लोकशाहीचा उत्सव आपण नुकताच साजरा केला. निवडणुकीचा निकाल लागला. त्याची व्यक्तिसापेक्ष चिरफाड आपण सध्या करत आहोत. हा उत्सव आपण सर्वांनी साजरा केला. ‘उत्सव’ हा संस्कृत शब्द आहे. त्याला ‘जत्रा’ हा मराठी प्रतिशब्द चालेल का? या विषयावरती एखादा एक्झिट किंवा ओपिनियन पोल घेऊ या का? आम्ही तो पोल रीग करून जत्रा हा प्रतिशब्द चालेल असे उत्तर मिळवले आहे. असो.
जत्रा म्हटले की दोन गोष्टी डोळ्यांसमोर येतात. जत्रेत जमा होणारे हौसे, नवसे, गवसे आणि या सर्व बाबींचा असणारा एक खास असा ग्रामीण बाज. या निवडणुकीनंतर तयार झालेली लोकसभा ही भारताची १९वी लोकसभा. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाल्यानंतर अस्तित्वात आलेली पहिली. या निवडणुकीचे राजकारण बाजूला काढले तर दोन गोष्टींनी माझे लक्ष वेधून घेतले. मतदान यंत्रांबाबत वारंवार होणारी चर्चा व सर्वोच्च न्यायालयात त्याबद्दल झालेली सुनावणी ही पहिली गोष्ट. निवडणूक आयोगाने या यंत्राच्या टीकाकारांना यापूर्वीच हे यंत्र हॅक करून दाखवा असे जाहीर आव्हान दिले होते. कोणाही यंत्रविरोधकांनी हे आव्हान स्वीकारून आपला विरोध साधार असल्याचे आजतागायत सिद्ध केलेले नाही. अनेक तज्ज्ञांच्या मते हे यंत्र व मतदानाची ही पद्धती योग्य आहे. या यंत्राची अचूकता व अभेद्यता वाढावी यासाठी काही तज्ज्ञ त्यात तांत्रिक बदल सुचवीत आहेत. ते अमलात आणण्याजोगे आहेत का याचा निवडणूक आयोग योग्य तो विचार करेलच. आपल्या पराभवांचे खापर या यंत्रांवर फोडणे बंद करण्याची वेळ आता आली आहे.
मला त्रास देऊन गेलेली दुसरी गोष्ट म्हणजे या निवडणुकीदरम्यान महाराष्ट्रातल्या एका उन्मत्त पुढार्याची सर्वत्र पसरलेली चित्रफीत. या चित्रफितीत हे महोदय विरोधी पक्षाच्या एका सामान्य कार्यकर्त्याला शिवीगाळ व दमदाटी करताना दिसले. त्या संवादातले एक वाक्य फार महत्त्वाचे होते – “आज दिवसभर तू गमजा करशील तुला काय करायच्या त्या; पण संध्याकाळी सहानंतर (म्हणजे मतदानाची वेळ संपल्यावर) तुला कोण आहे?” अर्थात संध्याकाळी सहानंतर माझ्याशीच गाठ आहे ही गर्भित धमकी. याला गर्भित धमकी तरी कसे म्हणायचे – ही तर उघड उघड धमकी! आजच्या ग्रामीण महाराष्ट्राचे एक दाहक वास्तव आपल्याला दाखवणारे हे वाक्य.
भारताची ‘इंडिया’ व ‘भारत’ ही दोन रूपे आहेत हे निर्विवाद सत्य आहे; या दोघांचे पर्यावरण वेगवेगळे आहे; त्यांचे समाजकारण, अर्थकारण, वर्गव्यवस्था याही वेगवेगळ्या आहेत. या दोन अंगांमधील आंतरसंबंध कसे आहेत आणि कसे असायला हवेत यावर खरेतर आपल्या देशाचे भवितव्य अवलंबून आहे. हे आंतरसंबंध कसे असायला हवेत हा आपल्या अनेक राष्ट्रीय नेत्यांच्या चिंतनाचा विषय होता. गांधीजींना आपली खेडी स्वयंपूर्ण व आत्मनिर्भर असावीत व दोन मित्र राष्ट्रांतील संबंध जसे असतात तसे दोन गावे किंवा एक गाव व शहर यांच्यातले संबंध असावेत असे त्यांना वाटायचे. त्यांच्या विचारविश्वात शहरांपेक्षा खेड्यांनाच खरे महत्त्व होते. शहरांना त्यांनी फारसे गांभीर्याने घेतले नव्हते असेही म्हणता येईल.
याउलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची विचारधारा होती. ‘शहराकडे चला,’ असा त्यांचा संदेश होता. समाजातल्या मागासवर्गाची भौतिक प्रगती व समानतेची अधिक शक्यता या दोन गोष्टी त्यांच्या या प्रतिपादनामागे होत्या. सुरुवातीचे दर्पोक्तीचे उद्गार भारतीय खेड्यांमध्ये आजही सरंजामी मानसिकता कशी आहे ते दाखवून देतात.गावांमध्ये अजूनही समाजातील एका मोठ्या वर्गाला दुसऱ्यांच्या मर्जीवर अवलंबून राहावे लागत आहे याचे हे प्रतीक आहे. खेड्यापाड्यांतील वंचितांना अशा प्रकारच्या वर्तणुकीपासून कागदोपत्री संरक्षण देणारे कायदे आहेत; पण वास्तव किती भेदक व वेगळे आहे त्याचे निदर्शन हे उद्गार करत आहेत.
शहरांमध्ये सगळे काही अलबेल आहे आणि आपल्याला हवी असणारी समानता सर्वत्र नांदते आहे असे मुळीच नाही; तरीही शहरात असे उद्दाम उद्गार सहजासहजी काढणे शक्य नाही. असे कोणी म्हणू लागलाच तर शहराच्या त्या भागातून इतर भागात स्थलांतर करता येऊ शकते. शहरच सोडावे लागेल अशी शक्यता कमी आहे.
यातून बाहेर पडायचा मार्ग शरद जोशींनी सांगितला होता. शेतीला सर्व प्रकारच्या नियंत्रणांमधून व बंधनांमधून मुक्त करणे हाच तो क्रांतिकारक मार्ग. आजच्या तारखेला तरी ते दिवास्वप्नच आहे. हे स्वप्न प्रत्यक्षात येत नाही तोपर्यंत संध्याकाळी सहानंतर आपल्याला कोणाच्यातरी ताब्यात राहायचे आहे याचे भान ठेवा आणि नीट वागा.
