बांधवगड : व्याघ्रदर्शन 

 .            

    तशी ही आहे  २००९ ची गोष्ट. जुन्या गोष्टींचा कधीकधी वेगळाच आनंद असतो. कालौघात  तिकडची गर्दी, बंधने  वाढत जातात.  अशा वेळी  त्या जुन्या गोष्टी स्मरून त्याविषयी पुन्हा एकदा  वाचायला, लिहायला आणि तो निवांतपणा आठवायलाही खूप छान वाटते.  अशा एका बिनगर्दीच्या वेळची ही गोष्ट.    

               पेपरमध्ये जाहिरात बघितली. व्याघ्रदर्शनाची ही सहल  होती. जंगलसफारी  नेणारी  ही कंपनी होती. घराजवळच असल्याने लगेच चौकशीला गेले.  तारखा सोयीच्या होत्या, दोन मैत्रिणी बरोबर यायला तयार झाल्या;  मग लगेच पैसे भरून टाकले. त्यांनी नियमावली आणि टोपी, टी-शर्ट दिले. टी-शर्ट मात्र मापाचे नव्हते.

              पुण्यातून निघून ट्रेनने सकाळीच  कटनीला गेलो. तवेरा, क्वालिस, सुमो, अशा गाड्या तयार होत्या.  उन्हाळा असल्यामुळे ए.सी.तही घाम फुटला;  पण पाण्यावर आलेले वाघ बघायला मिळावेत म्हणून अशा जंगलसफारी उन्हाळ्यातच असतात. गाडी थेट मोगली हॉटेलच्या दारात जाऊन उभी राहिली. अरण्यातच असावं असं ते हॉटेल होतं. 

             पहिल्याच दिवशी एका पाणवठ्यावर पाण्याला तोंड लावून बसलेला वाघ बघितला. तिथेच तो नंतर शांत बसून राहिला. पाणीही स्थिर होतं, त्याचं प्रतिबिंब सुंदर दिसत होतं. शेजारी झाडावर गरुड बसला होता, तो दुर्बिणीतून दिसत होता. अंधारून यायला लागलं होतं. आम्ही निघणार तेवढ्यात तो वाघ उठला, मागे फिरला. त्या काठाला समांतर झाला, दोन पावलं चालला आणि मग त्याला काय झालं कोणास ठाऊक! सरळ आडवा झाला, पाय पोटाशी घेऊन झोपला. कुशीला वळला… आम्ही त्याच्या अंगड़ाइयां मजेत बघत होतो. कौतुकाच्या  नजरा त्याला  मुजरा करीत होत्या.            

             अंधार पडल्यावर बाहेर फिरायला परवानगी नसते म्हणून आम्ही सगळे मुख्य हॉलमध्ये जमलो. एखादे वेळी कंटाळा आला, बसून राहावंसं  वाटलं तरी अशा सहलीत अशी माहिती देणारी सेशन्स मिस करून चालत नाही. काहीतरी महत्त्वाचं हुकतं.  मुख्य हॉलमध्ये सर्वांची ओळख करून घेण्याचा कार्यक्रम झाला –  तोही अनोखा होता. जोड्या जोड्या करून दोघादोघांनी एकमेकांशी ओळख करून घ्यायची आणि एकाने दुसऱ्याची ओळख इतरांना करून द्यायची. त्या वेळी सगळ्यांना काही कार्डंही वाटली होती. त्यावर असलेल्या चित्रांची माहिती प्रत्येकजण आपापल्या परीने  सांगत होता आणि आमच्याबरोबर आलेली आदित्य, अनघा आणि देवेंद्र त्या प्राणिपक्ष्यांबद्दलची अधिक माहिती सांगत होते. वेळ कसा गेला कळलंच नाही. नंतर सापाबद्दलचं एक माहितीपूर्ण सेशन झालं.  फोलिएज ही आयोजक संस्था आता नऊ वर्षांची झाली होती. आम्ही एकंदर ३१ लोक होतो. सगळे एकत्र जेवायला बसलो. मध्ये मोकळी जागा सोडून शिवाय इतरही बाकीचे लोक लहान लहान टेबलांभोवती  बसलेले असूनही गर्दी वाटत नव्हती एवढा हॉल प्रशस्त होता. प्रवेशद्वाराच्या बाजूला टेबलावर  रुबाबदार वाघाची एक प्रतिकृती होती. हौशी लोक त्याच्याजवळ उभे राहून फोटो काढत होते.

             खोल्या म्हणजे सुंदर कॉटेजेस होत्या. एका खोलीत दोन व्यक्ती. माझ्याबरोबर एक अपरिचित मुलगी आली. तिच्याबरोबर तिची बारा-तेरा वर्षांची मुलगी होती; मग आम्ही तिघी एका खोलीत.  खोल्याही मोठ्या होत्या. तिची व्यवस्था खाली गादी घालून झाली. त्यांचं आणि माझं छान जमलं. 

            एक सेशन हत्तींच्याबद्दल होतं. हस्तिदंतासाठी हत्तीला कसं मारलं जातं, त्यांची चोरी कशी होते,  सुळे जितके दणकट तितका हत्ती दणकट असं समजलं जातं. हे हस्तिदंत कुठे पाठवले जातात, त्यापासून कुठल्या वस्तू तयार केल्या जातात, त्यांना किती भाव मिळतो वगैरे, याबरोबर अशा वस्तू, मोरपिसे, मोरपिसांचे पंखे,  सापाच्या किंवा इतर कातड्यांच्या  पर्सेस, बेल्ट अशा वस्तू विकत घेऊ नयेत; त्याने चोरी करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळतं, असंही सांगितलं गेलं. जंगलातली कुठलीच वस्तू उचलू नये,  तिचा तिथेच योग्य विनियोग होतो. त्या पर्यावरणाला मदतच करतात. याबाबत लहानपणापासून मुलांच्यात जागरूकता निर्माण केली पाहिजे… अशा गोष्टी त्यांनी सांगितल्या. टीव्हीवरच्या ॲनिमल प्लॅनेट, डिस्कवरीसारख्या चॅनलवरून मुलांनासुद्धा इतर देशांतली माहिती असते; परंतु आपल्याकडचे प्राणी, पक्षी, जंगलाच्या श्रीमंतीची, जैवसाखळी याची माहिती त्यांना नसते. 

                  सकाळी पुन्हा  निसटतं का होईना पण वाघाने आम्हांला दर्शन दिलं. बरंच शोधल्यावर कोणालातरी एक वाघ दिसला. त्याचा माग जंगलातल्या गाईडला बरोबर लागतो. प्रत्येक गाडीबरोबर एक गाईड असतोच. ते बोट दाखवतात, आपण डोळे ताणताणून तिकडे बघत राहतो. झाडामागे गवतात बसून तो आपली शिकार खात होता. मध्येच जेव्हा घास ओढून घेताना मानेला झटका द्यायचा तेव्हा थोडा दिसायचा.              

              संध्याकाळी हॉटेलच्या आसपास थोडे फिरून आलो. मागच्या बाजूला दूरवर बांधवगड दिसला. रावणाला पराभूत करून सीतेला परत घेऊन जाताना इथे रामाने लक्ष्मणाला सांगितले, “हा प्रदेश तू सांभाळ,”  म्हणून या परिसराला बांधवगड हे नाव पडलं, असं सांगतात.

             एक मे २००९ हा दिवस वाघाच्या दृष्टीने आमच्यासाठी सर्वात चांगला होता. आदली  संध्याकाळ जवळजवळ फुकट गेली होती. त्या दिवशी आम्ही छोटी छोटी वटवाघळे मात्र भरपूर संख्येने बघितली. सकाळी भारद्वाज उडताना दिसले. सकाळी निघताना कुणीतरी लाल टी-शर्ट घालून कॉरिडॉरमध्ये आली होती.  आदित्यने सांगितल्यानंतर ती तो बदलून आली. असे भडक रंग जनावरांना बिथरवतात म्हणे. अशा सहलींना पेस्टल कलर किंवा त्याहीपेक्षा हिरव्या, चॉकलेटी, ब्राऊन या रंगांतील छटा जास्त बऱ्या असतात. जंगलात गाडीतून खाली उतरणं  म्हणजे महापाप असतं. या गाड्या म्हणजे संपूर्ण उघड्या जीप असतात. त्यातून कोणीही सहज खाली उतरू शकतो; परंतु अशा वेळी जंगलात जनावर आलं; तर त्याचा वेग, वजन इतकं असतं की आपल्याला वर चढून न देता डोळ्यांचं  पातं लवतं न लवतं तोच येऊन धडक मारून आपल्यासह गाडीचा चेंदामेंदा करून जाऊ शकतं!  

            ब्रेकफास्ट झाल्यानंतर आम्ही पुन्हा ए रूटवर गेलो. तिथे एक वाघ आहे अशी कुणकुण लागली होती. गाईडचे इशारे आपसांत चालूच असतात; अर्थात त्यासाठी त्यांना आपापसांतले संबंधही चांगले ठेवावे लागत असतील. गेलो तर सात आठ गाड्या लागलेल्या होत्या. अर्धा तास वाट बघितल्यावर एक वाघ दिसला; पण लगेच जंगलात चालत जाऊन तो दिसेनासा झाला; पण गाईड हुशार होता. त्याने तिथेच थांबायचं ठरवलं. उशीर झाला की वाघ दिसेल;  पण ड्रायव्हर उशिरापर्यंत थांबायला तयार नसतात. उशीर झाला की त्यांना दंड होतो, पाच दिवस राईड मिळत नाही  – म्हणजे केवढं नुकसान! वाघांनाही अंदाज असावा : जरा संध्याकाळ व्हायला लागली की ही माणसं, वर्दळ नाहीशी होते; मग आपल्याला रान मोकळं…म्हणून ते हळूहळू बाहेर पडायला लागत असावेत. निघता निघता अगदी शेवटी पुन्हा त्याने दर्शन दिलं. 

             दुसऱ्या दिवशी सकाळी शेवटची राईड होती.  ब्रेकफास्ट घेताना कोणीतरी बातमी आणली आणि सगळ्यांची तारांबळ उडाली. त्या दिवशी मात्र अगदी पोटभर दर्शन दिले त्यांनी. वाघांना नावंही दिलेली असतात.  तिथे दोन छोटी पिल्लं – सख्खी जुळी  भावंडं एकच शिकार खात होती. अशा वेळी ती तल्लीन झालेली असतात. थोड्या वेळाने उठून एक दोन फेऱ्या मारून दोघे दोन दिशांना निघून गेले. दुसरीकडे गेलो तिथे एकाला रस्ता क्रॉस करताना बघितलं; नंतर एक गाडीला अगदी समांतर चालत होता. आम्ही स्पीड कमी केला. पुढे दोन वाघ एका खंदकातून चढून वर येताना दिसले. इथे म्हणे एक वाघीणसुद्धा होती. ते दोघे वर आल्यावर दोन दिशांना तोंडं करून अगदी वेगळे एकाच पोझमध्ये बसून राहिले. त्यांना तसंच सोडून निघणं अगदी जिवावर आलं होतं. 

             जंगलचा राजा म्हणून आपण जरी सिंहाला ओळखत असलो; तरी ते सापडतात फक्त गीरच्या जंगलात – तेही अगदी मोजकेच. त्यांना लागतो तेवढा परिसर शोधून तिथे त्यांचं ब्रीडिंग करायचं म्हटलं तर त्यांना तिथल्या वातावरणाशी जुळवून घेता येणं कठीण. आता तशा जागा शोधणेही अवघड झालं आहे. वाघांचं तसं नाही. मेळघाट, कान्हा, ताडोबा अशा वेगवेगळ्या ठिकाणी वाघ आहेत. प्रत्येक ठिकाणची वैशिष्ट्ये वेगळी.

             परत निघालो. डावी-उजवीकडे गाडी वळवत असताना वाळलेलं गवत उजवीकडे आलं. त्यामधून एक भालू आमच्या दिशेने चालत येताना दिसला. गवत अगदी त्याच्या गळ्यापर्यंत आलं होतं. आपल्या चार पायांवर चालत तो डुबरा काळा कुळकुळीत गोळा आमच्याच दिशेने येत होता. त्याने मान उचलली आणि समोर काहीतरी चाललंय असं वाटल्यामुळे वळून झपकन नाहीसा झाला. अस्वलं  लाजाळू, भित्री असतात म्हणे! दिसायला भाग्य लागतं. ड्रायव्हरने गाडी वळवली; तर कोणालातरी पलीकडच्या गवतात कोल्हाही दिसला. आम्ही मात्र तो फोटोतच बघितला. परत येताना पुन्हा एक वाघाची जोडी गाडीला समांतर आली – रस्त्यावरच होती. खूप जिप्सी तिकडे आल्या; मग ते थोडे दुरून चालू लागले. आम्हांला त्यांनी आणखी थोडी सोबत केली. आता मात्र त्यांना सोडून जायला हवं होतं. गाडी चालवताना ड्रायव्हर्स बाजूचे पगमार्क्स बघतात. वाघाचे, वाघिणीचे ठसे ते सहज ओळखतात. त्यावरून या रस्त्यावरून किती वेळापूर्वी ते गेले असतील याचा अंदाज बांधतात. छोटी पदचिन्हं असतील तर त्यामागे वाघिणीची हमखास असतात आणि ती जर नसली तर तिथून वाघाचे बछडे गेले नसून तरस गेलेला असू शकतो. बांधवगडला दर चार चौरस किलोमीटरमध्ये एक वाघ आढळतो. इथली डेंसिटी जास्त आहे, म्हणून ते दिसायचं प्रमाण अधिक. आता इथे आम्ही बघितलेली दोन पिल्ले आहेत. ती दोन वर्षांपेक्षा मोठी झाली आहेत;  तरी एकत्र आहेत; पण आता आपला एरिया ठरवण्यासाठी पुढच्या दोन-चार महिन्यांत त्यांच्यात कधीही चकमक होऊ शकते.  दोन्हींपैकी एक डॉमिनंट असतंच. 

             मे महिना असूनही इथे पाण्याचे स्रोत चांगले आहेत. मध्ये एखादा पाऊस पडून गेला तरी आतमध्ये वाघांना पाणी मिळतं आणि मग पर्यटकांना वाघ दिसत नाहीत. काळविटांचा धावण्याचा वेग प्रचंड असतो. इथे चित्ते नाहीत; त्यामुळे त्यांना मारणारं  कोणी नाही; मग त्यांची प्रजा वारेमाप वाढते. शेतकऱ्यांना त्याचा खूप त्रास होतो. बरं,  शिकारीचीही शेतकऱ्यांना  परवानगी नाही. शेवटी चोरट्या शिकारीचे ते शिकार होतात. हॉटेलच्या परिसरात अनेक प्रकारची झाडं होती – निलगिरी, जांभूळ, साल, पळस, कदंब, कुसुम, मोह, तेंडूपत्ता, घोस्ट ट्री वगैरे.   

            आमची ट्रीप सार्थकी लागली होती. कोणीही नाराज, निराश नव्हतं. कान्हामध्ये आपल्यापेक्षा जास्त वाघ आहेत, म्हणजे १२०/१३० वगैरे त्या वेळी तरी होते; पण क्षेत्र खूपच मोठं असल्यामुळे ते दिसण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. 

             आम्ही राहत असलेल्या रूमच्या आणखी मागे एक स्पा होतं. माझी रूममेट एका दुपारी तिथे जायला निघाली. अपरिचित आणि काहीशा एकांड्या ठिकाणी एकटीने जाऊ नये, असं मला वाटत होतं; पण मला म्हणाली, “तुम्ही मुलीजवळ थांबा;” पण मी तिच्याबरोबर जाऊन जागा बघून आले. निदान बायका तरी आहेत का बघ म्हटलं. तिला चांगला अनुभव  आला.

            परतताना सगळेच ढेपाळले होते. पुणे स्टेशनवर सकाळी दहाच्या सुमाराला गाडी आली आणि एकमेकांचे निरोप घेऊन सगळे घराच्या दिशेने निघालो. 

Author

Leave a Reply