बेंगलोर डायरी ७

   फळांचा राजा आंब्याला म्हणतात आणि आंब्यांचा राजा हापूस.  आंबा म्हणजे फक्त हापूस या माझ्या समजाला मोठा छेद गेला बेंगलोरला आल्यावर. इथे हापूसच्या झगमगाटात इतर आंबे लपून जात नाहीत. येथील प्रसिद्ध बदामी म्हणजेच  कर्नाटक हापूससुद्धा जरा इतर आंब्यांना दबूनच असतो. इथे मोठा मान असतो तो बैंगनपल्ली या आंध्र प्रदेशातील आंब्यांना, त्यानंतर रसपुरी या नावातूनच रस गळणाऱ्या आंब्याला, त्यानंतर बदामीबरोबरचा मान असतो तो सिंदूरा या आंब्याचा! सीझन संपता संपता, जून -जुलैमध्ये येणारा मल्लिका जो नीलम आणि दशहरी आंब्यांच्या संकरातून तयार झालेला असतो तो  इथल्या स्थानिक लोकांचा खास आवडीचा. बाकी छोटे गोटे आंबे, मलगोबा, केशर, दशहरी, काला पाड, नीलम, रुमानी असे नानाविध प्रकारचे आंबे हजेरी लावतातच. इंडियन इंस्टीट्यूट ऑफ हॉर्टिकल्चरचे मुख्यालय बेंगलोरमध्ये असल्याने असावे किंवा इथल्या हवेमुळे, मातीमुळे किंवा सामाजिक, आर्थिक  कारणांमुळे; पण बेंगलोरमध्ये फळांचे वैविध्य नेहमीच बघायला मिळते. आजची बेंगळुरू डायरी येथील भाज्या, फळांबद्दल!  

   नारळ आणि केळी या वर्षभर मिळणाऱ्या फळांचा मान मोठा असतो; पण या केळ्यांमध्येदेखील तीन चार वेगवेगळे  प्रकार बघायला मिळतात. नानजनागुड  केळ्यांना तर GI  tag  पण आहे. नारळ आणि केळी  या दोन गोष्टींशिवाय इथली प्रत्येक पूजा, सण अपुराच असतो; बाकी मोसमानुसार चिकू, संत्री, मोसंबी, द्राक्षे, पपई, सिताफळे, डाळिंबे अशी अनेक देशी फळे मिळतात.  बेंगलोर ब्लू प्रकारची काळी द्राक्षे बेंगलोरच्या आसपासच्या जिल्ह्यांत पिकतात. जॅम, सरबते तयार करण्यासाठी तसेच खाण्यासाठी ही द्राक्षे वापरली जातात. इथल्या मातीत, इथल्या हवेत पिकणाऱ्या या द्राक्षांची साल पातळ असते, चवीला आंबट गोड असतात. असेच आणखी एक खास बेंगलोरमध्ये दिसणारे फळ म्हणजे पोमेलो किंवा स्थानिक भाषेत चकोत्रा – आपल्याकडे याला पपनस म्हणूनही ओळखतात. जुन्या घरांमध्ये याची झाडे आजही बघायला मिळतात. यावर कधी साखर घालून; तर कधी मीठ, तिखट भुरभुरून खातात.            

      गुढी पाडव्याला कैरीचा मान असतो; तसाच गणपतीत मान असतो तो कमरक म्हणजे स्टार फ्रूटचा. गणेश चतुर्थीच्या पूजेला हे फळ ठेवले जाते. तसेच रामनवमीला खरबुजाचे सरबत चौकाचौकांत वाटले जाते. अव्हाकॅडो हे खरेतर विदेशी फळ; पण गेल्या पाच-सहा दशकांत ही फळे, बेंगलोर, त्याचबरोबर कुर्ग भागात चांगलीच बहरली आहेत. याला बटर फ्रूट असे अगदी साजेसे नाव दिले आहे. जागोजागच्या ज्यूसच्या दुकानांत हमखास विचारला जातो तो हा बटर फ्रूट मिल्कशेक. कुर्गची संत्रीदेखील हिवाळ्यात मिळतात . ही संत्री आकाराने छोटी असून हिरव्या रंगाची असतात. उन्हाळ्यात कलिंगडे, खरबूज, यांच्याबरोबरच वॉटर ॲपल  म्हणजे आपली  जांबाची  फळेसुद्धा मिळतात इथे. इथे  जांभाच्या फळांचे हिरवा, लाल असे दोन प्रकार मिळतात. याचबरोबर पनीर हण्णू नावाचे एक फळ मिळते. हण्णू म्हणजे फळ – याचे इंग्रजी नाव याला व्यवस्थित न्याय देते; कारण नावात पनीर नाव असणाऱ्या या फळाला वास मात्र असतो गुलाबाचा, त्यामुळेच की काय याचे इंग्रजी नाव आहे रोज ॲपल! मलबेरी म्हणजे तुतीची कोणे एके काळी बेंगलोरमध्ये खूप झाडे होती; मात्र गेल्या काही दशकांत रस्ते रुंद होता होता ती झाडे मातीत मिळाली. लिची, स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी यांच्याबरोबरच मॅंगोस्तीन, अमरफळ ही अनवट फळेदेखील मी इथेच बघितली आणि खाल्ली. बाकी बोरे, कवठ मिळत असले तरीही करवंदांची जाळी अजूनही बेंगलोरसाठी लांबच आहे.

   उन्हाळ्यात स्थानिक बेंगलोरवासी आंब्याइतकेच प्रेम करतात ते फणसांवर! अख्खा फणस घरी घेऊन जाऊन कापून दोन तीन दिवस आरामात खातात; मग कधी त्या फणसाच्या गऱ्यांची खीर, गोड इडली असे अनेक प्रकार केले जातात. कच्च्या फणसापेक्षा या लोकांचे जास्त प्रेम पिकलेल्या फणसांवर आहे; त्यामुळेच आमच्या बेंगलोरमध्ये आंबा आणि फणसांचा मेळावा दरवर्षी जूनमध्ये भरतो.

  बेंगलोर शहरात कन्नड – त्यांतही मेंगलोरकडील, सारस्वत, उत्तर कर्नाटकाची वेगळी, तमिळ, तेलगू, बंगाली, पंजाबी अशा सगळ्या खाद्यसंस्कृती बऱ्यापैकी रुजल्या असल्याची झलक इथल्या भाजी मंडईत बघायला मिळते. वांग्याचे तीन-चार प्रकार इकडे बघायला मिळतात. आपण ज्यांची भरली वांगी करतो ती, त्याहून थोडी मोठी, भरताची मोठी जांभळट, आणि वांगीभाताची निमुळती हिरवी वांगी (यालाच मैसूर बदनेकाई म्हणूनसुद्धा ओळखतात), त्याच आकाराची जांभळी वांगी, हिरवी उडुपी वांगी असे नानाविध प्रकार बघायला मिळतात. वांगी ही मूळ  भारतीय भाजी – अगदी हडप्पा काळापासून इथे रुजलेली; त्यामुळेच की काय चोयटे ही विदेशी भाजी जेव्हा इथे रुजली तेव्हा त्याचे स्थानिक लोकांनी सीमेबदनेकाई असे नामकरण करून टाकले… म्हणजे सीमेबाहेरून आलेली वांगी असा शब्दशः अर्थ घेता येऊ शकतो. दोन शतकांपूर्वी  भारतात नसलेली ही भाजी आता इथे चांगलीच रुजली आहे. 

लाल भोपळा, कोहळा या पुरवठ्याच्या भाज्यादेखील मोठ्या प्रमाणावर वापरल्या जातात. बीटरूटसारखी भाजी इथे फक्त कोशिंबिरीसाठी न वापरता भाजीत, सांबारामध्येदेखील वापरतात. टोमॅटो जरी वापरत असले तरीही अजूनही चिंच इथे तिचे महत्त्व टिकवून आहे. गवार, सुरण, बीन्स, गाजर, बीट, लाल भोपळा, भेंडी यांसारख्या भाज्या या जास्त खास आहेत; कारण कोणत्याही सणासुदीच्या, शुभकार्याला याच भाज्या वापरल्या जातात. बाकी इथे कडधान्येदेखील आवडीने खाल्ली जातात. हिवाळ्यात तुरीच्या शेंगा, वालाच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, डबल बी अशा अनेक शेंगा मुबलक मिळतात; मग त्यांचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर केला जातो. कधी सांबारामध्ये, कधी पुलावामध्ये; तर कधी पालेभाजीत व्यंजन म्हणून. इथे सांबार  बहुतांशवेळा भरपूर भाज्या घालून केले जाते. तुम्ही कर्नाटकातील कोणत्या प्रांतातले आहात त्यावरून त्यात किती नारळ लावायचा हे ठरते. हुबळी, धारवाड, गुलबर्गा भागात  सांबारापेक्षा रसदार भाज्या, उसळी जास्त केल्या जातात कारण अजूनही त्या लोकांच्या आहारात ज्वारीची भाकरी तिचे स्थान टिकवून आहे; पण मेंगलोर, शिरसी भागाकडे मात्र नारळ हाच मुख्य घटक आहे की काय असेही क्वचित कधी वाटते. मैसूर, मंड्या, हासन, चामराजनगर या भागांमध्ये कांदा, लसूण सढळ वापरला जातो, टोमॅटो रुळला असला; तरीही ज्यात त्यात टोमॅटो अजून तरी इथे आलेला नाहीये.  बेंगलोरने मात्र सगळे आपले म्हणत सगळ्यांची शैली आपलीशी केली आहे.           

   इथे तसा वर्षभर पाऊस जाऊन-येऊन असतो; त्यामुळे पालेभाज्यांचे भाव गगनाला टेकलेत असे खूपच कमी वेळा होते; म्हणजे नेहमी १०-१५  रुपयांना  मिळणारी जुडी ४०-५० ला मिळते. पालक, शेपू, मेथी यांबरोबर राजगिरा, माठ, चंदन बटवा, तांदुळजा या भाज्यादेखील मिळतात. तेलगू लोकांचे लक्षणीय प्रमाण असल्याने अंबाडीदेखील सहज मिळते. घोळासारखी सीझनल भाजीदेखील जुन्या वस्तीच्या भागांमध्ये मिळते. हरभऱ्याची पेंड इथे वजनावर विकतात हे जेव्हा मी पहिल्यांदा बघितले तेव्हा जरा सांस्कृतिक धक्काच बसला होता मला; पण मग नंतर केळी, संत्री, मोसंबीदेखील डझनापेक्षा वजनावर विकताना बघून सरावले. पालेभाज्या करताना अनेकदा त्यांचे देठ हे आमटीमध्ये वापरतात आणि त्याची फार सुरेख चव त्यात उतरते…. खास करून माठ किंवा चंदन बटवा सारख्या भाज्यांचे. शेवग्याच्या शेंगा, पाला, मायाळू, अळूची पानेदेखील वापरली जातात. कोशिंबिरी करतानादेखील त्यात दाण्याच्या कुटाचा फारसा वापर होत नाही; तर त्याऐवजी मुगाची डाळ, नारळ वापरला जातो. मोड आलेल्या हिरव्या मुगाची डाळिंबाचे दाणे घालून किंवा मक्याच्या दाण्यांची मनुका घालून कोशिंबीर खाण्याच्याआधी नेत्रसुख देतात. बाकी काकडी, गाजर तर हुकमी एक्के असतातच.  

पंजाबी, बंगाली लोकांच्या वाढत्या वस्तीमुळे, ढेमसे, शलगम, बसका दुधी भोपळा, परवरासारख्या भाज्या आता सहज मिळतात. तसेच कमाल बेसिल, झुकीनि, ब्रोकोली, रंगीत सिमला मिरची  यांसारख्या परदेशी भाज्या कदाचित परदेशी होत्या हेच विसरले जाईल काही वर्षांत!

   काही  मोसमांत काही ठरावीक भाज्या मिळण्याचे दिवस आता संपलेत; पण तरीही त्या ठरावीक मोसमात मिळणाऱ्या गोष्टीची चव बिगरमोसमी मिळणाऱ्या भाजी फळांपेक्षा जास्त सरस असते; हे जाणूनच आपल्या सणांचे स्वयंपाक त्या पद्धतीने केले जातात. घरातल्या दोन स्त्रियांची स्वयंपाक  करण्याची पद्धत वेगळी असते; त्यामुळे शहराबद्दल काय बोलणार; पण तरीही या शहराने जुने टिकवून ठेवत नव्याचा स्वीकार केला आहे हे कोणत्याही शुभकार्याला गेल्यावर तिथेल जेवण जेवताना लक्षात येतं. इथल्या लग्न, वास्तुशांती, बारसे अशा सगळ्यांबद्दल लिहीन तेव्हा जेवणाबद्दल आवर्जून लिहीनच. तूर्तास मी आंबे, फणस, लिची, जांभूळ या उन्हाळी फळांचा आस्वाद घेते!  

(ही एका त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर, माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ती म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)

 

Author

2 thoughts on “बेंगलोर डायरी ७”

  1. केवळ अप्रतिम…..वाचून खूप आनंद झालाय

  2. अजून एक गोष्ट मला आवडली ती म्हणजे,
    जवळ जवळ प्रत्येक जिल्ह्यात
    कर्नाटक रस्ते सारीगे च्या बस स्थानकावर हॉपकॉम चा ताज्या फळभाज्यांचा आणि ताज्या फ्रूट ज्यूस चा स्टॉल.
    आणि केएमएफसी चे “नंदिनी” दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे विक्री केंद्र.
    महाराष्ट्रात मला महाराष्ट्र सरकारने
    कृषी पणन मंडळाने चालवलेला स्टॉल दिसला नाही.
    आपला लेख प्रवाही आहे
    धन्यवाद.

Leave a Reply