पन्नास वर्षांची अक्षरयात्रा

   उतार वयात आपण जुने हिशेब चाळत बसतो. मागच्या काळात रमायला आवडते सत्तरी पार केलेल्या आमच्यासारख्यांना! सहज हिशेब करताना आठवले : आपली पहिली कादंबरी ‘अंधारातल्या सावल्या’ १९७३ साली प्रसिद्ध झाली – त्याला या वर्षी ५० वर्षे पूर्ण झाली! काळ असा चंद्र यानाच्या वेगाने धावतो. या निमित्ताने मागे वळून साहित्यिक प्रवासाची उजळणी करावीशी वाटली.

  तसा मी शाळेत असल्यापासून लिहायला लागलो. लेखन वाचनातून उगवते. शालेय जीवनात खूप वाचले  : फडके,खांडेकर,स्वा. सावरकरांपासून,श्री. ना. पेंडसे, दळवी,नवरे, पु. ल., अत्रे, गोखले, गाडगीळ, माडखोलकर असे सर्व काही… सुरुवात कवितेपासून झाली असावी. ६६ साली नागपूरच्या एका मासिकात लेख प्रसिद्ध झाला. पहिली कथा अनुराधा मासिकात ६८ साली प्रकाशित झाली; मग तरुण भारतमध्ये लिहायला लागलो. मी इंजिनियरिंगच्या तिसऱ्या वर्षाला असताना उन्हाळ्याच्या सुटीत पहिली कादंबरी लिहिली. ती तशीच पडून होती. पुढे मेनका, माहेर, वसंत, राजस, वसुधा, सुदर्शन अशा विविध मासिकांतून कथा प्रकाशित व्हायला लागल्या. एक-दोन कथांना पारितोषिके  मिळाली; तेव्हा आत्मविश्वास वाढला. पुढे एम. टेक. झाल्यावर पहिली नोकरी मुंबईला लागली. त्या काळात प्रचंड वाचन… लेखनदेखील वाढले. तेव्हा पेटीत पडून असलेले कादंबरीचे हस्तलिखित बाहेर काढले अन् हिंमत करून पुण्याला बेहेरे ( मेनका प्रकाशन) यांना दिले पाठवून. ‘साभार परत’ची वाट बघत राहिलो; पण आश्चर्य म्हणजे त्याचे स्वीकृतीचे पत्र आले! माझा माझ्यावरच विश्वास बसेना. आधी मासिकातून अन् नंतर पुस्तकरूपाने कादंबरी प्रसिद्ध होणार होती. त्यांनी काही सूचना केल्या होत्या; त्यानुसार किरकोळ बदल करून, पुनर्लेखन करून हस्तलिखित पाठवले. मेनकाचे वैशिष्ट्य हे की मासिकातून कादंबरी प्रसिद्ध होताच रसिक वाचकांची पत्रे  यायला सुरुवात. माझ्यासाठी हा अनुभव सुखद होता. काही महिन्यांतच पुस्तकाच्या प्रती कल्याणच्या पत्त्यावर मिळाल्या. मला स्वर्ग दोन बोटे उरल्यासारखे वाटले.

    या यशाच्या झुल्यावर झुलत असताना मला नवी कल्पना सुचली. आय.आय.टी. खरगपूरला असताना मी माझ्या मित्र-मैत्रिणींना नियमित पत्रे लिहीत असे. प्रथमच घर सोडल्याने आलेले एकटेपण विसरायचा तो एक प्रयत्न होता. या पत्रांचे स्वरूप वेगळे होते. ती  ख्यालीखुशालीची पत्र नव्हती. विचारांच्या आदानप्रदानातून स्वतःचे अन् दुसऱ्याचे व्यक्तिमत्त्व  घडविण्याचा तो एक प्रयोग होता. विज्ञान तंत्रज्ञान शिकताना नवनवीन प्रयोगांची सवय झाली होती. लेखनात मी असे अनेक प्रयोग केले. पत्रांच्या माध्यमातून लिहिलेल्या या कादंबरीचा जन्म कल्याणचा. आय. आय. टी.ची पार्श्वभूमी असलेली मराठीतली एकमेव कादंबरी होती; शिवाय त्यात केवळ एकाच व्यक्तीची पत्रे होती. पत्रोत्तरे नव्हती. हाही नवा प्रयोग. हेही लिखाण मी बेहेरे यांनाच पाठवले – तेही त्यांनी ताबडतोब स्वीकारले. ७४ साली आधी मासिकातून अन् नंतर पुस्तकरूपाने पत्रांजली कादंबरी प्रसिद्ध झाली. या कादंबरीला वाचकांनी – विशेषकरून तरुणांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. शेकडो पत्रं आली. अजूनही या कादंबरीचे चाहते भेटतात. आता मी मेनका प्रकाशनाचा लेखक झालो होतो. यानंतर एका पाठोपाठ एक कादंबऱ्या प्रसिद्ध केल्या. मेनकाचा वाचकवर्ग प्रचंड आहे, दाद देणारा आहे. कमीत कमी शब्दांत योग्य ती संपादकीय प्रतिक्रिया देऊन लेखकाला प्रोत्साहन देत, हवे तसे लिहून घेण्याचे कसब बेहेरे यांच्यात होते. मी त्यांना भेटलोदेखील नव्हतो. सगळा व्यवहार पोस्ट ऑफिसद्वारे! ज्या प्रकारचे लेखन मेनकात येत असे; त्या प्रकृतीचे माझे लेखन नव्हते; तरी मी बेहेरे यांच्या मर्जीतला लेखक होतो हे विशेष! आता विविध दिवाळी अंकांतदेखील माझ्या कथा प्रकाशित व्हायला लागल्या. दरम्यान नागपूरहून एक कादंबरी आणि एक कथासंग्रह प्रसिद्ध झाला झाला. मेनकाबरोबर दिलीपराज प्रकाशन, अनघा, मेहता, साकेत असे प्रकाशक स्नेह वर्तुळात आले. मधल्या काळात नागपूरहून एक कवितासंग्रह देखील प्रसिद्ध झाला. तिथले – विदर्भ लेखक संघाचे मामा गंधे यांनी एकाच व्यासपीठावर एकाच वेळी १०० कवितासंग्रह प्रसिद्ध करण्याचा जागतिक रेकॉर्ड केला. त्यात माझ्या संग्रहाला सुरेश भट यांच्या हस्ते पुरस्कारदेखील मिळाला. एरवी शासकीय किंवा इतर पुरस्कार मिळाल्याचे भाग्य माझ्या कुठल्याही पुस्तकाला लाभले नाही हेही तितकेच खरे. माझ्या कुठल्याही पुस्तकाचे समारंभात प्रकाशन झालेले नाही. वाचकांचा मात्र उत्तम प्रतिसाद लाभला. माझे घर, पोटपाणी लेखनावर अवलंबून नव्हते. आपले लेखन जास्तीत जास्त रसिक वाचकांपर्यंत पोहचावे हा एकमेव उद्देश. तो मला मिळालेल्या प्रकाशकांनी पूर्ण केला याचे समाधान आहे.

गेल्या काही वर्षांत एकेक करून चांगली मासिके बंद झाली. या साहित्यिक व्यवहारात, व्यापारात खोलवर जाण्याचे कारण नाही; पण लेखकांसाठी दरमहाचे व्यासपीठ बंद झाले हे खरे; त्यामुळे कथालेखन दिवाळी अंकांपुरते मर्यादित झाले. या बदलाला सामोरे जात मी वृत्तपत्रातले स्फुट लेखन वाढवले. आधीही लिहीत होतोच; पण गेल्या काही वर्षांत सामाजिक, शैक्षणिक विषयावरचे लेखन वाढले. हा वाचक वर्ग वेगळा. त्यांची दाददेखील वेगळी. वृत्तपत्राची छाप,पोचसुद्धा वेगळी. मी कुठल्याही गटाशी संबंधित नसल्याने मटा,तरुण भारत, सकाळ, लोकसत्ता, लोकमत, सामना, देशोन्नती, पुण्यनगरी, पुढारी अशा सर्व प्रमुख पेपरांत वेळोवेळी कमी-अधिक प्रमाणात; पण सातत्याने लिहिले. हे लिखाण महाराष्ट्रात कानाकोपऱ्यात पोहोचले याचे समाधान आहे.

दोन वेगळ्या प्रयोगांविषयी लिहिणे गरजेचे आहे. १९९० या कादंबरीची कल्पना मी बेहेरे यांना ८९ अखेरीस दिली. दरमहा मी एक प्रकरण लिहिणार. त्या महिन्यात घडलेल्या ताज्या घटनांची पार्श्वभूमी त्यात असणार. एका कुटुंबाची कथा… त्याची फक्त रूपरेखा कळवली. नेमके कथानक कसे फुलेल – माहिती नाही, कसे संपेल – माहिती नाही; तरी बेहेरे यांनी ही कल्पना उचलून धरली – त्यात रिस्क असूनही स्वीकारली. एरवी हातात हस्तलिखित नसताना कादंबरी स्वीकारणे म्हणजे गंमत नव्हे; पण बेहेरे यांचा माझ्या लेखनावर विश्वास होता. हा प्रयोग यशस्वी झाला. यांतली काही प्रकरणे तर मी परदेशातून पाठवली आहेत! पुढे दहा वर्षांनंतर हाच प्रयोग पुन्हा केला. त्याच कुटुंबाची दहा वर्षांनंतरची कथा! हे लेखन ९९-२००० असे २४ महिने चालले! बेहेरे यांनी या प्रयोगाला महाकादंबरी असे नाव दिले! त्या काळात मेनका प्रकाशन बंद करण्याचे ठरत होते. आवरासावर सुरू होती; पण माझ्या कादंबरीचे प्रपोजल आल्याने त्यांनी आपला निवृत्ती निर्णय पुढे ढकलल्याचे त्यांनीच मला सांगितले! बेहेरे यांनी प्रकाशित ,संपादित केलेली माझी ‘नव्या शतकाच्या उंबरठ्यावर’ ही शेवटची कादंबरी. त्यानंतर ते गेलेच. माझ्या प्रत्येक संपादक,प्रकाशक यांच्याकडून मला काही न काही शिकता आले. अनुभव चांगले वाईट दोन्ही असले; तरी ते मला समृद्ध करणारे होते. लेखनातून मिळालेले मानधन मोजण्याची मला कधीच गरज भासली नाही. माझे वास्तव्य महाराष्ट्राबाहेर असल्याने कुण्याच संपादक,प्रकाशकांची भेट,बोलचाल कधी झाली नाही. सगळे व्यवहार पोस्टचे .आपल्याकडे लेखक, प्रकाशक, संपादक यांच्यातील आर्थिक व्यवहार हे कधीच स्पष्ट नसतात. त्यात लॉजिक शोधण्यात अर्थ नसतो. सगळा एकतर्फी कारभार.  आपले लेखन जास्तीत जास्त वाचकांपर्यंत पोहोचावे हेच लेखकाचे उद्दिष्ट असते. त्यासाठी प्रकाशक, संपादक हे एकमेव साधन असते. मला सुदैवाने ( काही अपवाद सोडल्यास) चांगले संपादक, प्रकाशक लाभले. त्यांची वितरण व्यवस्था छान होती; त्यामुळे महाराष्ट्रभर माझी पुस्तकं पोहोचली. कानाकोपऱ्यांतून प्रतिसाद मिळाला. हेच माझे खरे मानधन मी समजतो.

मी स्वतःला साहित्यिक वगैरे समजत नाही. मला कुठल्याही संमेलनाची निमंत्रणे येत नाहीत. लिहिताना संशोधन, अभ्यास, बैठक यांत मी गुंतत नाही. ‘जो लिहितो तो लेखक,’  या व्याख्येप्रमाणे मी एक सामान्य लेखक आहे; तरीही माझ्या लेखनावर प्रेम करणारा, ते पुन्हा पुन्हा वाचणारा,आवडल्याचे आवर्जून कळविणारा वाचक वर्ग मला लाभला आहे; हे मी माझे सद्भाग्य समजतो. काही दिवाळी अंकांचे संपादक सातत्याने आवर्जून माझे साहित्य प्रसिद्ध करतात याचा अभिमान वाटतो. 

१२ कादंबऱ्या,१२ कथासंग्रह, ८ लेख संग्रह, १ कवितासंग्रह अशी एकूण ३३ पुस्तकं खाती जमा झाली आहेत. दोन-तीन येत्या काही महिन्यांत प्रसिद्ध होतील. विविध मासिकांतून ,वृत्तपत्रांतून प्रकाशित लेखांची संख्या ५५०, कविता १५३, कथा २६५ असा एकूण लेखनप्रपंच! मुळात इलेक्ट्रॉनिक इंजिनीयरिंगचे संशोधन,अध्यापन, आस्थापन अशा प्रोफेशनल जबाबदाऱ्या सांभाळून केलेले हे लेखन आहे; त्यामुळे ही तारेवरची कसरतच म्हणावी लागेल. तोल सांभाळला गेला हे नशीब!

आता एकूणच पुस्तकप्रकाशन क्षेत्रात मंदी आली आहे. इथले व्यावहारिक, व्यावसायिक गणित पार बदललेले आहे. जुने जाणते प्रकाशक गेले. व्यवहार नव्या पिढीच्या हाती आले. त्यानेही फरक पडतोच. जोपर्यंत लेखक,प्रकाशक,संपादक यांचे सूर जुळत नाहीत तोपर्यंत काही खरे नाही. याही क्षेत्रात व्यावसायिक कारणाने घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे असे खेदाने म्हणावे लागते!

Author

Leave a Reply