रामकथा ही भारतीय संस्कृती आणि धर्माचा एक अविभाज्य भाग आहे. रामायण महाकाव्यातील कथानकावर आधारित अनेक कलाकृती निर्माण केल्या गेल्या आहेत. त्यांमध्ये शिल्पकला हाही एक महत्त्वाचा प्रकार आहे. रामकथेचे शिल्पांकन हे अनेक रूपांत आढळते. अनेक मंदिरांवर रामायणामधील विविध प्रसंगांचे शिल्पांकन पाहायला मिळते. या शिल्पांमध्ये रामायणातील प्रमुख प्रसंग आणि पात्रे यांचे चित्रण आहे. या आगळ्या रामकथेचे निरूपण करताहेत नीलिमा थत्ते.
राजपुत्र आणि राजस्नुषांच्या कौतुकात सारे दंग होते; त्यातच महाराज दशरथांनी रामाला यौवराज्याभिषेक करायचं ठरवलं.
यौवराज्याभिषेकाच्या निर्णयाने कौसल्या – सुमित्रा आनंदून गेल्या; पण कैकेयीच्या महालात वेगळंच नाट्य रंगत होतं. मंथरेने कान भरले आणि कैकेयीने महाराजांकडून दोन वर मागून घेतले…
“भरतालागी द्या सिंहासन रामाला वनवास
मोडू नका वचनास नाथा मोडू नका वचनास”
अत्यंत नाइलाजाने महाराजांना वर द्यावे लागले.
१.महाराज दशरथ पुत्रांसह
२. आनंदलेल्या कौसल्या नि सुमित्रा
३. मंथरा कैकेयी संवाद (उजवीकडे) कैकेयीची दशरथाकडे वचनपूर्तीची मागणी(डावीकडे)
पित्याची आज्ञा शिरसावंद्य मानून राम निघाल्यावर सीता आणि लक्ष्मणही निघाले…खरं रामायण इथे सुरू झालं.
आदौ राम तपोवनादि गमनं हत्वा मृगं काञ्चनम्।वैदेहीहरणं जटायुमरणं सुग्रीवसंभाषणम्।
वालीनिर्दलनं समुद्रतरणं लङ्कापुरीदाहनम्।पश्चाद्रावणकुंभकर्णहननं एतद्धि रामायणम्।।
राम-लक्ष्मण-सीता अगदी शांत मनाने वनात गेले – चौदा वर्षे हसतखेळत घालवून अयोध्येला परतायचं असं ठरवून; पण तसं घडणार नव्हतं. अनेक ऋषींचा आशीर्वाद मिळाला खरं; पण राक्षसांचा त्रासही झाला.
४. सीता व लक्ष्मणासह राम वनात
५. आसनस्थ राम-सीता. पहाऱ्यास सज्ज लक्ष्मण
६.रामसीता यांना ऋषींचे आशीर्वाद. अगदी उजवीकडे लक्ष्मण
खर-दूषण चालून आले. त्यांचा सहज निःपात केला; तर एक वेगळेच संकट आले – रावणाची बहीण शूर्पणखा. रामाने सीतेला सोडून आपल्याला जवळ करावे म्हणून ती लगट करू लागली. मी एकपत्नीव्रत पाळतो असे म्हणून त्याने तिला लक्ष्मणाकडे पाठवले. तिच्या वागण्याने संतापून लक्ष्मणाने तिचे नाकच छाटले. अपमानाने खवळलेली शूर्पणखा रावणाकडे गेली आणि बदला घेण्यास सांगू लागली.
“विरूप झाली शूर्पणखा ही दाशरथींची कृती, सूड घे त्याचा लंकापती’!
७. खर-दूषण वध(डावीकडे) शूर्पणखेचे नाक छाटले(उजवीकडे)
८. शूर्पणखा संतापून रावणाकडे(पट्टडकल)
स्वयंवरात झालेली फजिती, खर-दूषणांचा वध आणि आता शूर्पणखेची विद्रूपता… रावण सूडाने पेटून उठला. त्राटिकेचा(ताटका) पुत्र मारिच याला बोलावले. आई नि भावाच्या मृत्यूचा त्याने बदला घ्यावा म्हणून उद्युक्त केले. सूडाने पेटलेल्या रावणाने एक रडीचा डाव खेळण्याचा बेत आखला – मारिचाने सुवर्णमृगाचे रूप घेऊन भुलवायचे आणि रामाला कुटीपासून दूर न्यायचे; मग रावण येऊन सीतेला पळवणार. आता संन्यस्त जीवन जगणाऱ्या मारिचाने नकार दिला, राम श्रेष्ठ असून त्याच्याविरुद्ध असे काही करू नये हे परोपरीने सांगितले; पण रावणाने जिवाची भीती घातल्यावर त्याच्या हातून मरण्यापेक्षा रामाच्या हातून मरण आले तर चांगले या विचाराने तो तयार झाला.
“झळकती तयाच्या रत्ने शृंगावरती नवमोहफुलासम सुवर्ण अंगावरती,
हे नयन भाळले त्याच्या रंगावरती
ते इंद्रचापसे पुच्छ भासले उडता
मज आणुन द्या तो हरिण अयोध्यानाथा”
श्रीरामांनी सीतेचा हा लाडिक हट्ट पुरवण्याचे ठरवले. लक्ष्मणाला रक्षणासाठी ठेवले; पण मायावी मारिचाच्या हाकांमुळे तोही धावला. मारिच मुद्दामच त्यांना कुटीपासून कसा दूर घेऊन गेला ते फार छान दाखवलंय.
इकडे भिक्षेच्या बहाण्याने येऊन रावणाने सीतेला पळवले. जटायूची एकाकी झुंज अपयशी ठरली.
( हंपी, पट्टडकल, सोमनाथपुर, बसरलु, मार्कंडा, जवागल येथील मंदिरांवरचे शिल्पांकन इथे घेतले आहे. कथा एकच असली तरी शैली, दगडाचा प्रकार, सादरीकरण यांत विविधता बघण्यासारखी आहे. )
९. हंपीची शिल्पे
अ. कांचनमृग मागणी
आ. मारिचवध
इ. सीताहरण- जटायू झुंज-राम जटायू भेट
१०. आता सोमनाथपूर-
. डावीकडे जटायू झुंज. उजवीकडे सीता रावणास भिक्षा देताना- सोमनाथपूर
जटायू राम-लक्ष्मणास रावणाविषयी सांगताना, डावीकडे रावण
मृगाचा पाठलाग व वध
खाली जटायू झुंज. वर रथातून सीतेचे हरण
११. आता बसरलुची शिल्पे –
कांचनमृगाचा पाठलाग
उजवीकडे मारिचवध, डावीकडे रिकामी पर्णकुटी
सुवर्णमृग रामाला भुलवून दूर नेताना, जवागल
रावण-जटायू झुंज, सोमनाथपूर
सीता कपटवेशातील रावणाला भिक्षा घालताना. उजवीकडे त्याचे खरे रूप
मारिचवध- उजव्या कोपऱ्यात खाली फक्त मृगशीर्ष शिल्लक
क्रमश:
