संपादकीय जुलै २०२४ : संघटन कशासाठी? 

  विविध  व्यावसायिकांनी स्थापन केलेल्या आपल्या संघटना हे आपल्या समाजजीवनाचे एक महत्त्वाचे अंग बनल्या आहेत. सनदी लेखापाल,  अभियंते,  वैद्यक-व्यावसायिक,  वकील यांच्या संघटना आपापल्या सदस्यांच्या हितरक्षणासाठी जागरूक असतात.  अशा प्रकारच्या संघटनांचा हेतू काय असावा? 

१ आपापल्या क्षेत्रात होणारी प्रगती, येणारे नवीन ज्ञान आपल्या सभासदांपर्यंत पोहोचवून त्यांना अद्ययावत  ठेवणे – यासाठी प्रदर्शने, कार्यशाळा,  व्याख्याने यांचे आयोजन करणे.  

२ सभासदांना व्यावसायिक विकासाला मदत करणे. 

३ सरकारी धोरणे व नियम होताना व्यवसायिकांच्या गरजा व हितसंबंध यांचे रक्षण होते आहे ना यावर लक्ष ठेवणे. 

व्यावसायिक संघटनांना समाजहिताची जाण पाहिजे.  एकीकडे आपल्या सभासदांच्या व्यक्तिगत हितसंबंधांचे रक्षण करीत असताना समाजाच्या आपल्या व्यवसायाकडून काय गरजा  आहेत त्याचाही विचार संघटनांनी करून आपल्या घटनांमध्ये आणि कामकाजामध्ये त्यांचा जाणीवपूर्वक समावेश केला पाहिजे.  बऱ्याचशा संघटना त्या दृष्टीने काम करतातही.  

     या बाबीकडे आज लक्ष जाण्यासाठी निमित्तमात्र  एक घटना म्हणजे ज्येष्ठ वकील कपिल सिबल यांनी  सर्वोच्च न्यायालयाच्या वकील संघटनेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी जाहीर केलेली आपली उमेदवारी. कपिल सिबल हे नाव वेगवेगळ्या कारणांनी आपल्याला सर्वांना परिचित आहे.  त्यांच्या राजकीय मतांविषयी मतभेद असू शकतात; तरीही वकील म्हणून त्यांची आतापर्यंतची कामगिरी देदीप्यमान आहे यात शंका नाही.  गेली सुमारे ४० वर्षे ते सर्वोच्च न्यायालयात वकिली करून आपल्या बुद्धिकौशल्याने संविधान न्यायपालिका व कार्यपालिका यांच्यातील संबंधांत संतुलन ठेवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहेत.  ते यापूर्वी तीन वेळा या संघटनेचे अध्यक्ष झाले आहेत.  त्यांची शेवटची अध्यक्षपदाची कारकीर्द होऊन अनेक वर्षे झाली असताना त्यांना पुन्हा एकदा या संघटनेच्या निवडणुकीत भाग घ्यावे असे का वाटले असा प्रश्न मनामध्ये आला. स्वतः कपिल सिबल यांनी दिलेल्या एका मुलाखतीत यावर प्रकाश टाकला आहे.  या संघटनेच्या घटनेनुसार एखाद्या व्यक्तीला जास्तीत जास्त चार वेळा अध्यक्षपद मिळू शकते;  त्यामुळे निवडून आले तरी त्यांचे  अध्यक्ष म्हणून हे शेवटचे वर्ष असणार आहे.  गेली सुमारे ४० वर्षे या व्यवसायाने आपल्याला भरभरून दिले आहे;  त्यामुळे आता या व्यवसायातली नवीन पिढी आणि एकंदरीत समाज यांचे आपण काहीतरी देणे लागतो आणि ते देणे परत करण्यासाठी केलेला हा अल्पसा प्रयत्न आहे असे त्यांनी सांगितले.  आपल्या सभासदांच्या व्यावसायिक हितसंबंधांचे रक्षण करत असतानाच देश व समाज यांच्याकरिताही काहीतरी करायला पाहिजे ही जाणीव सिब्बल यांच्या या मुलाखतीतून व्यक्त झाली.  सर्वोच्च न्यायालयात घटना व नागरिकांचे मूलभूत हक्क यांचे संरक्षण करण्याबाबत  अनेक गोष्टी घडत असतात.  यामध्ये सरकार एका बाजूने असते.  सरकारी पक्षाची ध्येयधोरणे घटनेच्या मूलभूत स्वरूपात बदल करणारी असली तर त्याला विरोध करणे हे वकील म्हणून एक महत्त्वाचे काम आहे.  वकिलांना सर्वसाधारणपणे कुठलीच बाजू असता कामा नये –  म्हणजे त्यांना फक्त न्यायाची व संविधानाची बाजू दिसली पाहिजे असे त्यांचे प्रतिपादन आहे. बेंच आणि बार यांच्या समन्वयावर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज अवलंबून असते.  हा समन्वय सांभाळणे हे या संघटनेचे महत्त्वाचे काम आहे.

        व्यवसायात नवीन आलेल्या वकिलांसमोर अनेक प्रश्न असतात.  या नवीन पिढीला व्यवसायात स्थिर होण्यासाठी योग्य ती मदत झाली पाहिजे.  त्यांना ग्रंथालय व इतर संदर्भसाहित्य सुलभपणे उपलब्ध झाले पाहिजे. त्यांना योग्य ती आर्थिक सुरक्षिततादेखील मिळाली पाहिजे; या सर्व गोष्टी श्री सिबल यांनी मांडल्या  आहेत. ते स्वतः निष्णात वकील असल्यामुळे त्यांची याबाबतची मांडणी देखील मुद्देसूद व आकर्षक आहे. या निवडणुकीचे काय होईल ते होईल पण या निमित्ताने त्यांनी मांडलेले मुद्दे विचार करण्याजोगे आहेत.  ते वकिलांच्या संघटनेविषयी बोलत असले तरी त्या मागची तत्त्वे सर्वसाधारणपणे सर्वच व्यावसायिक संघटनांना लागू होण्यासारखी  आहेत. अशा व्यावसायिक संघटनांनी  त्यांचे सभासद असलेली व्यक्ती व समाज  यांच्यातील शिडी म्हणून काम केले पाहिजे हे या गोष्टीचे तात्पर्य आहे.   

Author

One thought on “संपादकीय जुलै २०२४ : संघटन कशासाठी? 

  1. व्यावसायिक संघटनानीं स्वहिताबरोबर परमार्थ ही साधावा हा विचार खूप आवडला

Leave a Reply