रणधुरंधरा जय घडो सुखें वा न वा

एखाद्या व्यक्तीच्या  वागण्यावरूनच त्याच्या स्वभावाचा अंदाज येतो.  त्याच्या गुणांची  स्तुती करणं याला उदात्त अलंकार म्हणतात. 

ज्यांचें पात्र पवित्र पाणि-युग हें भिक्षान्न जे भक्षिती

ज्यांचें वस्त्र दिशा, जयां भय नसे शय्या जयांची क्षिती

ज्यांला दैन्य नसे, विरक्त-वनिता जे तीसवें नांदती|

ज्याला कर्म-कलाप बांधित नसे ते धन्य येणें रिती|

 एकापेक्षा एक गुणांचं अथवा दुर्गुणांचं आधिक्य असतं तिथे सार अलंकार होतो.  

आधीच मर्कट तशातही मद्य प्याला

झाला तशांत जरि वृश्चिकदंश त्याला

झाली त्या तद्नंतर भूतबाधा

चेष्टा वदूं मग किती कपिच्या अगाधा

याचं रचनाकौशल्य असं की चालीवर वाचताना समोर माकडाची सगळी गंमतही डोळ्यांसमोर दिसू लागते. 

वामन पंडित पुराणकथेमधलं वर्णनही  सार अलंकाराने सजवतात. 

वाहे महीतें स्वशिरी फणींद्र तो

पाठीवरी कूर्म तयास वाहतो

त्यालाहि घे सागर मांडियेवरी

थोराचिये थोरिव जाण यापरी

सार अलंकारात एकापेक्षा एक असा क्रम असतो; तर विरुद्धगुणन्यासात विरुद्ध गुणांचे तुल्यबळ जोखले जाते. 

तू राजा जरि मी श्रुतिस्मृतिमहाविद्याभिमानी असे|

भाग्यें विश्रुत तूं मदीय कविता सत्कीर्ति श्लोकीं वसे|

आहे अंतर फार तूज मज रे

तू गर्व जैं दाविशी|

मीही निःस्पृह भाग्यवंत गणना नाही मला फारशी|

सद्भावना, निर्मोह, दान अशा भावनांनी युक्त असे वामन पंडितांचे काव्य आहे. सद्गुण आणि दुर्गुण यांची तुलना हा बऱ्याच रचनांचा विषय आहे. परिसंख्या अलंकारामधून ते हात, कान आणि शरीर यांना कशामुळे शोभा येते एवढेच सांगून थांबत नाहीत; कशामुळे येत नाही हेही ठासून सांगतात. 

श्रुतेंचि कीं श्रोत्र न कुंडलानें

दानेंचि कीं पाणि न कंकणानें

साजे तसा देहहि हा न आनें

परोपकारेंचि न चंदनानें

दीपक अलंकार हा एका ज्योतीने सगळे दिवे उजळावे असा अलंकार. एका शब्दातूनच ज्ञानप्रकाश पडावा अशा पंक्ती वामन पंडितांनी लिहून विचारांचा प्रकाशझोत सोडला आहे. 

पुरे, पुराणे, स्मृति, वेद, शास्त्रें|

आमुष्मिकें वैदिक कर्म तंत्रें|

जेणें सरे हा भव ते विचारी|

यावेळी सर्व दुकानदारी|

सुरुवातच ‘पुरे’ या कळकळीने करून हे सगळं थांबवा अशी विनंती ते करतात, भवरोग कधी संपेल इतकाच विचार करा असा सल्ला ते दीपक अलंकाराचा वापर करून देतात. 

जे नाहीच त्याचा भास होणे याला भ्रांती म्हणतात. 

मा म्हणजे नाही 

या म्हणिजे ऐसी 

नसोनि भासे जे काहीं| 

ते ते कीं मृगजळ

न दिसे कोणासही|

किरणावांचूनि स्वयें जैसें

जी नाहीच अशी माया  मृगजळाच्या माध्यमातून भ्रांतिमान अलंकाराद्वारे उलगडली आहे. 

दोन वस्तूंतील संबंध अशक्य   असतो ते निदर्शनास आणणारा अलंकार निदर्शना! 

जे का ज्ञानें लाधलें सद्विचारा|

संपत्तीचा त्यापुढे काय तोरा|

पद्माचा जो तंतु तो वारणाला|

वारायाला पैं म्हणे सिद्ध झाला|

वारण म्हणजे हत्ती.  त्याला वारायला कमलतंतू उपयोगी पडत नाही असा दृष्टान्त देत ज्ञान आणि संपत्ती यांच्यातील फरक दाखवून दिला आहे. 

प्रश्नालंकार आणि दृष्टान्त  यांचाही मेळ गुंफत ‘ सर्वदेवनमस्कारः केशवं प्रतिगच्छति|’ हे तत्त्व त्यांनी बिंबवलं आहे. 

ते म्हणतात, ‘ ज्या विहिरीत तोंड धुवावे त्याच विहिरीत कपडे धुणे योग्य नव्हे…. 

एवं च

इत्यादि सर्व विहिरे टाकूनिया वरें वरे|

जरी एकाच गंगाजळीं शिरे|

तरी कोण कार्य त्याचे न होणार| 

कार्य का बरे होणार नाही… याचा अर्थ नक्कीच होईल. 

एखादी गोष्ट लगेच लक्षात यावी यासाठी एखादं उदाहरण दिलं जातं त्याला  दृष्टान्त  म्हणतात. 

गजशौचाचा एक बहारदार दृष्टान्त 

हस्तीतें धुतलें जळीं बसविलें मालिन्यही नाशिलें|

तेणें ते पहिलें स्वकर्म वहिलें तीरींच आरंभिलें|

शुंडाग्रें धरिलें धुळीस भरिले सर्वांगही आपुलें|

प्रायश्चित्त दिलें तथापि न भलें ज्याचें मन क्षोभले|

सर्वसामान्य माणसाचीही अशीच गत असते नाही का? 

पूयपंकीचे किडे काय चिळसी घेत… ज्ञानेश्वरांच्या या ओवीचे निरूपण करताना के. वि. बेलसरे म्हणाले होते, पुवातल्या किड्याला बाहेर काढून धुऊन स्वच्छ केला तर तो मरेल! तसाच हा प्रकार! 

गंतव्य स्थानी   कसे जात आहात यापेक्षा योग्य ठिकाणी पोचता आहात हे महत्त्वाचे हे सांगताना प्रवासवाटेचा दृष्टान्त वामन पंडित देतात. 

एकाच वाराणसीप्रती| 

मार्ग दोनी जे असती|

जे काशी न जाती||

काशी जो जाय|

त्या कोण मार्ग जाला तरी काय|

दोन्ही मार्गीं चालती पाय|

आणि पावणें काशीतेंचि||

माणसाचं आत्ममग्नत्व संपतच नाही, समोर मृत्यू उभा ठाकला तरी हाव सुटत नाही आणि हाव तृप्त करणारे खायला घालतच असतात ही जगाची शोकांतिका सांगणारा हा दृष्टान्त 

खांदियावरी सूळ| 

त्यास चारिती खोबरे गूळ|

सुळीं घालायचे स्थळ|

जवळी होते पदोपदी|| 

काही तर हातात आलेला परमार्थाचा घास दूर सारून विषय कवळतात. 

देऊन हातींचा विडा| 

तांबूल मागे वेडा|

ज्यास होता ज्ञानें मोक्ष रोकडा|

तो दाढेत पडला काळाच्या||

ज्ञान, भक्ती मनावर ठसवण्यासाठी रूपकाचेही प्रभावी उपयोजन वामन पंडित करतात. कृष्णाची कृपा होताच पाप नाहीसे झाले अशी नीरस  वाक्ये  लक्षवेधी ठरत नाहीत. वामन पंडित रूपकातून अर्थ स्पष्ट करण्याबरोबरच  रसनिर्मितीही करतात. 

विप्राची अघझोपडी न कळतां नामाग्निनें जाळिली|

तेव्हा कृष्णकृपांबुवृष्टि सहसा माथां पडों लागली|

दैवी ह्येषा गुणमयी मम माया याचे निरूपण वाचताना एखादा भयपट पाहत आहोत असे वाटते. अंतर्मुख होण्यासाठी योजलेले हे रूपक अतिशय प्रभावी ठरते. 

वासनासमीरें चंचळ|

उठती कामनेचे कल्लोळ|

धार अहंकाराची लोळ|

अत्यंत करी|

कामक्रोधतिमिंगिल(मोठे मासे) 

गिळिती चघळती प्रबळ|

लोभ नक्र अमंगळ| 

मिठी घाली न सोडी सर्वथा

वामन पंडितांची विद्वत्ता अलौकिक होती,  आंतरिक अनुभवसृष्टी त्यांच्या अलंकार योजनेतून दिसत राहते. 

अकारादि सोळा स्वरनामके अक्षरे 

आणि ककारादि पंचवीस अक्षरी 

सारे विश्व लेख न आटले परि ज्यां जोडाक्षरे न कळती तों न म्हणवे लेखक|

असं ते म्हणतात.  एकूणच कवितेवर लिहिताना जोडाक्षरांनी जोडलेल्या विविध खाचाखोचा समजण्याइतकी विद्वत्ता माझ्याकडे नाही; तरीही त्यांच्या अलंकारांचा आस्वाद घेण्याचा हा छोटा प्रयत्न. 

या अलंकारांतून त्यांच्याच शब्दांत :

गीताकार चिद्घन

मेघ श्याम कृपाघन

तोचि हे टीकाजीवन वर्षतो

हे भगवत्तत्वाची सुधा

सज्जनांची बुद्धिवसुधा

आर्द्र करील बहुधा| 

वामन म्हणे

९७६९३६२६०१

अलंकारांसाठी संदर्भ 

१)अलङ्कार- चंद्रिका

( गणेश मोरेश्वर गोरे) 

२)मराठी साहित्य व व्याकरण

मोरेश्वर सखाराम मोने

Author

4 thoughts on “संत, पंत, तंत  काव्यविषयक लेखमाला: ९

  1. आपला अंतर्नाद च्या आॅक्टोबर 24 मधला कवी विठ्ठल यांच्या वरचा लेख अतिशय माहितीपूर्ण आहे. लिहण्याची पद्धत ही सुरेख आहे. अभिनंदन!
    पुढे दिलेला कूटप्रश्न कवी विठ्ठल याचा आहे असे वाटते. याचे उत्तर आपल्याला माहीत आहे का?
    नाही गे, पवनात्मजे समरि त्या रामायणी दीधली
    नाही अर्जुन भारती परि कदा कोणासि ते दीधली
    नाही गे, त्रिपुरासुरासि भिडता श्रीशंकरे दीधली
    कांताने सरिता अजी मज प्रिये रात्रीस ते दीधली ।

    1. तुम्ही पाठवलेल्या कोड्यावर विचार करते. विठ्ठलाच्या नावावर हे वाचलं नाहीये. कवी आणि उत्तर सापडलं तर कळवते.

  2. आपल्या अभिप्रायाबद्दल मनःपूर्वक आभार!
    विठ्ठल कवी पांडित्यप्रदर्शन करत असे असे म्हटले जाते. त्यांच्या काव्याकडे टीकात्मक दृष्टीने बघण्यापेक्षा काही नवीन काव्यरचना, विषय लोकांना हवे होते यासाठी तो वेगवेगळ्या रचना करू लागला असावा असं मला वाटतं. दूरदर्शनवर मालिकांत एकच विषय सतत आला तर जसं प्रेक्षकांना कंटाळवाणं वाटू शकतं, तसं काहीसं होऊन त्यानं हा मार्ग निवडला असावा असं वाटतं.

Leave a Reply