रद्दीतील रत्ने २ : हुसैनी ब्राह्मण

  या लेखाचे शीर्षक वाचून अनेकांना आश्चर्य वाटेल; परंतु अशी ब्राह्मणांची एक पोटजात भारतात अस्तित्वात आहे.

मी हा लेख २८ एप्रिल २०१०  रोजी लोकसत्तेच्या लोकरंग पुरवणीत ‘इंटरेस्टिंग’ या सदरात श्री.उमेश करंदीकर यांनी हुसैनी ब्राह्मणांविषयी जी माहिती दिली आहे त्याचा आधार घेऊन लिहिला आहे. मला ही माहिती खरोखरच इंटरेस्टिंग वाटल्यामुळे मी  स्वतः  ब्राह्मणांच्या या पोटजातीविषयी अधिक माहिती गोळा केली; त्याचाही मी या लेखात उपयोग केला आहे.  

       ‘डॉन’ या पाकिस्तानी वृत्तपत्राचे स्तंभलेखक  इंतेजार हुसेन यांनी दिल्लीच्या भेटीत एक व्याख्यान देताना हुसैनी ब्राह्मणांचा उल्लेख केला आणि भारतातदेखील आता एकही हुसैनी ब्राह्मण उरला नसावा असे विधान केले. त्या वेळी जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापिका असलेली नोनिका दत्त नावाची तरुणी उठून उभी राहिली व म्हणाली मी हुसैनी ब्राह्मण आहे. श्री.इंतजार हुसेन यांनी नंतर तिच्याशी संवाद साधला व विचारले की, ‘तुम्ही स्वतःला मुस्लीम मानता का?’ त्यावर ती म्हणाली, “नाही!” 

‘मग तुम्ही कोण आहात’ या प्रश्नाला उत्तर देताना ती काहीशा अभिमानाने म्हणाली की आम्ही हुसैनी ब्राह्मण आहोत; मग तिने हुसैनी ब्राह्मणांच्या काही प्रथाही सांगितल्या. प्रत्येक हुसैनी ब्राह्मणाच्या जिभेवरती एक आडवा ओरखडा असतो. करबलाच्या लढाईत हुसेनच्या शत्रूंनी हुसेनला मदत करणाऱ्या ब्राह्मणांच्या जिभा छाटल्या – त्याची आठवण म्हणून   मुलाच्या जन्मानंतर हुसैनी ब्राह्मण  समाजात मुलाच्या जिभेवरती आडवा ओरखडा काढला जातो. तसेच इमाम हुसेनच्या नावाने मुंडन केले जाते. भारतीय मुस्लीम समाजाच्या ‘मिली गॅझेट’ या नियतकालिकात या समाजावरती एक लेख आला होता. त्यात या समाजावरती रचलेले एक पारंपरिक गीतही दिलेले होते. त्या गीतात म्हटले आहे, 

‘वाह दत्त सुलतान| 

हिंदू का धर्म,

मुसलमान का इमान |

आधा हिंदू आधा मुसलमान|’

  मुहरमच्या महिन्यात इमाम हुसेन यांच्या बलिदानाचे स्मरण प्रामुख्याने शियापंथी मुस्लीम करतात. त्यात हुसैनी ब्राह्मण सहभागी होतात. अशा काही प्रथांचे उल्लेख ‘मिली गॅझेट’मध्ये दिलेले आहेत.

   पंजाबमध्ये मोहयाल ब्राह्मण अशी ब्राह्मणांची एक जात आहे. हा समाज ब्राह्मण असला तरी वृत्तीने तो क्षत्रिय आहे; त्यामुळे घरटी एका मुलाने शीख पंथाचाही स्वीकार केल्याचे दिसून येईल; म्हणून मोहयाल या अल्पसंख्याक समाज गटात हिंदू व शीख अशा दोन्ही पंथांचे लोक असतात.

    माझ्या मते शिखांचे सहावे गुरू हरगोविंद (यांचा कार्यकाळ १९ जून १५९५ ते २८ फेब्रुवारी  १६४४ ) यांनी धर्मरक्षणासाठी क्षात्रवृत्ती स्वीकारली. त्याचेच परिणामस्वरूप  – मोहयाल या ब्राह्मण समाजाने क्षात्रवृत्तीचा  स्वीकार केला असावा असे माझे मत आहे. महाराष्ट्रातील संत – समर्थ रामदास यांनी वीरवृत्ती जोपासण्याचा जो उपदेश केला त्याचे मूळ समर्थ रामदास व शीख गुरू हरगोविंद यांच्या भेटीत आहे. असो!  माझ्या पाहण्यात मोहयाल ब्राह्मण समाजाचे एक नियतकालिक आले. त्यात समाजासाठी काम करणाऱ्या व्यक्तींचे फोटो होते. त्यांतील ७० टक्के व्यक्ती निवृत्त सेनाधिकारी होत्या. यावरून आजसुद्धा या समाजाने क्षात्रवृत्ती टिकवली आहे असे दिसते. या समाजात सात आडनावे असलेले गट समाविष्ट आहेत १) बाली २) भिमवाल ३) छिब्बर ४) दत्त ५)मोहन ६)लौ आणि ७) वैद.  या गटातील सगळेच काही हुसैनी ब्राह्मण  असतात असे नाही. 

     हुसैनी ब्राह्मण कसे निर्माण झाले याची एक कथा मला शियापंथीय बोहरी मुस्लिमाने  सांगितली ती अशी –   मुहम्मद पैगंबर यांच्या काळात पंजाबमध्ये राहिब दत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. त्याला मुलगा नव्हता; त्यामुळे तो अनेक साधुसंतांकडे जाऊन मुलाची याचना करीत असे. कोणीतरी त्याला मुहम्मद पैगंबरांकडे जाण्याचा सल्ला दिला; त्यामुळे तो मक्केला जाऊन मुहम्मद पैगंबर यांना भेटला. मुहम्मद पैगंबर यांनी  ध्यान लावून अल्लाला राहीब दत्तला मुलगा व्हावा अशी प्रार्थना केली; परंतु याच्या नशिबात मुलगा नाही असे अल्लाने पैगंबर यांना सांगितले. राहीब दत्तला हे कळल्यावर अत्यंत उदास होऊन तो पैगंबर यांच्या घरातून बाहेर पडला.  घराबाहेर पैगंबर यांचे नातू म्हणजे त्यांची मुलगी फतिमा हिची मुले हसन आणि हुसेन खेळत होते.    हुसेनने राहीब दत्तला एवढे दुःखी होण्याचे कारण विचारले.   राहीब दत्तने त्यांची दर्दभरी कहाणी हुसेनला सांगितली.   हुसेन याने राहीब दत्तला सांगितले की मी सांगतो तुला मुलगा होईल. पैगंबर यांनी हा संवाद ऐकला व ते बाहेर येऊन हुसेनला म्हणाले की राहीब दत्तच्या नशिबात मुलगा नाही असे मला अल्लाने सांगितले आहे; तेव्हा तू त्याला खोटे आश्वासन देऊ नकोस. हुसेन म्हणाला, “असे कसे होईल? त्याला मुलगा होईल असे मी म्हणतो.” परत परत मुहम्मद पैगंबर हुसेनला समजावत होते आणि दरवेळी हुसेन त्याला मुलगा होईल असे म्हणत होता असे सात वेळा झाले. त्या वेळी एक देवदूत आला व पैगंबरांना म्हणाला की  हुसेनचे निरागस व निष्पाप मन पाहून अल्लाने  हुसेन यांचे म्हणणे कबूल केले आहे; त्यामुळे राहीब दत्तला मुले होतील. तुम्ही आता त्याच्याशी वाद घालू नये. तुम्ही हुसेनला समजावू नका; कारण अल्लाने त्याची प्रार्थना किंवा मागणी कबूल केली आहे. हुसेनने सात वेळा मुलगा होईल असे म्हटले आहे; तेव्हा राहीब दत्तला सात मुलगे होतील. हुसेनच्या आशीर्वादाने खरोखरच राहीब दत्तला सात  मुलगे झाले. पुढे जेव्हा मुस्लिमांचा  खलिफा होण्यावरून मुहम्मद पैगंबर यांचा जावई म्हणजे फतिमाचा नवरा – जो पैगंबरांचा चुलत भाऊसुद्धा होता – त्याचे वंशज म्हणजे हसन व हुसेन यांचे सुन्नी मुसलमानांबरोबर भांडण होऊन हल्लीच्या इराकमधील करबला या ठिकाणी युद्ध झाले. त्या युद्धावेळी  राहीब दत्त आपल्या सात मुलांना बरोबर घेऊन व इतर सैन्यासह( हे सैनिक मोहयाल समाजातील असावेत.)हुसेनच्या मदतीसाठी करबला येथे आला. करबला येथे ज्या अनेक लढाया झाल्या त्यांत हे सातही  मुलगे मारले गेले. त्यांच्या सैन्यातील शिपायांच्या जिभा कापल्या गेल्या ; ज्याचा उल्लेख या लेखाच्या सुरुवातीला आला आहे. इमाम हुसेन यांनी त्यांचे आपल्यावरील प्रेम बघून राहीब दत्त यांना ‘सुलतान’ ही पदवी दिली व त्यांना हिंदुस्थानात परत जाण्यास सांगितले व जाताना प्रेमाची भेट म्हणून आपला एक केसही दिला; जो श्रीनगरमधील हजरत बाल मशीद किंवा दर्ग्यात ठेवला आहे असे मानतात.

   नंतरच्या युद्धात इमाम हुसेन व हसन व त्यांचे सर्व नातलग मारले गेले. नंतर राहीब दत्त व त्याचे काही सहकारी इराण, अफगाणिस्तान मार्गे परत हिंदुस्थानात म्हणजे पंजाबात परत आले.  वाटेत प्रेषिताला मानणाऱ्या लोकांनीच या ब्राह्मणांना हुसैनी ब्राह्मण म्हणून नावाजले.

 इमाम हुसेनच्या आशीर्वादाने झालेली सात मुले हुसेनला मदत करताना मृत्यू पावली या योगायोगाला काय म्हणावे?  

   माझा मित्र अतुल दत्त याचे वडील इंडियन एअर फोर्समध्ये विंग कमांडर होते व मिग विमानाचे पायलट होते. सन १९६४-६५  च्या सुमारास त्यांना इराकी वैमानिकांना मिग विमानाचे ट्रेनिंग देण्यासाठी बगदादला पाठविले होते. ते सुमारे चार वर्षे इराकमध्ये होते. तेथील अनुभव सांगताना अतुल दत्त यांची  आई म्हणते की ज्या वेळी इराकी लोकांना या कुटुंबाचे नाव दत्त आहे असे  कळत असे त्या वेळी इराकी लोक त्यांना खूप आदराने वागवीत असत व तुम्ही इमाम हुसेन यांना मदत केली असे म्हणत. असो ! माझा मित्र अतुल दत्त हा काही हुसैनी  ब्राह्मण नाही.

 वरील अनुभवाचा निष्कर्ष असा आहे की, काही विशेष घटनांच्या आठवणी समाजाच्या मनात रुतून बसतात. या आठवणी लिखित इतिहासापेक्षा जास्त टिकतात व जास्त परिणामकारक असतात; तेव्हा अशा आठवणींकडे जास्त डोळसपणे पाहिले पाहिजे. 

https://thebookerprizes.com/the-booker-library/authors/intizar-hussain

सुधीर दांडेकर 

Author

Leave a Reply