वटपौर्णिमा किंवा सावित्री म्हटले की मला उगीच फार जवळचे वाटते; कदाचित जोतिबांच्या सावित्रीमुळे असेल, कदाचित मूळ कथेचा खोल अर्थ डॉ. तारा भवाळकर यांनी समजावून दिल्यामुळे असेल; पण त्या स्पष्टीकरणानंतर सत्यवानाच्या सावित्रीचे फार कौतुक वाटले. तिच्या नशिबी जे आले ते तिने गपगुमान स्वीकारले नाही; प्रत्यक्ष यमाशी वाद घातला, चातुर्याने आपल्या मागण्या पूर्ण करून घेतल्या. म्हटले तर सावित्री धैर्याचे, हुशारीचे उदाहरण; पण आपण तिला फक्त पातिव्रत्याचे प्रतीक करून टाकले.
वटपौर्णिमा होऊन गेल्यानंतर अनेक वडांना गुंडाळलेले दोरे बघितले तेव्हा हे व्रत ‘कशासाठी’ करायचे हा खोल कुठेतरी टोचत असलेला प्रश्न वर आलाच आणि मग त्याचे उत्तरही कवितेतून आले.
हा ‘तिचा’ आणि माझा संवाद आहे…
ह्यातली ‘ती’ कोण हे ज्याने त्याने ठरवावे. कदाचित ती आपल्याच मनातली सावित्रीची प्रतिमा असेल; कदाचित ही कविता म्हणजे ‘आपुलाची वाद आपणांसी’ असेही असेल.
ह्या वर्षी वटपौर्णिमेनिमित्ताने काही सामाजिक संघटनांनी वृक्षारोपण कार्यक्रम राबवला. पूर्वापार चाललेल्या रूढी-परंपरांना विरोध करण्याऐवजी, त्यांना कालसुसंगत आणि पर्यावरण-पूरक पर्याय देण्याचा हा पर्याय मला भावला. त्यामागची भूमिका स्पष्ट करण्यासाठी ही कविता लिहिली आहे
वटसावित्री ते वटधरित्री
मी : व्रत वट सावित्रीचे
कशासाठी करायाचे
आणि कशाला वडाला
सात फेरे मारायाचे
ती : पत्नी पतीचे गं प्रेम
राहो असेच आजन्म
जन्म घेई जरी सात
सुटू नये त्यांची साथ
मी : सारी व्रते नि वैकल्ये
तीच त्याच्यासाठी करे
सांग एक व्रत ऐसे?
जे तो तिच्यासाठी धरे?
ती : सण, पूजेच्या मिषाने
सख्या तिला भेटतात
व्रताच्या गं निमित्ताने
नटतात थटतात
मी : भेटण्याची नटण्याची
आता निमित्ते गं किती!
नको साल पिंपळाची
लावू वडाच्या खोडाशी!
ती : पूर्वापार जे चालते
का गं तुला ते सलते?
नको प्रश्न हे भलते
प्रथा तुला न कळते!
मी : सुवासिनीलाच मान
भेदभाव प्रथा त्या गं !
नाही समतेला स्थान
अशा साऱ्या प्रथा त्याग
ती : अशा कशा त्यागू प्रथा
त्यात जीव गुंतलेला
बंड जगाशी कराया
नाही जमत गं मला
मी : मान राख तू प्रथांचा
पण बोध घे कथांचा
कथा नव्याने ऐकता
अर्थ शोध तूच तुझा
ती : अशा जुन्या कथेतून
काय शोधावे नवीन ?
यमालाही हरवून
पती आणला जिंकून
मी : सावित्रीचे पाहा धैर्य
शीक तिचे हे चातुर्य
तिने नियतीविरुद्ध
फुंकियले रणशिंग
ती : साऱ्या प्रथा परंपरा
पूर्वजांचा तो वारसा
राहो भान त्याचे जरा
संस्कृतीचा तो आरसा
मी : काल केल्या जरी पोळ्या
आज होतात ना शिळ्या
रूढी परंपरा जुन्या
कशा ताज्या त्या राहाव्या?
ती : तुझं बोलणं पटतं
थोडं मनी झिरपतं
पण सांग कोण व्रत?
असे कालसुसंगत?
मी : तू गं सावित्रीची लेक
आता खरी शोभलीस
तुज सांगते उत्तर
तुला पटते का बघ !
उत्तर : कुण्या एका सावित्रीने
सत्यवाना जगविले
आणि दुज्या सावित्रीने
सत्य मनी जागविले
ज्योतीबाच्या सावित्रीनी
तुला केली गं शहाणी
आता डोळे उघडोनी
जग पहा तू नव्यानी
झाडे प्राणी नि पाखरे
निसर्गाची गं लेकरे
हीच सारी वनचरे
माणसाचे गं सोयरे
ह्याच सोयऱ्यांची आई
तुझी माझी माय भुई
पण धरतीच्या डोई
करपली हिरवाई
होई जंगलाची तोड
दाट झाडी होई रोड
नाही सावलीला झाड
नसे पिंपळ ना वड
म्हणूनच गं सांगते
घेऊ नवीन ही व्रते
शोधू नवीन दैवते
पुजू निसर्गदेवते
आजच्या गं मुहूर्ताला
येथे रुजू दे रोपाला
पूज येथल्या वडाला
जप प्रत्येक झाडाला
रुजविले रोप आज
त्यास खत पाणी पाज
त्यास मनोभावे पूज
त्याचे दर्शन घे रोज
व्रत नवीन युगाचे
नाही केवळ स्त्रियांचे
बदलाची नांदी वाजे
गीत समतेचे गाजे
पृथ्वी मातेला जपणे
आपुल्याच की गं हाती
निसर्गाशी जोडी नाती
हवा पाणी नभ माती
कथा साठ उत्तरांची
प्रथा नव्या गं व्रतांची
बीजे नव्या विचारांची
तीच रोपे हो उद्याची

कालसुसंगत
निसर्गाला जपले पाहिजे हे निर्विवाद पण त्या आधी साथ सुसंगत व्हायला हवी त्यासाठी प्रथम खाली दिलेली प्रार्थना करायला हवी .
तुमचे संवादात्मक काव्य उत्तम आहे .
जन्मोजन्मी
“ जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे ! ” अशी प्रार्थना करण्याचा हा दिवस . ह्या दिवशी वडाची पूजा केली जाते . दीर्घकाळ जगणारा हा वृक्ष आहे त्यामुळेच हा एकमेव असा वृक्ष आहे जो अनंत काळापर्यंत बायकांची प्रार्थना देवा पर्यंत पोहोचवेल ह्या कल्पनेतूनच आपल्या पूर्वजांनी ह्या वृक्षाच्या पूजेचे संस्कार बाईच्या पदरात टाकले असावेत . त्यानंतर, मग ह्या संस्काराला सावित्री,तिचा नवरा ,यम ,त्याचा रेडा, यांची गोष्ट जोडली गेली असावी .
बाईने जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे अशी प्रार्थना करायची आणि पुरुषाने काय करायचे ? किवा कुठली प्रार्थना करायची ? त्याने जर नकार घंटा वाजवली तर देवाची मोठी पंचाईत होणार . ऐकायचे कोणाचे असा त्याला प्रश्र्न पडणार ? मग ज्याची देवाकडे जास्त ‘वट’ आहे त्याचे देव ऐकणार ! इथे सुद्धा ‘वटच’ निर्णायक निकाल देणार!
बायकोने वडाला गुंडाळलेल्या सुताने जर देवाला तिचे म्हणणे समजत असेल आणि नवऱ्याला सध्याची बायको नको असेल तर त्याने बायकोने वडाच्या झाडाला गुंडाळलेले सूत वडाला उलट्या प्रदक्षिणा घालून सोडवायचे म्हणजे देवाला नवरोबांचे म्हणणे कळेल .
शेवटी वेढे देणे, गुंडाळणे आणि गुंता सोडवणे हेच जीवनाचे सार आहे . रोजच्या जीवनात आपण सतत तेच करत असतो . प्रत्येक वेळी गुंता करणारा आणि तो सोडवणारा बदलत असतो हे ही तितकेच खरे आहे. एकाने पसरायचे आणि दुसऱ्याने आवरायचे यालाच ‘ जीवन ऐसे नाव ’ असे म्हटले आहे .
सध्या जन्मोजन्मी हाच अशी प्रार्थना करण्यापेक्षा ह्याच जन्मी आमचे ‘ सूत ’ चांगले जमू दे अशी याचना प्रत्येक नवरा बायकोने करावी अशी परिस्थिती आहे . आपल्या पूर्वजांचीसुद्धा अशीच इच्छा असावी म्हणूनच तर त्यांनी सूत जमण्यासाठी सुत वडाला गुंडाळायची प्रथा योजली असावी .
सुतावरून स्वर्ग गाठता येतो ह्या म्हणीचा खरा अर्थ कळावा म्हणुनतर अति प्रचंड ,खूप काळ जगणाऱ्या ह्या वडाच्या झाडाची योजना केली असावी .
काळाच्या ओघात ह्या प्रथेचा अतिरेक झाला . शहरवासियाना जवळपास वडाचे झाड मिळेना म्हणून त्याच्या फांद्यांचा व्यवसाय सुरु झाला . पूजा करायला वेळ नाही म्हणून तुमची पूजा आम्ही करतो तुम्ही फक्त दक्षिणा द्या असे सांगणारे पुरुष आणि स्त्री भटजी अवतरू लागले . बिचाऱ्या त्या भटजींना अजून पाचपाच नवरे असणाऱ्या पांचालीची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना नसावी.
चढता आलेख कधीतरी उतरतोच या न्यायाने सत्य परिस्थीची जाणीव होऊन सध्याच्या शिकल्या सावरलेल्या मुली वडाची पूजा करत नाहीत . परिस्थिती कडे त्यांचे सजगपणे लक्ष असते . पुढील जन्माचा काय भरवसा ? तो मनुष्य त्यातून तो बाईचाच मिळेल याची काय शास्वती ? म्हणून जन्मोजन्मी काय हवे या पेक्षाही या जन्मात काय मिळणे गरजेचे आहे याकडे सगळ्याचे बारीक लक्ष असावयाला हवे.
त्यामुळे समस्त नवरोबांनी आणि नावारीबाईनी जपून वागावे हेच आजच्या दिवसाचे मतीतार्थी सांगणे आहे हे लक्षात असू द्यावे .
****************
कौस्तुभ ताम्हनकर – ९८१९७४५३९३
Kdtamhankar@gmail.com
************************************************
गर्दी नसलेले एकमेव ठिकाण
” माहेर- गावाकडंच घर “- सासवणे – अलिबाग
संपर्क :-९९६७०६८२४६
भेटा- (Visit) :- http://www.mahertrip.in
***********************************
सुंदर होण्यासाठी आचरणा
http://www.zerogarbage.co.in
****************************
भेटा (Visit) :- https://www.youtube.com/channel/UClSbWXyFr0E_GJ42-rYi0kg
*************************