अष्टनायिकांपैकी वासकसज्जा, लाटानुप्रास, साकी वृत्त असा हा प्रयोग आहे. या दोन्ही गोष्टींचं थोडं स्पष्टीकरण :
लाटानुप्रास
अनुप्रास हा भाषेच्या अलंकारांपैकी मोहक असा दागिना. अनुप्रास म्हणजे पुनरावृत्ती – ती अक्षरांची, शब्दांची किंवा वाक्यांची असू शकते. अनुप्रासाच्या विविध प्रकारांपैकी एक लाटानुप्रास.
शब्दर्थयोः पौनरुक्त्यं भेदे तात्पर्यमात्रतः लाटानुप्रास इत्युक्तो|
लाटानुप्रासाचं वैशिष्ट्य काय?
लाटानुप्रासात शब्दांची पुनरावृत्ती होते; शब्दाच्या पुढे किंवा मागे आणखी एक शब्द येतो त्याने शब्दाचा अर्थ बदलतो.
याचं उदाहरण
स्मेरराजीवनयने नयने किं निमीलते|
पश्य निर्जितकन्दर्पं कन्दर्पवशगं प्रियम्||
स्मेरराजीवनयने नयने…
उमललेल्या कमळासारखे नेत्र असलेल्या तू… नयने – डोळे का बंद केले आहेस?
निर्जितकन्दर्पं – कंदर्पवशगं
कामाला सौंदर्याने पराभूत करणारे आणि कंदर्पवशगं – कामाला वश झालेले
या पुनरावृत्तीमुळे आणि अर्थबदलामुळे काव्याला आगळे शाब्दिक आणि अर्थसौंदर्य प्राप्त होते.
लाटानुप्रास आणि समुद्राच्या लाटा यांचा काहीही संबंध नाही. लाट देशातील कवींना प्रिय असलेला हा अलंकार म्हणून तो लाटानुप्रास. यालाच शब्दगत अनुप्रास असेही म्हणतात.
विघ्ने विघ्नेश्वरसा कौरवकटके पळात कैवारी
विघ्ने हा शब्द दोन वेळा आला; पण पुढे ईश्वर शब्द लागून त्याचा अर्थ पालटला.
ते अल्प अल्पबळरिपु
हे आणखी उदाहरण.
यालाच शब्दगत अनुप्रास किंवा शब्दानुप्रास असंही म्हणतात.
लाटानुप्रासाचा प्रयोग करायचं मनात आलं आणि मनात विषय आला अष्टनायिका! नृत्यातला लोभस आणि प्रगल्भ सादरीकरणाचा भाग. या नायिकांचं विश्व नायकाभोवती गुंफलेलं असतं. इथे रंगवली आहे वासकसज्जा. वासक म्हणजे पलंग. शब्दशः अर्थ शयनगृहात शय्येची तयारी करून ठेवणारी ती वासकसज्जा! तिच्या प्रियकरानं तिला सांगितलं आहे, ‘आज रात्री मी नक्की येणार आहे.’ त्याच्या सहवासाची तिला ओढ लागलेली आहे. तिनं शय्या सजवली आहे, स्वतः साजशृंगार केला आहे आणि आतुरतेने वाट बघत आहे.
हे लिहायच्या वेळी जयदेवाच्या गीतगोविंदातला एक श्लोक वाचनात आला.
श्लिष्यति चुम्बति जलधरकल्पम् ।
हरिरूपगत इति तिमिरमनल्पम् ॥ ६
राधा मिलनासाठी आतुरली आहे. ती रात्रीचा अंधार बघते, तो अंधार तिला श्रीकृष्णासारखा भासतो आणि ती त्यालाच मिठी मारते. हे वाचताना कृष्ण, कृष्णपक्ष, कृष्णनिशा असे शब्द मनात आले आणि कवितेचा मार्ग सुकर झाला.
३)कठीण शब्द १)मन्मथ – कामदेव
२)दधिस्तेन — स्तेन चोर. दही चोरणारा.
साकी ८, ८, ८,४
वासकसज्जा
उगवे दिन तो, चढे दिनमणी, दिनचर्या गोपांची|
गो दोहूनी, रानी गोधन, गोरस मथुरे, नेती||१||
विकल असे मन, मन्मथ मंथत, मथणी घुसळत, राहे|
मनी ये काम , कामातुर ती, कामज्वर तो वाढे||२ ||
श्रवते मुरली, मुरलीधर तो, अधरी धरितो, पावा|
निळ्यासावळ्या, वर्ण श्यामशा, श्यामसुंदरा, ध्यावा ||३||
चित्त नसे स्थिर, तो चित्तचोर चित्तवृत्ति आंदोळी|
रासकलीला, लीलाधर तो, मनात खेळे, होळी||४||
रिताच डेरा, घुसळे राधा, स्मरे न दधि – दधिस्तेना|
आठवी हरी, हरिप्रिया ती, हरपुन बसली, भाना||५||
शृंगाराच्या, खुणा मनोमन, मनमोहन तो, माझा|
हरखुन उठला, मग रोमरोम, रोमांचित ती, राधा||६||
वाट पाहते, कधी ये रात, रातराणीहि, बहरे|
सजती वासक, वासकसज्जा, त्या षोडश शृंगारे||७||
टपोर पुष्पऽ, पुष्पराज तो, दरवळ भरुनी, राही|
सुगंधित शेज, शेजगृहे सुखमोहर शिंपित, जाई||८||
दूध केशरी, शांती उदरा, दामोदरा स्वहस्ते |
तनू ती मोर, मोरमुकुटधर, आठव राधे, लाजे||९||
लाजलाजुनी, हळूच शय्या, शय्यागारा, पाहे|
पुन्हा पुन्हा ते, मंचकी नयन, कमलनयन तो भासे||१०||
ओघळते ती, गाली लज्जा, लज्जावंती, राधा|
मुखाभोवते, वेढुनि हस्ता, पद्महस्तसन्नीधा||११||
दर्पणात मग, देखे बिंबा, कृष्णऽबिंबा पाही|
धावत दारापाशी राधा, राधारमणा, बाही||१२||
मनी गुंजत्या, हरिप्रीतीने, ते बिंबचि प्रतिबिंब|
तन्मय तल्लिन, श्रीकृष्णाशी, रूपे ती तद्रूप||१३||
तिला नसे परि, त्याची जाणऽ, अजाण मन ते, साधे|
धावत जाउन, रात्री काळ्या, काळ्याला ती, शोधे||१४||
दूर राहिले, कुठे कुंजवन, कुठे कुंजवनमाळी|
मधुसाठी करि, गुणगुण मधुकर, मधुबोलातुर होई||१५||
अवतीभवती पसरे, सावळ, अंधुक सावळमूर्ती||१६||
नेत्रि दाटले, पाचही प्राण, प्राणेश्वर ते दिसती|
पक्ष कृष्ण तो, कृष्णा रजनी, रजनीकर नभि, नाही |
भासते कृष्ण, कृष्णप्रियेसी, कृष्णनिशा अंधारी||१७||
फसून बोले, श्यामरातीसि, श्यामसावळा, आला|
आलिंगित ती, कृष्णयामिनी, कृष्णसावळी, बाधा||१८||
हरीचा विरह, विरहार्ता ती, जळाविना मासोळी|
सत्त्व रजऽ अन तमोगुण मनी, त्रिगुणांची ती होळी||१९||
हरि हरि स्मरते, ओठी तो जप जपमाळा तनु झाली|
कृष्णाची सखि सखिभावाच्या, कल्लोळाने न्हाली||२०||
ऐहिक बंध नि, अनुबंधहि ते, तुटल्या रेशिमगाठी|
तनमन निज ते, जाहले वेणु, वेणुगोपाळ साथी||२१||
तन मन रंगे, एकची रंग, श्रीरंगरंग ल्याली|
हरिचे झाले, जीवन अवघे, देहि विदेही, झाली ||२२||

