वाह ताज!
Dmitrij Rodionov/Wikimedia Commons
ताजमहाल ही भारतातील एक आयकॉनिक वास्तू आहे. भारतात येणाऱ्या कोणत्याही परदेशी पर्यटकाला विचारले, की तुम्ही भारतात येऊन काय बघणार आहात; तर त्याचे पहिले उत्तर असेल ताजमहाल!
– एवढे ताजमहालाचे महत्त्व व आकर्षण आहे. भारतातील पर्यटकही याला अपवाद नाहीत. ताजमहाल सर्वांना एवढा का आवडतो? या प्रश्नाचे एक मोघम किंवा वरवरचे उत्तर म्हणजे ताजमहाल ही एक अत्यंत सुंदर वास्तू आहे; परंतु ताजमहाल सुंदर का दिसतो? या प्रश्नाचे उत्तर देणे सहज शक्य नाही; किंबहुना सर्वसाधारण माणूस या अंगाने विचारसुद्धा करीत नाही! असो.
भारतातील प्रसिद्ध वास्तुशिल्पकार व प्राध्यापक कै. माधवराव आचवल यांनी १९५५पासून ताजमहालाच्या वास्तुरचनेमधील सौंदर्याचा अभ्यास करायला सुरुवात केली व जुलै १९७० साली कै.माधवराव आचवलांनी मुंबई मराठी साहित्य संघात ताजमहालावरती एक व्याख्यान दिले. त्या व्याख्यानाच्या आधारावरती श्री.भा.द. साठे यांनी १० मार्च २००७ च्या लोकसत्तेच्या वास्तुरंग पुरवणीत ‘ताजमहालाची अपार्थिवता’ या शीर्षकाचा एक विस्तृत लेख लिहिला. या लेखात ताजमहाल पार्थिव असून अपार्थिव का वाटतो? याचे कै.आचवलांनी जे विश्लेषण केले आहे ते दिलेले आहे. ते थोडे तांत्रिक असल्यामुळे वाचकाला क्लिष्ट वाटण्याची शक्यता गृहीत धरून कै.आचवलांच्या २००७ च्या लेखाचा परामर्श माझ्या पुढील लेखात घेणार आहे.
श्री.भा.द. साठे यांनी मार्च २००९ ते मे २००९ या काळात ११ लेख लोकसत्ताच्या वास्तुरंग पुरवणीतून प्रसिद्ध केले. या ११ लेखांच्या मालिकेतून ताजमहाल या वास्तूने इ.स. १६७० ते इ.स.१९५२ या काळात आलेल्या परदेशी पर्यटकांना कशी भुरळ घातली होती या विषयी लिहिलेले आहे. या परदेशी पर्यटकांनी त्यांच्या प्रवासवर्णनात ताजमहालाच्या सौंदर्याविषयी व या सौंदर्याचा त्यांच्या मनावरती झालेला परिणाम याबद्दल जे लिहून ठेवले आहे त्याचे श्री. भा. द.साठे यांनी संकलन करून ही लेखमाला सिद्ध केली. या लेखमालेच्या आधारावरच मी हा प्रस्तुतचा लेख लिहीत आहे. मला स्वतःला परदेशी लोकांनी ताजमहालाचे जे वर्णन केले आहे ते फारच भावले. माझ्या या लेखाच्या वाचकांनाही ते आवडेल असा माझा विश्वास आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ही वर्णने वाचल्यावरती कै. आचवलांचा लेख समजणे सोपे होईल असे मला वाटते; तसेच हा लेख वाचून ताजमहाल कसा बघावा? त्याचे सौंदर्य कशात दडले आहे? याची कल्पना वाचकांना येईल. यानंतर निवडक पर्यटकांनी केलेले ताजमहाल या वास्तूचे सौंदर्यग्रहण देत आहे.
ताजमहाल इ.स. १६३२ ते १६४८ या काळात बांधला गेला. कोणत्याही गोष्टीचे मूल्यमापन व कलास्वाद काळाचे भान ठेवून करावे लागते म्हणून ताजमहालाच्या निर्मितीचा काळ नमूद केला आहे.
१) इ.स.१६७० साली म्हणजे ताजमहालाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर फक्त बावीस वर्षांनी फ्रॅंको बर्निए या फ्रेंच डॉक्टराने त्याचा व्यापारी मित्र टॅ्व्हिनिए याच्याबरोबर ताजमहाल बघितला. त्यानंतर बर्निएने त्याचा आश्रयदाता – फ्रांसचा त्या वेळचा अर्थमंत्री जीन बॅप्टिस्ट कोल्डबर्ट याला एक पत्र लिहिले. या पत्रात बर्निए म्हणतो की, टॅ्व्हिनिए व माझ्या मते या असाधारण वास्तूचे व्हावे तितके कौतुक झालेले नाही. इतकी भव्य आणि राजेशाही वास्तू आम्ही युरोपात कुठेही पाहिली नाही. आता मला हिंदुस्तान आवडू लागला असल्याने मी असे म्हणत असेन असं तुम्हांला वाटेल; पण तसं मुळीच नाही. मी निश्चितपणे सांगू शकतो की ताजमहाल हे जगातील एक आश्चर्य आहे. इजिप्तमधील पिरॅमिड्समध्ये मला ताजमहालाचे नावीन्य व मानवी कौशल्य जाणवले नाही हे नक्की.
२) ठगांचे बंड मोडून काढणारा इंग्रजांच्या बंगाल रेजिमेंटचा कर्तबगार अधिकारी डब्ल्यू एच स्लिमन याचे सन १८३५ साली ताजमहाल बघण्याचे स्वप्न पुरे झाले. स्लिमनने त्याच्या ‘रॅबल्स अँड रिकलेक्शन ऑफ इंडियन ऑफिशियल्स’ या पुस्तकात ताजमहालाचे तपशीलवार वर्णन केले आहे. स्लिमन या पुस्तकात लिहितो की ताजमहाल या वास्तूचे मी बारकाईने पुन्हा पुन्हा निरीक्षण करीत होतो; वाटत होतं की कुठेतरी एखादी उणीव दिसेल; पण नाही उलट प्रत्येक वेळी एका नवीन सौंदर्यस्थळाचा शोध लागत होता. प्रथम पाहिलेल्या घुमटापासून ते अगदी जवळून बघितलेल्या कोरीव कामातील फुलापानांपर्यंत. खरंतर परत- परत निरीक्षण करताना त्याचे तपशील लक्षात न राहता संपूर्ण वास्तुसमूह एकत्रितपणे माझ्या मनामध्ये घर करून राहिला. स्मृतिपटलावरून ते सौंदर्यचित्र कधीही न पुसून जाणारं आहे. स्लिमन पुढे लिहितो की ताजमहालाच्या समोरच्या चौथऱ्यावर बहुतेक रोज सायंकाळी आमच्या गॉडबी या मित्राच्या रेजिमेंटकडून बँड वादन होत असे तेव्हा खूप छान – प्रसन्न वाटत असे; पण त्यातही खरा आनंद मिळत असे तो ताजमहलाच्या घुमटाखाली कधीकधी वाजवली जाणारी बासरी ऐकण्यात. घुमटापर्यंत पोहोचलेले बासरीचे मंजूळ स्वर्गीय सूर त्या घुमटात घुसून परावर्तित होऊन आमच्या कानांवर येत.
३) जर्मन सैन्यातील कॅप्टन लॅपल्डवॉन आरलिंक हा ब्रिटिश सैन्यात भरती होण्यासाठी सुमारे इ.स.१८४५ साली काबूल येथे आला; परंतु तोपर्यंत अँग्लो-अफगाण युद्ध संपले होते; त्यामुळे तो ब्रिटिश सैन्यात भरती होऊ शकला नाही; मग आरलिंकने शांतपणे हिंदुस्थानचा प्रवास करण्याचे ठरवले. आग्रा येथे जाऊन त्याने ताजमहाल बघितला; त्याचे सविस्तर वर्णन त्याच्या ट्रॅव्हल्स इन इंडिया – १८४५ या पुस्तकात वाचायला मिळते. आरलिंकने लिहून ठेवले आहे की, मुख्य दालनाच्यावरती असलेल्या घुमटाखाली घुमणारा ध्वनी जेव्हा परावर्तित होतो तेव्हा एक प्रकारचे सुश्राव्य संगीत निर्माण होते. नुसता ध्वनी जर संगीतमय होत असेल; तर डब्ल्यू. एच. स्लिमनने ऐकलेल्या बासरीच्या मंजूळ स्वरांनी काय परिणाम केला असेल याची वाचकाला कल्पना करता येईल. आरलिंक पुढे वर्णन करतो, ‘आग्नेय कोपऱ्यातील मिनारावरून टपोऱ्या चांदण्यात नाहून निघालेला हा महाल मला परीकथेत शोभावा असा विलोभनीय वाटला. चांदण्या रात्रीची नीरव शांतता, आसमंत नाना फुलांच्या सुगंधाने दरवळलेला, संथपणे वाहणारा यमुनेचा वळणदार रूपेरी प्रवाह अशा वातावरणात झालेले ताजमहालाचे दर्शन मनावर कायमचे कोरले जाते. रस्त्यावरच्या बाजारामधल्या अधून मधून लुकलुकणाऱ्या दिव्यांनी वेढलेले आग्रा शहर अशा चांदण्या रात्रीच्या प्रहरी सुंदर झिरझिरीत वस्त्राने अच्छादलंय असे वाटते. येथे मला वाचकांच्या एक गोष्ट लक्षात आणून द्यावीशी वाटते ती म्हणजे कॅप्टन आरलिंक ज्या काळात ताजमहाल बघत होता त्या काळात आजच्या मॉडर्न जगातील इलेक्ट्रिक लाईट, मोटारी, बसेस वगैरे अनेक गोष्टी नव्हत्या; त्यामुळे त्या वेळी असलेली शांतता, गडद अंधाराच्या पार्श्वभूमीवर चमकणाऱ्या चांदण्या व त्यांचा प्रकाश याची आपण आज कल्पनाही करू शकत नाही; कारण आपल्याला याचा कधी अनुभवसुद्धा आलेला नसतो.
आत्तापर्यंत मी फ्रेंच ब्रिटिश व जर्मन प्रवाशांनी केलेले वर्णन जरा सविस्तरपणे दिले आहे. श्री. भा. द. साठे यांनी सुमारे अकरा परदेशी प्रवाशांनी ताजमहालाच्या सौंदर्याचे केलेले वर्णन त्यांच्या लेखमालेतून करून दिले आहे. ती सर्व वर्णने या एका लेखातून देणे शक्य नाही; परंतु या इतर प्रवाशांची नावे तरी ऐकून घेऊ या!
१)प्रसिद्ध इंग्रज लेखक एडवर्ड लियर (१८८७४)
२) इंग्रज कवी आणि पत्रकार सर एडविन अर्नोल्ड (१८८६)
३)स्वीडनचा राजपुत्र विल्यम.(१९१५)
कंसातील आकडे प्रवाशांच्या भेटीचे वर्ष दर्शवतात.
फर्स्टलेडी एल्नाॅर रूझवेल्ट हिने १९५१-५२ च्या सुमारास ताजमहालाला भेट दिली. ती म्हणते, ‘ताजमहालाच्या अनुपम सौंदर्याने माझ्या मनाचा ठाव घेतला. चार कोपऱ्यांतून वर येणारे मिनार, त्यांच्या मधोमध निळाशार आकाशात झेपावणारा अतिशय विलोभनीय घुमट, घुमटावरचा निमुळता होत जाणारा कळस हे सर्व काही अवकाशामध्ये अधांतरी असल्यासारखे भासत होते. ताजमहाल माझ्या मनात मी मरेपर्यंत घर करून राहणार आहे,’ ती पुढे म्हणते की माझे वडील मला नेहमी म्हणत असत हिंदुस्थानात मी (एल्नाॅरच्या वडिलांनी) पाहिलेली अविस्मरणीय वास्तू म्हणजे आग्र्याचा ताजमहाल. त्यांच्या विधानाचा अर्थ आज माझ्या लक्षात आला. असो!
ताजमहालाच्या सौंदर्याची तारीफ करणाऱ्या परदेशी प्रवाशांच्या काळाचाही संदर्भ वाचकांनी लक्षात घ्यावा. हे सर्वजण १८व्या आणि १९व्या शतकातील आहेत. या काळात युरोपियन सत्ता साम्राज्य स्थापन करण्यास निघाल्या होत्या. त्यांना स्वतःच्या सामर्थ्याचा, संस्कृतीचा गर्व होता. असे असतानासुद्धा हे प्रवासी ताजमहालाच्या सौंदर्याने भारून गेलेले आहेत. ताजमहालाच्या गारुडाने त्यांना मोहित केले आहे. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सौंदर्याचा आस्वाद घेण्यासाठी जी मनाची तरलता लागते ती लष्करी पेशातील व्यक्तींकडेसुद्धा होती. प्रवासवर्णने लिहून ठेवून ऐतिहासिक ऐवज, पुरावा निर्माण करण्याचा युरोपियन लोकांचा जो गुण आहे त्याचे महत्त्व भारतीयांना अजून समजलेले नाही. राल्फ फीच हा इंग्रज व्यापारी व प्रवासी इ. स. १५८३च्या सुमारास भारतात आला. त्याला पोर्तुगिजांनी पकडून एक वर्षभर गोव्यात कैद करून ठेवले. या काळात त्याला मसाल्याच्या व्यापारात अतोनात फायदा आहे हे कळले. त्याने प्रवासवर्णन लिहिले. ते वाचून इ.स. १६०१मध्ये ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली व त्यातून पुढे इतिहास घडला तेव्हा प्रवासवर्णनाचे सामर्थ्य काय असते हे वाचकांच्या लक्षात येईल.
