मोठी माणसे ८ : दिलीप पुरुषोत्तम चित्रे 

   दिलीप पुरुषोत्तम चित्रे हे नाव मी प्रथम सत्यकथेच्या (किंवा मौजेच्या) १९६४ च्या दिवाळी अंकात वाचले. मला वाटते, ‘आणि गुरुदत्त मेलेला आढळतो’ अशी त्यांची कविता होती. कविता पूर्ण आकळण्याचे माझे वय नव्हते; पण ही कविता अंकातील इतर कवितांपेक्षा वेगळी होती आणि म्हणूनच माझ्या लक्षात राहिली. ही कविता केवळ त्या अंकातल्या इतर कवितांपेक्षा वेगळी होती असे नाही.  आज विचार करता असे वाटते की, ही कविता स्वतः दिलीप पुरुषोत्तम चित्र्यांच्या नंतरच्या कवितांपेक्षाही वेगळी होती; शिवाय दिलीप पुरुषोत्तम चित्रे असे लांबलेले संपूर्ण नावही ते नाव लक्षात राहायला कारणीभूत झाले असावे.

   दिलीपजी प्रत्यक्ष भेटले, ते मला वाटते –  १९७६-७७ या वर्षी – पुण्यात झालेल्या एका नवोदितांच्या साहित्य संमेलनात. दिलीपजी त्या संमेलनाला अध्यक्ष म्हणून आले होते. दूरदर्शनवरच्या कविसंमेलनात ओळखीचा झालेला कविमित्र निरंजन उजगरे मुंबईहून या कार्यक्रमासाठी आला होता. तो माझ्याकडे आला आणि त्याच्याबरोबर मीही या कवी संमेलनाला गेलो – नवोदित कवी म्हणून. दिलीपजींनी अध्यक्षीय भाषणात, ‘कवी कितीही प्रसिद्धी पावलेला असला; तरी तो आपली नवी कविता लिहिताना नवोदितच असतो,’ असे मत व्यक्त केले होते. निरंजनने या संमेलनाची सुरुवातच आपल्या ‘माकडवाला’ या कवितेच्या वाचनाने केली . मीही या संमेलनात माझी एक कविता वाचली; पण इतर कवींच्या कवितांचा दर्जा पाहता आपण उगीचच शिंगे मोडून या कविसंमेलनात आलो की काय असे माझ्याजवळ निरंजनने बोलून दाखवले. दिलीपजींशी तिथे फारशी जानपहचान होऊ शकली नाही. 

   १९७८ या आंतरराष्ट्रीय बालक वर्षानिमित्त अभिरुचि मासिकाने विविध साहित्य मागवले होते आणि मीही त्यासाठी कथा, कविता, लेख, विडंबने असे सर्व साहित्य पाठवले  आणि काय आश्चर्य ! मला खुद्द अभिरुचिच्या संपादकांचे पु.आ.उर्फ बाबुराव चित्रे यांचे काळ्या शाईतले, मोठ्या अक्षरांतले पत्र आले. ‘नवे हिरे सापडणे हा संपादकाचा भाग्ययोग असतो’ असे त्यांनी म्हटले होते. सर्व साहित्य त्यांनी अभिरुचिच्या दिवाळी अंकात छापले. माझे विडंबनपर लेखन वाचून, त्यांना त्यांचे पूर्वीचे सदर लेखक पुरुषराज अळुरपांडे (पु. ल.देशपांडे, अलुरकर, मं.वि. राजाध्यक्ष) यांचे वादसंवाद सदर आठवले. तसे लेखन मी अभिरुचिसाठी करावे असे त्यांनी मला फर्मावले आणि मी ‘अभिरुचि’चा लेखक झालो आणि बाबुरावांना प्रिय झालो .

 पुढे  एकदा मी मुंबईला दूरदर्शनवरच्या एका कविसंमेलनासाठी गेलो असताना; त्याच दिवशी मुंबई साहित्य संघात दिलीपजींच्या ‘मिठू मिठू पोपट’  या नाटकाचा,  मला वाटते, पहिलाच प्रयोग होता. मी मी तो पाहायला तिथे गेलो; तर बाबुरावांनी मला हाताला धरून निमंत्रितांमध्ये नेऊन बसवले. दिलीपजींचे नाटक तर छान होतेच; प्रयोगही उत्कृष्ट झाला. विहंगनायक आणि सुनीला प्रधान काम करत होते. 

दिलीपजींच्या  ‘कवितेनंतरच्या कविता’ या कवितासंग्रहाला  कऱ्हाड पुरस्कार जाहीर झाला आणि बाबुरावांनी मला त्या कार्यक्रमासाठी कऱ्हाडला बोलावले. मी पुण्याहून थेट कार्यक्रमस्थळी गेलो.‌ यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला.  त्याच सुमारास मंगेश पाडगावकरांच्या ‘सलाम’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला होता. दिलीपजींनी आपल्या भाषणात पाडगावकरांच्या कवितेवर आणि त्यांच्या सादरीकरणावर तोंडसुख घेतले. ‘असे कवी कवितेचे बघ्ये निर्माण करतात आणि कवितेचे नुकसान करतात’ असे त्यांनी म्हटले. इतर  वक्त्यांनी  आणि परीक्षणकर्त्यांनी ‘आधुनिकता हा दिलीपजींच्या कवितेचा मोठा गुण आहे’ असे म्हटले; मात्र वक्त्यांपैकी प्रा. स.शि. भावे यांनी ‘आधुनिकता हा काही कवितेच्या मोठेपणाचा निकष नाही,’ असा मुद्दा मांडला. कार्यक्रमानंतर श्रीनिवास कुलकर्णी यांच्या घरी निमंत्रितांना जेवण होते. बाबुरावांनी मलाही आग्रहाने नेले. रस्त्याने जाताना आम्ही पुढे होतो आणि दिलीपजी आणि त्यांचे मित्र मागून चालत येत होते. ‘कविता दशकाची’ त्याच सुमारास प्रसिद्ध झाले होते.  माझ्या कविताही त्यात प्रसिद्ध झालेल्या होत्या आणि त्याच्या संपादक मंडळात मंगेश पाडगावकर होते. मला उद्देशून ‘धसक्याची कविता’ असा टोमणा दिलीपजी आणि त्यांच्या मित्रांनी मारला. जेवणानंतर अनौपचारिक कविसंमेलन झाले. बाबुरावजींनी मलाही कविता म्हणायला सांगितले. दिलीपजींच्या कार्यक्रमाला सुसंगत होईल म्हणून मी दिलीपजींच्या ‘प्रेषिताच्या डोळ्यात असतो प्रकाशाचा स्क्रू’ या कवितेचे मी केलेले विडंबन ‘बिढारांच्या डोक्यात असतात जन्मजात अग्रेसर स्क्रू ड्रायव्हर’ वाचतो असे म्हटले. दिलीपजींनी अत्यंत खिलाडूपणे ‘मी मूळ कविता आधी वाचतो म्हणजे श्रोत्यांना विडंबनाची गंमत कळेल,’ असे सुचवले. त्यांनी मूळ कविता वाचल्यावर मी त्याचे विडंबन वाचले. हे विडंबन अभिरुचिमध्ये दिलीपजींच्या मूळ कवितेसह प्रसिद्ध झाले होते. मी ते वाचताच तिथे उपस्थित असलेले चंद्रकांत पाटील एकदम उसळले. हा सगळा पाडगावकर गटाचा चित्र्यांविरुद्धचा कट आहे असे म्हणू लागले. माझी होड्या कविता पाडगावकरांनी निवडली असल्याने मी त्यांच्या गटाचा कट्टर कवी असल्याचे त्यांनी गृहीत धरले होते. असे काही नसल्याचे बाबुरावांनी त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला. शेवटी यशवंतरावांनी असे वाद न संपणारे असतात असे म्हणत पाटलांना थांबवले. दिलीपच्या कवितेचे विलक्षण प्रेम असणाऱ्या बाबुरावांना मी केलेले विडंबन खूप आवडले  होते.  गमतीचा भाग म्हणजे, पाडगावकर हे कवीच नव्हेत असे मानणाऱ्या चंद्रकांत पाटलांना आता महाराष्ट्र सरकारने मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धन पुरस्कार दिलेला आहे.

दिलीपजी पुण्यात येऊन स्थायिक झाल्यावर, बाबुराव वरचेवर पुण्याला येऊ लागले.  पुण्याला आले की माझ्या घरी नक्कीच येत. आपला मुलगा दिलीपच्या कर्तृत्वाबद्दल आणि आपला मुलगा दिलीपच्या कवितेबद्दल आणि एकूणच कर्तृत्वाबद्दल  बाबुरावांना अपार कौतुक होते. भले दिलीपजींच्या मनात वडिलांबद्दल किती का अढी असेना!  ती त्यांच्या वागण्या-बोलण्यात कधी कधी कवितेतही दिसायची. ‘संस्कृतीसाठी बलिदान करण्याच्या जिद्दीने ते रावाचे रंक झाले’ असा उल्लेख दिलीप यांच्या कवितांत आहे (भुंडं टेकाड, चित्रे यांचा वाडा…इ.). दिलीपजींनी मॉडेल कॉलनीत घर घेतल्यावर , त्यांचं येणं जाणं फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरून म्हणजे माझ्या घरासमोरून होत असे.‌ एकदा दिलीपजी आणि भालचंद्र नेमाडे असेच चालत चालत माझ्या घरासमोरून चालले होते. मी फाटकातच होतो. मी त्यांना अभिवादन करून वर माझ्या घरी यायचे निमंत्रण दिले.‌कोणताही अनमान न करता ते माझ्या घरी आले आणि त्यांच्या एकमेकांशी गप्पा चालूच राहिल्या.

मीही मग मुद्दाम दिलीपजींच्या घरी जाऊ लागलो. दिलीपजी अमेरिकेतल्या आयोवा विद्यापीठात, आंतरराष्ट्रीय लेखन कार्यक्रमाचे दोन वर्ष फेलो होते.  अनिल अवचट यांनी हा कार्यक्रम  नंतर अटेंड केला होता, त्यासंबंधी एक लेखही लिहिला होता. हा कार्यक्रम आपल्यालाही अटेंड करता यावा असे मला वाटत होते. त्यासाठी काय करावे लागेल हे विचारण्यासाठी मी दिलीपजींना भेटलो; पण त्यांनी फारसा उत्साह दाखवला नव्हता.

त्यांच्या घरी गेल्यावर त्त्यांचे चालू असलेले अनेक उपक्रम पाहून थक्क व्हायला होई. चित्रकला, शिल्पकला , संगीत सर्वच कलांत त्यांना रुची आणि गती होती. गोदाम चित्रपट तर त्यांनी दिग्दर्शित केला होता. अनेक चित्रपटांसाठी पटकथा लेखन केले होते. वीस माहितीपट निर्माण केले होते. काही चित्रपटांना संगीतही दिले होते. मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांत त्यांचे लेखन आणि अनुवाद चालू असत. 

माझ्या ‘होड्या’ या कवितासंग्रहाचा अनुवाद इंग्रजीत कविता लिहिणाऱ्या मकरंद परांजपे यांनी केला होता. तो ‘बोट्स’ नावाने दिल्लीच्या डी.के. पब्लिशर्सने प्रसिद्धही केला. तो मी दिलीपजींना दिला. काही दिवसांनी त्यांना या पुस्तकाबद्दल विचारायला गेलो; तेव्हा त्यांनी पुस्तकाबद्दल प्रतिकूल  प्रतिसाद दिला; पण तो माझ्यासाठी कॉम्प्लिमेंट होता. ते म्हणाले, ‘तुमची कविता साधी आहे; पण सोपी नाही.  अनुवादात ती सोपी वाटते.’  अनुवाद हे स्वतंत्र कवितेइतकेच जिवंत रसरशीत असायला हवेत. दिलीपजींनी स्वतः तसे केले होते.  

दिलीपजी माझ्या इतरत्र प्रसिद्ध होणाऱ्या कवितांबद्दल कधी बोलत नसत. त्यांच्या पत्नी विजया मात्र त्यांच्या वाचनात आलेली माझी कविता आवडली तर तसे आवर्जून सांगत असत. 

काळाने दिलीपजी आणि त्यांच्या पत्नींवर अनेक आघात केले. त्यांचा मुलगा भोपाळच्या गॅस दुर्घटनेने ग्रस्त झाला होता. तो निवर्तला. पुढे दिलीपजींना कर्करोगाने ग्रासले आणि त्यातच ते २००९ साली कालवश झाले .

कविता, कथा, कादंबऱ्या, लेख, नाटक सर्वच साहित्य प्रकारांत त्यांनी असामान्य लेखन केले आहे. साहित्य अकादमीचा कवितेसाठीचा आणि अनुवादासाठीचा असे दोन्ही पुरस्कार त्यांना एकदमच लाभले.

 त्यांच्या कवितेविषयी सांगण्यासाठी मला विंदांचे उद्गार  उद्धृत करावेसे वाटतात. ते करतो आणि थांबतो. विंदा दिलीपजींच्या ‘एकूण कविता’ संग्रहाबद्दल बोलताना म्हणतात, “संग्रह अद्भुत आहे; पण अद्भुत शब्द तितकासा खरा नव्हे. अद्भुत नव्हे भूत आहे. पंचमहाभूतांपैकी एक. याचा अर्थ मला तो ‘समजलेला’ नाही; म्हणजे एखाद्या चांगल्या समीक्षकाला समजतो त्या अर्थाने समजला नाही; पण भावला – मनस्वी भावला. ऐन मध्यरात्री घनदाट अरण्यातून शिवालयाकडे पूजेला जाणाऱ्या  सुसरीच्या पाठीवर बसलेल्या अप्सरेप्रमाणेच. म्हणजेच तुझ्या ‘कवितेनंतरच्या कविता’ या खरे म्हणजे कवितेपूर्वीच्या कविता आहेत; म्हणूनच मोलाच्या. या कवितेचे विशेषसे  अनुकरण होण्याची शक्यता नाही ही फार चांगली गोष्ट. एक दिलीप चित्रे हा मराठीचा भाग्योदय; पण दहा दिलीप चित्रे ही महाभयंकर घटना ठरेल!”

हेमंत गोविंद जोगळेकर

Author

Leave a Reply