मोठी माणसे ९ : शंकर वैद्य 

शंकर वैद्यांशी माझी ओळख व्हायला कारणीभूत झाला तो महाराष्ट्र टाइम्स (मटा) ने १९७५-७६ मध्ये चालवलेला मासिक काव्यस्पर्धेचा उपक्रम. पहिल्याच मासिक स्पर्धेचे परीक्षक होते मंगेश पाडगांवकर आणि स्पर्धेसाठी आलेल्या ५००० कवितांतून पाडगांवकरांनी मी पाठवलेल्या ‘होड्या’ कवितेची पहिल्या क्रमांकाने निवड केली आणि तिचे भरभरून कौतुक केले. त्यानंतरच्या मासिक स्पर्धेसाठी दर महिन्याला एखादा नामवंत साहित्यिक असायचा. शांता शेळके, रमेश तेंडुलकर, नारायण सुर्वे आणि शंकर वैद्यही परीक्षक होऊन गेले. त्या स्पर्धेसाठी निवडल्या गेलेल्या काही कवींचे कविसंमेलन दूरदर्शनने आयोजित केले आणि कवींबरोबर परीक्षकांनाही कवितांवर भाष्य करायला बोलावले. तेथे शंकर वैद्य पहिल्यांदा भेटले. तेजस्वी गौरवर्ण, देखणे, रुबाबदार आणि भेदक डोळ्यांचे. मला वाटते पँटीत न खोचलेला पूर्ण बाह्यांचा रंगीत बुशशर्ट त्यांनी घातला होता. (माझा कविमित्र निरंजन उजगरे तर त्यांना मराठी कवितेतील देवानंद म्हणायचा!) त्यांनी आपण होऊन माझी ओळख करून घेतली होती आणि माझ्या कविता आवडत असल्याचे सांगितले होते. 

    १९७७ च्या ऑगस्ट महिन्यात माझी ‘त्याची इच्छा’ कविता स्त्री मासिकात प्रसिद्ध झाली. त्या वेळी शंकर वैद्य मटामध्ये त्या त्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या उत्कृष्ट कविता निवडून प्रसिद्ध करीत असत आणि अनपेक्षितपणे त्यात माझी ‘त्याची इच्छा’ कविता आली. त्या वेळी मी विडंबन कविताही लिहीत होतो. त्यांतल्या काही मासिकांतून प्रसिद्धही होत होत्या. अशा विडंबन कविता मी मटाकडे मासिक निवडीसाठी विचारार्थ पाठवल्या आणि मला थेट शंकर वैद्यांचे पत्र आले – छोट्या तिरक्या सुंदर हस्ताक्षरांत, शीर्षरेषा न देता.‌ मी पाठवलेली  विडंबने वैद्यांना आवडली होती; विशेषतः त्यातली कल्पकता व चातुर्य. ‘ही  विडंबने मूळ कवितेशी योग्य ते संधान राखतात आणि स्तिमित करणारी कलाटणी देत हसवतात,’ असे त्यांचे म्हणणे होते; पण मटाच्या मासिक निवडीत अशा कविता देता येणार नव्हत्या. त्यांचा गुच्छ एकत्रितपणे कुठेतरी प्रसिद्ध व्हायला हवा असे त्यांना वाटत होते. पत्रातच त्यांनी माझ्या अन्य काव्यलेखनाची ही चौकशी केली होती.  विडंबने करताना माझे स्वतंत्र काव्यलेखन उणावू नये असेही त्यांना म्हणायचे असावे;  पण त्यांनी घेतलेली माझ्या विडंबनांची नोंद मला सुखावून गेली.

    १९८० च्या सुरुवातीस ‘ग्रंथाली’ने कविता दशकाची हा संग्रह प्रसिद्ध केला. पाच नामवंत संपादकांनी १९७० ते १९८० च्या दशकात काव्यलेखन सुरू केलेल्या आणि येत्या दशकात प्रभावी ठरू शकतील असे संपादकांना वाटते अशा दहा कवींची निवड करून त्यांच्या प्रत्येकी दहा कविता त्यात प्रसिद्ध केल्या होत्या. त्याचा प्रकाशन समारंभ मुंबईच्या मराठी ग्रंथसंग्रहालयात झाला.‌ दहापैकी नऊ कवी या समारंभाला आले होते आणि निमंत्रित वक्त्यांमध्ये होते शंकर वैद्य. गंभीरपणे बसलेल्या आम्हां कवींना उद्देशून वैद्य म्हणाले, “दशकाचे कवी अशी सनदच तुम्हांला आता मिळालेली आहे आणि त्याचा आनंद तुम्ही घेतला पाहिजे.”

    १९९० च्या अखेरीस अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन (अभामसासं)  बार्शीला भरले. मी त्यासाठी निमंत्रित कवी नव्हतो; पण त्यात नवोदितांच्या कविसंमेलनासाठी कविता मागवल्या होत्या. मी पाठवल्या आणि  त्या नवोदितांच्या कविसंमेलनासाठी बार्शीला गेलो. मुख्य कविसंमेलनाचे सूत्रसंचालन नारायण सुर्वे करणार होते. माझ्याबरोबरचे काही ‘दशकाचे कवी’ संमेलनाला आले होते; त्यांनी सुर्व्यांना भेटून मुख्य कविसंमेलनात आपली वर्णी लावून घेतली होती. ते मलाही घेऊन सुर्व्यांकडे गेले. मी त्यांना आधीच्या पुण्याच्या कविसंमेलनात गाजलेल्या पाडगांवकरांच्या ‘सलाम’चे विडंबन वाचतो असे सुचवले. ते पुण्याच्या साहित्य संमेलनाचेच विडंबन होते; म्हणून ते या कविसंमेलनात समायोचित होईल असे मला वाटत होते. माझे बोलणे ऐकून सुर्वे गप्पच झाले आणि त्यांनी माझी निवड केली नाही. अशी विडंबन कविता – तीही आयत्या वेळी घेतली तर वाद निर्माण होतील अशी भीती त्यांना वाटली होती असे मला नंतर कळले. संमेलनाला वैद्य निमंत्रित कवी होते; पण ते जेवढे कवी होते तेवढेच प्राध्यापक होते. आमच्यासारखे अनेक तरुण कवी त्यांच्याभोवती जमून कविता समजावून घेत असत आणि वैद्य सर अत्यंत तळमळीने रात्री उशिरापर्यंत कवितांची उकल करण्यात रमून जात. स्वतःचीच नव्हे तर इतरांची कविताही वैद्य सरांच्या नित्य चिंतनाचा भाग होता.

    १९८२मध्ये माझा पहिला कवितासंग्रह ‘होड्या’ प्रकाशित झाला. मी मुंबईला गेलेलो असताना मुद्दाम वैद्य सरांना भेटून तो संग्रह भेट दिला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी मला पत्र लिहिले;  त्यात त्यांनी म्हटले  होते, “तुम्ही काल भेट दिलेला तुमचा कवितासंग्रह लागलीच वाचला. संग्रह मला आवडला. हे कळवण्यासाठीच हे पत्र. संग्रहाविषयी कुतूहल मनात होतेच; तो वाचायला घेतला तो तुम्ही दिला म्हणून; तुमच्यासाठी. वाचायला लागल्यावर ही भूमिका आपोआप नाहीशी होत गेली; संग्रह आणि मी हे नाते निर्माण होत गेले. त्याच्या ओढीतूनच संग्रह संपूर्ण वाचला गेला; आवडला. तपशीलवार प्रतिक्रिया कधीतरी भेटीत सांगेन.” त्यांचे पत्र वाचून मला अर्थातच खूप आनंद झाला. 

   १९८२च्या डिसेंबर महिन्यात ग्रंथालीने ‘ग्रंथयात्रा’ कार्यक्रम आयोजित केला होता. ग्रंथालीची बस वेगवेगळ्या साहित्यिकांना आणि ग्रंथालीच्या कार्यकर्त्यांना घेऊन जवळजवळ तीन आठवडे महाराष्ट्रभर फिरत होती. वेगवेगळ्या गावांत साहित्यिक कार्यक्रम आणि ग्रंथविक्री असा तो उपक्रम होता. शेवटच्या आठवड्यात मीही त्यात सामील झालो आणि त्या वेळच्या औरंगाबादमध्ये मी दाखल झालो. औरंगाबादच्या एका दिवसात वैद्य सरही भेटले. थंडीचे दिवस होते.  वैद्य सर स्वेटर घालूनच बसले होते. ‘केव्हाही थंडी पडली तरी स्वेटर आपला घातलेलाच असावा,’ असे त्यांचे म्हणणे होते. 

    १९८६ साली १९८२-८३ या वर्षाकरिताचे राज्य पुरस्कार जाहीर झाले आणि काही ध्यानीमनी नसताना सर्वोत्कृष्ट कवितासंग्रहासाठीचा ‘केशवसुत’ पुरस्कार होड्या संग्रहाला मिळाला. त्या काळात दलित साहित्य जोमात होते आणि पुरस्कार मुख्यतः दलित साहित्याला मिळत असत; पण माझ्या या अदलित संग्रहाला तो पुरस्कार मिळाला आणि त्याचबरोबर तो विभागून नामदेव ढसाळ यांच्या ‘तुही यत्ता कंची’ या संग्रहालाही.  पुरस्कार समारंभानंतर झालेल्या भोजनप्रसंगी पारितोषिक विजेते आणि परीक्षकही आलेले होते; तिथे वैद्य सर भेटले. ते त्या वर्षीच्या काव्यपुरस्कारांचे परीक्षक होते. ते म्हणाले, “तुम्हांला पारितोषिक जाहीर झाल्यावर मी तुम्हांला अभिनंदनाचे पत्र पाठवू शकलो नाही; कारण मीच त्या संग्रहाची निवड केली होती. तुमचा ‘होड्या’ संग्रह मला अतिशय आवडला. मराठी काव्यक्षेत्रात तुमची कविता एक वेगळा आणि चांगला प्रवाह निर्माण करणारी आहे.”

    त्या काळात मुंबई दूरदर्शनवर ‘प्रतिभा प्रतिमा’सारख्या कार्यक्रमात कविसंमेलने होत असत. एका कविसंमेलनासाठी मी निमंत्रित होतो आणि कविसंमेलनाची थीम होती निसर्गकविता.  मी वेगळ्या निसर्गकविता लिहीत नसे; पण माझ्या अनेक कवितांत निसर्ग असे. संमेलनाचे सूत्रसंचालन वैद्य सर करीत होते. मी माझी ‘अर्धे मिनिट’ ही कविता वाचली. त्यात सार्वजनिक स्वच्छतागृहाच्या झरोक्यातून दिसणाऱ्या, बाहेर पत्र्यावर पावसात भिजत बसलेल्या कावळ्याचे वर्णन होते. कवी संमेलनानंतर वैद्य सरांनी मला त्या कवितेत आलेल्या काही तपशिलांचे प्रयोजन विचारले. मला सांगता आले नाही. मी म्हणालो,”हा प्रसंगच किती कॅज्युअल आहे हे दाखवण्यासाठी ते आले आहेत.” वैद्य सरांनी नकारार्थी मान हलवली. ते म्हणाले,”कवितेत काहीच कॅज्युअल नसते.” नंतर विचार करताना मला ते पटले. त्या तपशिलांनाही कवितेत काही प्रयोजन होते; फक्त मला ते तेव्हा समजले नव्हते. हे तपशील आपोआपच आले होते.

एका ‘प्रतिभा प्रतिमा’ कार्यक्रमात हास्य-कविसंमेलन आयोजित केले होते. मोठे मोठे कवी त्यात होते. मंगेश पाडगांवकर, शांता शेळके, वसंत सावंत; अगदी संगीतकार यशवंत देवसुद्धा. संचालनाची जबाबदारी शंकर वैद्यांकडे होती. मीही निमंत्रित होतो. मोठ्या कवींना सांभाळत संचालन करायचे दडपण वैद्य सरांवर होते. त्यांनी मला कार्यक्रमाआधी त्यांच्या घरी भेटायला बोलवले आणि चर्चा केली होती. कार्यक्रमाआधी सर्व कवी जमले होते. गप्पाटप्पा चालल्या होत्या. माझ्याजवळ येऊन वैद्य सर म्हणाले, “तुम्ही नर्व्हस होऊ नका – माझ्यासारखे!”  मी म्हणालो, “नाही नाही, मी माझ्यासारखाच नर्व्हस होईन!” माझे उत्तर वैद्य सरांना इतके आवडले की त्यांनी ते पाडगांवकरांना सांगितले. पाडगांवकरही हसले म्हणाले, “There he will have his originality!” मी त्या कविसंमेलनात ग्रेसच्या ‘जिवाची वैष्णवी’ चे विडंबन ‘ब्युटीपार्लरवाली’ वाचले. वैद्य सरांनी त्याची खुमासदार प्रस्तावना केली होती. स्टेजवरच बसलेल्या शांताबाईंनी त्यातल्या ओळी-ओळीला खळखळून हसून दाद दिली आणि माझी ‘ब्युटीपार्लरवाली’ बाजी मारून गेली.

१९८६ साली मला राज्य पुरस्कार मिळाला असल्याने, १९८७ च्या अभामसासंमध्ये मी निमंत्रित कवी होतो आणि संचालन करत होते वैद्य सर. तिथे मी वैद्य सरांच्या सूचनेनुसार ‘होड्या’ कविता वाचली आणि तिला भरभरून दाद मिळाली; नंतर नामदेव ढसाळांनी त्यांची ‘गांडू बगीचा’ कविता वाचली आणि मुंबईच्या त्या काळातल्या श्रोत्यांनी तिला हुट आउट केले; त्यामुळे ढसाळ नाराज झाले होते. 

१९९० च्या पुण्याच्या अभामसासंसाठीही मी निमंत्रित होतो आणि सूत्रसंचालक होते वैद्य सर. माझी ओळख वैद्य सरांनी ‘होड्या आणि खोड्या करणारे कवी’ अशी करून दिली होती. खोड्यांमध्ये त्यांना विडंबन कविता अभिप्रेत होत्या. पुण्याच्या कवींमध्ये मी आणि नीलिमा गुंडी होतो. दोघांनीही अगदी वेगवेगळ्या बाजाच्या कविता वाचल्या होत्या. 

रामदास फुटाणे दरवर्षी १२ मार्चला सादर करत असलेल्या ‘हास्यधारा’ कार्यक्रमात १९९३ या वर्षी, मी निमंत्रित कवी होतो आणि त्याच कार्यक्रमात  वैद्य सरांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले होते. त्याच दिवशी मुंबईत बॉम्बस्फोट झाल्याची बातमी आली. त्या काळी मोबाईल फोन नव्हते आणि वैद्य सर काळजीत होते. सरोजिनी बाईंना घरी फोन लावण्यासाठी खटपट करीत होते. फोन काही लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते मुंबईला जाऊ शकले.

१९९३ मध्ये मी काही कामानिमित्त मुंबईला गेलो होतो. रविवार मोकळा होता आणि त्याच दिवशी डोंबिवलीत काव्यरसिक मंडळाचे वार्षिक संमेलन होते. मी संध्याकाळच्या कविसंमेलनाला गेलो. वैद्य सर त्याचे अध्यक्ष होते. वैद्य सरांनी मलाही कविता वाचायला बोलावले. कविसंमेलनानंतर मंडळाचे सचिव डॉ. प्रल्हाद देशपांडे यांच्या घरी जेवण आणि अनौपचारिक मैफल होती. मीही गेलो. वेगवेगळे कवी आपापल्या कविता सादर करीत होते. कविमित्र अशोक बागवेने मी केलेल्या विडंबनांचा विषय काढला. मला विडंबने सादर करायची फर्माईश झाली. वैद्य सर उपस्थित होते म्हणून मी त्यांच्याच ‘उत्तररंग’ या सुट्या सुट्या दहा तुकड्यांच्या भावकवितेचे विडंबन सादर केले. त्याला वैद्य सरांसह सर्वांनीच हसून दाद दिली. मुळातील वैद्य सरांची कविता अतिशय उत्कट तरल आणि सूचक आहे; पण ही तरलता आणि सूचकता ताणली तर कसा विनोद निर्माण होईल ते माझे विडंबन दाखवीत होते. पुढे वैद्य सरांनीही अनेकदा आपल्या या कवितेचे विडंबन श्रोत्यांना सांगितले होते. विडंबनविषयक माझ्या लेखात मी वैद्य सरांची ही कविता आणि मी तिचे केलेले विडंबन उद्धृत केले होते आणि वैद्य सरांची त्याला सहर्ष अनुमती होती.

१९९५ मध्ये माझा पुढचा स्वतंत्र कवितांचा संग्रह ‘मनातले घर’ प्रकाशित झाला आणि त्या संग्रहाला पुन्हा महाराष्ट्र सरकारचा त्या वर्षीच्या उत्कृष्ट कवितासंग्रहासाठीचा ‘बालकवी पुरस्कार’ मिळाला. परीक्षक होते शंकर वैद्य. वैद्य सरांसारखा उमद्या मनाचा काव्यरसिक परीक्षक असल्यामुळेच माझ्यासारख्या कुठल्याच गटात किंवा गोटात नसलेल्या कवीच्या कवितासंग्रहांना हे राज्य पुरस्कार मिळू शकले.

त्यानंतर प्रसंगोपात वैद्य सर भेटत राहिले. भेटल्यावर आस्थेने माझ्या लेखनाची चौकशी करीत. ‘अजून तुम्हांला पुष्कळ मोठा पल्ला गाठायचा आहे,’ असे त्यांचे सांगणे असे. मी २००० या वर्षी अंतर्नादमध्ये लिहू लागलेली ‘अगा कवितांनो’ ही कविता-विषयक लेखमाला वैद्य सरांना अतिशय आवडत होती. ‘हे लेखन मौलिक आहे,’ असा त्यांचा अभिप्राय होता.

२००७ मध्ये सरोजिनी वैद्य यांचे निधन झाले. वैद्य सरांवर हा मोठा आघात होता. मी लगेच त्यांना भेटायला जाऊ धजलो नव्हतो. २००८ मध्ये मी माझा नवा कवितासंग्रह ‘उघडे पुस्तक’ घेऊन त्यांना भेटायला गेलो. ते आता आपले पहिले माटुंग्याचे घर सोडून प्रभादेवीच्या आसपास एका छोट्या घरात राहत होते. मी येणार असल्याचे त्यांना आधी कळवले होते. माझ्यासाठी त्यांनी इडल्या मागवल्या होत्या. त्यांनी स्वतः उठून इडल्या आणि स्वतः केलेला चहा मला दिला. त्यांच्या उत्साही डोळ्यांतली उदासी स्पष्ट दिसत होती. जुजबी बोलून आणि माझा संग्रह देऊन मी परत आलो.

वैद्य सरांची शेवटची भेट मुंबई आकाशवाणीवरील एका कविसंमेलनात झाली. मला वाटते, वैद्य सर त्या संमेलनाचे अध्यक्ष होते. परत जायला आकाशवाणीने वैद्य सरांसाठी गाडी दिली होती. त्याच गाडीने मी त्यांच्याबरोबर परत निघालो. वाटेत बोलताना, सरांनी ‘होड्या’ कवितेचा विषय काढला. त्या कवितेत ‘बंबी होडी, नांगर होडी, शिडाची आणि साधी होडी अशी ओळ मी काय हेतूने  लिहिली आहे,’ असा त्यांचा प्रश्न होता. कवितेचा निवेदक आपल्याला किती वेगवेगळ्या प्रकारच्या होड्या येतात ते सांगण्यासाठी तसे म्हणतो आहे असे मी सांगितले. त्यांना ते पटले नाही. होडीचा प्रत्येक प्रकार हे एक प्रतीक आहे असा त्यांनी अर्थ लावला. हा अर्थ सुंदर होता आणि माझ्या कवितेला अधिक सुंदर करणारा होता. हीच माझी आणि वैद्य सरांची शेवटची भेट. २३.९.२०१४ रोजी ते हे जग सोडून गेले. 

वैद्य सर लहानपणापासून अखेरपर्यंत लेखन करीत होते. त्यांचे पहिले पुस्तक ‘आला क्षण गेला क्षण’ हा एक कथासंग्रह होता. त्यांचा पहिला कवितासंग्रह कालस्वर १९७१ या वर्षी प्रसिद्ध झाला; पण त्यांचा दुसरा कवितासंग्रह ‘दर्शन’ यायला आणखी १७ वर्षे जावी लागली. प्रत्येक कवितासंग्रह आशयदृष्ट्या स्वयंपूर्ण आणि संपृक्त हवा अशी त्यांची भूमिका होती. त्यासाठी कितीही थांबायची त्यांची तयारी होती. दर्शन संग्रह प्रसिद्ध झाल्यानंतर ते पुढे सोळा वर्षे हयात होते; पण त्यांचा तिसरा संग्रह मात्र निघाला नाही. ते खूप कविता लिहिणाऱ्यांपैकी नव्हते आणि संग्रह प्रकाशित करण्याबाबत उत्सुकही नव्हते. पाडगांवकरांचे अनेक कवितासंग्रह निघाले. त्यांचा ‘अखेरची वही’ संग्रह निघाल्यानंतर वैद्य सरांनी, पाडगांवकरांना ‘यापुढे अखेरची वही भाग दोन…भाग तीन…असे अनेक संग्रह काढा’ अशा शुभेच्छा दिल्या होत्या! वैद्य सरांच्या  कितीतरी भावसुंदर कविता असंग्रहित आहेत. त्यांनी इतर कवींच्या कवितांची संपादनेही केली. कुसुमाग्रजांच्या कवितांचे त्यांनी दोन संग्रह संपादित केले. महाराष्ट्रभर वैद्य सर व्याख्याने देत हिंडले; त्याला कारण त्यांचे कवितेवरचे प्रेम हेच होते. आपल्या प्रसिद्धीबद्दल मात्र ते अजिबात महत्त्वाकांक्षी नव्हते, जशा सरोजिनीबाई होत्या आणि सरोजिनी बाईंचे कार्यकर्तृत्वही झळाळून उठले. त्याची कदरही झाली. तसे वैद्य सरांचे झाले नाही. मोठ्या कालखंडात कवितालेखन करूनही वैद्य सरांच्या संपूर्ण कवितेची समीक्षा समीक्षकांनी केली नाही. ते कुठल्याच गटात नव्हते म्हणूनच की काय, साठोत्तरी कवींप्रमाणे त्यांचा मराठी कवितेच्या इतिहासातही खास उल्लेख होत नाही. वास्तविक त्यांची भावकविता अतिशय आशयसंपन्न आहे; पण मिरवणारी नाही. या कवितेची पुरेशी दखल घेतली गेली नाही. वैद्य सरांनी अनेक शिष्य घडवले. त्यांनी वैद्य सरांच्या अप्रकाशित कवितांचा शोध घेऊन त्यांचे प्रकाशन आणि त्यांच्या संपूर्ण कवितेची समीक्षा ही कामे हाती घ्यायला हवीत असे फार फार वाटते. हे केवळ वैद्य सरांसाठी नाही तर मराठी कवितेसाठीही आवश्यक आहे.

Author

Leave a Reply