संपादकीय : हाक मायमराठीची

 महाराष्ट्र राज्य शासनाने नुकतेच म्हणजे गेल्या मार्च महिन्यात पुढील २५  वर्षांसाठीचे भाषा धोरण जाहीर केले आहे.  या बाबत १२ पानी  शासन निर्णय नुकताच जाहीर झाला आहे.  अर्थातच निर्णयाची भाषा खास शासकीय मराठी आहे. एक मे १९६० रोजी महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आले.  द्विभाषकापासून हे मराठी भाषिक  राज्य निर्माण झाल्याने आता मराठीला बरे दिवस येतील अशी आशा निर्माण झाली.  हे बरे दिवस यायचे असतील तर एकंदरीतच सर्व राज्यकारभारात मराठीचा वापर होणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने वेळोवेळी अनेक निर्णय घेतले गेले व आता राज्यशासनाच्या दैनंदिन कामकाजात मराठी बऱ्यापैकी वापरले जात आहे. 

   मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, जतन, संवर्धन व विकास  होऊन मराठी भाषेच्या वापराची व्याप्ती व गुणवत्ता वाढावी  यासाठी  मराठी भाषेचे धोरण आखणे आवश्यक होते.  महाराष्ट्र राज्याचे साधारणपणे  पुढील २५  वर्षांसाठीचे  मराठी भाषेचे धोरण ठरवणे, भाषा सर्वांगांनी वाढावी यासाठी नवनवे उपाय व उपक्रम सुचवणे व या बाबतीत शासनाला  करणे – यासाठी एक कायमस्वरूपी भाषा सल्लागार समिती स्थापन झाली आहे. या भाषा सल्लागार समितीकडे शासनाचे  भाषाविषयक धोरण ठरवण्याचे काम सोपविण्यात आले होते. या समितीवर नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे यांसारखे तज्ज्ञ  होते.  समितीने  विचार करून  एक मसुदा शासनाला सादर केला होता; परंतु तो मंत्रिमंडळासमोर जाऊन त्याला अधिकृत मान्यता मिळालेली नव्हती. त्यानंतर २०२१ साली  या समितीची पुनर्रचना होऊन लक्ष्मीकांत देशमुख समितीचे अध्यक्ष झाले.  नवीन समितीने पूर्वीच्या मसुद्याचा अभ्यास करून एक दुरुस्त मसुदा सादर केला व त्याला आता मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. या मसुद्यात एकंदरीत अठरा मुद्दे आहेत.  शेवटचा मुद्दा हा धोरणाची अंमलबजावणी कशी होणार – या बाबतची प्रशासकीय व्यवस्था सांगणारा  आहे. पहिल्या मुद्द्यात या भाषाधोरणाची उद्दिष्टे काय आहेत ते विस्ताराने सांगितले आहे. 

 ही उद्दिष्टे खालील प्रमाणे : 

१. भारतीय स्वातंत्र्याच्या शतक महोत्सवी वर्षापर्यंत मराठी भाषा तिच्या अंगभूत सामर्थ्यासह ज्ञान  व रोजगाराची भाषा  म्हणून प्रस्थापित करणे.  

२. सर्व ज्ञानशाखांकरिता इंग्रजीसह मराठीत शिक्षण घेण्याच्या पर्याय उपलब्ध करून देणे. 

३. ठिकठिकाणी भाषिक प्रयोगशाळा उभ्या करणे – यामध्ये भाषेचा अभ्यास करणे आणि भाषा शिकणे या दोन्ही संकल्पना अभिप्रेत असाव्यात.

४. राज्यातील मराठी भाषेच्या विविध बोलींचे जतन व संवर्धन . 

५. मराठी भाषा  नवतंत्रज्ञानाने सुसज्ज करणे. 

६. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणे – यासाठी एक स्वतंत्र समिती नुकतीच नियुक्त झाली आहे. 

७.बृहन्महाराष्ट्रातील मराठी भाषाविषयक उपक्रमांना साहाय्य करणे. 

८. जनमानसामध्ये मराठी भाषेविषयी आत्मविश्वास निर्माण करणे.

९. प्रशासनासाठी साधी सोपी मराठी भाषा निर्माण करणे. 

१०. मराठी भाषेसमोर सध्या कोणती आव्हाने आहेत याचा शोध घेऊन त्यावर उपाययोजना करणे. 

११.मराठी भाषा  राष्ट्रीय, वैश्विक स्तरावर प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे.  

   कागदावरती सर्व उद्दिष्टे अतिशय छान आहेत;  मुद्दा आहे ती प्रत्यक्षात कशी आणायची याचा. वैश्विक स्तराचे जाऊ द्या!  राष्ट्रीय स्तरावरती ज्या वेळेला संसदेत वेगवेगळ्या विषयांवरती वाद, चर्चा होतात; त्या वेळी इंग्रजी व हिंदी भाषा सोडून इतर भाषिक खासदार फारसे चमकत नाहीत.  या भाषिक न्यूनगंडाचा परिणाम खासदारांच्या एकंदरीत कामगिरीवरही होतो. संसदेतील मराठीचा वापर वाढण्यासाठी काय करायला पाहिजे हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे.  सध्या भाषांतराचे तंत्रज्ञान वेगाने पुढे जात आहे; त्यामुळे सर्व खासदार मातृभाषेत बोलत आहेत आणि त्यांचे इतर भाषांतून अनुवाद होत आहेत असे चित्र लवकरात लवकर दिसावे;  त्यामुळे संसदेतील मौनी मराठी खासदारांची संख्या कमी होईल अशी आशा करू या. 

 बाकीच्या मुद्द्यांमध्ये शिक्षण,  प्रशासन,  न्यायपालिका  यांत व्यावहारिक पातळीवर मराठीचा वापर कसा केला जाईल याची चर्चा आहे.  ‘उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी’  हे ब्रीद शिक्षणासाठी ठेवण्यात आले आहे.  संगणक क्षेत्रातला मराठीचा वापर,  मोडीचे व मराठीच्या बोलीभाषांचे जतन व सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ग्रंथालय व वाचन चळवळ बळकट करण्यासाठीचे प्रयत्न यांचाही त्यात उल्लेख आहे.  या सर्व उद्दिष्टांसाठी वेळोवेळी पैसा उपलब्ध करून दिला जाईल व प्रशासकीय व मंत्रिमंडळ पातळीवर भाषा धोरणाच्या वाटचालीचा वेळोवेळी आढावा घेऊन योग्य ती प्रगती साधली जाईल अशी आशा करू या. 

माझ्या मराठीची गोडी

मला वाटते अवीट

माझ्या मराठीचा छंद

मना नित्य मोहवीत !

ज्ञानोबांची तुकयांची

मुक्तेशांची जनाईची

माझी मराठी चोखडी

रामदास-शिवाजीची

‘या रे, या रे अवघे जण’

हाक मायमराठीची

बंध खळाळा गळाले

साक्ष भीमेच्या पाण्याची !

डफ-तुणतुणे घेऊन

उभी शाहीर मंडळी

मुजर्‍याची मानकरी

वीरांची ही मायबोली

नांगराचा चाले फाळ

अभंगाच्या तालावर

कोवळीक विसावली

पहाटेच्या जात्यावर !

गीत – वि. म. कुलकर्णी

Author

Leave a Reply