
कुर्ल्याच्या लोकमान्य टर्मिनसला गाडी लांबचा भोंगा वाजवून थांबली आणि मेनकाने तिचे लांबसडक काळेसावळे हात पूर्व-पश्चिम पसरत मोठ्ठा आळस दिला. उतारूंच्या नजरा लगोलग तिच्याकडे वेधल्या गेल्या – होतीच ती तशी. नाकीडोळी नेमकेपणा, पांढरेशुभ्र हसरे दात, उंच उचललेल्या इंद्रधनुष्यी भुवया, उंच गर्दन, सडसडीत मोहक बांधा, बऱ्यापैकी उंची आणि मुख्य म्हणजे या सगळ्याची असलेली पुरेपूर जाण; पण त्या नजरा, थबकणारे पाय या कशाचं काही वाटून न घेता सरळ दुर्लक्ष करत ती तिच्या मोठ्या बहिणीला गावठी तेलगू भाषेत विचारू लागली, “अक्का उतरने का क्या?” अक्काने कपाळावर हात मारत काहीतरी शिवी हासडली असावी. त्यावरही निर्लज्ज हसत मेनका उठून उभी राहिली. आपला परकर पोलका आणि त्याला आवश्यक तितकं झाकून घेणारी ओढणी अंगभर पसरत करकचून बांधली. आपलं छोटंसं रंगीबेरंगी दिसणारं बोचकं मानेवरून स्टायलीत मागे टाकत अक्काच्या मागे उतारूंच्या रांगेत जाऊन उभी राहिली. अक्काने तिला आपल्या पुढ्यात खेचली आणि म्हणाली, “सीधी उभी रहा.” उगाच आपल्या तोंडावरून हात फिरवत खासगी आवाजात मेनका बोलू लागली, “अरे अक्का, तू बच्ची समझती क्या मेरे को?” आपल्या शरीराला उद्देशून आपादमस्तक निर्देश करत वर म्हणाली, “इतनी बडी हुई है ना; मेरे को संभाल सकती मैं|” पण गर्दीच इतकी तुंबली होती की चार लोकांना तिचा खासगी आवाजपण लगेच पोचला. कोणी फिस् कन हसलं, कोणी तिला तेवढ्यात निरखू लागलं. अक्का आता डोळे मिटून घेत म्हणाली, “बाहर चलो बाद में देखेंगे|”
रेटारेटीला न जुमानता दोघी धडाधड दरवाजातून बाहेर आल्या आणि त्यांच्या मागून उरलेले निरीक्षक उतारू धडपडू लागले. सहीसलामत स्वतःला वाचवत कशाबशा आपली बोचकी सांभाळत दोघी फलाटाच्या दुसऱ्या दिशेने चालू लागल्या. मेनकाचं मुंबईतलं आगमन तिच्या निरागस डोळ्यांनी सगळ्यांना समजत होतं. तिचे देहाला हेलकावे देत चालणं एखाद्या हिंदी सिनेमातल्या ‘गांव की गोरी’ सारखं तिच्या परीने नैसर्गिक असलं तरी मुंबईसाठी ते अस्वाभाविक होतं. अक्का मात्र निराळ्याच भ्रांतीत असावी. कल्याणची लोकल पाच नंबरच्या फलाटावर लागलीय ऐकल्यावर मेनकेचा हात घट्ट पकडला आणि ती जवळजवळ पळत सुटली. मेनका इलाज नसल्यामुळे फरपटत आपण काही चित्रपटात भूमिका करत असल्यासारखी नाजूक जपत धावू लागली. मुंबईला यायचं म्हणून अक्काने नव्या कोऱ्या चपला आणून दिल्या होत्या त्या तिला बोचत असाव्यात. एरवी गावाकडे आपण कुठे चप्पल घालतोय! “अक्का रुक जरा,” म्हणत तिने पटकन चप्पल काढून जुडी हातात धरली. “चल अभी,” म्हणत लोकलमध्ये चढायला सज्ज झाली. लांबच्या गाड्यांमधून आलेल्या या दोघींच्या अंगाला मत्स्यगंधेसारखा दुर्गंध येत होता. बायकांच्या डब्यात चढायला इच्छुक स्त्रिया त्यांना, ‘दूर खडे रहो’ म्हणून मागे ढकलू लागल्या. इतक्यात लोकल फलाटाला लागली आणि सगळे समान झाले. धकाधकी करत यशस्वीपणे सगळ्याच बायका डब्यात शिरल्या. नम्रपणे अक्का मेनकेला धरून सीटवर बसायला न जाता बाहेरच्या जागेतच सरळ खाली बसल्या. “इधर अच्छा लगताय रे, कितना खिटखिट वो औरत लोगों का.” मेनका मोठ्याने बोलली. तिला नाजूक चिमटा काढत अक्काने गप्प केलं. अपने पास तिकट नहीं हय, चूप बैठ अभी| संभ्रमित मेनकेने बाहेर पाहिलं आणि संभ्रम बाहेर फेकून दिला. ते तिला एकदम शोभायचं. ‘अच्छा है रे तेरा बंबई| सब पढे लिखे चकाचक लोग. हम जा किधर को रहे हैं पर?” अगदी हनुवटीवर बोट ठेवून अभिनय केल्यासारखं विचारू लागली. अक्का तिला जवळ घेऊन समजावू लागली. बंबई से थोडा दूर जानेका हम को|कल्यान गांव है| उधर झोपडा है मेरा, मैं मेरा मर्द, मेरा बच्चा रहता उधर| अभी तू भी रहने का| आज तू एकदम आराम कर| थक गये ना हम| देख हम सब काम करते| फोकट में कोई नही परवडता| कल से तू भी काम कर मेरे साथ|’ मेनका मनापासून कथा ऐकल्यासारखी मान डोलवत होती. शेवटचं वाक्य आलं तेव्हा तिला समजलं आता प्रश्न पडला पाहिजे. ‘अक्का मैं क्या करेगा? मेरे को कूच नई आता.’ एकदम मूर्ख चेहरा करत मेनका दिलखुलास ओशाळी हसली; पण अक्काने ठरवलंच होतं तिच्यासाठी, ‘अरे घर पे झाडू लगाती ना, पोछा लगाती ना? बर्तन साफ करने का इसमे कूच खास नई| आताय तेरे को! फिर?’ मेनका आता अक्काच्या थेट डोळ्यांत बघत विचारू लागली, ‘मेरे को ये सब करने का पैसा मिलेंगा?’ आणि ती खूश झाली. ‘नया घागरा चोली लेंगी मैं, ये फट गया है ना| देख इधर’ म्हणत डब्यातच खांद्यावर फाटलेले दाखवू लागली. शेजारच्या डब्यातल्या काही पुरुष-नजरा आपोआप तिथे वळल्या. अक्काने इतरांकडे बघत तिला सावरलं आणि कुजबुजली, ‘ऐसा दिखाने का नय| येडी तू|’ कल्याण आलं तशा दोघी कपडे झटकून उठून आधीच उभ्या होत्या. चढणारा लोंढा शिरू द्यायचा आणि एका बाजूने कडेने आपण कसं उतरत जायचं ते अक्काने तिला प्रात्यक्षिक देत ट्रेनिंग दिलं. डोळे विस्फारलेली मेनका कधीही तेल न लावलेल्या आपल्या बटा मागे सारत अक्कामागे चालू लागली. ‘मेरे को थोडी रोज जानेकाय ऐसा| बाबा रे मेरे को डर लगता रे गाडी का|’ मेनकाचा ऊर अजूनही धडधडत होता.
तिच्या घाबरण्याकडे दुर्लक्ष करत अक्का फलाटाला लागून थोड्या अंतरावर असलेल्या झोपडपट्टीकडे बघत होती. ‘ये अपना इलाका| इधर रहते हम|’ मेनका एक हात कमरेवर ठेवत एक हात कपाळावर धरत झोपड्या निरखत होती. मध्येच तिने विचारलं, ‘तो ये तेरा महल?’ ‘हां अभी तेरा भी येच,’ अक्का हसत उत्तरली. लोकल निघून गेली आणि रिकाम्या फलाटावरून लोक इकडे तिकडे जाऊ लागले. गोंधळलेल्या मेनकेला तिने हाताने थांबवले, ‘सब गये ना के आपुन इधर से कूदने का| येईच रास्ता आपुन का| आणि बघता बघता दोघी उड्या मारून झोपड्यांकडे पळत सुटल्या.
अक्कापुढे मोठी जबाबदारी होती. ही अर्धवट वयातली बहीण आणली खरी; पण तिथेपण होतं कोण बघायला? बाप दारूपायी वाया गेलेला, आई लंगड्या पायाने कसाबसा संसार रेटत होती. मी हिची काळजी घेणार नाहीतर कोण? माझा नवरापण इतर झोपडीवाल्यांसारखा वाईट नाही. रिक्षा चालवतो, मी शाळेत आयाचं काम करत्ये नि पोरगं ट्राफिकमध्ये गाडीच्या काचा पुसतंय, फुलं विकतंय. भिकारी नाय कोणपण. नवरा मारत नाही मला; की दारुडा नाय. फक्त पिच्चरचा नाद हाय त्याला; पण चालतंय. बाईचा नाद तरी नाही. मेनका काम करेल, बाहेरच असेल दिवसा, रात्री माझ्यासमोर असेल. प्रश्न सुटल्यासारखं वाटलं आणि अक्काने झोपडीत पाय ठेवला. नवरा देवासमोर अगरबत्ती लावत होता. मेनकेला प्रसन्न वाटलं. ती पटकन देवाच्या आणि त्याच्या पाया पडली. दचकून त्याने पाय मागे घेतले. अक्काकडे बघत मग तो मोकळा हसला आणि मेनकेच्या डोक्यावर हात ठेवत ‘अच्छा है|’ एवढंच म्हणाला. दरवाजा बंद करून दोघींनी भराभर झोपडी स्वच्छ केली, अक्काने चहा टाकला. “मेनका, नहायेगी नहीं? चल चाय पी और बाहर आ, मैं दिखाती तेरे को कहाँ पर नहाना है|” मेनका ते अर्धवट नहाणीघर बघून शरमली, “अक्का मेरे को शरम आता| इधर से खुला है ना|” “अरे उधर कपडा लटकाकर डालने का|सब ऐसेही नहाते इधर. बंबई है ये| और हां, ये सामने का दो खोली छोडके संडास है| अपुनको बाल्दी लेके जाना होता है| एक चाबी दिया है हम सब को|’ मेनका लांब पापण्यांची सुंदर उघडझाप करत ऐकत होती. एक हात कमरेवर ठेवून मोठ्या बायकांसारखी उभी राहायची सवय तिची. कमरेवरचा तिचा हात हातात घेत अक्का म्हणाली ‘तू सुबोको मेरेही साथ चला कर| तेरे को मैं काम पे लगा देगी फिर कोई बातही नही| पैसा मिलेगा ना तो सब ठीक हो जायगा रे|’ पाठीवर हात फिरवल्यादिशी मेनका रडू लागली. तिची हनुवटी वर उचलून अक्काने पाहिलं. कुठे आलीय ही! पिक्चरमध्ये गेली असती तर हिरोईन झाली असती. काय करायचं गं असलं रूप आपल्याला? संभाल कें रह मेनका| खुद को बहोत संभालना पडता है रे दुनिया से! क्या बोलू अभी तेरे को’ मेनकाने हुंदके दाबत आपली कपड्याची बोचकी उघडली. एक त्यातल्या त्यात स्वच्छ परकर पोलका काढला. कसंबसं न्हाणं उरकून घेतलं आणि पहिल्या दिवसाचं पुष्कळ शिक्षण पदरात पडलं असं झालं तिला.झोपडीत आली, एक कळकट्ट चादर काढली आणि पथारी पसरून आडवी झाली. दरवाजा किलकिला उघडा होता, आतून अक्काचे सल्ले देणं चालू राहिलं. हं हं करत मेनका एका हाताची घडी करून कपाळावर ठेवत तळपायाचे नाग डोलवू लागली. बघता बघता थकून त्या पत्र्याच्या भिंतीला किंचित टेकल्या टेकल्या तिला गाढ झोप लागली मनाशी काहीबाही पुटपुटत. आपलं दूर लांब राहिलेलं अदोनी गाव स्वप्नात आलं आणि स्वप्नभर ती गावात घरात बालगोपाळांबरोबर मोकळी खेळत राहिली. डोळ्यांतून पाण्याच्या धारा वाहत राहिल्या.
ठरल्याप्रमाणे अक्का तिला आपल्यासोबत सगळ्या कामांना न्यायला लागली. ही कोण ? विचारलं की तिला बरं वाटे. माझी धाकटी बहीण गावावरून आली आहे, तिला कामाची गरज आहे वगैरे पाढा वाचला जायचा. मेनकाला तोडकं हिंदी बोलता येत होतं. नाही जमलं तर फार डोक्याला तोशीस न देता सरळ तेलगूमध्ये बोलून मोकळी व्हायची ती. आठवडाभर ही ओळख परेड झाल्यावर तिला पण कामं येऊ लागली. साधवानींच्या शेजारचे नेने कुटुंब तिला फार आवडायचं. त्या ब्राह्मण गोऱ्या गोऱ्या रूपवान बाई नोकरी करायला जायच्या मुंबईला. नवरा खूप लवकर जायचा, उशिरा यायचा तो कधी दिसायचा नाही विशेष. त्यांचा छोटुसा एकुलता एक गुलाबी गोरा, नाजूकसा लेक सकाळी रोज आईकडून ओरडा खात असे. हळूहळू आवरत असल्याने त्याची आई रोज त्याच्यामागे लागत असे. मेनका त्यांचा सगळा संवाद ऐकून हसत असे. एक दिवस काम आटपल्यावर धीटपणाने तिने नेन्यांचा दरवाजा वाजवला आणि नेनीणबाई आल्या. स्वयंपाकातलं काम अर्धवट टाकून यायला लागल्याने साहजिक त्यांच्या कपाळावर आठ्या होत्या. त्या बघून तिला लगेच समजलं, ‘आंटी मैं मेनका ! मेरे को काम चाहिये| मैं झाडू पोछा बर्तन कपडा धोना सब कर सकती है|’ तिचा एकंदर अवतार बघून त्यांना एवढे काम द्यायचा धीर होईना; तरी त्यांनाही कोणी मुलगी हवीच होती या कामांना; म्हणून थोडं विमान खाली उतरवत त्या ‘ये आत’ म्हणाल्या. ‘देख, चार बडे रूम्स हैं, दो टॉयलेट. सब रोज साफ करना है, हफ्ते में एक बार खिडकी साफ कर. हां और ये बर्तन भी कर. कपडे रहने दे,’ तिच्याकडे स्पष्ट नाराजीने बघत त्या म्हणाल्या. तिच्या जवळ गेलं तरी झोपडपट्टीमधून आल्याचा दुर्गंध येत होता; पण तिचा पेहराव अगदी तिथल्या राजकन्येसारखा होता. खांद्याला फुग्यांचे हात असलेला पोलका, लांब घोळदार खडी – नक्षी असलेला रंगीत लाचासारखा पायघोळ परकर, एक वेगळ्याच रंगाची ओढणी, लांब केसांचा वर उंच छान बांधलेला अंबाडा, त्याच्यावर काहीतरी कलाकुसरवाला आकडा, कानातले लोंबते डूल. त्यांनी हसून विचारलं, ‘नहा के आयी हो क्या?’ मेनका घाईने हो हो म्हणाली. त्या बजावून सांगत होत्या ‘इधर रोज नहाके आना हां|’ लगेच ती केरसुणी शोधू लागली. हातात केरसुणी घेऊन झाडता झाडता हैदराबादी स्वरात त्यांना आपलं इथे येणं कसं झालं ते सांगायला लागली. बाईना तिचं बोलणं सगळंच समजत नसावं. त्या तरी तिला विचारतच राहिल्या, ‘इतना सज धज कर काम पे आयेगी तो काम में ध्यान लगेगा क्या?’ मेनका निष्पाप मुलासारखी होती. इकडे तिकडे खोल्यांमध्ये वाकून बघत त्यांना म्हणाली, “ये ऐसा घुटने तक घागरा लेके ऐसा कस के बंधने का.” आणि सर्रकन आपला परकराचा घोळ अर्धा कमरेवर खोचला. तिचे नाजूक सावळे पाय त्या पाहतच राहिल्या. ‘बरं बरं, कर अपना काम, और मुझे भी करने दे,’ म्हणत मनात म्हणाल्या, काळी आहे म्हणून नाहीतर कुलपात ठेवावी लागली असती हिच्या बहिणीला हिला.
मेनका रोज न चुकता येत राहिली. खूप लवकर तिने कामं शिकून लोकांचा विश्वास संपादन केला. आता नेनीण तिच्या मुलाला चालत सासूकडे सोडून ये अशी कामंपण बिनधास्त सोपवायला लागली होती. त्या त्यांच्या मुलाला ओरडल्या, क्वचित एखादा फटका दिला की पाठीशी घालत म्हणायची, ‘अम्मा इस को मत चिल्ला, मार मत कभी| कितना गरीब है रे ये|’ त्या मुलाची आणि मेनकाची मस्त दोस्ती झाली होती. पाच-सहा वर्षांचं लहान मूल ते – ‘आई, ती मेनका कुठून येते गं? तिच्या अंगाला घाण वास येतो,’ अशी तकरार करायचा; पण तिचं मन लावून काम करणं, स्वतःचं घर असल्यासारखं दिल झोकून स्वच्छ करणं सगळ्यांनाच आवडायला लागलं होतं. नेनीण बाईचं दरम्यान एक ॲबॉर्शन झालं आणि त्या काही दिवस आरामासाठी रजेवर होत्या; तेव्हा त्यांचे केस फार गळत. मेनकाला सगळ्यांचीच काळजी. बाईंना म्हणाली, ‘अम्मा तुम्हारा बहोत बाल गिरता| सब खोलीमे इतना बाल देखो| मैं तुमको तेल लगा के देता| आणि चांगलं तेल कोमट करून त्यांना एक दिवसाआड हेड मसाज करू लागली. नेनीण बाईंना हे सगळं आत कुठेतरी स्पर्शून गेलं असावं. तिला त्या सणावाराचे बक्षीस म्हणून काहीबाही देऊ लागल्या : कधी पैसे, कधी खाणं, कधी काही. तिच्या कामाचा झपाटा एवढा होता की अक्काला मागे टाकून ती भराभर पैसे मिळवू लागली. पैशासाठी मात्र ती अतिशय अगतिक असायची. ‘खोली लेना है,’ म्हणत असायची. इथले सगळे ऋतू आता तिला आवडू लागले होते.
मुंबई आणि उपनगरांत पावसाने आता चांगलाच जोर धरला होता. जुलैचा पाऊस आणि त्यात मुंबईचा – म्हणजे कहरच. २६ जुलै २००५ ची ती रात्र पूर्ण मुंबईसाठी काळरात्र ठरली. मेनका सगळी कामं उरकून दुपारी झोपडीकडे परतत होती. कोणी काही खायला म्हणून दिलेलं पिशवीत घालून खांद्यावर पिशवी टाकून झपझप चालत होती. त्या दिवशी गाड्यांचा बराच गोंधळ होता. लोक कचेऱ्यांमध्ये पोहोचू शकले नव्हते, काही अर्धवट प्रवास करून पुढच्या संकटाची चाहूल लागून परत फिरले होते. ते आपसांत काही बोलत होते. तिच्या कानावर येत होतं, आज मुंबईत बराच पाऊस पडलाय, आणखी खूप पडणार आहे. लोकांना हापिसातून सोडून दिलंय; म्हणजे आपण नक्की काय करायला हवं हे सांगणारं कोणीच त्यांत नव्हतं; त्यामुळे तिला फारसा फरक पडला नाही. झोपडीशी आल्यावर लोक काहीतरी हालचाली करताना दिसत होते. कोणी सामान हलवायला घेत होतं, टेकडीवरच्या झोपड्यांमध्ये त्यांचे कोणी जातभाई असावेत. ते बघून बाकीचे अस्वस्थ झाले होते. मेनका खरंतर अंगमेहनतीच्या कामाने पार आंबून गेली होती. कधी एकदा पेटपूजा करून आडवं होतोय असं तिला झालं होतं.
एका हाताची बोटं केसात घालून बोटाने खाजवत तिने चुलाण्यावर पातेलं चढवलं आणि पाणी ओतून फतकल मारून बसली. जवळचा एक डबा उघडून थोडे तांदूळ पाण्यात टाकले आणि झाकण ठेवून ती परत बाहेर आली. शेजारच्या काही झोपड्या एव्हाना रिकाम्या झाल्या होत्या. आगामी संकटाची झालेली नांदी बघून तिला समजलं आज आराम नाही. अजून खूप कष्ट आहेत; तेव्हा आधी खाऊन घेऊ. कोण्या मालकीणबाईंनी दिलेली आमटी तिने एका वाडग्यात काढली आणि एव्हाना शिजलेला भात त्यावर ओतला. हावरटासारखी ती आडवा हात मारून जेवू लागली. इतक्यात तिला दरवाजा वाजल्याची जाणीव झाली. अक्का विजेच्या वेगाने आत शिरली आणि ‘मेनका,’ म्हणत कपाळावर हात मारला. ‘तू आराम के साथ यहा खाने बैठी, अरे कैसी है तू? जान की पर्वा नय क्या? सब जा रहे थे तो तू क्यू नही बांधा रे अपना सामान?’ मेनकाने कसंबसं जेवण उरकलं आणि उठून हे ते आवरू लागली. अक्का चिडली तरी आपल्यावर तिचं फार प्रेम आहे हे तिला माहीत होतं आणि म्हणून ती अशा वेळी गप्प व्हायची. अक्का सांगत होती, ‘अब हम को कहीं भी जगह नही है| अभी पानी बढ़ने लगेगा तो फिर आपुन किधर जायेंगे? रेल्वे प्लॅटफॉर्म पे जाके सोयेंगे – देखेंगे चल|’ मेनकाची कशालाच ना नव्हती. तिला फक्त पैसे हवे होते. गावाला जाऊन लग्न करायचं स्वप्न होतं. तिचा स्वामी होता तिथे – बेकार तरुण; पण खूप स्वप्नं खिशात ठेवून जगणारा साधा मुलगा. मेनकाला त्याचा खूप भरवसा होता. हे तिने आजपर्यंत कोणालाच सांगितलं नव्हतं. अक्कालापण! तिला वाटत होतं आपण खूप सुखी होणार हे लग्न करून; म्हणून पैसे हवे होते तिला. वेडी मुलगी. अक्काकडे इज्जत वाचवून पैसे कमवायचा रस्ता होता म्हणून विसंबून ती इथवर आली होती.
पावसाने प्रचंड थैमान मांडलं होतं त्या पूर्ण रात्रभर. अंगच्या कपड्यानिशी दोघी आणि अक्काचा नवरा हाताला लागेल ते घेऊन प्लॅटफॉर्म वर आले. टीसीने त्यांना एक रात्रीपुरता एक कोपरा दिला आणि तिथेच त्यांनी संसार मांडला. सगळं स्टेशन अस्ताव्यस्त पसारा घातल्यासारखं झालं होतं. रात्रभर विजा, कडकडाट, गडगडाट, रिपरिप हेच दृश्य बघत शेवटी ते झोपी गेले. सकाळी पूर येऊन गेलेल्या गावाचं वातावरण झालं होतं. त्यांचं सगळं सामान झोपडीसकट वाहून गेलं होतं. नंतर दोन दिवस तिघं वेड्यासारखे सामान वेचत होते. सगळीकडे चिखल झाला होता. झोपडपट्टीच्या लोकांची एकूणच वाताहत झाली होती. त्यांची एका शाळेत तात्पुरती सोय केली होती. मेनका आयुष्य जिथून नवी फांदी फुटेल तशी अंकुरत चालली होती. जसा प्रवाह वळेल तशी वाहत होती. दोन दिवसांनी तिने सगळ्या कामांच्या घरी मदत मागायचं ठरवलं. नेनीणीचा नवरा मुंबईत अडकला होता. ती त्याच्या चिंतेत होती. शाळा काही दिवस बंद ठेवल्या होत्या. रेल्वे बंद, वीज पुरवठा ठप्प; म्हणून पाणी पुरवठा अनियमित झाला होता. थोडे श्रीमंत लोक बिसलेरी बाटल्या आणून पाणी पीत होते. मेनका आली आणि रडक्या आवाजात कर्मकहाणी सांगू लागली. ‘मेरा सब – झोपडा सामान बह गया आंटी| कुछ नही बचा| मेरा सब पैसा भी बह गया|’ सांगता सांगता ओक्सबोक्शी रडू लागली. नेनीण आणि तिची पोळीवाली बाई त्या अश्रुपातात विरघळल्या. उद्या देते तुला सामान म्हणून तिच्या पाठीवरून दोघींनी हात फिरवला. गहिवरलेल्या मेनकेच्या डोळ्यांतून अगतिकता वाहू लागली.
मेनका हा आता नेनीण बाईंच्या घरातला घटकच झाला होता. सगळे तिला जपून राहायला सांगत असत. ती हसून सोडून द्यायची. आता परत नव्याने सगळं मिळवायचं म्हणजे पैसे आले, इतक्या लवकर कसे मिळतील याच विचारात ती सदैव बुडालेली असायची. काहीतरी हाताच्या बोटांनी मोजत असायची. नेनीण मुलाला पाळणाघरात ठेवत असे. हापिसात जायच्या आधी त्याला तयार करून सोडायचा कार्यक्रम असे. कधी मेनकेला सोडायला सांगितले जाई. पाळणाघरातही तिला सगळे ओळखू लागले होते. कदम काकूंचं पाळणाघर लहानसं असलं तरी नीटनेटकं होतं. घरात इन मिन तीन खोल्या आणि राहणारी माणसं त्या, मुलगा आणि नवरा एवढेच. बारावीच्या परीक्षेला बसलेला त्यांचा मुलगा वीरेन गोरापान उंचापुरा सडसडीत शरीयष्टीचा होता. त्याला आरशासमोर उभं राहून भांग पाडत शीळ घालायची तारुण्यसुलभ आवड होती.
एकदा मेनका मुलाला सोडायला गेली आणि दरवाजा काकूंच्या मुलाने उघडला. तो अभ्यासाच्या तंद्रीत होता; पण त्याला तिच्या नाकीडोळी नीटस देखणेपणाची जाणीव झाली. तिच्या अघळपघळ बोलण्याची त्याला गंमत वाटली. तरी अक्का सारखी बजावायची उगाच कोणाकडे रेंगाळत जाऊ नकोस, आपण बरं आपलं काम बरं; पण तिच्या वयाचा आणि सौंदर्याचा महिमाच असा होता की कोणी तिची स्तुती केली की लगेच तिचं पाऊल थबके. स्तुतिसुमनं झेलून होईपर्यत ती रेंगाळे. आपले एकसारखे सुंदर दात दाखवत नाजूक हसे. समोरचा स्तुतिपाठक आणखीनच घायाळ होई.
हातात पैसे येऊ लागले आणि मेनका अधिकच नटून येऊ लागली. घागऱ्याचे फलकारे मारत अशी राणीसारखी चालायची की हिच्याकडून काम कसं करून घ्यायचं असा लोकांना प्रश्न पडे. हळूहळू पुन्हा तिचं बस्तान बसू लागलं होतं. कोणीतरी तिने स्वतंत्र झोपडी घेतली आहे असं सांगितलं आणि नेनीण बाई खूश झाल्या. दिवस कॅलेंडरची पानं फडफडावीत तसे सरत होते. एका सकाळी नेनीण बाईंचा नवरा दूध घेऊन लिफ्टपाशी उभा होता. लिफ्ट वरून आली खरी; पण थांबली आणि दरवाजा न उघडता परत वर जाऊ लागली. आश्चर्याने आणि किंचित रागाने त्याने दरवाजा वाजवला. त्याला दरवाजाच्या खिडकीत दोन चेहरे दिसले आणि तो चरकलाच. ती मेनका होती आणि एक मुलगापण होता. तो तर पाळणाघराच्या काकूंचा वीरेन होता. तो तिला स्पर्श करू पाहत होता आणि ती हातवारे करून त्याला हसतहसत दूर लोटत होती. दोन वेळा अशी लिफ्ट वर-खाली झाली आणि त्या वीरेनचं लक्ष आता लिफ्टबाहेरच्या माणसांकडे गेलं. घाबरून त्याने लिफ्ट सहाव्या मजल्यावर थांबवली आणि दोघे बाहेर पडले. वरून दोघे आता जिन्याने पळत आले. ती धावत होती आणि तो पाठून थोडं अंतर ठेवून धावत होता. नवऱ्याने नेनीण बाईंना झाला प्रसंग वर्णन केला आणि तिच्याबद्दल काळजीही व्यक्त केली. तिला सावध करायला सांगितलं. बाईंनी तिला कामावर आल्यावर एक-दोनदा हटकलं, एकदा भीती पण घातली; पण मेनका तिच्या तारुण्याच्या छटा आणि अविष्कारांमध्ये अधिक गुंतली होती. ते वयच तसं वेडं असतं. खूप नाजूकपणे हाताळावं लागतं.
मध्ये काही दिवस गेले आणि नेने कुटुंब अचानक परदेशी जायला निघालं. नेनीणीचा नवरा अमेरिकेत नोकरी करायला चालला होता आणि सोबत बायको- मुलालाही न्यावे लागणार होते. त्या स्वतःच्या या सगळ्या व्यापात गुंतल्या आणि त्यांनी हळूहळू घर बंद करायला घेतलं. मेनकेला दोन महिन्यांचा पगार दिला गेला. त्यांच्या मुलाच्या डोक्यावरून हात फिरवत ‘इस को मारना नही हां,’ असं प्रेमाने सांगून ती घराबाहेर पडली. बाईंची आणि मेनकेची ती भेट त्यांना परदेशातही आठवत राहिली.
मध्ये दहा वर्षं गेली असतील. नेने कुटुंब पैसे कमावून पुन्हा भारतात परतलं. त्यांनी परत घर लावायला घेतलं. मेनकाची त्यांना प्रचंड आठवण येत होती. निरोप पाठवला तर त्याच्या उत्तरादाखल एक बुटकी जाडीशी कुमारिका अवतरली. ‘मेरा नाम पद्मा, मैं करेगा सब काम|’ तिच्याकडून कामं करून घेता घेता उत्सुकतेपोटी त्यांनी मेनकेची चौकशी केली. एखाद्या आजाराने कुणी मरावं इतक्या सहजतेने पद्मा बोलून गेली. ‘मेनका का बहोत बुरा हुआ मालकीन| उसने गांव मे जा के खुदकुशी किया|’ बाई तर उडाल्याच. “काय? क्यूं किया लेकिन? उस को तो पैसा जमाना था|” पद्मा खालच्या मानेने म्हणाली, ‘आंटी, वो कितनी खूबसूरत थी मालूम ना आप को. अपने ही धून में मस्ती में रहती थी वो| सजवज के घूमने का| लोग देखते हैं| पागल थी वो| गांव मी उसका कोई था| शादी करने का था दोनों को| इद्धर किसी ने उस की इज्जत लूट के खराब किया, तो कौन लेंगा वापस गांव में? मुँह दिखाने के लिये नहीं रहा होगा उसको तो;’ नेनीण बाई हादरून गेल्या. ‘कितना लोग उसके आगे पीछे रहने का क्या बताऊँ अभी! अपने आप को संभाल कितने लोग बोले होंगे उसको| अक्का तो फूट फूट कर रोयी है उस के मौत के बाद. उस के भरोसे आयी थी ना इधर वो| वो उस का कोई था वो लड़का बोला, “सुना मैंने तू शादी करने के लायक नहीं रही अभी|” बहोत दिल से लिया उसने और कर डाला खुदकुशी,’ असं काय काय बोलत पद्मा काम उरकत होती. नेनीण बाई दूर खिडकीबाहेर कित्येक मैल दूर डोंगरात नजर खिळवून हताश बसल्या होत्या.
काय होऊन गेलं हे! मेनका…तिला जपायला हवं होतं खूप. कोण असेल तो नराधम? आणि आयुष्य तर तिचं उद्ध्वस्त झालं ना पण ! आता कुठे आयुष्य मांडायला घेतलं होतं तिने, अजून कच्चा रस्ता होता – वाट मळलीसुद्धा नव्हती. काय काय दाखवत असायची आपल्याला, ‘ये मैंने खरीदा देखो झुमका और माला, किसी को बोलना नय| शादी में चैहिये मेरे को ये सब…’ दूर मलंग गडावर झेंडा एकाकी फडफडत होता. सुळके अधिकच टोकदार भासत होते – कोणी शिलेदाराने शत्रूवर उगारल्यासारखे. पाऊस एक दोन दिवसांवर आला असावा तेव्हा. डोंगर गडद होऊन जवळ आल्यासारखा भासतो अशा वेळी. तिच्या अवेळी जाण्यानं दुःख जर्द होत त्या डोंगरांसारखं बाईंच्या अंगावर आलं होतं. मलंगगड त्यांच्या आवडीचा आणि सवयीचा. पायथ्याच्या गावातून गडाला जाणाऱ्या अनेक वाटा फुटत. एक कच्ची वाटपण त्यात होती. जरा दुर्लक्षित. सहसा कुणी तिने जाऊन बघत नसावं. का बरं? ती वाट खडतर असेल – काट्याकुट्यांची, दगड-धोंड्यांची, चढ-उतार असतील खूप. कदाचित… कदाचित मध्येच रस्ता तुटतही असेल… कोणी सांगावं. जर गडापर्यंत पोहोचूच शकत नसलो तर का कोणी जावं त्या वाटेने. तीच माझ्या मेनकेची वाट. नेनीणबाई आता उठून उभ्या राहिल्या आणि खिडकीशी आल्या. त्यांनी दोन्ही हात खिडकीच्या तळाशी गच्च धरले आणि त्या वाटेकडे एकटक बघत राहिल्या. अश्रुधारा लागल्या होत्या आणि मेनकेची वाट आणखीनच धूसर होत गेली.
