पुनर्भेट नॅशनल पार्कची ६ : चैत्रपालवीचे  दिवस  

 दि. ११.४.२०२४                                                

         फाल्गुन संपला आणि  उद्यानात उन्हं तापू लागली आणि  करंजाच्या झाडांना बहर येऊ लागला. फाल्गुनात  करंजाचं झाड चकचकीत हिरव्या पानांनी भरून गेलं होतं;त्यावर आता  फिकट गुलाबी कळ्यांसारखी दिसणारी फुलं गुच्छाने येऊ लागली. करंजाचं फूल तीन पाकळ्यांचं. वरच्या दोन पाकळ्या   मुळाला लालसर गुलाबी रंगाच्या.नमस्कारासाठी जोडलेल्या दोन फुगीर हातांप्रमाणे एकमेकांना जोडलेल्या; तर खालची पाकळी पसरट त्रिकोणी आकाराची व टोकाला हिरव्या रंगाची. करंजाच्या फुलांवर गुलाबी पांढऱ्या व हिरव्या रंगांचा मनोहारी संगम आढळतो. जी झाडं फाल्गुनात फुलली होती त्या झाडांखाली  करंजीच्या आकाराच्या शेंगांचा सडा पडला होता.  जखमेवर गुणकारी असं करंजतेल या बियांपासून काढलं जातं.एक दिवस मी उद्यानाच्या आत प्रतिबंधित क्षेत्रात कामानिमित्त गेले होते; तर धुंद करणारा सुगंध आला.मी वळून पाहिलं; तर एक सात ते आठ मीटर उंचीचं मोठं झाड होतं. त्यावर फिकट पांढऱ्या रंगाची गुच्छाने आलेली फुलं होती. चार ते पाच सेमी आकाराची नळी व टोकाला फुगीर असलेली ही फुलं – एका एका गुच्छाला शेकडो फुलं आली होती.आणि झाड हजारो फुलांनी अक्षरश:  लगडलेलं होतं. फुलांचा गोड सुगंध आसमंतात पसरला होता. मी ओळखलं : हे तर मादक सुगंधाच खुरीचं झाड. झाडाच्या सावलीत क्षणभर डोळे मिटून मी त्याचा सुगंध माझ्या रोमारोमांत भरून घेतला.  खुरीच्या फुलांसारखा सुगंध मी फक्त हिरव्या चाफ्याच्या फुलांचा अनुभवला आहे; पण हिरवा चाफा तर आता कित्येक वर्षांत पाहिलेला आठवत नाही.  बदलत्या  वातावरणात हिरव्या चाफ्यासारखी काही झाडं केवळ आठवणीतच राहणार बहुधा; पण खुरीचं दुर्मीळ झाड उद्यानात पाहायला मिळालं याचा खूप आनंद झाला.  

            फाल्गुनात लालभडक पानांनी सजलेला कुसुम पहिला होता. चैत्रात त्याची पानं आता हिरवी झाली होती; पण प्रत्येक ऋतूत वेगवेगळी  झाडं  आपल्या बहरलेल्या रूपात अचानक समोर येतात.  या चैत्रात  एक दिवस मी दहिसर नदीच्या बाजूने उद्यानाच्या आतल्या बाजूला वळले; तर कोपऱ्यावरच्या एका लालभडक पानांच्या वृक्षाने लक्ष वेधून घेतलं.त्याला जमिनीकडे झुकलेली पाच-सहा सेमी लांबीची कळ्यांसारखी दिसणारी फुलं होती. दुसऱ्या फांदीला लांब देठांची – सुपारी एवढ्या आकाराची फळं आली होती. मी ओळखलं हा तर मोह. एवढे दिवस त्याच रस्त्याने मी ये जा करत होते; पण मला हा मोह दिसलाच नव्हता.जेव्हा चैत्रात त्याने लालभडक पानांचा साज चढवला; तेव्हाच तो डोळ्यांत   भरला. मोह हा आदिवासींच्या जीवनातील महत्त्वाचा वृक्ष.  याच्या फुलांची व फळांची भाजी केली जाते. मोहाच्या दारूला  आदिवासींच्या संस्कृतीत महत्त्वाचं स्थान आहे. मोह हा आदिवासींचा जणू कल्पवृक्ष आहे. चैत्रात फुलणारं  आणखी एक झाड म्हणजे कुंभ. चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आम्ही काही कामानिमित्ताने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या बाजूलाच वसलेल्या तुंगारेश्वर वन्यजीव अभयारण्यात गेलो होतो. वसईच्या बाजूने आम्ही अभयारण्याच्या आतील कच्च्या रस्त्यावर प्रवेश केला. वरून ऊन रणरणत होतं; पण आत जंगलाचा प्रसन्न गारवा जाणवू लागला. एका वळणावर दहा-एक मीटर उंचीचं झाड उभं होतं. ते झाड फिकट पिवळ्या रंगाच्या फुलांनी बहरून आलं होतं. छोटे पाच सेमी आकाराचे रेशमी धागे  एका गुच्छात बांधल्याप्रमाणे असलेली फुलं वाऱ्याबरोबर लहरत होती.त्या एका झाडाच्या पुढे कितीतरी तशीच कुंभाची बहरलेली झाडं वाऱ्याबरोबर डोलत होती.  

या चैत्रात एका बिबट्याच्या रेस्क्यूसाठी आम्हांला वसई किल्ल्यावर जावं लागलं होतं. या किल्ल्यावर ठिकठिकाणी ताडाची झाडं आहेत.या झाडांवर मडकी लावून ताडी गोळा केली जाते.  झाडांवर चढण्यासाठी स्थानिकांनी झाडाला खाचे करून ठेवलेले होते.  त्यात बऱ्याच  मोठ्या भागावर  भंडिरा (Clerodendrum infortunatum)   ही  दीड फूट लांबीची रोपटी उगवलेली दिसत होती. चैत्र हा त्यांचा बहराचा महिना असावा. पूविस्पे त्यावर लाल गुलाबी रंगाची फुलं फुलली होती.  फुलांच्या पाच पांढऱ्या पाकळ्यांचा एकत्रित आकार एखाद्या  मुकुटाप्रमाणे  होता.पाकळ्यांच्या मध्यभागी कोणीतरी गुलाबी रंगाची चिमूट सोडल्याप्रमाणे वाटत होते. भंडिराच्या पानांचा उपयोग त्वचारोग ताप, जखम यांवर होतो. 

 दि. १५.४.२०२४

            आईवेगळी बिबट्याची पिल्लं आरे कॉलनीत गांडूळ खताच्या एका छोट्या खड्ड्यात सापडली.  ज्या ठिकाणी सापडली त्याच ठिकाणी त्यांना चिकन दिलं.  प्लेटमधील चिकन त्या जंगली पिल्लांनी खाल्ले याचा आनंद झाला खरा; पण त्या पिल्लांची आई सापडून जर पिल्लं आईसोबत जंगलात गेली असती तर तो आनंद कायमचा टिकला असता. सात दिवस आम्ही वाट बघितली. पिल्लांना चिकन आणि पाणी देऊन आम्ही जगवत होतो. कधी कधी बिबट्याची लेकुरवाळी मादी जंगलातील नराने पिल्लांकडे येऊ नये म्हणून त्याच्यासमोर खोटं खोटं माजावर आल्याचं नाटक करते आणि नराला झुलवत आपल्या पिल्लांपासून दूर नेते.  अशा वेळी ती पाच-सहा दिवस पिल्लांच्याजवळ येऊ शकत नाही.  रात्रीच्या वेळी जंगलात आम्हांला नराच्या डरकाळीचा  आवाज यायचा. इतरत्र लावलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये एखादी मादी यायची; परंतु छायाचित्रात दुधावर आलेले स्तन  दिसायचे नाहीत. त्यावरून आम्ही ओळखायचो की ही ‘ती’ मादी नाही; पण आमच्या पिल्लांची मादी सातव्या दिवशीही पिल्लांकडे आली नाही; हे बघून आमच्या लक्षात आलं की आता मादी येणं शक्य नाही. आम्ही ती पिल्लं उद्यानातील रेस्क्यू सेंटरमध्ये घेऊन जायची ठरवली. ही पिल्लं साधारण अडीच महिन्यांच्या आसपासच्या वयाची होती; पण चांगलीच आक्रमक होती. त्यांच्या जवळ गेलं तरी फिस्कारून अंगावर यायची. आईने त्यांना माणसापासून दूर राहण्याची व आक्रमकतेची शिकवण दिली असावी. त्यांच्या जवळ जाताना आम्हांला चांगलीच काळजी घ्यावी लागायची. रेस्क्यू सेंटरमध्ये आणल्यावर त्यांची तपासणी केली. त्यांच्यातील एक पिल्लू चांगलंच बळकट होतं. तो नर होता. साधारण साडेचार-पाच किलो वजनाचा असावा. तो अंगावर आला की त्याच्यामागून ती बाकीची दोन  पिल्लं अंगावर  यायची. आम्ही त्यांच्यातील हे जंगलीपण जपायचं ठरवलं. आम्ही त्यांना पिंजऱ्यात ठेवल्यावर त्यांच्या फार जवळ जायचो नाही. लांबूनच चिकनच्या डिश त्यांच्याकडे सरकवायचो. आम्ही दूर गेल्याशिवाय ती चिकनला शिवायची नाहीत. हीसुद्धा त्यांच्या आईची शिकवण असावी; पण आमचे प्राणिरक्षक मुकेश मोरे एक मात्र करायचे  – लांबूनच त्यांच्याशी बोलत राहायचे. खाणं ठेवलं की “खा आता बाळांनो,” म्हणायचे.  त्यांना बाहेर मोठ्या पिंजऱ्यात व्यायामासाठी पाठवताना,“ए चला रे पोरांनो, खेळायला पळा बाहेर” असे म्हणायचे. हळूहळू त्यांना मोरेंच्या या बोलण्याची सवय झाली. बाहेर सोडलेलं असताना मोरेंचा आवाज आला की पिल्लं बरोबर आत यायच्या दरवाजासमोर उभी राहून त्यांच्याकडे टकामका बघत राहायची. आता पिल्लं आमच्याकडे येऊन जवळ जवळ तीन महिने होऊन गेले आहेत. अजूनही माणूस जवळ आला की ती त्यांच्या सवयीने गुरगुरतात; पण त्यात आता पूर्वीचा विखार राहिलेला नाही. ही आजूबाजूची माणसं आपल्याला वाटली तेवढी वाईट नाहीत हे त्यांना नक्की कळलं असावं; तरीही कधी कधी ती पिंजऱ्याला लावलेल्या जाळीतून दूर जंगलात पाहत राहायची. कदाचित आपली आई आपल्याला शोधत अजूनही येईल ही वेडी आशा त्यांना असावी. खरंतर ही वेडी आशा आम्हांलाही होती म्हणून बरेच दिवस उद्यानातील बिबट्यांचे संशोधक त्यांची विष्ठा घेऊन  आरे कॉलनीच्या जंगलात ठिकठिकाणी ठेवायचे. त्या वासावर आई येईल अशी आशा आम्हांलाही वाटायची; पण  आमचीही निराशाच झाली. आता त्यांची आई कधीच येऊ शकत नाही ही जाणीव आम्हांला झाली आहे आणि ती पिल्लांनाही झाली असावी; कारण आताशा ती जाळीजवळ बसून  जंगलात टक लावून बघत नाहीत…

Author

Leave a Reply