कविता : युगानुयुगे

युगानुयुगे

 प्रत्येक दारासमोर अखंड उभा असतो तो

शांतपणे, न थकता, न कंटाळता

अनंतकाल, अविचल

अहेतुककृपासिंधु

दार उघडले जाण्याची वाट बघत

दिसत नाही तो आपल्याला

कारण आपल्याला तो बघायचाच नसतो

आपल्याला हवी असते फक्त आपली इच्छापूर्ती

तीही पावशेर पेढ्यांच्या बदल्यात

तोही पावतो म्हणा

कधीतरी, कोणाला

त्याच्यावरचा आपला विश्वास

कापराप्रमाणे जळून जाऊ नये म्हणून

खरंतर प्रचंड घाबरतो आपण त्याला

अजिबात नको असतो तो आपल्याला

कळते ना आपले भले आपल्याला

त्याच्यापेक्षाही अत्यंत उत्तमरित्या

ते विनासायास व्हावे म्हणून त्याची अर्चना

एवढेच त्याचे प्रयोजन

तसे सृष्टीच्या आरंभीच सांगितले आहे त्याने

तू  फक्त मला हाक मार

मी येईन आपणहून आत

आपण नाही मारू शकत फक्त त्याला हाक

नको असतो फक्त तो आपल्याला

हव्या असतात आपल्याला तो सोडून

इतर असंख्य मौल्यवान चिजा 

त्याच्याचकडून

आत आला तर म्हणे तो

आपल्याला त्याच्यासारखे करतो

काहीच भेद उरत नाही

एका महाप्रलयंकारी वावटळीत

पार भिरकावले जाते सारे मीपण

प्राप्त होते म्हणे त्यानंतर

सच्चिदानंद स्थिती

पोटात गोळा उठतो आपल्या

आपले स्वतंत्र अस्तित्वच नाकारणाऱ्या

त्या अतीत अवस्थेच्या कल्पनेनेच

नसते धाडस आपल्यात

त्याच्यासाठी दार उघडायचे

दारामागील कूपमंडुक जिणेच

प्रिय असते आपल्याला

कितीही दुःखात होरपळत असलो

तरी

सांतातच सुखरूप असतो आपण

दिवाभीताप्रमाणे पळत असतो आपण

त्याच्याकडे पाठ फिरवून जिवाच्या आकांताने

आपल्या दारासमोर उभा आहे तो

सर्वज्ञ, सर्वसंपन्न, सर्वशक्तिमान

आशाळभूताप्रमाणे

आपल्या हाकेची वाट बघत

दुष्प्राप्य भक्ताच्या शोधत

युगानुयुगे

Author

One thought on “कविता : युगानुयुगे

  1. परमेश्वराचे अस्तित्व सतत जाणिवेत रहाण्यासाठी प्रेरणादायी मुक्तछंद कविता!👌👌👌🌹🙏

Leave a Reply