यास्मिन शेख : चिरतरुण वैयायोगिनी

     मराठीप्रेमाचा मूर्तिमंत आविष्कार असे ज्यांचे वर्णन करता येईल त्या प्रा. यास्मिन शेख २१ जून २०२४ रोजी वयाची नव्व्याण्णव वर्षे पूर्ण करून शंभराव्या वर्षांत पदार्पण करत आहेत ही सर्वच मराठीप्रेमींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आहे. त्यांच्या नव्वदीनिमित्त २०१५ साली त्यांचा एक अनौपचारिक खासगी सत्कारसमारंभ त्यांच्या दोन्ही मुलींनी योजला होता. त्यात अंतर्नादच्या वतीने शेखबाईंचा सत्कार करताना साताऱ्याहून नव्वद कंदी पेढ्यांचा हार घेऊन खास आलेले डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर म्हणाले होते, “शेखबाईंकडे बघितल्यावर वाटते की, नाइंटी तो झांकी है, सेंचुरी अभी बाकी है! त्यांचा उत्साह बघितल्यावर वाटते, की तोही क्षण आणखी दहा वर्षांनी नक्की येईल आणि त्या वेळीही आपण सर्व असेच इथे एकत्र येऊ!” दाभोळकरांना अभिप्रेत असलेला तो सुवर्णक्षण आता अगदी जवळ येऊन ठेपला आहे.

   यास्मिन शेख या जन्माने ज्यू. हा समाज अतिशय प्रतिभावान. जीझस क्राईस्ट, कार्ल मार्क्स, अल्बर्ट आइनस्टाईन, फ्रांझ काफ्का किंवा सिगमुंड फ्रॉइड हे जगाच्या इतिहासाला वेगळे वळण देणारे पाचही जण जन्माने ज्यूच होते आणि आजचा विचार केला तर आपल्या जीवनावर खूप परिणाम करणाऱ्या फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा मार्क झुकरबर्ग किंवा गूगलचा सर्जी ब्रिन यांच्यासारखे उद्योजक, स्टीव्हन स्पीलबर्गसारखा प्रतिभावान सिनेदिग्दर्शक, थॉमस फ्रिडमनसारखा मर्मग्राही पत्रकार किंवा बॉब डीलनसारखा जगप्रसिद्ध गायक हेही ज्यूच आहेत. जगातली यांची लोकवस्ती पाव टक्कादेखील नाही; पण विकिपीडियावरील नोंदीनुसार आजवरच्या एकूण सुमारे ९०० नोबेल विजेत्यांपैकी वीस टक्के ज्यू आहेत. 

   पॅलेस्टाइन व आसपासचा परिसर हे ख्रिस्ती व मुस्लीम यांच्याप्रमाणे ज्यू धर्मीयांचेही मूळ स्थान. सुमारे दोन हजार वर्षांपूर्वी परदेशी आक्रमकांनी ज्यूंना देशोधडीला लावले. मोडक्यातोडक्या जहाजातून महासागरात भरकटत चाललेले त्यांचे एक जहाज कोकणात अलिबागजवळ खडकावर आपटून फुटले. त्यातले बहुतेक सगळे बुडालेच; पण सात जोडपी नागावजवळ किनार्‍यावर कशीबशी पोचली. अंगावरच्या वस्त्रांशिवाय जवळ काहीच नव्हते. स्थानिक कोळी समाजाने त्यांना उदार आसरा दिला. काळाच्या ओघात या मूठभर ज्यूंची संख्या वाढत गेली. आपला धर्म त्यांनी जपला; पण स्थानिकांचे रितीरिवाज व भाषा स्वीकारली. हे बहुतांश बेने इस्राएली १९४८ साली इस्राएलच्या निर्मितीनंतर तिथे परतले – भारतीयांच्या सहिष्णुतेबद्दल अपार कृतज्ञता मनात बाळगून. त्यांच्यातील फ्लोरा सम्युएल या विदुषीने नंतर लिहिले; “मी सार्‍या जगाला सांगू इच्छिते की, भारत हा जगातील एकच असा देश आहे, जिथे आम्हां ज्यूंचा कधी धार्मिक कारणांवरून छळ झाला नाही.” याच कृतज्ञताभरित ज्यूंमधली एक मुलगी म्हणजे जेरुशा रूबेन – लग्नानंतरच्या यास्मिन शेख.  

   त्यांचे वडील सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागात होते. फिरतीची नोकरी. तसे घर नाशिकला बांधलेले; पण उच्चशिक्षणासाठी कुटुंब पुण्यात. जेरुशा जात्याच खूप हुशार. प्रा. श्री. म. माटे ह्यांची लाडकी विद्यार्थिनी. अस्सल ‘पुणेरी’ मानल्या गेलेल्या सर परशुरामभाऊ महाविद्यालयातून १९४६ साली त्या बी.ए. झाल्या; केवळ मराठीतच नव्हे, तर सर्वच विषयांच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक मिळवून. बीएनंतर त्यांना एमएसाठी फेलोशिप मिळाली होती; पण त्या काळात काही आजारपणामुळे त्या विश्रांतीसाठी पुण्याहून नाशिकमधील घरी गेल्या होत्या. त्या वेळी एमएचा अभ्यासक्रम थोडा बदलला होता आणि त्या नव्या अभ्यासक्रमासाठी क्रमिक पुस्तके कुठे मिळतील ह्याची चौकशी करण्यासाठी वडिलांबरोबर त्या कोणाच्यातरी ओळखीने सुप्रसिद्ध नाटककार प्रा. वसंत कानेटकर ह्यांच्या निवासस्थानी गेल्या. मुसळधार पावसात चिंब भिजलेल्या अवस्थेत! कानेटकरांना त्यांच्या अभ्यासाविषयीच्या कळकळीचे विलक्षण कौतुक वाटले. त्यांनी आवश्यक ती पुस्तके तर मिळवून दिलीच; पण शिवाय नंतर त्यांनी जेरुशाची व अझीज अहमद इब्राहीम शेख ह्या तेथील चित्रमंदिरात काम करणाऱ्या एका देखण्या, उमद्या, मुस्लीम तरुणाची ओळख करून दिली. तरुण असूनही का कोण जाणे पण सगळे त्यांना ‘डॅडी’ असेच म्हणत! कानेटकर ह्यांच्याच पुढाकाराने पुढे १९५० साली दोघांचे लग्न झाले. मिस जेरुशा रुबेन मिसेस यास्मिन शेख बनल्या. त्यांनी धर्म मात्र कधीच बदलला नाही. ही घटना तशी खळबळजनकच होती; कारण हिंदू-मुस्लीम भेदापेक्षा ज्यू-मुस्लीम भेद कितीतरी अधिक भयावह आहे. इस्राएल आणि भोवतालची अरब राष्ट्रे यांच्यातील सततचा संघर्ष त्याचेच द्योतक आहे.  

   पुढे शेखबाईंनी मुंबईला शीव येथील एस.आय.इ.एस. महाविद्यालयात २७ वर्षे मराठीचे अध्यापन केले. इथेच विंदा करंदीकर इंग्रजी व चंद्रकांत बांदिवडेकर हिंदी शिकवत. श्री. पु. भागवत मराठीचे विभागप्रमुख होते; त्यांच्या निवृत्तीनंतरची शेवटची सात वर्षे शेखबाई विभागप्रमुख होत्या. आपल्या निवृत्तीनंतर दहा वर्षे शेखबाई यू.पी.एस.सी.च्या परीक्षार्थींना भाषाशास्त्र आणि व्याकरण शिकवीत होत्या. एकूण ४४ वर्षे त्यांनी मराठीचे अध्यापन केले. ‘मराठी लेखन मार्गदर्शिका’ आणि ‘मराठी शब्दलेखनकोश’ ही त्यांची दोन्ही पुस्तके अभ्यासकांना उपयुक्त ठरली आहेत.  

   निवृत्तीनंतर आपला चेंबूरमधील फ्लॅट विकून १९९६ साली शेख जोडपे पुण्यात औंध येथे स्थायिक झाले. आमच्या घराजवळच; त्यामुळे आमच्या गाठीभेटीही अधिक सुलभ झाल्या. एकदा महापालिकेचा एक कर्मचारी जनगणना करण्यासाठी त्यांच्या घरी आला. तो विचारत असलेल्या प्रश्नांमध्ये ‘तुमची मातृभाषा कोणती?’ हा एक प्रश्न होता. ‘मराठी’ हे शेखबाईंनी दिलेले उत्तर त्याला पटत नव्हते. ‘तुमचे आडनाव शेख म्हटल्यावर मातृभाषा उर्दू लिहायला हवी,’ असा त्याचा आग्रह होता; पण शेखबाईंनी  ‘मातृभाषा : मराठी’ अशीच नोंद त्याला करायला लावली. शमा आणि रुकसाना या त्यांच्या दोन्ही मुलींचे शिक्षण मराठी माध्यमातूनच झाले आहे. शेखबाई एकदा म्हणाल्या होत्या, “भाषेला धर्म नसतो, भाषेला जात नसते. मराठी माझी मातृभाषा आहे. माझं माझ्या भाषेवर जिवापाड प्रेम आहे. मराठी भाषा फक्त हिंदूंची नाही. ती महाराष्ट्रात जन्मलेल्या, तेथे वास्तव्य करणाऱ्या सर्वांची भाषा आहे.”   

   भाषेच्या संदर्भात त्यांची काही आग्रही मते आहेत. उदाहरणार्थ : प्रमाणभाषेचा आग्रह. ललित साहित्यात बोलीभाषा (किंवा प्रमाणेतर भाषा) नक्कीच चालेल, अनेकदा ती वातावरणनिर्मितीसाठी आवश्यकही असेल; पण निवेदनात आणि वैचारिक लेखनात मात्र प्रमाणभाषाच हवी; नाहीतर एका बोलीभाषेतील लेखनाचे नेमके आकलन दुसरी बोलीभाषा असलेल्या वाचकाला होणार नाही आणि पर्यायाने भाषेच्या क्षेत्रात अनागोंदी माजेल असे त्यांचे मत आहे. आजकाल स्थानिक अस्मितांना कुरवाळण्याचे दिवस आहेत आणि त्यामुळे वेगवेगळे समाजघटक आपापल्या बोलीचा आग्रह धरत असतात. मुळातच संकटग्रस्त असलेली आपली मातृभाषा अधिकाधिक घटकांमध्ये विभागली जाते आणि परिणामतः अधिकच दुबळी बनत जाते.  शेखबाईंचा कुठल्याच बोलीभाषेला विरोध असा नाही; पण एखादे लेखन सर्व मराठी भाषकांना समजायला हवे असेल तर त्यासाठी प्रमाणभाषेचाच वापर व्हायला हवा असे त्या म्हणतात. त्यांचा हा आग्रह काही जणांच्या दृष्टीने अप्रिय असला तरी आपल्या मतावर त्या ठाम आहेत.  

   त्याचप्रमाणे व्याकरणाचे नियमही आपण पाळलेच पाहिजेत हाही त्यांचा आग्रह असतो. सर्वच शास्त्रांमध्ये त्या-त्या शास्त्राचे नियम असतात आणि आपण ते विनातक्रार पाळतच असतो; इंग्रजी शब्दांचे स्पेलिंगदेखील आपण घोकून घोकून पाठ करत असतो; मग मराठीच्या बाबतीत कंटाळा का करायचा? भाषा ही प्रवाही असते आणि काळाच्या ओघात तिच्यात फेरफार होतच जातात; त्या दृष्टीने प्रमाणभाषा लेखनाचे नियमही बदलायला त्यांचा विरोध नाही. भाषेच्या सुलभीकरणाच्या दृष्टीने आणि ज्यांना संस्कृतची काहीच पार्श्वभूमी नाही त्यांच्या गरजा विचारात घेऊन काही बदल भाषातज्ज्ञांनी अवश्य सुचवावेत; नंतर ते शासनाकडून मंजूर करून घेता येतील; पण तसे घडत नाही तोवर तरी शासनाने आधी १९६२ साली मंजूर केलेले चौदा नियम आणि त्यानंतर १९७२ साली मंजूर केलेले आणखी चार नियम असे अठरा नियम सर्वांनी पाळायलाच हवेत असे त्या म्हणतात. 

   पर्यायी मराठी शब्द उपलब्ध असतानाही इंग्रजी शब्द वापरण्याला त्यांचा विरोध असतो. उदाहरणार्थ, ‘शूटिंग’ऐवजी चित्रीकरण, ‘चॅनेल’ऐवजी वाहिनी, ‘सिरियल’ऐवजी मालिका, ‘रोल’ऐवजी भूमिका, ‘स्क्रिप्ट’ऐवजी संहिता, ‘मीडिया’ऐवजी माध्यम, ‘क्लासिक’ऐवजी अभिजात, ‘रिस्पॉन्स’ऐवजी प्रतिसाद किंवा ‘स्पॉन्सर्ड’ऐवजी पुरस्कृत यांसारख्या सोप्या आणि रूढ प्रतिशब्दांचा त्या आग्रह धरतात. त्या लिहितात, “आपली मराठी भाषा समृद्ध आहे, तिच्यात नव्या नव्या संकल्पना व्यक्त करण्याची ताकद आहे. सर्वच परकीय शब्द काढून टाका असे मला सुचवायचे नाही; पण त्यांच्या अतिरिक्त वापराने मराठीचे अपरिमित नुकसान होत आहे. इतर भाषांच्या गैरवाजवी मिश्रणाने प्रदूषित झालेली भाषा टाळून आपण प्रयत्नपूर्वक पर्यायी मराठी शब्दांचा वापर केला तर त्यामुळे आपल्या भाषेचा गौरवच केल्यासारखे होईल. ते करणे हे आपले कर्तव्यच आहे.” 

   त्यांच्या दृष्टीने आणखी एक चिंतेची बाब म्हणजे मराठी भाषेतून नष्ट होत चाललेल्या म्हणी आणि वाक्प्रचार. त्या म्हणतात, “भाषेचे हे वैभवच अलीकडे लुप्त होत चालले आहे. मोजक्या शब्दांत मोठा आशय व्यक्त करण्याचे सामर्थ्य म्हणींमध्ये असते. मानवी समाज, रूढी, परंपरा, माणसाच्या स्वभावातील गुणदोष इत्यादींचे अल्प शब्दांत केलेले कथन म्हणजे म्हणी. ‘पुढच्यास ठेच, मागचा शहाणा’, ‘थेंबे थेंबे तळे साचे’, ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ अशा कितीतरी अर्थपूर्ण म्हणी आज मराठी भाषेतून गायब झाल्या आहेत. तसेच, डोळे उघडणे, कान फुंकणे, हात दाखवणे, पालथ्या घड्यावर पाणी असे कितीतरी वाक्प्रचारदेखील अलीकडे बोलण्यातून आणि लेखनातूनही हद्दपार झाले आहेत. त्यांचा पुन्हा भाषेत अंतर्भाव होणे आवश्यक आहे. त्यात नवे वाक्प्रचार, नव्या म्हणी यांची भर घालून आपण आपली भाषा अधिक समृद्ध केली पाहिजे असे मला मनापासून वाटते.”

   व्याकरणाची आवश्यकता तर त्या सतत मांडत असतात. दुर्दैवाने व्याकरणाचे महत्त्व आपल्या अनेक लेखकांनाही पटलेले नसते. किंबहुना त्याकडे ते फारसे लक्षही कधी देत नाहीत. ते आपल्यासारख्या प्रतिभावंताचे काम नाही, प्रकाशकाने किंवा मुद्रितशोधकाने ते काम करावे अशीच जणू त्यांची अपेक्षा असते; पण इथेही शेखबाई वेगळा मुद्दा मांडतात. अंतर्नादने आयोजित केलेल्या एका कथाशिबिरात त्या म्हणाल्या होत्या, “आपण जेव्हा एखादा अनुभव घेतो तेव्हा त्यासाठी शब्दांची गरज नसते; पण जेव्हा तो लेखनातून व्यक्त करतो तेव्हा मात्र शब्दांची गरज असते; किंबहुना तेच लेखकाचे मूलद्रव्य असते. म्हणूनच लेखकाने भाषेकडे आणि व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे. त्यातूनच लेखनाला नेमकेपणा येतो. पुष्कळदा एखादी कथा अत्यंत कलापूर्ण असते, तिचे अंतरंग सौंदर्यपूर्ण असते; पण तिचे बाह्य रूप मात्र तितकेसे निर्दोष नसते. सुग्रास जेवणात वारंवार खडे लागले तर जसा विरस होतो, तसा विरस अशी कथा वाचताना होतो. कथेचे हे बाह्यांग, कथेचा हा शब्दबद्ध आविष्कार, तितकाच महत्त्वाचा आहे, जितके कथेचे अंतरंग. कारण त्या बाह्यांगातूनच वाचक कथेच्या अंतरंगात शिरणार असतो. अगदी विरामचिन्हे हीदेखील बोलकी असतात. त्यांच्यातूनही उपहास, संताप, आश्चर्य, कुतूहल वगैरे भावना व्यक्त करता येतात. त्यांचा योग्य वापर केल्यास लेखकाच्या मनातील, शब्दांत व्यक्त न होऊ शकलेला, आशय व्यक्त करता येतो. लेखकाला जे म्हणायचे आहे ते वाचकाला पुरते आणि नेमके समजावे यासाठीही विरामचिन्हे आवश्यक असतात; म्हणूनच लेखकानेही व्याकरणाकडे लक्ष द्यायला हवे.”  

   शेखबाई म्हणजे मूर्तिमंत भाषाप्रेम. त्या म्हणतात, “मानवी जीवनातील व्यवहाराचे सर्वश्रेष्ठ साधन म्हणजे भाषा. विचार, भावना, कल्पना व्यक्त करण्याचे भाषेइतके प्रभावी साधन दुसरे कोणतेही नाही. भाषा ही एक सामाजिक संस्था आहे, सामाजिक सवय आहे; तर तिचे लेखन ही रूढी आहे. भाषेचे बाह्य रूप सतत हळूहळू, नकळत, पण निरपवादपणे बदलत असते. कारण भाषा ही प्रवाही आहे. मात्र भाषेच्या लेखनात हे बदल लगेच प्रतिबिंबित होत नाहीत; लेखनात हे बदल अत्यंत मंद गतीने होतात. याचे कारण लेखन हे चिरस्वरूपाचे असते. एका पिढीचे विचार नंतरच्या अनेक पिढ्यांना कळणे हे लेखनाचे एक महत्त्वाचे सांस्कृतिक कार्य आहे.” 

   म्हणूनच भाषा हा आपला सर्वश्रेष्ठ सांस्कृतिक वारसा आहे असे त्या मानतात. आणि तो भाषिक वारसा जपण्यासाठी शेखबाई जशा दक्ष आहेत, तशाच त्या परधर्मसहिष्णुता हा आपला ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत दक्ष आहेत. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे हे दुसरे एक वेधक अंग. तसे पाहिले तर शेख आडनावाचा त्यांना खूपदा त्रास झाला आहे. एकदा मुंबई-पुणे आगगाडीच्या प्रवासात समोरच्या एका अपरिचित लहान मुलाशी त्यांच्या गप्पा-टप्पा सुरू झाल्या. डॅडी शेख यांनी स्वतःची खिडकीतली जागा मुलाला दिल्यामुळे तो अधिकच खूश होता. शेजारीच बसलेले मुलाचे आई-वडीलही गप्पांमध्ये हसतखेळत सामील झाले होते. पण साधारण निम्मा प्रवास होऊन गेल्यावर गप्पांच्या ओघात बाईंचे आडनाव ‘शेख’ आहे हे कळले आणि समोरच्यांची देहबोली एकदम बदलली. संभाषण मंदावले; मग जवळजवळ थंडावलेच. खिडकीत शेखांशेजारी बसलेल्या आपल्या मुलाला त्याच्या आईने जवळजवळ हिसकावूनच आपल्याकडे घेतले आणि ती जरा लांब जाऊन बसली! उरलेल्या प्रवासात आणि अगदी आगगाडीतून उतरतानादेखील त्यांनी शेखांकडे पाहिलेसुद्धा नाही!

   असाच आणखी एक प्रसंग शेख दाम्पत्य पुण्यात फ्लॅट शोधत असतानाचा. एक फ्लॅट त्यांनी पसंत केला होता. सगळी प्राथमिक बोलणीही झाली; पण प्रत्यक्ष व्यवहार करण्यासाठी जेव्हा शेख जोडपे त्या प्रख्यात बिल्डरच्या कार्यालयात गेले व त्यांचे आडनाव शेख आहे हे स्पष्ट झाले, तेव्हा “सध्या फ्लॅट उपलब्धच नाही” असे त्यांना ऐकावे लागले होते!  

   पण असे बरेच अनुभव गाठीशी असूनही शेखबाईंच्या मनात जराही कटुता नाही. कारण भारतीय समाजात असलेले धार्मिक सौहार्ददेखील त्यांनी लहानपणी बऱ्याचदा अनुभवले आहे. आजच्याप्रमाणे त्या वेळी जातीयवादाला राजकीय कारणांसाठी खतपाणी घातले जात नव्हते; शिवाय नंतरच्या आयुष्यातही  त्यांच्याबरोबर वागताना कुठल्याही प्रकारचा दुजाभाव न दाखवणारे अनेक हिंदूही त्यांना भेटले आहेत. किंबहुना त्या असेही म्हणतात की, “आज जेव्हा मी माझ्या मित्रपरिवाराचा विचार करते, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की त्यात हिंदू स्नेहीच अधिक आहेत. आणि माझ्या या स्नेह्यांनी जातिद्वेषाने मला नाकारलं असं कधीच घडलं नाही.” त्यांची एवढीच इच्छा आहे की व्यक्तिगत पातळीवर अनुभवायला येणारे आपल्या समाजातील हे धार्मिक सौहार्द सार्वजनिक पातळीवरही जाणवायला हवे. या संदर्भातली त्यांची मते अगदी पक्की आहेत. 

   त्या म्हणतात, “आपण कोणत्या धर्मात व जातीत जन्माला येणार हे आपल्याला माहीत नसतं. ते आपण ठरवूही शकत नाही. आपण माणसं आहोत आणि माणुसकी हा आपला एकमेव धर्म आहे, असं जर आपण मनापासून स्वीकारलं, तर मानवी समाज किती सुखी होईल, नाही?” डॅडी शेख स्वतःही खूप पुरोगामी विचारांचे होते; त्यांच्या एक वडील भगिनी झुबेदाबाई या मुंबईच्या ग्रँट मेडिकल कॉलेजमधून एम.बी.बी.एस. करणाऱ्या पहिल्या मुस्लीम  महिला. डॅडी वारले तेव्हा त्यांच्याच अंतिम इच्छेनुसार शवाचे वैकुंठात दहन केले गेले होते, मुस्लीम  परंपरेप्रमाणे दफन नव्हे. अर्थात त्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांना महानगरपालिका अधिकाऱ्यांशी बराच वाद घालावा लागला होता.  

   मराठीप्रेम आणि परधर्मसहिष्णुता ह्यांव्यतिरिक्त आवर्जून उल्लेख करायला हवा असा शेखबाईंचा तिसरा विशेष म्हणजे त्यांची कर्तव्यनिष्ठा. पाठाची पूर्वतयारी केल्याशिवाय, आवश्यक ती टिपणे काढल्याशिवाय त्या कधीही वर्गावर गेल्या नाहीत. नंतरच्या आयुष्यातही जेव्हा जेव्हा भाषण करायचा योग आला तेव्हा तेव्हा त्यांनी आपले भाषण अगदी शब्दश: लिहून काढले आहे; त्यात त्यांनी कधीच कंटाळा किंवा आळस केला नाही. अंतर्नादच्या प्रत्येक अंकाची मुद्रिते त्या  अगदी वेळेत तपासून देत; काम झाले की लगेच स्वतः फोन करून कळवत; पाठपुरावा कधीही करावा लागत नसे. यजमान हृदयविकाराच्या झटक्याने रुग्णालयात अतिदक्षता कक्षात असतानाही त्यांनी अंतर्नादची मुद्रिते तिथेच बसून व कसलेही अवडंबर न माजवता तपासून दिली होती. यात आपण काही विशेष करतो असेही त्यांनी कधी मला जाणवू दिले नाही. “अंतर्नादच्या अंकात एखादी चूक आढळली तर मला हातावर ओरखडा उमटल्यासारखं वाटतं,” असे त्या एकदा म्हणाल्या होत्या. हे सारे त्या पैशाकरिता करत नव्हत्या, कारण सुदैवाने त्यांची सांपत्तिक स्थिती उत्तम होती;  शिवाय आम्ही त्यांना देऊ शकत होतो ते मानधन तसे मामुलीच होते; पण हाती घेतलेले काम जास्तीत जास्त चांगले करणे हीच त्यांची त्यामागची भावना होती. साहित्यक्षेत्रात सगळ्याच पातळ्यांवर आज पाट्या टाकायची प्रवृत्ती बोकाळत आहे; अशा परिस्थितीत शेखबाईंची कर्तव्यतत्परता जर लेखकांपासून पुस्तकविक्रेत्यांपर्यंत साहित्यक्षेत्रातील अधिकाधिकांनी अंगी बाणवली, तर अन्य कुठल्याही शासकीय वा बिनशासकीय मदतीशिवायदेखील मराठी साहित्यव्यवहार खूप अधिक उंचावर जाईल. 

   शेखबाईंचे आणखी एक वेगळेपण म्हणजे त्यांना प्रसिद्धीचा जराही सोस नाही. केवळ आपले नियत काम जास्तीत जास्त चोख करण्यावर त्यांचा सगळा भर असतो. कोणाच्या पुढे-पुढे करण्याचा त्यांचा स्वभाव नाही, या ना त्या निमित्ताने प्रसिद्धी मिळवायचा त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही. त्या मुंबईत होत्या ते साहित्याच्या दृष्टीने बहराचे दिवस होते. साहित्यसृष्टीत अनेक गट कार्यरत होते; अनेक संस्था होत्या. पुरस्कार दिले जात, कार्यक्रम सादर होत. त्यात कुठेतरी सामील व्हायचा प्रयत्न साहजिकच अनेक जण करत असत. प्रकाशझोत सगळ्यांनाच प्रिय असतो; पण आपले कॉलेज सोडले तर तशा कुठल्याही गटात शेखबाई कधी सामील झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. कुठल्याही साहित्य संमेलनात किंवा परिसंवादात आमंत्रित वक्ता म्हणून त्यांची वर्णी लागलेली नाही. त्यांनी स्वतःहून कधी तसा प्रयत्नही केला नाही. पुण्यातील किंवा मुंबईतीलही साहित्यिक वर्तुळात त्यांच्या फारशा ओळखी नव्हत्या आणि त्यांच्याविषयी फारशी कोणाला माहितीही नव्हती. २०१५ साली त्यांना पुण्यात महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार दिला गेला तो त्यांना मिळालेला पहिला मोठा पुरस्कार. तोही वयाच्या नव्वदीत मिळालेला. पारितोषिकांचा सुळसुळाट झालेल्या आजच्या काळातही अशा स्वरूपाचा गौरव त्यापूर्वी कधी त्यांच्या वाट्याला आला नव्हता ही एकच गोष्ट त्यांच्या प्रसिद्धिपराङ्मुखतेची साक्ष पटवायला पुरेशी आहे. गेल्या दहा-पंधरा वर्षांतच साहित्यिक वर्तुळात त्यांचे नाव घेतले जाऊ लागले असे लक्षात येते.    

   एक खंत मला जरूर वाटते; त्यांनी स्वतः फारच कमी लेखन केले. या लेखात पूर्वी उल्लेख केलेली दोनच पुस्तके त्यांच्या नावावर जमा आहेत. त्यांच्या वेळोवेळी लिहिलेल्या लेखनाचे एखादे पुस्तक काढावे असा विचार एकदा माझ्या मनात आला होता; पण त्यांच्या तशा लेखांची संख्या त्यासाठी पुरेशी नव्हती. त्यांनी अधिक लिहिले नाही याचे वाईट वाटते. खरेतर त्यांच्याजवळ लेखनासाठी आवश्यक असे अनेक गुण होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त एक गौरवग्रंथ येत्या २१ जून रोजी खासगी स्वरूपात प्रसिद्ध होणार आहे. त्यातील काही लेख शेखबाईंच्या अंगी असलेल्या लेखनगुणांची साक्ष पटवायला पुरेसे आहेत. उदाहरणार्थ, ‘कळ्यांचे निःश्वास : निःशब्दाचे शब्दरूप’ हे पुस्तक-परीक्षण, किंवा ‘श्री. पु. भागवत : सहकारी आणि स्नेही’ आणि ‘श्री. म. माटे – एका विद्यार्थिनीच्या दृष्टिकोनातून’ ही व्यक्तिचित्रे अवश्य वाचण्यासारखी आहेत.     

   त्यांच्या लेखनशैलीचे आणखी एक उदाहरण म्हणजे ‘मैत्र – एक पवित्र नाते’ या शीर्षकाचा मैत्रीबद्दलचा त्यांचा लेख. तो त्यांनी ‘व्यासपीठ’ नावाच्या नाशिकहून निघणाऱ्या आणि पुण्या-मुंबईत फारशा परिचित नसलेल्या एका दिवाळी अंकात २००८ साली कोणाच्यातरी सांगण्यावरून लिहिला होता. त्या अप्रतिम लेखातील काही भाग इथे उद्धृत करण्यासारखा आहे. त्यांच्या लेखणीचे सामर्थ्य त्यातून दिसून येते. त्या लिहितात, 

   “माझ्या पपांची पंढरपूरला बदली झाली तेव्हा मी सहावीत होते. आमची ममा माझ्या वयाच्या दहाव्या वर्षीच आम्हाला कायमची सोडून गेली. देऊबाई नावाची एक स्वयंपाकीण आमच्याच घरात राहायची. ती स्वभावाने दुष्ट होती. पपांच्या अपरोक्ष ती आम्हां भावंडांचा दुःस्वास करी. आमची शाळा घरापासून बरीच दूर होती. सकाळी अकरा वाजताच घरून निघावे लागे. आम्हां बहिणींना मधल्या वेळी खाण्यासाठी डबा तिने कधीच दिला नाही. ‘स्वैपाक तयार नाही’ ही तिची सबब रोज ऐकायची आणि डबा न घेताच शाळेत जायचे! माझ्या वर्गातल्या ज्या मुलींची घरे शाळेजवळ होती, त्या मधल्या सुट्टीत घरी जेवायला जायच्या. ज्यांची घरे दूर होती त्या डबे आणायच्या. मी मधल्या सुट्टीत वर्गातच बसून राही. माझ्या तीन वर्गमैत्रिणींच्या ही गोष्ट लक्षात आली. त्या मला वर्गात बोलवायला आल्या. ‘मला भूक नाही; मी शाळेत येतानाच जेवून आले,’ असे मी त्यांना सांगू लागले. कसे कुणास ठाऊक, पण मी खोटे बोलते आहे हे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी माझ्या प्रतिकाराला न जुमानता अक्षरश: मला ओढून शाळेच्या पटांगणातील एका झाडाखाली नेले. त्यांनी आपापले डबे उघडले. भाजी, पोळी, भाकरी, लोणचे, चटणी असे काही काही त्यांच्या डब्यात होते. ‘चला, जेवू या’, म्हणून त्यांनी जेवायला सुरुवात केली. मला फार संकोचल्यासारखे झाले. मी काही खाईना. तेव्हा त्यांनी एकमेकींना नेत्रपल्लवी केली आणि आळीपाळीने मला घास भरवायला सुरुवात केली. माझ्या घशात आवंढा दाटून आला. घास गिळवेना. तेव्हा त्यांतल्या एकीने ‘घास घे रे तान्ह्या बाळा’ हे गाणे सुरेल आवाजात गायला सुरुवात केली. तिघीही माझ्याकडे पाहून मंद स्मित करू लागल्या. त्यांच्या दृष्टीत अजिजी होती. मलाही हसायला आले. आणि त्या दिवसापासून रोज मी त्यांच्याबरोबर जेवू लागले. संकोच, अवघडलेपण गेले. गंमत म्हणजे आम्ही सर्व जणी त्या डब्यातूनच अन्न खात असू, कुणीही वेगळे वाढून घेत नसे. डब्यातून लागेल तसे खाणे हा कार्यक्रम होता. ‘तू डबा का आणत नाहीस?’ असा प्रश्न त्यांनी कधीच विचारला नाही. मला आई नाही हे त्यांना ठाऊक होते; पण त्याबद्दल दयाबुद्धीने किंवा सहानुभूतीने त्यांनी एक शब्दही कधी उच्चारला नाही, किंवा इतर कुणापाशीही ‘ही आमच्या डब्यातले खाते’ असे उद्गार काढले नाहीत. त्या काळात पंढरपूरसारख्या त्या गावात जातिभेदाचा अनुभव आम्हाला वारंवार येई. त्याच पंढरपुरात माझ्या या तीन वर्गभगिनींना एकाच डब्यातून जेवताना स्नेहाचे अतूट नाते माझ्याशी जोडावेसे वाटले! हा अनुभव इतका हृदयस्पर्शी होता की, आज इतक्या वर्षांनंतरही त्याच्या मधुर स्मृती माझ्या मनाला एक वेगळाच अवीट आनंद देऊन जातात आणि हृदय कृतज्ञतेने भरून येते. त्यांनी मला जे निरपेक्ष प्रेम दिले, ते किती मोलाचे होते हे शब्दांत सांगता येणार नाही.”   

   इथे थोडा व्यक्तिगत मजकूर लिहिला तर ते अनुचित ठरू नये. ऑगस्ट १९९९पासून अंतर्नाद मासिकाच्या प्रत्येक अंकाच्या पहिल्या पानावर श्रेयनामावलीत ‘व्याकरण सल्लागार’ म्हणून छापले गेलेले नाव म्हणजे यास्मिन शेख. तसे पद असलेले दुसरे नियतकालिक माझ्यातरी ऐकिवात नाही; पण आमचा संबंध केवळ व्यावसायिक पातळीवरचा कधीच नव्हता. तसे पाहिले तर त्यांची धाकटी मुलगी रुकसाना (सासरची रुमा बावीकर) आणि मी मुंबईला शिकत असताना पाचवी ते अकरावी डी. एस. हायस्कूल या शीव येथील शाळेत एकाच वर्गात होतो. मोठी मुलगी शमा (सासरची भागवत) हीदेखील त्याच शाळेत पण दोन वर्षे पुढे होती; परंतु त्या काळी वर्गात मुलगे एका बाजूला आणि मुली दुसऱ्या बाजूला अशी अगदी सुस्पष्ट विभागणी असायची – जणू भारत आणि पाकिस्तान! मध्ये अनुल्लंघनीय भिंत! धर्माव्यतिरिक्त इतरही भिंती समाजात असतातच! त्यामुळे शेखबाईंशी माझा खरा परिचय झाला तो पुण्याला आल्यानंतर आणि तोही अंतर्नादच्या माध्यमातूनच; पण लौकरच तो खूप दृढ झाला. 

   तो किती दृढ झाला त्याचे एक द्योतक. दिवस होता एप्रिल १५, २०२३. पुण्यातील डेक्कन जिमखान्याचे सभागृह. आम्ही साठ-सत्तर जण एकत्र जमलो होतो. दत्तप्रसाद दाभोळकर, अनिल जोशी आणि दिलीप फलटणकर या माझ्या तीन जवळच्या मित्रांच्या पुढाकारातून माझा सत्तरावा वाढदिवस अनौपचारिकरीत्या साजरा करण्यासाठी. सगळे आयोजन त्या तिघांनीच केले होते. अनेकांनी आपले मनोगत त्यावेळी उत्स्फूर्तपणे व्यक्त केले. अनेकांच्या विनंतीवरून ९८ वर्षांच्या प्रा. यास्मिन शेख याही काठी टेकत उभ्या राहिल्या आणि बोलू लागल्या, “भानू काळे यांनी माझ्या पोटातून जन्म घेतला नसला तरी त्यांना मी माझा मानसपुत्रच मानते. या माझ्या प्रिय मानसपुत्राला दीर्घायुष्य लाभो अशी या प्रसंगी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करते,” अशी सुरुवात करून त्यांनी केलेले ते चार-पाच मिनिटांचे भाषण ऐकताना इतर बहुतेक श्रोत्यांप्रमाणे माझेही डोळे पाणावले होते. त्यांनी असे सर्वांसमोर म्हणावे याहून अधिक कुठला गौरव माझ्या वाट्याला या आयुष्यात येणार होता? तो प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही.

   आज शंभरीच्या उंबरठ्यावर उभे असतानाही दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामात त्या गर्क असतात, स्वतःला गुंतवून घेतात. एक मोठे नवल म्हणजे मुद्रिते तपासताना त्यांना चष्माही लावावा लागत नाही.  आजही दोन-तीन शब्दकोश नेहमीच त्यांच्या हाताशी असतात; एखाद्या शब्दाविषयी जरा जरी शंका आली तरी कंटाळा न करता त्या शब्दकोश काढून तपासतील. लेखनसंस्कार करताना कुठलाही संदर्भ विचारा; लगेच सांगतील; स्वतःला ठाऊक नसेल तर मुद्दाम शोध घेऊन माहिती पुरवतील – तेही अगदी हसतमुखाने. इतक्या वर्षांत त्यांच्या चेहर्‍यावर कधी वैताग किंवा कंटाळा बघितल्याचे आठवत नाही. अगदी दुपारची वामकुक्षीही कधी पाच मिनिटांसाठीही घेत नाहीत. अलीकडे अनेक जण त्यांच्याकडे काही ना काही मुद्रितशोधनाची कामे घेऊन येतात; शंकानिरसन करून घ्यायला येतात. त्या कोणालाही नाही म्हणत नाहीत. कुठल्याही वेळी आलेला फोन स्वतः घेतात. मला स्वतःला आणि त्यांच्या दोन्ही मुलींनाही त्यांनी या वयात तितका त्रास घेणे, त्यांच्या प्रकृतीचा विचार करता, तसे आवडत नाही; पण शेखबाई कोणालाही विन्मुख करत नाहीत; शक्य तेवढा वेळ त्या कामासाठी देतातच. 

   सतत स्वतःला अशा स्वरूपाच्या कामात गुंतवून घेणे त्यांना बहुधा आवडत असावे; त्यातूनही त्यांना एक प्रकारची ऊर्जा मिळत असावी. त्या एकदा म्हणाल्या होत्या, “माझ्या प्रदीर्घ आयुष्यात जवळच्या आप्तेष्टांचे मृत्यू पाहण्याचे, क्लेशाचे अनेक प्रसंग आले; पण त्यामुळे स्वतः हताश न होता, मनात नकारात्मक विचारांना स्थान न देता सतत कार्यमग्न राहायचा मी निश्चय केला. मराठी भाषा व साहित्य यांच्या उपासनेला वाहून घेतलं. ‘रिकामे मधुघट’ या आपल्या प्रसिद्ध कवितेत भा. रा. तांबे म्हणतात, ‘संध्याछाया भिवविती हृदया’. त्यात थोडा बदल करून मी ‘संध्याछाया सुखविती हृदया’ असं म्हणू शकते ते या सकारात्मक दृष्टिकोनामुळेच.” आपल्या प्रिय कामातून मिळत असलेली ऊर्जा हेच बहुधा या वैयायोगिनीच्या चिरतारुण्याचे रहस्य असावे.    

   अशा या यास्मिन शेख आता शंभराव्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढलेल्या आयुर्मानाच्या आजच्या काळातही हे तसे विशेषच आहे. त्यांचा जन्मदिन २१ जून हा वर्षातील सर्वांत मोठा दिवस आणि अलीकडे तो जागतिक योगदिन म्हणूनही साजरा होतो हाही एक सुखद योग. आपण त्यांना वंदनपूर्वक आणि अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देऊ या. जीवेत शरद: शतम्!  

यास्मिन शेख व भानू काळे 

Author

2 thoughts on “यास्मिन शेख : चिरतरुण वैयायोगिनी

  1. यास्मिन बाई ( खर तर सवयीनं मॅडम म्हणणार होते) अतिशय हृद्य आहे. बाईंबद्दल जितकं वाचवे तितके त्यांचं थोरपण उमजत जाते. त्या लेखकाला आपला मुलगा मानतात ही उभयतांसाछी किती मोठेपणाची व भाग्याचा गोष्ट आहे.

  2. व्यक्ति(मत्व)परिचय सुंदर आहे. लेखामुळे त्या अजून हयात आहेत हे देखील कळले! (सहेतुक ! आहे) धर्म व (मातृ)भाषा यांची गल्लत अनेक जण करतात. वंशाने अरब पासले तरी काही जण मुसलमान तर काही ज्यू व काही ख्रिश्चन असतात. हे विषयांतर झाले! असो. लेख खूपच आवडला, तुमच्या आठवणी व अनुभव परिणामकारक रीत्या गुंफल्या/ले आहेत.

Leave a Reply