रद्दीतील रत्ने १ 

एका अस्पृश्याच्या मुंजीची मौज

पालघर येथील सुधीर दांडेकर यांचे लिखाण अंतर्नादच्या   माध्यमातून आपण वाचत आहोत.  दांडेकर यांच्याकडे सुमारे पन्नास वर्षांच्या कालावधीतील वृत्तपत्रांतून किंवा इतर नियतकालिकांमधून प्रसिद्ध झालेल्या वेगवेगळ्या विषयांवरील कात्रणांचा खूप मोठा संग्रह आहे.   यांतील निवडक  कात्रणांवर आधारित ‘रद्दीतील रत्ने’  ही लेखमालिका सुरू करीत आहोत.  आजचे वृत्तपत्र हे उद्याची रद्दी असते असा एक (गैर) समज;  त्याला अनुसरून रद्दी हा  शब्दप्रयोग केला आहे.  महामहोपाध्याय  दत्तो  वामन पोतदार यांनी   याच मथळ्याचा एक लेख पूर्वी लिहिला होता. 

   गोष्ट आहे १९१६  सालची  . सांगली जवळच्या कवलापूर गावात गरीब अस्पृश्य समाजात जन्मलेल्या एका मुलाची.  त्याचे नाव डॉक्टर जयनारायण भोरे.  हे अमेरिकेत उत्तम मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध होते (होते म्हणण्याचे कारण आज ते हयात असण्याची शक्यता नाही) गरीबी व अस्पृश्यतेला कंटाळून हे भोरे कुटुंब नाइलाजाने ख्रिश्चन झाले. ख्रिश्चन झाल्यानेच ते डॉक्टर होऊ शकले. डॉक्टर झाल्यावर त्यांनी गावात प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न केला परंतु अस्पृश्यता आडवी आल्याने प्रॅक्टिस चालली नाही म्हणून त्यांनी १९५८  साली अमेरिकेचा रस्ता धरला तिथेच त्यांचा मेरी नावाच्या अमेरिकन बाईशी विवाह झाला.  ते अमेरिकेत मानसोपचार तज्ज्ञ म्हणून प्रसिद्ध झाले.

  १९७५ साली  ते अमेरिकेतून तब्बल सतरा वर्षांनी आपल्या भावाला भेटण्यासाठी आपल्या गावाला म्हणजे कवलापूरला परत आले.त्या वेळी काय घडले हे त्यांच्याच शब्दात बघूया. 

 मी रात्री दोनच्या च्या सुमारास भावाच्या घरी पोहोचलो.  भावाशी बोलता-बोलता झोपायला पहाट झाली . माणसांच्या गलबल्यामुळे किंवा गोंगाटामुळे मला जाग आली.  या माझ्या भावाच्या घरी गावातील माझे अनेक हितचिंतक गोळा झाले होते.   त्यांत अनेक उच्चवर्णीय हिंदू , गावातील पुढारी, सरपंच,नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक असे अनेक लोक उपस्थित होते.  माझ्या भावाने मला त्यांचा परिचय करून दिला.  जो तो माझ्याशी हस्तांदोलन करू लागला.  मी आश्चर्यचकित झालो.  अस्पृश्याशी स्पर्श करण्यासाठी धडपडणारा जमाव  बघून मी थक्क झालो.भारतातील खेड्यात अजून अस्पृश्यता पाळली जाते हे मी अमेरिकेत ऐकून होतो; परंतु  येथील अनुभव काही वेगळाच होता. एवढ्यात नेहरू विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री मोहिते यांनी तुमच्या आगमनार्थ आम्ही एक चहापानाचा कार्यक्रम ठेवला आहे असे सांगून मला आग्रहाचे निमंत्रण दिले.  माझ्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्य पाहून श्री.कुलकर्णी म्हणाले आम्ही गावातील सर्व ब्राह्मणसुद्धा आपल्याला या समारंभाला येण्याचे आग्रहाचे निमंत्रण देत आहोत. या समारंभात चहा व बिस्किटे घेताना अस्पृश्यतेचा ठसा व मनात खोलवर दडून बसलेली भीती उफाळून वर आली.  माझे हात थरथरू लागले; परंतु सगळ्यांनी मला सांभाळून घेतले. समारंभाच्या शेवटी निरोप घेणार इतक्यात ब्राह्मण समाजातील प्रमुख महादेव मंदिराचे पुरोहित सर्वांना उद्देशून म्हणाले, “आपण गावातील अस्पृश्य बांधवांना आपल्या मंदिरात का बरे प्रवेश देऊ नये?” या सूचनेवर सर्व ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला की दोन दिवसांनी आपण सर्वांनी म्हणजे स्पृश्य व अस्पृश्य अशा सर्वांनी मिळून मंदिरप्रवेश करू. दोन दिवसांनी तो सोनियाचा दिवस उगवला.  एका मोठ्या मिरवणुकीने गावातील दोन्ही समाज महादेवाच्या मंदिरात प्रवेश करते झाले . मंदिराच्या पायरीवरती मी पाऊल ठेवले व उंबरठ्यावर नतमस्तक होऊन आम्ही महादेवाच्या मंदिरात प्रवेश केला.  पुरोहितांनी आमचे सस्मितवदनाने स्वागत केले.  महादेवाचे नामस्मरण करीत सर्वांच्या कपाळावर शेंदूर लावला. माझे अनेक जातबांधव महादेवाचे नामस्मरण करीत जणू काय अलीबाबाच्या गुहेत प्रवेश केल्याप्रमाणे आनंदयुक्त आश्चर्याने मंदिरात प्रवेश करीत होते.  हे दृश्य पाहून मी खरोखरच आश्चर्यचकित झालो.  मला खूप आनंद झाला.ज्या मंदिरात मी लहानपणी आईबरोबर मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या बाहेरून दंडवत घालत होतो त्याच मंदिराचे द्वार माझ्यासाठी व माझ्या जातबांधवांसाठी आज खुले झाले होते.

   वरील प्रसंग संपता संपता देवळातील पुरोहित  यांनी मला दुसरा आश्चर्याचा धक्का दिला. ते मला म्हणाले की आम्ही  उद्या तुमची मुंज करणार आहोत. बरेच वर्षे अमेरिकेत राहिल्याने मला मुंज या शब्दाचा अर्थ कळेना. तेव्हा ते म्हणाले की उद्या आम्ही तुम्हांला ब्राह्मण करणार आहोत. दुसऱ्या दिवशी पहाटे ठरल्याप्रमाणे एक पुरोहित व दोन सुवासिनी माझ्या घरी आल्या . पुरोहितांनी चंदन उटणे व  सुवासिक तेल  सर्वांगाला लावून सचैल स्नान घातले .सुवासिनींनी मला ओवाळले.तेथून आम्ही गावाच्या मध्यवर्ती ठिकाणी जो मांडव घातला होता तेथे मी लेंगा झब्बा टोपी अशा पूर्ण भारतीय पोशाखात पोहोचलो. तेथे अनेक ग्रामस्थांच्या उपस्थितीत पवित्र मंत्रोच्चारांत मुंज लावून मला जानवे घालण्यात आले.एके काळी आम्ही हे मंत्रोच्चार ऐकणे हासुद्धा अपराध होता आणि आज मी तेच मंत्र कानांत प्राण आणून ऐकत होतो. नंतर त्यांनी प्रसाद म्हणून नारळ दिला व अंगावर शाल पांघरली ;त्यानंतर सर्व ब्राह्मण माझ्याभोवती गोळा झाले व म्हणाले, “आता तुम्ही आमच्यापैकी एक झालात.”

 दुसऱ्या दिवशी शाळेत गावाचा सुपुत्र म्हणून माझा सत्कार करण्यात आला.  विविध जातींच्या पुढार्‍यांनी सुंदर फुलांचे हार घालून माझ्याबरोबर हस्तांदोलन केले.  काहींनी आलिंगन दिले.  सत्काराला उत्तर देताना माझ्या डोळ्यांतून अश्रू पडत  होते.  मी सर्वांचे व परमेश्वराचे आभार मानले.  मी म्हणालो, “तुम्ही केवळ माझाच नव्हे; तर माझ्या जातिबांधवांचा स्वीकार केला आहे.  आपणां सर्वांना एकमेकांपासून अलग करणारी ही जातिभेदाची भिंत आज गळून पडली आहे.

  आज माझ्या कुटुंबातील मंडळी माझ्याकडे वरकरणी समाधानाने पाहत होती की मी अजून एक ख्रिश्चन आहे; परंतु मी मात्र होतो अस्पृश्य असणारा ब्राह्मण ख्रिश्चन.

डॉक्टर जयनारायण भोरे यांनी लिहिलेल्या ‘द अनटचेबल ब्राह्मिन ख्रिश्चन’या लेखाचा स्वैर अनुवाद डॉक्टर दिलीप देशमुख यांनी केला व तो ९ जुलै १९९१  सालच्या महाराष्ट्र टाइम्सच्या मैफल या रविवार पुरवणीत प्रसिद्ध झाला.

डॉ जयनारायण  भोरे व सौ मेरी 

Author

Leave a Reply