राम दिखाया पत्थरों ने : ४

रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत; त्यांमध्ये  शिल्पकला हाही  एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर  रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते.  या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे  चित्रण आहे. या आगळ्या रामकथेचे निरूपण करताहेत नीलिमा थत्ते. 

सीताहरणाने व्यथित झालेल्या राम-लक्ष्मणांपुढे आता मोठा प्रश्न होता तिला सोडवून आणण्याचा. वानरराज सुग्रीवाची मदत घेणे हा एक आशादायी मार्ग होता. त्याची पत्नी त्याच्याच भावाने – वालीने पळवली होती. वालीचा वध करून सुग्रीवाला राज्य नि पत्नी मिळवून द्यायची आणि त्या बदल्यात मदत घ्यायची असे ठरले. वालीवध सोपा नसल्याने सुग्रीवाने द्वंद्वात गुंतवले आणि श्रीरामांनी मागून बाण मारला. या वालीवधाचे शिल्पांकन अनेक ठिकाणी आहे. सात तालवृक्ष भेदून घेतलेला वेध शिल्पकारांचा आवडता असावा. प्रत्येक ठिकाणी पाठीमागून आलेल्या बाणाने आश्चर्यचकित झालेला वाली सुरेख दाखवला आहे.

           (जवागल, होसहोललू, हळेबीडू, हंपी येथील शिल्पे)

‘समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्|’ 

सुग्रीवाची ससैन्य मदत तर मिळाली; पण आता विशाल समुद्र कसा पार करायचा हा प्रश्न होता. रामनामाचे पाषाण वापरून सेतू उभारणे हा उपाय होता. तोवर हनुमानाने आधी जाऊन पाहणी करायची, खुणेची अंगठी देऊन सीतेची भेट घ्यायची, तिला आश्वस्त करायचे असे ठरले. हनुमानाने हे काम बजावलेच; पण एवढ्यावर न थांबता लंकेत धुमाकूळही घातला. पुण्याजवळ पळसदेवच्या मंदिरावर आणि भोवताली पसरलेल्या अवशेषांमधून हे बघायला मिळते. होसहोललू आणि पट्टडकललाही थोडे शिल्पांकन आहे. (४३,४४,४५) (४६,४७,४८)

सेतुबंधन : पट्टडकल 

          ‘पश्चात् रावणकुम्भकर्णहननम्…’

सेतू बांधून झाल्यावर रामाचा सर्वांसह लंकेत प्रवेश, युद्ध आणि शेवटी रावणवध हे सगळ्यांना माहीत आहे; पण दहा दिवस चाललेल्या या युद्धाची क्षणचित्रे शिल्पांतून फारशी आढळत नाहीत. थेट राम-रावण युद्धच दाखवले जाते. त्यातील काही निवडक शिल्पे इथे देत आहे. अगदी छोट्याशा शिल्पांतही बरेच बारकावे आहेत. रावणाच्या रथाला गाढवे जोडलेली दिसतात. वानरे त्रास देत असताना रावण चक्क हसताना  दाखवला आहे.

क्रमशः

Author

One thought on “राम दिखाया पत्थरों ने : ४

  1. सुंदर सचित्र वर्णन! धन्यवाद आणि अभिनंदन!💐💐

Leave a Reply