| मौज आणि सत्यकथेचे संपादक या नात्याने मराठी साहित्याला विशेष योगदान दिलेल्या श्री. पु. भागवत यांची जन्मशताब्दी गेल्या वर्षी साजरी झाली. त्या निमित्ताने दोन उत्तम ग्रंथ प्रकाशित झाले. “वाङमयीन युगान्तर आणि श्री. पु. भागवत” हा एक ग्रंथ (संपादक : सुधीर रसाळ आणि वसंत पाटणकर) पुण्याच्या राजहंस प्रकाशनने काढला होता तर दुसरा “सृजनव्रती : श्री. पु. भागवत” हा ग्रंथ (संपादक : मोनिका गजेंद्रगडकर आणि विजय तापस) मुंबईच्या मौज प्रकाशनने काढला होता.या दोन्ही ग्रंथांसाठी त्या-त्या संपादकांच्या विनंतीनुसार भानू काळे यांनी लेख दिले होते. दोन्ही लेखांचा मध्यवर्ती आशय वेगवेगळा होता. इ अंतर्नादच्या काही वाचकांनी ते लेख कदाचित वाचले नसतील म्हणून त्यांपैकी पहिला “‘मौज’ – ‘सत्यकथा’ यांचा अस्त “हा लेख इ अंतर्नादमधे आपण नंतर पुनर्मुद्रित केला होता. दुसरा “श्रीपु : सुसंस्कृत वाङमयव्यवहाराचा मानदंड” हा लेख या अंकात पुनर्मुद्रित करत आहोत. वाचकांना मागील लेखाप्रमाणे हा लेखही आवडेल अशी आशा आहे. — संपादक |
मराठी साहित्यसृष्टीत श्री. पु. भागवत या नावाभोवती एक तेजोवलय आहे आणि त्यांच्या निधनाला पंधरा वर्षे उलटून गेल्यावरही त्याची झळाळी कायम आहे. संपादन आणि प्रकाशन क्षेत्रांत त्यांनी मिळवलेले आदरस्थान केवळ अजोड आहे. आजही ‘साक्षेपी संपादक’ म्हटले की सर्वप्रथम डोळ्यांसमोर उभे राहते ते त्यांचेच नाव. त्यांच्या जन्मशताब्दिनिमित्ताने निघणाऱ्या या ग्रंथात काही लिहायची संधी मिळाली, त्यांच्या आठवणींना उजाळा देता आला याचा आनंद खूप मोठा आहे आणि त्याबद्दल संपादकांचा मी आभारी आहे.
श्रीपुंशी आलेल्या माझ्या व्यक्तिगत संबंधांपासून या लेखाची सुरुवात करावीशी वाटते. लेखाच्या उत्तरार्धात श्रीपुंच्या व्यावसायिक वाटचालीसंदर्भात लिहायचे आहे.
माझ्या वाचनप्रवासात श्री. पु. भागवत आणि सत्यकथा मासिक यांच्याशी भेट तशी उशिरानेच झाली. साधारण साठचे दशक माझ्या वाचनाच्या पहिल्या बहराचे दिवस. त्या प्रवासाची सुरुवात झाली होती ती रोज घरी येणाऱ्या आचार्य अत्रे यांच्या दैनिक मराठापासून. अत्रे आणि भागवत ही दोन्ही साहित्यक्षेत्रातील मोठी नावे ,पण एकमेकांपासून इतकी अधिक भिन्न असणारी अशी दोन व्यक्तिमत्त्वे शोधूनही सापडली नसती! त्या सुमारास माझ्या पिढीला बऱ्यापैकी सामाजिक भान येऊ लागले होते. ते चळवळींचे दिवस होते. कामगार मैदान किंवा शिवाजी पार्कवरची कुठलीही सभा आम्ही सोडत नव्हतो. दुसरीकडे दादर सार्वजनिक वाचनालय आणि नायगावचे मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय पालथे घालणेही सुरूच होते. वृत्तपत्रे आणि त्यांच्या पुरवण्यादेखील आमची वाढती बौद्धिक भूक वाढवत होत्या. सत्यकथेचे अंक हाती यायचे पण ते वाचण्यात जीव रमत नसे. मी वाङ्मयाचा विद्यार्थी नव्हतो; फक्त वाचनप्रेमी होतो व त्यामुळे समीक्षकी लेखनात काहीच रुची नव्हती. सत्यकथा मला नीरस, क्लिष्ट आणि माझ्या आवतीभोवतीच्या जीवनापासून तुटलेले वाटत असे. मला आठवते, त्या काळात आम्ही ‘माणूस’ साप्ताहिक अधिक अगत्यपूर्वक वाचत असू – विशेषतः ‘नाझी भस्मासुराचा उदयास्त’ किंवा ‘आणि ड्रॅगन जागा झाला’ यांसारख्या त्याच्यातील लेखमाला. पुढे आणीबाणीच्या कालखंडात सत्यकथा अधिकच दूरची वाटू लागली.
मी कथालेखनाला सुरुवात केली तेव्हा मात्र सत्यकथेकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन बदलला. वाचक म्हणून सत्यकथेकडे पाहणे आणि लेखक म्हणून सत्यकथेकडे पाहणे यांत फरक होता. सत्यकथेत आपली एखादी कथा यावी असे इतर तत्कालीन लेखकांप्रमाणे मलाही वाटू लागले. माझ्या आठवणीनुसार साधारण १९७६-७७ साली माझ्या काही कथा प्रकाशनार्थ देण्यासाठी मी खटाववाडीत जायला सुरुवात केली आणि तेव्हाच माझी आणि श्रीपुंची तिथे प्रथम गाठ पडली. प्रथमदर्शनीच आदर निर्माण होईल असे त्यांचे रूप होते – घारे-निळे डोळे, चेहऱ्यावरचे सात्त्विक भाव, मोजकेच पण सौजन्यशील बोलणे, मंद स्मित, साधा पण पांढराशुभ्र पोशाख. ‘ललित’मध्ये ठणठणपाळ सदरात खूपवेळा सत्यकथेची आणि श्रीपुंची थट्टा करणारे लेखन जयवंत दळवी करत असत व त्यामुळे निर्माण होणारे कुतूहल मनात होते. मला वाटते, सत्यकथा आणि श्रीपु यांची सर्वाधिक प्रसिद्धी आणि विशिष्ट अशी प्रतिमानिर्मिती ठणठणपाळमुळेच झाली! पण प्रत्यक्ष भेटीत श्रीपुंशी चार-पाच औपचारिक वाक्यांपलीकडे विशेष असे काही बोलणे झाल्याचे आठवत नाही. त्या काळात खटाववाडीत जाणे श्रीपुंनी बरेच कमी केले होते; पण तरीही नंतर काही भेटी होत राहिल्या; परंतु त्याही वरवरच्या. माझा जास्त संबंध मात्र प्रत्यक्ष संपादन करणारे राम पटवर्धन यांच्याशीच येत राहिला. खटाववाडीतील गप्पाटप्पा संपल्यावर आम्ही जवळच्या हॉटेलात इडली-डोसा असे काहीतरी खायचो, मग बसने घरी जायचो – बहुतेकदा ६६ नंबरच्या बसने. मी किंग्ज सर्कलला माझ्या घराजवळ उतरायचो आणि ते पुढे चुनाभट्टीला. गिरगाव ते किंग्ज सर्कल अर्धा-पाऊण तास निवांत गप्पा व्हायच्या – कार्यालयात व्हायच्या त्यापेक्षा अधिक मोकळ्या. बसचा वरचा मजला ऐसपैस गप्पा मारण्यासाठी सोयीचा असे. बहुधा साहित्यिक विषयच असायचे. मुंबईतील एका उद्योगपतीच्या जीवनातील तणावाचा एक दिवस चितारणारी ‘असंच. नेहमी. तरीदेखील.’ ही माझी कथा सत्यकथेत जून १९७७ अंकात आणि झारखंडच्या पार्श्वभूमीवरची जमशेदपूरची उद्योगसंस्कृती आणि भोवतालचे आदिवासी जीवन यांच्यातील परस्परावलंबी नाते चितारणारी ‘डमपासून डमपर्यंत’ ही दीर्घकथा त्याच वर्षीच्या दिवाळी अंकात प्रकाशित झाली व त्याचा मला खूप आनंद वाटला होता. पुढे सत्यकथा बंद झाले. थोडे दिवस त्यावरची चर्चा रंगली. अशाच एका चर्चासभेला ग्रंथसंग्रहालयात मीही उपस्थित होतो; पण लवकरच सगळे थंडावले – विस्मृतीत गेले. मौजची पुस्तके वाचनात येत राहिली; पण एक व्यक्ती म्हणून श्रीपु दूरस्थच राहिले.
पुढे आमचा संबंध ऑगस्ट १९९५ मध्ये मी पुण्याहून अंतर्नाद मासिक प्रकाशित करायला सुरुवात केली तेव्हा यायला लागला आणि त्यानंतर मात्र आमच्यात एक आपुलकीचे नाते निर्माण झाले. ते स्वतः अंतर्नादचे वर्गणीदार झाले, इतरही चारपाच जणांना त्यांनी वर्गणीदार करून घेतले. त्यांच्यातील गोवा हिंदू असोसिएशनचे अध्वर्यू रामकृष्ण नाईक यांच्याशी माझी मैत्रीही झाली. पुढे आम्ही सुरू केलेल्या आजीव सदस्य योजनेचेही श्रीपु दोन हजार रुपये भरून सदस्य झाले. अंतर्नादविषयी ते चौकशी करत, सूचना करत आणि ते सारे वरवरचे नव्हते हे जाणवत असे. कोणाशीही नाते दृढ होणे हे उभयपक्षी व्हावे लागते. बहुतेकदा जो आपल्या कामात रस घेतो, आपल्याविषयी आपुलकी दाखवतो, त्याच्याविषयी मग आपल्यालाही आपोआप आपुलकी वाटू लागते. अर्थात याचा व्यत्यासदेखील खरा असावा. ‘जग हे दिल्या-घेतल्याचे’ असे तुकोबा म्हणूनच म्हणाले असावेत.
बऱ्याच नंतर माझी ‘बदलता भारत’ लेखमाला अंतर्नादमध्ये प्रसिद्ध होत असतानाच त्यांनी ती मौजतर्फे पुस्तकरूपात प्रकाशित करायचे मान्य केले व त्याच्या पहिल्या तीन आवृत्ती त्यांच्या डोळ्यांसमोरच लागोपाठ निघाल्या होत्या. पुण्यात आले, की सुरुवातीला त्यांचा मुक्काम कर्वे रस्त्यावर त्यांचे पुतणे गजानन आणि यशोदा भागवत यांच्या घरी असे; पण पुढे पुढे त्यांचा मुक्काम औंध येथेच त्यांच्या एसआयईएस कॉलेजातील दीर्घकालीन, म्हणजे १९६० सालापासूनच्या सहकारी यास्मिन शेख यांच्या घरी असे. तिथेही आमच्या गाठीभेटी होत. अर्थात भरभरून गप्पा अशा कधीकधीच होत. वयाने ते माझ्याहून तीस वर्षे मोठे होते, कर्तृत्वाने तर खूपच ज्येष्ठ होते, त्यामुळे आमच्यात फार जवळीक होती असे म्हणणे किंवा अप्रत्यक्षपणे तसे भासवणे हे अप्रामाणिकपणाचे ठरेल; परंतु अंतर्नादबद्दल त्यांना आत्मीयता होती एवढे म्हणता येईल. आमच्या अडचणींची अर्थातच त्यांना स्वानुभवामुळे पूर्ण जाणीव होती. प्रत्यक्ष संभाषणापेक्षा त्या संदर्भात नंतर लिहिलेल्या पत्रांत ते अधिक मोकळे होत असा माझा अनुभव आहे.
वेळोवेळी आलेली श्रीपुंची अनेक पत्रे माझ्या संग्रही आजही आहेत. ती त्यांच्या साहित्यप्रेमाची आणि त्या अनुषंगाने अंतर्नादविषयी त्यांना वाटणाऱ्या आस्थेची साक्ष पटवणारी आहेत. आशयाचा भाग क्षणभर बाजूला ठेवला तरीही इतर बहुतेक संपादकांकडून किंवा प्रकाशकांकडून मला आलेल्या पत्रांपेक्षा ती प्रथमदर्शनीच वेगळी वाटतात. त्यांचे पटकन नजरेत भरणारे व्यावहारिक वेगळेपण म्हणजे ही सर्व पत्रे व्यवस्थित छापील ओळी असलेल्या आयव्हरी व्हाइट लेटरहेडवर लिहिलेली, पुरेसा समास सोडलेली, जवळपास जराही खाडाखोड नसलेली आणि जे काही त्यांना सांगायचे होते ते निःसंदिग्ध शब्दांत सांगणारी आहेत. हाती लिहिलेली असली तरी ती सुवाच्य आहेत; शुद्धलेखनाकडे पुरेसे लक्ष देत लिहिलेली आहेत. संपादकीय कामात जाणवणारा त्यांचा नीटनेटकेपणा, मजकुराच्या दृश्यरूपाचे भान आणि अर्थातच भाषेवरची पकड यांची साक्ष ही पत्रे पटवतात.
त्यांच्या बोलण्यात किंवा पत्रांत कोणावरची टीका किंवा कोणावरचा राग कधीच नसे; अपवाद फक्त एक म्हणावा लागेल. ऑगस्ट १९९८मध्ये बाळ गाडगीळ यांचा ‘सत्यकथेची मौज’ हा एक पाच-पानी मुख्यतः टीकास्पद असा लेख अंतर्नादमध्ये प्रकाशित झाला होता. त्याबद्दल आपल्या १५ जानेवारी १९९९च्या पत्रात श्रीपुंनी लिहिले होते, “परवा प्रा. बाळ गाडगीळ यांचा सत्यकथेवरील लेख वाचला. मला तो आवडला नाही. खिन्न वाटले. तुम्ही त्यांना तो लिहायला सांगितला तो उथळ किंवा विरोधी वृत्तीने नसणार. त्यांनी मात्र तो तशा वृत्तीने लिहिला. तुमची लेखकाची निवड चुकली इतकेच. एखादे वाङ्मयकलाविषयक वा वैचारिक नियतकालिक सुरू करणे वा चालवणे हा निर्णय गंभीर असतो आणि ते बंद पडणे ही सांस्कृतिकदृष्ट्या चिंताजनक बाब असते. तिचा शोध; कितीही मतभेद असले तरी, गांभीर्याने घ्यायला हवा. असो. ही तक्रार नव्हे; माझ्या मनात ती कोणाबद्दलच नाही.”
त्यानंतर एकदा अंतर्नादविषयीच्या काही अडचणी मी त्यांना सांगितल्यानंतर त्यांनी पत्रात लिहिले (२ जून १९९९), “अंतर्नादची लढाई चालूच आहे, याचे नवल वाटले नाही. ती अपेक्षितच होती. मी तुमच्या संपादकीयात अथवा अंकात अन्य ठिकाणी वाचतो त्यावरून माझा ग्रह झाला आहे, की तुम्ही ती जिद्दीने, व्यावहारिक कल्पकतेने व योजनापूर्वक संपादनाने चालवीत आहात. म्हणूनच तीव्रतेने वाटते की तुम्हाला या प्रयत्नांत यश मिळो – आणि तेही केवळ व्यावहारिक नव्हे तर संपादकीयही.”
अंतर्नादची व्यक्तिगत मालकी सोडून द्यावी आणि त्याऐवजी एखादा ट्रस्ट स्थापन करून ट्रस्टमार्फत मासिक चालवावे असा विचार एकदा मी केला होता. त्यामुळे हा उपक्रम व्यक्तिनिरपेक्ष होईल व त्यातून त्याला अधिक स्थैर्य आणि दीर्घायुष्य लाभू शकेल असे वाटले होते. श्रीपुंनी त्या कल्पनेला विरोध केला होता. आपल्या पत्रात त्यांनी लिहिले होते (१३ फेब्रुवारी २०००), “गंभीर वाङ्मयीन वा वैचारिक नियतकालिकांना व्यक्तिमत्त्व व चेहरा लाभतो तो त्याच्या संपादकाच्या वाङ्मयीन अभिरुचीचा व भूमिकेचा; ट्रस्ट वा संस्था वा मंडळे सामान्यतः बिनचेहऱ्याची असतात, कित्येकदा आत्माही हरवतात.” अर्थात पुढे आम्हीही ती कल्पना सोडून दिली.
एकदा व्यक्तिशः मला कसदार वाटेल असे साहित्य फार कमी हाती येते व ती अंतर्नाद मासिक चालवताना येणारी मोठीच अडचण आहे असे मी त्यांच्याशी बोलताना म्हटले होते. त्याला उद्देशून याच पत्रात श्रीपुंनी लिहिले होते, “चांगले, निष्ठापूर्वक वृत्तीने केलेले सकस असे ललित व वैचारिक साहित्य; तुम्ही म्हणता तसे, आज कमी लिहिले जात असेलही. मला वाटते, पूर्वीही परिस्थिती फार वेगळी नव्हती. उथळपणाने, वाचकांचे मनोरंजन करण्याच्या हेतूने, प्रसिद्धीच्या हव्यासाने लिहिलेल्या ललित साहित्याचे प्रमाण नेहमीच व सर्वत्रच फार मोठे असते. वैचारिक साहित्य त्या त्या समाजातील ज्ञानलालसेवर अवलंबून असते. अनेक कारणांमुळे गेल्या काही दशकांत ती महाराष्ट्रात तरी कमी झालेली दिसते. ज्ञाननिर्मितीची क्षमता उणावली, की वैचारिक वातावरण निःसत्व व क्षीण होणारच. असो. मला एवढेच वाटते, की अशा परिस्थितीत संपादकाचे काम अधिकच कठीण होते. अनाहूत साहित्यसंभारावर त्याला विसंबून राहता येत नाही. ललित (व वैचारिकही) लेखन व लेखक यांच्या प्रतिभाशाली नव्या उन्मेषांचा भिरभिरत्या व संवेदनशील नजरेने त्याने सतत शोध घेत राहावे लागते. वैचारिक वा समीक्षात्मक साहित्य योजना करून लिहवून घ्यावे लागते. कथा-कवितांचे तसे नाही. भुईचाफ्याची फुले धुंडत सजग नजरेने भूमी पालथी घालत राहावे, तेव्हा अवचित एखादे ब्रह्मकमळच हाती येते. तुम्हांस मी हे काय सांगावे? तुम्ही ते जिद्दीने, निवृत्तीचा विचार कल्पनेतही न आणता करावे इतकेच. अर्थात तुम्ही मुळात लेखक आहात हे मला माहीत आहे, आणि तुमच्यातील लेखक-संपादक द्वंद्वाची मी कल्पना करू शकतो.”
दोन-तीन वेळा श्रीपुंनी अंतर्नादमध्ये छापण्याच्या दृष्टीने मी विचार करावा अशी त्यांना आवडलेली काही विशिष्ट लेखने सुचवली होती; पण अगदी सौम्यपणे, कुठलाही आग्रह न धरता. तारा वनारसे, विजया राजाध्यक्ष, मंगेश पाडगावकर, मिलिंद बोकील आणि स. ह. देशपांडे ही तशी पाच नावे मला आठवतात. अंतिम निर्णय अर्थात त्यांनी माझ्यावरच सोपवला होता.
लेखक आणि संपादक या दोन्ही भूमिका एकाचवेळी बजावताना होणाऱ्या ओढाताणीची त्यांना पूर्ण कल्पना होती. “अंतर्नादकडे मोठ्या प्रमाणावर साहित्य येते आणि ते कसेही असले तरी वाचावेच लागते. त्यामुळे माझे रोज तीन-चार तास येणाऱ्या साहित्याच्या वाचनासाठी द्यावे लागतात व शेवटी स्वतःच्या आवडीच्या वाचनासाठी वेळ मिळत नाही,” असे मी एकदा प्रत्यक्ष भेटीत म्हटले होते. त्या संदर्भात २३ मार्च २००१ रोजी लिहिलेल्या पत्रात श्रीपु लिहितात, “हस्तलिखिते व प्रुफे वाचता वाचता, अन्य वाचन मागे पडते त्याची तुम्हाला वाटणारी खंत माझ्या चांगल्या परिचयाची आहे. आता तर सवडीप्रमाणे माझा तकवाही फार कमी पडतो. आपल्याकडे वाङ्मयीन वा वैचारिक नियतकालिकाच्या संपादकाच्या वाट्याला येणारा हा बिकट पेच आहे. आपले काम समाधानकारक होण्यासाठी त्याने सतर्क राहून चतुरस्र वाचन करायला हवे, नवनव्या लेखकांच्या लेखनाचा डोळसपणे शोध घ्यायला हवा. पण बहुधा ही नियतकालिके एकखांबी असतात; त्यांचे संपादक संपादनाच्या मुख्य व रास्त कामाबरोबर आनुषंगिक अशा इतर लहानमोठ्या कामांत गुंततात, आणि संपादकीय कामाला प्राणभूत अशा अत्यावश्यक वाचनात मागे पडतात. त्याबद्दल फार खंतावू नये आणि निर्ढावूनही जाऊ नये. तेवढेच आपल्या हातात असते – आणि शक्य तितके वाचन करीत राहणे. असो. तुम्हांला मी काय सांगणार?”
त्यांचे एक पत्र मला अगदी एखाद्या मूल्यवान प्रशस्तिपत्रासारखे वाटले होते आणि अंतर्नादच्या अंकात मी ते त्यांची संमती घेऊन प्रसिद्धदेखील केले होते. त्यात त्यांनी लिहिले होते, “तुम्ही आजीव वर्गणीदारांसंबंधीचा केलेल्या संकल्प अजून पुरा करू शकला नाही असे दिसते. तुम्ही वाढवून दिलेल्या मुदतीत म्हणण्यापेक्षा केलेल्या नव्या आवाहनाला पुरेसा प्रतिसाद मिळेल, अशी आशा वाटते. पण संकल्प समजा पुरा झाला नाही तरी खंतावू नये. आजवर नोंदल्या गेलेल्या आजीव वर्गणीदारांची संख्या नवल करावी अशी आहे. माझ्या तरी माहितीत मराठी नियतकालिकांत एवढे यश मिळवलेले दुसरे उदाहरण नाही. तुमच्याइतक्या कल्पकतेने, योजनपूर्वक, एक प्रकारच्या व्यावसायिक कल्पकतेने व सातत्याने या बाबतीत प्रयत्न करणाऱ्या दुसऱ्या संपादक-प्रकाशकाचेही नाही. खरे तर इंग्रजी साहित्यविश्वातही गंभीर साहित्यिक नियतकालिक केवळ वर्गणीदारांच्या आधारावर फार काळ तरी चालत नाही असे दिसते. जाहिरातींची, विश्वस्तनिधींच्या, प्रतिष्ठानांच्या अनुदानाची मदत घ्यावी लागते.
“हा सारा विचार करता तुमचे मर्यादित यशही कौतुकास्पद आहे. तुम्हाला व तुमच्या सहकाऱ्यांना उत्साहवर्धक वाटावे असेच ते आहे. त्याचबरोबर संपादकीय जबाबदारीचे भान वाढवणारे आहे. अर्थात तुम्हाला ते प्रथमपासून आहे. अधूनमधून एखाददुसऱ्या अंकातील साहित्याचा कस उतरल्याची शंका आली तरी ते भान उणावल्याची नाही. ते वाढत राहो व तुम्हांला त्यात अधिकाधिक यश मिळो.”
(पूर्वप्रकाशन : अंतर्नाद, मार्च २००१)
एक हजार आजीव सदस्य करायची आमची योजना होती आणि तेवढे नक्की झालेही असते, पण आठशेपस्तीस सदस्य झाल्यावर काही कारणांनी आम्ही ती योजना बंद केली, सर्वांना त्यांचे पैसे परत केले. त्याचवेळी त्यांनी वर्गणीदार म्हणून मात्र राहावे आणि त्यांच्यासारखाच आणखी एखादा चोखंदळ वाचक वर्गणीदार म्हणून मिळवून द्यावा अशी विनंती त्यांना केली होती. तिला चांगला प्रतिसाद मिळाला व वर्गणीदारांची संख्या दुप्पट झाली. स्वतः श्रीपुदेखील शेवटपर्यंत वर्गणीदार राहिलेच; पण हा नंतरचा भाग झाला. वरील पत्राला संदर्भ आहे तो ती योजना चालू होती त्या काळाचा. श्रीपुंच्या या पत्राचा मला अभिमान वाटला होता.
अंतर्नाद मासिकाला शक्य तेवढी मदत करायचा श्रीपुंचा प्रयत्न असे. कधीकधी असेही वाटते की अंतर्नादला त्यांनी वेळोवेळी जे उत्तेजन दिले त्यामागे मी निराश होऊ नये, खचून जाऊ नये हीच भावना असावी; कारण अंतर्नाद म्हणजे त्यांच्या पुढच्या पिढीचे मासिक आहे, साहित्यविश्वापुढील अडचणी अधिकच जटिल झालेल्या कालखंडातील मासिक आहे आणि त्यामुळे आमची लढाई त्यांच्यापेक्षा अधिकच बिकट असणार याची त्यांनी कल्पना होती.
कै. प्रभाकर आणि कमल पाध्ये यांच्या नावे एक विश्वस्त निधी १९८८ साली श्रीपुंच्या पुढाकाराने आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली स्थापन झाला होता. त्याच्या व्याजातून योग्य त्या साहित्यिक उपक्रमांना आर्थिक साहाय्य करता यावे हा उद्देश. त्या विश्वस्त निधीतर्फे ऑक्टोबर २००५ साली अंतर्नादला पन्नास हजार रुपयांचा पुरस्कार प्राप्त झाला होता. त्या काळाच्या मानाने ती रक्कम बऱ्यापैकी घसघशीत होती. अंतर्नादच्या दशकपूर्तीचे ते वर्ष होते. धनादेशासोबत विश्वस्त मंडळाच्या वतीने लिहिलेले सहपत्रात कार्याध्यक्ष सरोजिनी वैद्य यांनी लिहिले होते : “अंतर्नाद मासिकाचे गेल्या दहा वर्षांतील वाङमयीन कार्य आमच्या सर्वांच्या डोळ्यांपुढे आहे. ते मराठी साहित्याच्या विकासाच्या संदर्भात आजच्या घडीला नितांत आवश्यकही आहे. अशा कार्याला हातभार लागावा ही गोष्ट पाध्ये पतिपत्नीना स्वतःला विशेषच आनंद देऊन गेली असती असेही आम्हांला वाटते.” यातील आर्थिक भाग क्षणभर बाजूला केला तरी मनोबळ वाढवणारे असे पत्र ही त्यावेळी माझी आंतरिक गरजही होती.
श्रीपुंशी आलेल्या माझ्या व्यक्तिगत संबंधांच्या अनुषंगाने लिहिलेला लेखाचा पूर्वार्ध इथे संपतो. आता उत्तरार्धात श्रीपुंच्या एकूण व्यावसायिक वाटचालीसंदर्भात लिहायचे आहे. या वाटचालीला योग्य ती दिशा देणाऱ्या दोन गोष्टींविषयी सुरुवातीला लिहितो.
पहिली गोष्ट म्हणजे ज्येष्ठ बंधू विष्णुपंत यांचा श्रीपुंवरील प्रभाव.
आपले कार्य श्रीपुंनी जास्तीत जास्त निष्ठेने केले आणि ज्यांच्यामुळे आपण घडलो असे श्रीपु म्हणत, त्या विष्णुपंतांकडून झालेला हा संस्कार असावा. ‘आकाशवाणी’वरून केलेल्या एका भाषणात विष्णुपंत म्हणाले होते, “आपल्याला मिळालेल्या संस्कारांचा, शिक्षणाचा व कर्तृत्वाचा जास्तीत जास्त उपयोग आपल्यावर पडलेल्या जबाबदाऱ्या पुऱ्या करण्यासाठी करणे हेच आपल्या जीवनाचे सार्थक आहे. आपल्याला हवे ते व हवे तेवढे यश मिळणे सर्वस्वी आपल्या हाती नाही, अनेक बाह्य बंधने व कारणे त्याचे नियंत्रण करत असतात. पण, त्यामुळे स्वतःच्या कार्यशक्तीवर वा प्रयत्नांवर बंधने येण्याचे काही कारण आहे असे मला मुळीच वाटत नाही. उलट तसे वाटणे हा आपला पराभव आहे. सृष्टिव्यवहारात मनुष्याचे जे अजोड स्थान आहे त्याच्याशी ते विसंगत आहे अशी माझी निष्ठा आहे. त्याच्या जोरावरच गेली पंचवीस वर्षे मी काम करत आलो आहे. काही वेळा पुरेसे यश मिळाले नाही, थोडया वेळा पुरे अपयशही पदरी पडले; पण या जीवननिष्ठेने माझे मन खचू दिले नाही.” (विष्णुपंत भागवत, वि. पु. भागवत स्मारक समिती प्रकाशन, २० जानेवारी १९८४, पृष्ठ २) वडीलबंधूंचा हा संस्कार श्रीपुंनी जाणीवपूर्वक जपला; तात्कालिक औदासिन्यावर मात करत; स्वतःच्या ‘करड्या रंगाच्या उदास पिंडाशी’ कायम संघर्ष करत.
मौज-सत्यकथेच्या यशात विष्णुपंतांचा खूप मोलाचा पण लोकांपुढे फारसा न आलेला असा वाटा आहे. विष्णुपंतांना मुद्रणाचे उत्तम ज्ञान होते. ज्यांना दर्जेदार छपाई हवी आहे अशा अनेक कंपन्यांची कामे मौजकडे येत असत. अक्षराचे वळण (फॉन्ट) कसे असावे आणि पुस्तकाची मांडणी व सजावट (लेआऊट) कशी असावी याचाही त्यांनी सखोल अभ्यास केला होता. मुखपृष्ठ, सुरुवातीची पाने, बांधणी यांकडेही त्यांचे बारकाईने लक्ष असे. मौजची दादर येथील फाउंड्री विष्णुपंतांनीच आपले बंधू जयराम यांच्या मदतीने सुरू केली. रस्ता रुंदीकरणात ती जागा गेली व म्हणून त्याबदल्यात महानगरपालिकेने विलेपार्ले (पश्चिम) येथील इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये दिलेल्या दोन गाळ्यांत फाउंड्री हलवली गेली. साधारण १९६५ सालापासून तिथेच मौजचा आधुनिक छापखानाही सुरू झाला व तिथूनच विष्णुपंतांचे चिरंजीव श्रीकांत आज मौजची धुरा सांभाळतात. मौजची खास ओळख बनलेला विशिष्ट टाइप ही विष्णुपंतांचीच निर्मिती. मौजची पुस्तके आजही हातात घेताच इतर प्रकाशकांच्या पुस्तकांपेक्षा ती वेगळी असल्याचे जाणवते याचे श्रेय विष्णुपंतांना द्यावे लागेल. मुद्रणासह सगळी व्यावसायिक जबाबदारी विष्णुपंतच सांभाळत असत. हे फार महत्त्वाचे आहे. कारण त्यामुळेच इतर अनेक मासिकांच्या संपादकांप्रमाणे संपादनाबरोबरच इतर व्यावहारिक कामेही स्वतःच करण्याची पाळी श्रीपुंवर आली नाही. ‘मराठी मासिक चालवणे म्हणजे एका माणसाने केलेली सर्कस’ हे निरीक्षण त्यामुळेच सत्यकथेला लागू पडणारे नव्हते! “आज मी जो काही आहे तो सर्वस्वी विष्णुपंतांच्यामुळे आहे, त्यांनी सांभाळल्यामुळे आहे; एरवी मी कोणीच झालो नसतो”, हे मौज प्रकाशनाच्या रौप्यमहोत्सव समारंभाच्या वेळी श्रीपुंनी काढलेले उद्गार पुरेसे बोलके आहेत.
श्रीपुंच्या व्यावसायिक वाटचालीला योग्य ती दिशा देणारी दुसरी गोष्ट म्हणजे मौज साप्ताहिक बंद झाले त्याच वर्षी म्हणजे १९६० साली सुरू केलेले पुस्तक प्रकाशन. श्रीपुंनी उचललेले ते एक महत्त्वाचे, आणि व्यावसायिकदृष्ट्या कदाचित सर्वाधिक महत्त्वाचे पाऊल. त्यापूर्वी अनेक वर्षे मौज आणि सत्यकथा यांच्या संपादनाचे कार्य त्यांनी मुख्यतः केले, पण ही दोन्ही नियतकालिके भागवतबंधूंनी स्वतः सुरू केलेली नव्हती. मौज साप्ताहिकाची स्थापना पुढे ‘समतानंद’ या नावाने अधिक प्रसिद्धीस आलेल्या अनंत हरी गद्रे यांनी बुधवार, २९ मार्च १९२२ रोजी, गुढीपाडवाच्या मुहूर्तावर केली होती. सत्यकथा हे मासिकही मो. ग. रांगणेकर यांनी नोव्हेंबर १९३३मध्ये ‘ट्रू स्टोरी’ या अमेरिकन मासिकाच्या धर्तीवर सुरू केले होते. ही दोन्ही नियतकालिके केवळ त्यांच्या आर्थिक अडचणींमुळे पुढे भागवत कुटुंबियांच्या हाती आली होती. त्यालाही काही वर्षे उलटल्यावर, कौटुंबिक जबाबदारीचा भाग म्हणून, विष्णुपंतांच्या सांगण्यानुसार, श्रीपु त्यांच्या कामात सहभागी झाले होते. मौज प्रकाशनाची स्थिती तशी नव्हती; त्याची स्थापना हा स्वतः श्रीपुंचा पुढाकार होता.
सत्यकथा आणि मौज यांचे काम बघत असतानाच आपण पुस्तकप्रकाशनक्षेत्रातही उतरावे असे श्रीपुंना वाटू लागले होते. त्याची अनेक कारणे होती. एकतर उत्तम साहित्य प्रकाशनार्थ मौज-सत्यकथेकडे येतच होते. ते प्रकाशित झाल्यानंतर त्याची पुस्तके इतर प्रकाशक काढतच होते. ती पुस्तके आता अनायासे आपल्याच घरात (इन-हाउस) राहिली असती. शिवाय नियतकालिकांत फुटकळ लिखाण छापून येण्यापेक्षा कायम स्वरूपाचे पुस्तक निघणे हे कुठल्याही साहित्यिकाला अधिक प्रिय होते. अनेक साहित्यिकांशी तसेच दीनानाथ दलालांपासून बाळ ठाकूरांपर्यंत बऱ्याच चित्रकारांशी श्रीपुंचे चांगले संबंध होते. मासिकाचे विक्री-आयुष्य (शेल्फ-लाइफ) फारतर दोन-तीन महिने इतके सीमित असते; पुस्तके मात्र अनेक वर्षे बाजारात खपत राहू शकतात. त्यामुळे ती काढणे केव्हाही अधिक फायद्याचे होते. शिवाय स्वतःचा छापखाना व कार्यालय होतेच. त्या खर्चाचाही भार वेगळा असा पडणार नव्हता. सर्वचदृष्ट्या पुस्तकप्रकाशन करणे योग्य पाऊल होते. त्यासाठी मौज प्रकाशन गृह ही संस्था सुरू झाली. सत्यकथेत अनंत काणेकर यांचे ‘आमची माती, आमचे आकाश’ या शीर्षकाचे प्रवासवर्णन क्रमशः प्रसिद्ध होत होते. त्यात दीनानाथ दलाल यांची सुरेख चित्रे असत. किंबहुना दलाल आणि काणेकर यांनी एकत्र प्रवास करायचे ठरवले, तेव्हाच हे प्रवासवर्णन सत्यकथेत प्रकाशित होईल असे ठरले होते. त्यावेळी मौज कार्यालयातच एका खोलीत दलाल यांनी आपला स्टुडिओ थाटला होता व त्यामुळे त्यांचे मौजशी जवळजवळ रोजचेच संबंध होते. ती लेखमाला खूपच गाजली. आपले पहिले प्रकाशन म्हणून जून १९६० साली मौजने ‘आमची माती, आमचे आकाश’ या प्रवासवर्णनाचीच निवड केली. ही घटना नोंदवणे महत्त्वाचे आहे, कारण त्यांना फक्त कथा, कविता आणि समीक्षा अशा तथाकथित ‘निखळ ललित वाङमयीन’ साहित्यप्रकारांतच स्वारस्य होते असा एक गैरसमज लोकांमध्ये नंतर पसरला होता. प्रत्यक्षात अर्थातच तसे नव्हते.
पुस्तक प्रकाशन सुरू करायचा निर्णय योग्यच होता हे पुढे काळाच्या ओघात सिद्धच झाले आहे. कारण सत्यकथा मासिक बंद झाल्यावरही मौजची पुस्तके निघतच राहिली. साधारण वर्षाला दहा पुस्तके ही सरासरी इतर काही प्रकाशन संस्थांच्या तुलनेत कमी असेल, पण जास्तीत जास्त पुरस्कार मौजने काढलेल्या पुस्तकांनीच पटकावले आहेत असे आढळते. प्रकाशन व्यवसायाचा मोठा फायदा सत्यकथेलादेखील होत गेला. हा मुद्दा थोडा अधिक स्पष्ट करायला हवा.
अंतर्नादमध्ये १९९८ साली लिहिलेल्या एका पुर्वोल्लेखित लेखात बाळ गाडगीळ यांनी सत्यकथेच्या तुलनेत ‘हंस’च्या कामगिरीची योग्य ती दखल घेतली जात नाही अशी खंत व्यक्त केली होती. त्या संदर्भात हंसचे संपादक-प्रकाशक अनंत अंतरकर यांच्या कन्या अनुराधा औरंगाबादकर यांनी एक पत्र पाठवले होते. “अनंत अंतरकरांवर मी प्रबंध लिहिला आहे. त्यावर मला पीएच.डी. मिळाली आहे. माझे मार्गदर्शक डॉ. हे. वि. इनामदार यांनी माझ्या प्रयत्नांना सतत प्रोत्साहन दिल्यामुळे हे घडून आलं.” अशी सुरुवात असलेल्या त्या पत्रातील काही भाग इथे उद्धृत करणे उपयुक्त ठरावे.
“हंसच्या कामगिरीची दखल घेणारा एक वाचकवर्ग आहेच. तो सत्यकथेच्या लेखकवर्गातलाही आहे. कारण सत्यकथेतले जी. ए. कुलकर्णी, दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले हे लेखक अंतरकरांनी त्यांच्या काळात प्रकाशात आणलेले आहेत. सत्यकथेच्या मुखपृष्ठावर विनोदी चित्र अंतरकरांनी त्या काळात प्रसिद्ध केलेलं होतं. हंसच्या चाहत्या लेखकवर्गाला, रसिक वाचकांना हंसचं एवढं कौतुक होत नाही आणि सत्यकथेचं होतं याची एक हळहळ वाटते, हे प्रबंधलेखनाच्या वेळी माझ्या हाती आलेलं एक सत्य आहे. याचंही कारण मी माझ्यापुरतं मान्य केलेलं आहे. ते उघड करून सांगणं म्हणजे पुन्हा सत्यकथेच्या प्रेमींना, सत्यकथावादी लेखकांना दुखावणं आहे. कदाचित त्यांच्या ‘इगो’ला धक्का लावणारं आहे; पण सत्यकथेबद्दल बोलताना, माझ्या वडिलांचा संबंध आल्यामुळे, माझ्यापुरतं जाणवलेलं ‘सत्य’ मी सांगायलाच हवं. सत्यकथेएवढा हंस गाजला नाही कारण त्याकाळी अंतरकरांची ‘मौज’सारखी प्रकाशनसंस्था नव्हती. आपलं पुस्तक निघणं हा लेखकांना सन्मान वाटत असतो. हा सन्मान सत्यकथेच्या लेखकांना मौज प्रकाशन मिळवून देत होतं. सत्यकथेविषयी ममत्व वाटायला हेही एक महत्त्वाचं कारण आहे.”
(अंतर्नाद, जानेवारी १९९९)
मौज प्रकाशनचे काम श्रीपुंना आयुष्यभर पुरले. प्राध्यापक म्हणून ते १९ जून १९७९ रोजी निवृत्त झाले. वयाच्या ५६व्या वर्षी; म्हणजे निवृत्तीच्या अपेक्षित वयाच्या चार वर्षे आधीच. त्यानंतर २१ ऑगस्ट २००३ रोजी निधन होइस्तोवर मौज प्रकाशनाचे काम ते मुख्यतः शीव येथील आपल्या घरूनच श्रीनिवास विनायक कुलकर्णी, मोनिका गजेंद्रगडकर, प्रदीप कर्णिक वगैरेंच्या सहकार्याने करत असत. पुस्तकप्रकाशनानेच त्यांना शेवटपर्यंत साथ दिली.
एक संपादक म्हणून श्रीपुंनी मराठी साहित्यसृष्टीला काय योगदान दिले? याचे उत्तर बरेच मोठे देता येईल, पण त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानातील मला विशेष महत्त्वाच्या वाटणाऱ्या चार घटकांचा इथे कृतज्ञतापूर्वक उल्लेख करतो.
पहिले योगदान म्हणजे पराकोटीची कार्यनिष्ठा. तसे पाहिले तर संपादनाचे काम श्रीपुंनी स्वतःची आवड म्हणून निवडले नव्हते; परिस्थितीची परिणती म्हणून आणि कौटुंबिक जबाबदारी झेलायची म्हणून ते या क्षेत्रात आले. त्यांचा जन्म २७ डिसेंबर १९२३ रोजी देवरूखसारख्या छोट्या गावातील एका मोठ्या कुटुंबात झाला. घरचे एक छोटे किराणा मालाचे दुकान. घरात आठ भाऊ आणि चार बहिणी. एकूण आर्थिक स्थिती बेताबाताचीच. प्राथमिक शिक्षण देवरुख येथेच झाले. पुढे ते शिक्षणासाठी मुंबईत आले. गिरगावातील युनियन हायस्कूलमधून मॅट्रिक झाले आणि नंतर रुईया कॉलेजात प्रवेश घेतला. तिथे इंटरला असतानाच त्यांनी, विष्णुपंतांच्या विनंतीवरून, त्यांना मदत करण्याच्या भूमिकेतून, या व्यवसायात प्रवेश केला. पण एकदा ते काम स्वीकारल्यावर त्यांनी स्वतःला संपादक म्हणून प्रयत्नपूर्वक घडवले आणि संपादक म्हणून चांगले काम करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला. माटुंगा येथील रामनारायण रुइया महाविद्यालयातून बी.ए. आणि एम.ए. करताना त्यांच्या उच्च शिक्षणासाठी एक विशिष्ट उद्देश होता; ते दिशाहीन किंवा केवळ परीक्षार्थी शिक्षण नव्हते. त्यावेळी तरी त्यांना प्राध्यापकी करायची नव्हती. नंतर श्रीपुंनी १९५४ साली रुइया महाविद्यालयात व्याख्याता म्हणून नोकरी धरली होती ती कौटुंबिक गरज म्हणून. मौज ही भागवत कुटुंबियांची भागीदारीतील कंपनी होती आणि जयराम, प्रभाकर, माधव, मुकुंद वगैरे इतर भागवत कुटुंबीयदेखील मौजमध्ये काम करत होते. मौज-सत्यकथेला मिळालेल्या प्रतिष्ठेमध्ये त्यांचाही वाटा आहे हे नमूद करायला हवे. त्या सगळ्यांना सामावून घेण्याइतके मौजचे काम नव्हते व त्यामुळे आपण अध्यापनाकडे वळलो असे श्रीपुंनी नंतर म्हटले होते. पण त्यापूर्वीची दहा वर्षे त्यांनी प्राध्यापकीचा विचारही मनात आणला नव्हता. एमए झाल्यावरदेखील पीएच.डी. करणे, विद्यापीठ पातळीवर काम करणे आणि त्यातून आपली शिक्षणक्षेत्रातील ‘कारकीर्द’ वर्धिष्णू ठेवणे हेही श्रीपुंनी केले नाही. संपादन हेच त्यांनी आपले सर्वस्व मानले. आपल्या शिक्षणकाळात न. र. फाटक, गोवर्धन परिख, द. के. केळकर आणि इतर प्राध्यापकांकडून त्यांनी मराठी साहित्याचे जास्तीत जास्त सखोल ज्ञान घेतले. आपल्या संपादनाच्या कामासाठी आवश्यक म्हणून त्यांनी जाणीवपूर्वक भरपूर वाचन केले; आपली साहित्याची पूर्वीपासून असलेली जाण अधिकाधिक सजग करून घेतली. त्याशिवाय चित्रकला, छायाचित्रण, नृत्य, संगीत वगैरे अनेक कलांचीही माहिती करून घेतली. पुढेदेखील आपला व्यासंग त्यांनी चालूच ठेवला. वा. ल. कुलकर्णी यांच्यामुळे इंग्रजी नियतकालिकांशीही त्यांचा परिचय झाला. स्वतःची मशागत ते करतच राहिले. ‘रंगायन’सारख्या नामांकित नाट्यसंस्थेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांचा १९३८ ते १९४२ या कालखंडात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी जवळचा संबंध आला होता, संघशिक्षावर्गात (ओटीसी) ते सहभागीही झाले होते असे गिरीश प्रभुणे यांनी लिहिले आहे. १९४२ सालच्या मुंबईतील कॉँग्रेस अधिवेशनानंतर महात्मा गांधींचाही त्यांच्यावर प्रभाव पडला होता; परंतु कुठल्याही राजकीय विचारसरणीच्या ते आहारी गेले नाहीत. जिथे जे शिकायला मिळेल ते त्यांनी तेथून घेतले. संपादकाला केवळ साहित्यिक जाण आणि व्यावहारिक ज्ञान असून पुरेसे नाही, त्याला एकूणच आपले जीवनविषयक आकलन प्रयत्नपूर्वक समृद्ध करावे लागते हा श्रीपुंकडून घ्यायचा महत्त्वाचा बोध. आणि तो त्यांच्या कार्यनिष्ठेचाच एक भाग होता.
श्रीपुंचे दुसरे योगदान म्हणजे संपादनाचे महत्त्व त्यांनी इतर कोणाहीपेक्षा अधिक ठळकपणे अधोरेखित केले. आर्थिक अडचणी असतानासुद्धा त्यांनी राम पटवर्धन यांच्यासारखे पूर्णवेळ संपादक संस्थेत कायम ठेवले. बहुतेक प्रकाशनसंस्थांमध्ये पूर्णवेळ संपादक हा प्रकारच आज राहिलेला नाही; मौजसोडून अन्यत्र तो पूर्वीही फारसा कुठे नव्हता. हल्ली लेखक जे हस्तलिखित देतो तेच बहुतेकदा काही किरकोळ बदल करून छपाईला दिले जाते. अनेकदा प्रकाशक किंवा संपादक स्वतःही ते हस्तलिखित फारशा बारकाईने वाचतात असे नाही, खूपदा ते केवळ वरवर चाळले जाते. श्रीपुंनी हे कधीही केले नाही. प्रकाशनासाठी आलेली प्रत्येक संहिता ते स्वतः दोन-दोन, तीन-तीन वेळा वाचत असत, लेखकाशी चर्चा करत असत. एखादे अपवादस्वरूप लेखन जन्मतःच परिपूर्ण असूही शकेल, पण बहुतेकदा पुनर्लेखनाने कलाकृती अधिक चांगली बनते. श्रीपुंचा पुनर्लेखनावर, त्यातून होणाऱ्या सौंदर्यवृद्धीवर आणि संपादकीय संस्करणाच्या उपयुक्ततेवर पूर्ण विश्वास होता. दुसरा एक व्यावहारिक भाग म्हणजे लेखकाच्या हस्तलिखितात अनेक चुका असतात व ते तसेच अक्षरजुळणीसाठी गेले तर नंतर मुद्रिते तपासताना त्या सुधारणे खूप अवघड बनते आणि खूपदा त्या चुका पुस्तकात तशाच राहूनही जातात. हे होऊ नये म्हणून आवश्यक वाटेल तेव्हा स्वीकृत संहितेची श्रीपु सुवाच्य अक्षरात मुद्रणप्रत तयार करून घेत. ते काम बरेच किचकट असते व म्हणून जवळजवळ कुठलेच प्रकाशक मुद्रणप्रत तयार करायच्या फंदात पडत नसत. आपले पुस्तक परिपूर्ण व्हावे यासाठी इतके कष्ट घेणारे संपादक फारच दुर्मिळ असतात.
सुबक मुद्रणाचा आग्रह हे श्रीपुंचे संपादक म्हणून मला नमूद करावेसे वाटणारे तिसरे योगदान. त्यासाठी मुद्रितशोधन ही पहिली पायरी. श्रीपु दोन-दोन, तीन-तीन वेळा मुद्रिते बारकाईने तपासत. अनेक प्रकाशकांना तो वेळेचा अपव्यय वाटे. त्यासंदर्भात रा. ज. देशमुख यांची एक आठवण श्रीपुंनी १९७५ सालच्या एका भाषणात सांगितली होती. ते म्हणाले होते, “मराठीतले मातब्बर प्रकाशक म्हणून आम्हीही त्यांना मानतो. प्रुफं वाचताना मला पाहिलं की ते म्हणतात, ’तू हे काय करतो आहेस? तू कशाला प्रुफं वाचतोस? ती लेखकाची जबाबदारी आहे.” (साहित्याची भूमी, पृष्ठ २४१) पण मुद्रण अचूक व्हावे याची दक्षता बाळगणारे श्रीपु याबाबतीत कधीही कंटाळा करत नसत. कागदाची निवड, मांडणी, सजावट, मुखपृष्ठ, प्रत्यक्ष छपाई, बांधणी वगैरे बाबतीत सुदैवाने मौजेचे कर्मचारी विष्णुपंतांच्या तालमीत चांगले तयार झाले होते, पण स्वतः श्रीपुदेखील त्याबाबतीत लक्ष घालत. मुखपृष्ठ हा पुस्तकाचा चेहरा आहे हे ते ओळखून होते आणि सुदैवाने त्यांची चित्रसाक्षरता उच्च दर्ज्याची होती. उपरोक्त प्रसंगी श्रीपु पुढे म्हणाले होते, “आमचं नवं प्रकाशन तयार झालं की त्याच्या पहिल्या दोन प्रती विष्णुपंत किंवा प्रभाकर माझ्याकडे पाठवतात. मी ते पुस्तक हातात घेतो, उघडून पाहतो, त्याचं मुखपृष्ठ आणि त्याच्या पाठीमागचा मजकूर पाहतो, त्याचं बाइंडिंग तपासतो, त्याची छपाई आणि त्याचा कागद बघतो. त्या नव्या कोऱ्या पुस्तकाचा वास हुंगतो. त्याच्यावर सर्व बाजूंनी हळुवार हात फिरवतो. त्या स्पर्शानं मला फार आनंद होतो. माझ्या मुलाच्या जावळातून मी प्रथम हात फिरवला तेव्हा जे सुख मी अनुभवलं तसं काहीतरी मला वाटतं आणि मी थरारून जातो. नव्या पुस्तकाच्या स्पर्शानं वाटणारा माझा हा आनंद आणि ही थरारी अजून कायम आहे – आणि यापुढंही ती कायम राहावी.” (पृष्ठ २४४-४५) एक जातिवंत, निष्ठावान प्रकाशकच हे सारे करू शकतो.
मला उल्लेख करावासा वाटतो असे श्रीपुंचे चौथे योगदान म्हणजे संपादकाने लेखक कसे जोडावेत ह्याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला. एकदा नाव झाल्यावर आपले उत्तमोत्तम लेखन, लेखक स्वतःहूनच मौजकडे पाठवू लागले. पैशाकडे पैसा जातो तशाच स्वरूपाचे ते एक स्वयंप्रेरित चक्र असते. पण ती उंची गाठेस्तोवरच्या काळात श्रीपु स्वतः होऊन लेखकांना भेटत असत, त्यांच्याशी स्नेह जोडून त्यांचे उत्तम लेखन प्रयत्नपूर्वक मिळवत असत. वि. स. खांडेकर, वि. द. घाटे, इरावती कर्वे वगैरेंचे लेखन त्यांनी अशाच पुढाकारातून मिळवले. ते नाते जपण्याचा एक भाग म्हणजे लेखकांना द्यावयाचे मानधन नियमित आणि व्यवस्थित हिशेब करून दिले जाईल यावर यांचा कटाक्ष असे. त्यांच्या पश्चातही ती मौजेची परंपरा कायम आहे याचे कौतुक करायला हवे. माझी पाच पुस्तके मौजने काढली आहेत आणि या बाबतीत माझा अनुभव आजही चांगलाच आहे. लेखकांसाठी स्वतः झीज सोसणे हा श्रीपुंचा आणखी एक विशेष. तोही लेखकांबद्दल असलेल्या आदराचा एक भाग. तसे पाहिले तर कोणाशी फार घसट करणे हा त्यांचा स्वभाव नव्हता, पण आपले काम उत्तम व्हावे म्हणून ते इतर प्रकाशक सहसा कधी करणार नाहीत असा स्नेहही दाखवत. उदाहरणार्थ, गीता साने यांनी ‘भारतीय स्त्री-जीवन’ नावाच्या पुस्तकाचे हस्तलिखित मौजकडे पाठवले होते. ते स्वीकृतही झाले होते पण हस्तलिखितात अनेक उणिवा राहून गेल्या होत्या. लेखिकेने त्यासाठी मुंबईला यावे असे श्रीपुंनी लिहिले. पण साने लांब बिहारमध्ये धनबाद येथे राहत होत्या आणि त्यावेळी मुंबईत त्यांना मुक्कामाला घर नव्हते. साने लिहितात, “भागवतांचे मुंबईला येण्याबद्दल पत्र आले तेव्हा तेथील वास्तव्य कसे काय जमवता येईल, हे मला कोडे पडले होते. त्या कोड्याचे भागवतांनी उत्तर दिले की, तुम्ही आमच्याकडे रहा. त्यांच्याजवळ तेरा दिवसांचा अवसर होता, त्यानंतर ते बाहेरगावी जाणार होते. एका अनोळखी व्यक्तीला दोन आठवडे आपल्या घरी येऊन राहण्याचे निमंत्रण देणे हे मला तरी धाडसाचेच वाटले.” पण त्या श्रीपुंच्या घरी आल्या. सकाळी सात-साडेसातला दोघे कामाला सुरुवात करत आणि रात्री उशिरापर्यंत काम चाले. बारीकशी चूकही राहू नये म्हणून श्रीपु दक्ष असत. शेवटी तेराव्या दिवशी दोघांनी संस्कारित संहिता पूर्ण केली. मराठीतील कुठले अन्य प्रकाशक एखाद्या लेखकाचे पुस्तक उत्तम व्हावे म्हणून त्याला स्वतःच्या घरी दोन आठवडे ठेवून घेतील; स्वतः इतकी झीज सोसतील?
श्रीपुंच्या योगदानाबद्दल अजून बरेच काही लिहिता येईल पण स्थलाभावी फक्त चारच मुद्दे मांडले. त्यांचे एकूण वाङमयीन योगदान विचारात घेता खरे तर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांना अगदी बिनविरोध मिळायला हवे होते. ते का मिळाले नाही हाही एक संशोधनाचा विषय ठरावा.
श्रीपुंच्या संपादकीय कामाच्या संदर्भात जाणवलेल्या दोन मर्यादांचा इथे उल्लेख केला तर ते वावगे ठरू नये.
अनेकदा सत्यकथेकडे एखादी कथा पाठवताना काही लेखक मुद्दामच ती कथा काही खास पद्धतीने लिहीत असत. जो आशय सरळ, साध्या शब्दांत मांडता येईल तो उगाचच समजायला कठीण अशा भाषेत मांडत असत; अनेक भाषिक क्लरुप्त्या वापरुन अनावश्यक मोडतोड करत असत. सत्यकथेच्या संपादकांना तशीच गूढता आणि क्लिष्टता अधिक भावते, अधिक कलात्मक वाटते असा त्यांचा समज असायचा. सत्यकथेत आपली कथा यावी ही इच्छा तर तीव्र असायची आणि मग त्या इच्छेपोटी लेखक कथेत अनेक करामती करत. त्यातून त्या कथेतील उत्कटता कमी व्हायची, कथा रटाळ व्हायची. हे मी निश्चितपणे सांगू शकतो कारण मी स्वतःही हा प्रमाद एकेकाळी केलेला आहे! रा. रं. बोराडे यांनी आपली ‘पाचोळा’ ही कादंबरी श्रीपुंच्या सांगण्यानुसार पाच वेळा लिहिली असे जाहीरपणे आणि तेही काहीशा कृतज्ञतापूर्वक सांगितले होते. त्यातून मूळ कादंबरीतील उत्कटता कमी झाली की वाढली हे सांगणे, मूळ संहिता आणि अंतिम संहिता यांची प्रत्यक्ष वाचनोत्तर तुलना केल्याशिवाय, अशक्य आहे. खूपदा अतिसंस्करण कलाकृतीला मारकही ठरते; उत्स्फूर्ततेमध्ये असलेले अंगभूत सौन्दर्य त्यातून उणावते. प्रत्यक्षात श्रीपु संहितेत बरेच बदल करायचे की नाही, हे नक्की सांगणे अवघड आहे, पण तसे बदल ते करतात असे वरचेवर म्हटले मात्र जाई. याबाबत श्रीपुंनी स्वतःहून खुलासा करायला हवा होता असे वाटते. त्यामुळे सत्यकथेकडे कथा पाठवताना लेखकांच्या मनावर येणारा एक प्रकारचा ताण कमी झाला असता आणि त्यांचे लेखन अधिक नैसर्गिक झाले असते. आपल्याबद्दल घेतल्या जाणाऱ्या आक्षेपांबद्दल मौन बाळगणे कधी कधी उपयुक्त असते, पण कधी कधी ते हानिकारकदेखील ठरते!
दुसरी मर्यादा म्हणजे लघुनियतकालिकांकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष. लघुनियतकालिकांमधून त्या काळात अनेक तरुण लेखक, विशेषतः ग्रामीण भागातील नवोदित लेखक, लिहीत असत. समीक्षक चंद्रकांत पाटील यांनी या लघुनियतकालिकांच्या योगदानाबद्दल विस्ताराने लिहिले आहे. लघुनियतकालिकांनी केलेला बोलीभाषांचा वापर, त्यांतून मुखर झालेल्या वंचित समाजाच्या वेदना, मुख्य माध्यमांतून उपेक्षित राहिलेल्या लेखकांचा वाढलेला आत्मविश्वास, एकूण साहित्यविश्वाचा झालेला विस्तार या गोष्टी साहित्याला वेगळे आयाम देऊन समृद्ध करणाऱ्या होत्या. दुर्दैवाने लघुनियतकालिकांची चळवळ ही स्वतःदेखील जेमतेम दहा-बारा वर्षेच चालली; तीही अशीच थंडावली. पण या लघुनियतकालिकांमधून लिहिणाऱ्या लेखकांना मुद्दाम भेटून, त्यांच्याशी चर्चा करून त्यांचे लेखन मौज-सत्यकथेसाठी मिळवता आले असते. या साऱ्याकडे श्रीपुंनी पुरेसे लक्ष दिले नसावे असे म्हणायला जागा आहे.
एक संपादक म्हणून श्रीपुंचा विचार केल्यानंतर एक व्यक्ती म्हणूनही त्यांच्याविषयी काही लिहावेसे वाटते. त्या दृष्टीने मला सर्वांत महत्त्वाचे वाटते ते त्यांचे सौजन्य.
मराठी साहित्यक्षेत्रात अजातशत्रुत्व ही केवळ कविकल्पना आहे! संपादकांच्या बाबतीत तर निःसंशय! ज्यांचे साहित्य सत्यकथा किंवा मौजकडून प्रकाशित होऊ शकले नाही असा असंतुष्ट लेखकांचा एक गट कायम अस्तित्वात होता. असे गट कुठल्याही नियतकालिकाच्या संदर्भात कायमच अस्तित्वात राहणार. कारण स्वीकृत साहित्यापेक्षा अस्वीकृत साहित्याची संख्या नेहमीच अधिक असणार आणि दुर्दैवाने ‘आपल्या साहित्याचा अस्वीकार म्हणजे आपला अस्वीकार’ असे खूपदा समजले जाते. अर्थात श्रीपुंचे अनेक प्रामाणिक टीकाकारही होते. त्यांच्या काही जुन्या स्नेह्यांनीदेखील त्यांच्या काही उणिवा नोंदवलेल्या आहेत. उदाहरणार्थ, “कार्यकुशलतेची व संघटनचातुर्याची उणीव ही श्रीपुंची फार मोठी मर्यादा” असे विंदा करंदीकर म्हणतात (श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक, पृष्ठ १८७).
श्रीपुंचा स्वभावात चैतन्याचा अभाव होता असेही मत काही लेखकांनी व्यक्त केले आहे. गंगाधर गाडगीळ लिहितात, “’सत्यकथे’त लिहिणारे लेखक फार नाही तरी पुरेसे लोकप्रिय झाले. पण ‘सत्यकथा’ अंग चोरून, संकोचाने थोड्याशा वाचकवर्गातच वावरत राहिली. ‘सत्यकथे’त मी मोठ्या हिरीरीने वाद केले. पण मी ‘सत्यकथे’त लिहायचे थांबल्यावर हा वावदूकपणा मावळल्यासारखा झाला. चैतन्य हा साहित्याचा फार मोठा गुण असतो. हे चैतन्य श्री. पु. भागवतांत नव्हते. आम्ही ते ‘सत्यकथे’त ओतले होते, आम्ही दूर झाल्यावर ते हरवल्यासारखे झाले.” (श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक, पृष्ठ १९१)
श्रीपुंचा चेहरा बहुतेकदा गंभीर असायचा आणि ते कुठल्यातरी काळजीत असल्यासारखे दिसायचे. यशोदा भागवत यांनी ‘श्रीपु : काही घरगुती आठवणी..’ या शीर्षकाचा एक लेख लिहिला आहे (अंतर्नाद, दिवाळी २००८). त्यांचे पती गजानन म्हणजे श्रीपुंच्या ज्येष्ठ भावाचे चिरंजीव. “घरातल्यांच्या मते, तात्याकाका आणि विमलाकाकू यांची बारा सुनांमधली सगळ्यांत लाडकी सून” असे त्यांनी सुरुवातीलाच स्वतःबद्दल लिहिले आहे. (तात्याकाका हे श्रीपुंचे घरगुती संबोधन.) त्या लेखात “निरीश्वरवादी, बुद्धिनिष्ठ, पुरोगामी विचारांचे आणि करड्या रंगाचा उदास पिंड असलेले” अशा शब्दांत त्यांनी श्रीपुंचे वर्णन केले आहे. “तात्याकाका, काळजी नसली तर ‘कशाची बरं आता काळजी करावी?’ अशी चिंता तुम्हाला पडत असेल, नाही?” असाही प्रश्न एकदा त्यांनी श्रीपुंना विचारल्याचा या लेखात उल्लेख आहे!
मौज-सत्यकथा ही नियतकालिके बंद का झाली, त्यामागे केवळ आर्थिक कारण होते की इतरही काही कारणे होती याची मीमांसा करणारा एक विस्तृत लेख प्रस्तुत लेखकाने अलीकडेच लिहिला आहे आणि त्यात श्रीपुंच्या काही मर्यादांचाही उल्लेख आहे. त्याची पुनरुक्ती इथे करायचे कारण नाही. पण त्यांचे सौजन्य मात्र मला कायम खूप लोभस वाटत आले आहे. ते मितभाषी होतेच पण शिवाय आमच्या कुठल्याच भेटीत कोणाची निंदा करताना किंवा तिथे हजर नसलेल्या दुसऱ्या कोणाची खिल्ली उडवताना किंवा कोणाचा उपहास करताना मी त्यांना कधीच बघितले नाही. श्रीपु शाकाहारी होते, सिगरेट किंवा ड्रिंक त्यांना वर्ज्य होते. ही निर्व्यसनी वागणूक झाकण्याचा त्यांनी कधी प्रयत्नही केला नाही. साहित्यक्षेत्रात हे सारे खूपच दुर्मिळ आहे आणि म्हणूनच खूप लोभस आहे.
वसंत बापट यांनी लिहिले आहे, “भागवतांचे दर्शन आणि वर्तनच असे असते की त्यांच्याशी फाजील सलगी करण्याचे धैर्य कोणाला होऊ नये.” कोणाशी व्यक्तिगत स्वरूपाचे काही बोलण्याचा कदाचित श्रीपुंचा स्वभावच नसावा. श्रीपुंविषयी काही लेखक आज भरभरून लिहितात, आणि ते वाचताना त्यांची श्रीपुंशी खूप जवळीक होती असे वाचकाला वाटू शकते; प्रत्यक्षात ती तशी होती का हे सांगणे अवघड आहे. पण अंतर्नादच्या व्याकरण सल्लागार यास्मिन शेख यांच्याशी मात्र त्यांचा जवळचा स्नेह नक्की होता. १९५४ ते १९६० ही सहा वर्षे श्रीपु रुइयामध्ये शिकवत होते व त्यानंतर त्यांनी मराठी विभागप्रमुख म्हणून त्याच वर्षी सुरू झालेल्या शीव येथील एसआयइएस (साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी) महाविद्यालयात मराठी विभागप्रमुख म्हणून एकोणीस वर्षे नोकरी केली. त्या संपूर्ण काळात यास्मिन शेख या त्यांच्या सहकारी होत्या. श्रीपुंशी इतका दीर्घकाळ आणि दैनंदिन स्वरूपाचा संबंध क्वचितच अन्य कोणाच्या वाट्याला आला असेल. कारण शेखबाईंच्या घरी ते कधीकधी वास्तव्यही करत असत व पूर्वी लिहिल्याप्रमाणे तिथे आमच्या भेटीही झालेल्या आहेत. त्यांच्याकडून मी श्रीपुंशी संबंधीत बऱ्याच आठवणी ऐकत आलो आहे. त्यांतील काही शेखबाईंनी लिहिल्याही आहेत. त्यांतल्या तीन-चार इथे नमूद करतो.
शेखबाई लिहितात,
“एकदा भागवत, पाडगावकर, बापट आणि मी भागवतांच्या गाडीतून शंभू मित्रा आणि तृप्ती मित्रा यांच्या कवितावाचनाच्या कार्यक्रमाला एका नाट्यगृहात गेलो होतो. रंगमंचावर पसरलेल्या गादीवर ती दोघे स्थानापन्न झाली. प्रकाशझोत त्या दोघांच्याही चेहऱ्यावर उजळपणा आणत होता. दोघांच्या पुढे ध्वनिवर्धक होते. दोघांनी आलटून पालटून बंगाली पद्धतीने कवितावाचनाला सुरुवात केली. आम्हांपैकी कोणालाच बंगाली कळत नव्हते. आमच्याप्रमाणे आणखी काही श्रोते बंगाली भाषेविषयी अनभिज्ञ होते. काही थोडे बंगाली श्रोते त्यांच्या काव्यवाचनाला उत्स्फूर्तपणे दाद देत होते. कार्यक्रम संपला. आम्ही थिएटरच्या बाहेर आलो. भागवत आम्हांला म्हणाले, ‘तुम्ही गाडीत बसा. मी आलोच.’ आम्ही तिघे गाडीत बसलो. बापट आणि पाडगावकर इतका वेळ गप्प होते; पण गाडीत बसल्यावर त्या दोघांनी बंगाली शब्दांशिवाय पण मित्रा-दाम्पत्याचा (मराठी माणसाला विचित्र वाटणारा) बंगाली सूर धरून नकला करायला सुरुवात केली. त्या नकला इतक्या हुबेहूब होत्या, की माझी हसता हसता पुरेवाट झाली. थोड्या वेळाने भागवत आले. आम्ही विचारले, ‘कुठे गेला होतात?’ ‘त्या दोघांचं अभिनंदन करण्यासाठी आत जाऊन त्यांना भेटून आलो.’ मला आश्चर्य वाटले आणि अपराधीही. आम्ही इकडे त्यांच्या कविता म्हणण्याची थट्टा करत होतो, पण भागवत मात्र… ! ते आल्यानंतरही या दोघांच्या नकला चालूच होत्या. भागवतांनी ओठातल्या ओठात मंदस्मित केले. मोठमोठ्याने हसणाऱ्या मला स्वतःचीच खूप लाज वाटली.”
(श्री. पु. भागवत : सहकारी आणि स्नेही, अंतर्नाद, जानेवारी २००८)
हल्ली साहित्यिक मित्रांमध्ये पूर्वीइतका दोस्ताना आढळत नाही, प्रत्येक जण आपापल्या बेटावर सुखी अशीच काहीशी परिस्थिती आहे. पण एकेकाळी साहित्यिक मित्र एकमेकांना अधिक भेटत, त्यांच्यात थट्टा-मस्करी चाले. संबंधित व्यक्ती हजर नसेल, तर अशा थट्टा-मस्करीला कधीकधी कुचाळक्यांचे स्वरूपही प्राप्त होई. स्वभावात:च गंभीर असलेले श्रीपु त्यात सहभागी होत नसत; तिथे असूनही काहीसे अलिप्त राहत. तसे पाहिले तर हा चांगुलपणा आहे, पण ती गंभीर व्यक्ती इतरांपासून वेगळे पडायचीही दाट शक्यता अशा प्रसंगी असते. त्या व्यक्तीबद्दल मग इतरांना आदर वाटू शकतो, पण जवळीक वाटायची शक्यता कमी असते. श्रीपुंच्या बाबतीत असे घडत असेल का?
श्रीपु देव-देव करणारे नक्कीच नव्हते, पण ते ठामपणे नास्तिक होते का असाही प्रश्न कधीकधी पडतो. त्यासंदर्भात वरील लेखातील शेखबाईंची ही एक आठवण.
एसआयइएस कॉलेजच्या विद्यार्थ्यांची एक सहल घेऊन शेखबाई पंढरपूरला गेल्या होत्या. संतसाहित्याचे संस्कार मराठी संस्कृतीवर अमीट आणि त्या संतांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी. निरीश्वरवादी मानले गेलेले श्रीपुही सोबत होते. देवळात गेल्यावर शेखबाईंनी भक्तिभावाने हात जोडले आणि विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवले. त्यांच्या दृष्टीने तो महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा होता आणि म्हणून साहजिकच त्यांचा आस्थाविषय होता. त्या प्रसंगाचे वर्णन करताना शेखबाई लिहितात, “भक्तगणांच्या बारीतून हळूहळू पुढे सरकत विठ्ठलाच्या मूर्तीसमोर भागवत उभे राहिले. मी त्यांच्या मागेच होते. कसे कुणास ठाऊक, मी एकदम म्हटले, ‘भागवत, विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवा.’ त्यांनी चमकून माझ्याकडे पाहिले. मला वाटले, ते तसेच पुढे सरकतील. पण त्यांनी विठ्ठलाच्या पायावर डोके टेकले. मला ते दृश्य विलक्षण वाटले. मनात विचार आला, मी त्यांना तसे का सांगितले? काही कळेना. मंदिरातून बाहेर पडल्यावरही ते काही बोलेनात. गप्पगप्पच होते. न राहवून मी म्हटले, ‘ज्ञानेश्वर, नामदेव, तुकाराम इत्यादी संतांनी जिथं मस्तक टेकलं, तिथं आपणही नतमस्तक व्हायला हवं.’ त्यांनी नुसती मान हलवली. या त्यांच्या मौनाचा अर्थ काय होता? स्वतःच्या भूमिकेला त्यांनी मुरड का घातली? माझ्यासारख्या सहकाऱ्याचा मान ठेवावा म्हणून? की कुठेतरी अंतर्यामी दडलेली श्रद्धा वरती आली म्हणून? काहीही असो, दुसऱ्या व्यक्तीच्या सश्रद्धतेचा त्यांनी कधी उपहास केला नाही.”
अडचणीत सापडलेल्या स्नेह्यांना अबोलपणे सहाय्य करण्याचा एक मोठा गुण भागवतांमध्ये होता. त्याबद्दल लिहिताना उपरोक्त लेखात शेखबाईं म्हणतात,
“महाविद्यालयीन प्राध्यापकांना साठ-सत्तरच्या सुमारास अगदी कमी पगार मिळत असे. दोनशे-अडीचशे रुपयेही त्या काळात खूपच वाटत. एकदा घाईने बसमध्ये चढताना कुणीतरी चोरट्याने माझी पर्स उघडून त्यातील २५० रुपये लांबवले. बसमध्ये बसल्यावर माझ्या लक्षात आले, पण तोपर्यंत तो चोर पळूनही गेला होता. दुसऱ्या दिवशी हताशपणे, अगदी दुःखित अंतःकरणाने मी भागवतांना चोरीबद्दल सांगितले. आठ-दहा दिवसांनंतर भागवतांनी माझ्या हातात एक बंद पाकीट ठेवले. म्हणाले, ‘घरी जाऊन उघडा.’ घरी गेल्यावर पाकीट उघडून पाहते, तर त्यात २५० रुपये आणि एका ओळीची चिठ्ठी – ‘तुमचे पैसे चोरीला गेले नाहीत असे समजा.’”
असाच आणखी एक प्रसंग याच लेखात आहे. शेखबाईंच्या यजमानांची नोकरी गेल्यानंतर केवळ भागवतांच्या शिफारशीमुळे त्यांना दुसरी एक नोकरी मिळाली. त्याबद्दल शेखबाईंनी भागवतांचे आभार मानले. त्या लिहितात, “त्यावर ‘त्यासंबंधी काहीही बोलायचं नाही’ अशी ताकीद त्यांनी डोळे मोठे करून आणि उजव्या हाताचे बोट उंचावून मला दिली! असे हे भागवत!”
श्रीपुंनी अनेकांना आर्थिक मदत केली होती, काही लेखकांना त्यांची परिस्थिती बिकट असताना स्वतःच्या घरात अनेक वर्षे मुक्कामाला ठेवून घेतले होते. मध्यंतरी एकदा अनंत हरी गद्रे यांच्या चरित्रलेखनासाठी काही माहिती गोळा करायला मी देवरुख येथे गेलो होतो. त्यावेळी तेथील देवरुख कॉलेज ऑफ आर्ट अँड डिझाइन ही संस्था बघायला मिळाली. देवरुखसारख्या एखाद्या छोट्या गावी असे आर्ट कॉलेज असावे याचे खूप आश्चर्य वाटले होते आणि या कॉलेजसाठी आवश्यक ती दीड एकर जमीन भागवत कुटुंबीयांनी कुठलीही अट न घालता, स्वतःचे नावही कुठे येऊ न देता, देणगी म्हणून दिली आहे ही ऐकून अधिकच आश्चर्य वाटले होते. साहित्यवर्तुळात किती जणांना ही गोष्ट ठाऊक असेल? सत्यकथेत ‘सामाजिक बांधिलकी’चा अभाव होता असा कधीकधी केला जाणारा आरोप म्हणूनच चुकीचा वाटतो. कारण खरी सामाजिक बांधिलकी ही केवळ तुमच्या बोलण्यात किंवा लेखनात असून चालत नाही, ती तुमच्या दैनंदिन जगण्यातही असावी लागते.
अंतर्नादला त्यांनी केलेल्या सहाय्याचा उल्लेख या लेखात पूर्वी आलेला आहे. प्रत्यक्ष कृतीत व्यक्त होणारी ही मदतशीलता केवळ साहित्यक्षेत्रात नव्हे तर आजच्या एकूणच समाजात खूप दुर्मिळ आहे. भागवतांचा मला विशेष भावणारा हा आणखी एक गुण.
शेवटी एक काहीसा वादग्रस्त ठरू शकेल असा मुद्दा इथे मांडावासा वाटतो. ज्या साहित्यसृष्टीला त्यांनी आपले उमेदीचे आयुष्य पूर्णतः वाहिले होते त्या साहित्यसृष्टीबद्दल साधारण सत्तरच्या दशकापासूनच, म्हणजे वयाच्या ऐन पन्नाशीतच, श्रीपु निराश झाले होते असे मात्र मला वाटते. अनेक जुने लेखक त्यांची साथ सोडून अन्य प्रकाशकांकडे गेले, किंवा जे त्यांचे लेखक नव्हते अशा लेखकांनीही मोठी साहित्यिक मान्यता मिळवली हा थोडा व्यक्तिगत, थोडा व्यावसायिक भाग त्या निराशेमागे असू शकतो. ज्यांचे लेखन मौजने परत केले असे एक लेखक पुढे जेव्हा मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले तेव्हा त्याबद्दल बोलताना, “त्यांचे लेखन मी नापसंत केले होते, पण साहित्यिक जगाने ते उचलून धरले, म्हणजे माझी फजितीच झाली ना!” असे उद्गार श्रीपुंनी माझ्यापाशी काढल्याचे आठवते. पण केवळ तेच एकमेव कारण त्यांच्या नैराश्यामागे नसावे. आपल्याला प्राणप्रिय अशा साहित्याचे एकूण प्रभावक्षेत्रच आक्रसत चालले आहे ही जाणीव त्यामागे अधिक मोठ्या प्रमाणात होती. सत्यकथेच्या शेवटच्या अंकामधल्या निवेदनातील “शिवाय ज्यासाठी जगायचे ते पुरेसे व मनासारखे साधत नसेल तर जगणे एवढेच प्रयोजन मानून जीव जगवत राहण्यात स्वारस्यही नसते,” हे वाक्य माझ्या मते सर्वाधिक कळीचे वाक्य आहे. कसदार साहित्याच्या एकूणच आक्रसत चाललेल्या स्रोताकडे ते लक्ष वेधणारे आहे. सत्यकथा बंद होण्यामागचे माझ्या मते हे सर्वाधिक महत्त्वाचे कारण होते.
व्यावसायिक पातळीवर विचार केला तर साधारण साठच्या आणि सत्तरच्या दशकात साहित्यसृष्टीत बरेच बदल होत गेले. साहित्यक्षेत्रातीलही मुंबईचे स्थान कमी होत गेले. चार-पाच अपवाद सोडले तर मुंबईत पुस्तकविक्रीची दुकानेही राहिली नाहीत. प्रकाशन व्यवसायाचे मुख्य केंद्र मुंबईऐवजी पुणे झाले. प्रकाशकही पुण्यात अधिक झाले. मराठवाडा आणि विदर्भाशी नाते जोडणारे अनेक लेखकही त्या-त्या ठिकाणी न राहता प्रत्यक्षात पुण्यातच वास्तव्य करू लागले. मुलांच्या शिक्षणाचा आणि करिअरचा विचार करता ते अपरिहार्यदेखील होते. काळाच्या ओघात पुढे पुण्याचे स्थानही कमी होत गेले. या साऱ्या सामाजिक बदलांचा जाणवू लागलेला एक परिणाम म्हणजे सत्यकथेचे माहात्म्य झपाट्याने आक्रसत गेले. महाराष्ट्र राज्य निर्मितीनंतर सहकारी चळवळीमुळे ग्रामीण भागात आर्थिक सत्ताकेंद्रे निर्माण झाली. जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्या स्थापन झाल्यामुळे राजकीय जागृती व्यापक प्रमाणावर झाली. मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचाही प्रसार झाला. अनेक महाविद्यालये-विद्यापीठे स्थापन झाली. त्यांची स्वतःची स्वतंत्र अभ्यासमंडळे आणि पाठ्यपुस्तके होती. साहित्य अकादमीसारख्या संस्थांवरही आता पूर्वीपेक्षा वेगळ्या मंडळींचा पगडा होता. साहित्यक्षेत्रातही जातींचा, मराठवाडा-विदर्भ अशा विभागांचा स्वतंत्र विचार होऊ लागला. गुणवत्तेपेक्षा सर्वसमावेशकता हा प्रत्येक ठिकाणी निकष ठरत होता. लोकशाहीत ते होणारच होते. मुळातच साहित्यसंस्कृती मुंबई-पुणे सोडून उर्वरित महाराष्ट्रात फारशी कधी रूजली नव्हती. आर्थिक समृद्धी आणि शिक्षण यांच्या जोडीने साहित्यसंस्कृतीचीही तिथे आता तरी वाढ होईल ही अपेक्षा फोल ठरली होती. इंग्रजी माध्यमाच्या शाळा ग्रामीण भागातही झपाट्याने सुरू झाल्या. टीव्ही घरोघर पोचले. या साऱ्यामुळे एकूणच आक्रसत गेलेले मराठी साहित्यक्षेत्र अधिकच आक्रसू लागले.
कर्दळीच्या कोंभाची लवलव ही तिची मुळे जिथे रुजलेली असतात त्या मातीतल्या ओलाव्याची खूण असते असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. साहित्य किंवा कुठल्याही कलेतील चैतन्याची लवलव हीदेखील त्याचप्रमाणे ज्या समाजातून ते साहित्य किंवा कला निर्माण होते त्या समाजातील सांस्कृतिक ओलाव्यातूनच संक्रमित झालेली असते; ती तशी आतूनच उमलून आलेली नसेल तर बाहेरून ती आणता येत नाही. दुर्दैवाने आजच्या समाजात तो सांस्कृतिक ओलावा आटत चाललेला आहे.
श्रीपुंना याची जाणीव अगदी बऱ्याच पूर्वी झालेली होती. पॉप्युलर प्रकाशनाने ५ ऑक्टोबर १९९२ रोजी आयोजित केलेल्या एका समारंभात बोलताना श्रीपु म्हणाले होते,
“आजच आमची नातवंडं मराठीला विन्मुख झाली आहेत. मराठी भाषेचे, वाङमयाचे आणि म्हणून संस्कृतीचे त्यांच्यावर चांगल्या परिचयापुरतेही संस्कार नाहीत. त्यांना मराठी लिहिता येत नाही की वाचता येत नाही. आपले आजी-आजोबा मोठे लेखक-कवी होते, त्यांनी मराठी साहित्यात मोलाची भर घातली, ही त्यांच्या लेखी केवळ माहितीच उरली तर उरेल. त्यांच्या कार्याचं मर्म आणि मोल त्यांना उमगणार नाही, की जिवाला भिडणार नाही. आणि हे केवळ पुण्या-मुंबईसारख्या मोठ्या शहरांतच घडतं आहे असं नाही, पुढारलेल्या सामाजिक वर्गातच घडतं आहे असंही नाही, तर जिल्ह्याच्या व तालुक्याच्या गावीही घडतं आहे. पुढारलेल्यांचं अनुकरण करून सामाजिक प्रतिष्ठा मिळवण्याची स्वाभाविक आकांक्षा बाळगणाऱ्या आजवरच्या मागासवर्गीयांतही घडतं आहे. अशा परिस्थितीत माझ्या तरी मनात एक प्रकाशक म्हणून ‘आपण चांगल्या साहित्याचे प्रकाशन करण्याचा हा खटाटोप कोणासाठी आणि कशासाठी करतो आहोत?’ असा प्रश्न कधीकधी उभा राहतो आणि मनाला खिन्नता येते.” (साहित्याची भूमी, पृष्ठ २१३)
दुसऱ्या कोकण मराठी साहित्य संमेलनात १५ एप्रिल १९९४ रोजी केलेल्या एका भाषणात श्रीपु म्हणतात,
“नवकाव्य आणि नवकथा यांच्या उदयानंतरच्या पन्नास वर्षांतला माझा अनुभव असं सांगतो की, मराठी साहित्यक्षेत्रात त्यांनी निर्माण केलेलं नवचैतन्य आणि नवनिर्मितीची थरारी पहिल्या पंधरा-वीस वर्षांनंतर ओसरू लागली. एखादी कविता, कथा अथवा पुस्तक वाचून माणसं आज नादावून जात नाहीत. वेड्यासारखी, काळाचं भान विसरून, त्याची चर्चा करत नाहीत. साहित्यसंस्थांत त्यांच्यावर तावलेल्या चर्चा होत नाहीत. दैनिकांच्या संपादकीयांतून उलटसुलट मतांचे वाद झडत नाहीत. साहित्यप्रेमातील चैतन्य आणि आवेश मंदावल्यासारखा झाला आहे.” (साहित्याची भूमी, पृष्ठ १४३)
श्रीपु कुठल्या काळाचा संदर्भ देत आहेत ते नीट बघायला हवे. नवकाव्य आणि नवकथेचा काळ म्हणजे मर्ढेकर आणि गाडगीळ यांचे बहारीचे दिवस, म्हणजेच साधारण १९४५ ते १९६० हा कालखंड. त्यानंतरची पंधरा-वीस वर्षे, म्हणजे साधारण १९७०-७५पासूनचा काळ इथे श्रीपुंना अभिप्रेत असावा. त्या काळातच त्यांच्या मते ‘साहित्यप्रेमातील चैतन्य आणि आवेश मंदावल्यासारखा’ झाला होता.
हा निराशेचा सूर श्रीपुंच्या भाषणांतून आणि लेखनातून वर्षानुवर्षे पुनःपुन्हा उमटत राहिलेला दिसतो. २८ सप्टेंबर १९७५ रोजी मौज प्रकाशनाच्या रौप्यमहोत्सवात केलेले त्यांचे भाषण वाचावे. त्यावेळच्या भाषणातही हाच सूर सुस्पष्ट आहे. साहित्यविश्वाबद्दल श्रीपुंच्या झालेल्या निराशेची अशी आणखीही अनेक उदाहरणे देता येतील. “त्या काळात एक दैनिक, एक साप्ताहिक, आणि एक मासिक अशी तीन पत्रे भागवतबंधूंच्या हातात होती. ती एकामागून एक, सर्वच बंद पडावी, यात भागवतबंधूंचा खात्रीने दोष आहे आणि त्यात श्री. पु. भागवतांचा वाटा फार मोठा आहे.” (श्री. पु. भागवत : व्यक्ती आणि संपादक, पृष्ठ १९१-२) हे गंगाधर गाडगीळ यांचे विधान आपल्याला विचारात पाडणारे आहे.
“मी लढाई हरलेला सेनापती आहे,” असे ते माझ्यापाशी एकदा नव्हे तर दोनदा म्हणाल्याचे आठवते. तसे औदासिन्य हा त्यांच्या स्वभावाचाच एक भाग कदाचित असेलही; पण त्याचबरोबर एकूण निराशाजनक साहित्यिक वास्तवाचे त्यांना आलेले ते अनुभवसिद्ध भानही होते.
सत्यकथा ज्या ‘ट्रू स्टोरी’ नावाच्या अमेरिकन मासिकापासून प्रेरणा घेऊन सुरू झाले होते, ते १९१९ साली सुरू झालेले न्यू यॉर्क येथील मासिक आज चार पिढ्या उलटल्यानंतरही चांगल्याप्रकारे चालू आहे हे इथे लक्षात घ्यायला हवे. कारण जे घडले किंवा घडत आहे तो एखाद्या व्यक्तीच्या यशापयशाचा भाग नसून आपल्या एकूण सांस्कृतिक स्खलनाचाच भाग आहे आणि ते स्खलन हा आपल्या चिंतनाचा विषय असायला हवा.
साहित्यातून सांस्कृतिक समृद्धी वाढवण्याचा प्रयत्न करणे हे अंतर्नादने प्रथमपासून आपले जीवितकार्य मानले होते. पण प्रत्यक्षात साहित्य माणसाला अधिक सुसंस्कृत बनवते का याविषयीच शंका यावी असे प्रसंग आपल्या अवतीभवती येतच असतात. वर्षानुवर्षे लेखन-वाचन करणाऱ्यांचे प्रत्यक्षातले वर्तन अनेकदा असंस्कृत असल्याचे आपण बघतो. साहित्यविश्वातच वावरणाऱ्या व्यक्तीला तर वरचेवर येणारा तो कटू अनुभव असतो. अशा परिस्थितीत आपल्या मूळ उद्दिष्टावरील श्रद्धा कायम राहावी यासाठी थोडेतरी आदर्श अवतीभवती असावे लागतात. श्रीपु हा एक तसा आदर्श होता, दीपस्तंभ होता, सुसंस्कृत वाङमयव्यवहाराचा तो मानदंड होता. अंतर्नादला अभिप्रेत असलेली सांस्कृतिक समृद्धी म्हणजे नेमके काय याचे श्रीपु हे एक चालतेबोलते प्रतीक मानता येईल.
श्री. पु. भागवत २१ ऑगस्ट २००७ मध्ये वारले. पण काळाच्या एका मोठ्या पटावर त्यांनी उमटवलेला ठसा आजही काळलाटांनी पुसला गेलेला नाही. त्यांचे साहित्यप्रेम, संपादनकौशल्य, कार्यनिष्ठा आणि सौजन्यपूर्ण स्नेहभाव, तसेच मराठी संपादन-प्रकाशनक्षेत्रात त्यांनी निर्माण केलेला अभिरुचिसंपन्न कर्तृत्वाचा आणि सुसंस्कृत वाङमयव्यवहाराचा मानदंड पुढच्या पिढीलाही मार्गदर्शक ठरेल. जन्मशताब्दीनिमित्ताने त्यांच्या स्मृतीला माझे प्रणाम.

१९२५ सालच्या मौज मासिकाच्या दिवाळी अंकाचे हे मुखपृष्ठ. संपादक म्हणून अनंत हरी गद्रे यांचा उल्लेख यात आहे. गद्रे आणि बालगंधर्व यांचे घरोब्याचे संबंध होते. मराठी नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदाची धुरा गद्रे यांनी बालगंधर्वांकडूनच स्वीकारली होती. हे छायाचित्र बालगंधर्व यांचेच असण्याची खूप शक्यता आहे. मौजेची सूत्रे श्रीपुंकडे येण्यापूर्वीची ही घटना आहे. जाणकारांनी याबाबत अधिक खुलासा करावा ही विनंती.
