मोठी माणसे ७ : आनंद यादव 

मला वाटतं, साधारण १९७९ च्या सुमाराला महाराष्ट्र सरकारने नवीन लेखकांच्या पुस्तकांना उत्तेजन मिळावे म्हणून नवलेखक उत्तेजन अनुदान योजना महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळा (म.रा.सा.सं.मं.) तर्फे सुरू केली होती. तेव्हा माझ्या कविता नियतकालिकांतून प्रसिद्ध होऊ लागल्या होत्या .त्याबरोबरच मी मोठ्या कवींच्या कवितांची विडंबनेही करू लागलो होतो . आपणही या योजनेसाठी अर्ज करावा असे मला वाटले . तेव्हा माझ्या कविता प्रसिद्ध करणाऱ्यांपैकी मुख्य होते राजस मासिकाचे संपादक विजय हरि वाडेकर. त्यांनी माझा मनोदय उचलून धरला. आपल्या ‘श्री प्रकाशना’ तर्फे अर्ज करण्याचे कबूल केले. त्यांच्या मते, आचार्य अत्र्यांच्या ‘झेंडूंच्या फुलां’नंतर तशा तोडीची वाङ्मयीन विडंबने करणारा कवी मीच होतो. मी विडंबन कवितांचे पुस्तक पाठवले तर त्याच्या वेगळेपणाने ते परीक्षकांच्या नजरेत भरेल असे त्यांना वाटत होते. मीही उत्साहाने माझ्या विडंबन कवितांना एका गद्य सूत्रात एकत्र गुंफून त्याचा ‘माझा (पण) बेहद्द नाममात्र घोडा’ नावाचा संग्रह तयार केला आणि विचारार्थ पाठवला. काही दिवसांनी मला म.रा.सा.सं.मं. चे पत्र मिळाले. त्यात लिहिले होते की, ‘आपण पाठवलेल्या कविता संग्रहावर ‘माझा (पण) बेहद नाममात्र घोडा’ वर यावर्षी काही निर्णय होऊ शकला नाही .आम्ही हा संग्रह पुढच्या वर्षीच्या निवड समितीकडे पाठवू.’  माझ्या प्रकाशकांनी म्हणजेच विजय हरि वाडेकर यांनी मला आतल्या गोटातील बातमी म्हणून सांगितले की, विडंबन कविता या कविताच नव्हेत असे समितीच्या परीक्षकांचे म्हणणे पडले. हे ऐकून मी चकित झालो . वास्तविक आचार्य अत्रे यांनी मराठी कवितेत विडंबन कवितांचे स्थान पन्नास-साठ वर्षांपूर्वीच आपल्या ‘झेंडूच्या फुलां’नी पक्के करून ठेवले होते . आता यावर कोणाचे मार्गदर्शन घ्यावे असा मला प्रश्न पडला होता. माझा कविमित्र निरंजन उजगरे याने मला तेव्हाच्या पुणे विद्यापीठाचे मराठीचे प्राध्यापक आनंद यादव यांचे मत विचारून पहा असा सल्ला दिला. त्याचा पहिला संग्रह ‘नवे घर’ प्राध्यापक यादवांना खूप आवडला होता. त्यामुळे त्यांच्याशी निरंजनचा संवाद सुरू झाला होता. मी यादवांना भेटलो.  यादवांचे नाव मी ऐकून होतो . यादव उजळ वर्णाचे, उंचनिंच, सडपातळ होते आणि त्यांच्या चेहऱ्यावरच एक प्रकारचे मार्दव दिसत होते. त्यांना मी माझा ‘बेहद्द नाममात्र घोडा’ आणि स्वतंत्र कविता दोन्ही वाचायला दिले. काही दिवसांनी यादवांनी मला त्यांच्या घरी भेटायला बोलवले. ते तेव्हा आपल्या सातारा रोडच्या पल्याड असलेल्या ‘भूमी’ या बंगलीत राहत होते. भूमी बंगला साधा पण टुमदार होता आणि मागे मोकळे माळरान होते. यादव म्हणाले , ‘आपण त्या माळावर फिरायला जाऊ आणि फिरताना बोलू.’ यादवांनी माझा ‘बेहद्द नाममात्र घोडा’  आणि स्वतंत्र कविता दोन्ही लक्षपूर्वक वाचले होते. ते म्हणाले, ‘तुमची विडंबने चांगली आहेत पण तुमची स्वतंत्र कविता ही खणखणीत बंद्या रुपयासारखी आहे ! तुमचा पहिला संग्रह तुमच्या स्वतंत्र कवितांचाच यायला हवा .तुमच्या साहित्य क्षेत्रातील पदार्पणातच तुमच्यावर विडंबन कवी असा शिक्का बसायला नको .’ त्यांचे म्हणणे ऐकून घेऊन मी परत आलो आणि माझ्या प्रकाशकांना भेटलो. त्यांनाही यादवांचे म्हणणे पटले. मी मंडळाला पत्र लिहून मी सादर केलेला माझा विडंबन कवितांचा संग्रह परत मागवला आणि माझ्या स्वतंत्र कविता – ज्या संख्येने फार नव्हत्या – त्याचे हस्तलिखित तयार केले आणि पुढील वर्षीच्या नवलेखक अनुदानासाठी विचारार्थ पाठवून दिले. जसजशा आणखी कविता माझ्याकडून लिहिल्या गेल्या त्याही या संहितेत जोडत राहिलो. पुढच्या वर्षी या माझ्या ‘होड्या’ संग्रहाला अनुदानही मिळाले .माझ्या कवितासंग्रहांची सुरुवात अशी ‘होड्या’ या स्वतंत्र कवितासंग्रहाद्वारे झाली आणि हे यादवांच्या सुयोग्य मार्गदर्शनामुळेच घडून आले. 

यादवांशी परिचय झाल्यानंतर केव्हाही त्यांची भेट झाली की ते माझ्या नियतकालिकात आलेल्या तेव्हाच्या कवितेविषयी बोलत . माझ्या लेखनाकडे असे त्यांचे लक्ष होते .तेव्हा दरवर्षी दिवाळी अंकांतून आलेल्या साहित्यातील उत्कृष्ट साहित्याचे संकलन ‘अक्षर दिवाळी’ या वार्षिक पुस्तकातून येत असे. १९८० च्या अंकात माझी त्या वर्षीच्या ‘हंस’ च्या दिवाळी अंकात आलेली ‘फुलदाणी’ समाविष्ट झाली, तेव्हा संपादक मंडळात आनंद यादवही होते. वास्तविक ही कविता घेताना  ‘हंस’  च्या कविता विभागाच्या संपादिका हेमा अंतरकर काहीशा  साशंक होत्या. पण हीच कविता त्यावर्षीच्या उत्कृष्ट कवितांपैकी एक ठरली. त्या वार्षिक अंकाच्या संपादकीय  निवेदनात ज्या कवींच्या एकाहून अधिक कवितांचा विचार झाला होता त्यांचा उल्लेख होता. त्यात माझेही नाव होते. ‘फुलदाणी’ यादवांना आवडलेली कविता होती.

एकदा आमच्या घराच्या फाटकापाशी माझी बायको उभी होती. ल्युनावरून आलेल्या एका सदृहस्थांनी  फाटकाशी थांबत मी घरी आहे का याची चौकशी केली. तेव्हा मी घरी नव्हतो . माझ्या बायकोने त्यांना त्यांचा परिचय विचारला. ते म्हणाले ,’मी आनंद यादव.’ इतक्या मोठ्या साहित्यिकाला आपल्याकडून ‘ते कोण?’ असे विचारले गेले याची माझ्या बायकोला खूपच लाज वाटली . तिने माफी मागत, त्यांना वर येण्याची विनंती केली पण यादव थांबले नाहीत . मला त्यांना भेटायला यायला सांगून निघून गेले. सातारा रोड वरच्या आपल्या घरातून थेट विद्यापीठापर्यंत ते आपल्या ल्युनावरूनच ये जा करीत असत . मी त्यांना भेटायला गेलो. तेव्हा त्यांनी ते मेहता पब्लिकेशन साठी संपादित करीत असलेल्या ‘शब्द प्रदेश’ या दिवाळी अंकासाठी माझी कविता मागितली. मी तेव्हा हिंदुस्थान अँटिबायोटिक्स या पेनिसिलीनच्या कारखान्यात काम करीत होतो. कारखान्याच्या पार्श्वभूमीवरच्या काही कविता मी लिहिल्या होत्या .‌मी त्याबद्दल काहीसे संकोचतच यादवांना सांगितले. यादवांनी या कवितांचा पूर्ण बंचच त्यांच्याकडे द्यायला सांगितले. तसा मी तो दिला तेव्हा यादवांनी त्या आठही कविता एकत्रितपणे चित्रांसहित ‘शब्द प्रदेश’ मध्ये प्रसिद्ध केल्या.

त्यानंतरही केव्हाही कुठेही भेटले की यादव माझ्या लेखनाची चौकशी करत. बरोबर असलेल्या इतरांनाही माझ्या कवितांचे कौतुक सांगत.  ‘अंतर्नाद’ मध्ये मी कविता विषयक लेख लिहू लागलो तेही त्यांना आवडत असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले होते. यादवांचे स्वतःचे लेखन तेव्हा जोमात होते. त्यांची सुरुवात कविता लेखनापासूनच झाली होती आणि त्यांचा पहिलाच ‘हिरवे जग’ संग्रह पु ल देशपांडे यांच्यासारख्या जाणकाराने नावाजला होता . त्यानंतर त्यांच्या कथा कादंबरी लेखनाने जोर पकडला. त्याबरोबर त्यांनी ‘स्पर्शकमळे’ सारखे ललित गद्यही लिहिले. तेव्हाही ग्रामीण कथा मोठ्या प्रमाणात लिहिल्या जात होत्या; पण त्यातल्या अधिकांश किस्सेवजा असत. त्या गर्दीत मूलभूत जीवन प्रश्नांना भिडणारे यादवांचे लेखन उठून दिसू लागले. मानवी जीवनातील आदिम कामभावनेचाही त्यांनी शोध घेतला.  त्यांच्या कथा कादंबऱ्यांत गावातल्या माणसांइतकाच शेतकऱ्यांना प्रिय असलेला त्याच्या जनावरांचा ‘गोतावळा’ ही महत्त्वाचे स्थान मिळवून असे. माऊली सारख्या मांजरी वरच्या कादंबरीत तर आदिम कामप्रेरणांचा शोध होता. 

स्वतःच्याच पूर्वजीवनाकडे बघून त्यांनी आत्मचरित्रात्मक कादंबरी हा नवा साहित्यप्रकार घडवला. त्यातल्या ‘झोंबी’ला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला . कथालेखनातही यादवांनी अनेक प्रयोग केले .कथेच्या तुकड्यांचा क्रम बदला की तिचा अर्थही कसा बदलतो हे त्यांनी ‘सत्यकथे’ मध्ये एका कथेद्वारे दाखवले होते . ५ कवितासंग्रह,  १० कथासंग्रह, ४ ललितलेख संग्रह, ७ कादंबर्या, ४ आत्मचरित्रात्मक कादंबर्या, १ वगनाट्य असे विपुल साहित्य त्यांनी लिहिले ज्यांना देशभरातील २४ विविध पुरस्कार मिळाले. १० महत्वपूर्ण ग्रंथांचे त्यांनी संपादन केले.  ते एकाच वेळी सर्जनशील साहित्यिकही होते आणि चिकित्सक वाङ्मयविमर्शकही होते. पण त्यांनी केवळ स्वतःच्याच लेखनाकडे लक्ष दिले असे नाही. खेड्यातून येणाऱ्या नव्या लेखकांना ते वाट दाखवीत राहिले. ‘आपल्याच भाषेत लिहा पण लिहाल ते उत्तम साहित्य असलेच पाहिजे’ असा त्यांचा आग्रह होता. मराठी साहित्यात दलित साहित्याची जशी चळवळ उभी राहिली तशी यादवांनी ग्रामीण साहित्याची चळवळच  उभारली. पण दलित साहित्य प्रस्थापित साहित्य आणि  विशेषतः  समीक्षेच्या विरोधात उभे होते . यादवांची चळवळ विद्रोहाची नव्हती , समरसतेची होती. ‘यादवांच्या ग्रामीण साहित्य चळवळीमुळेच मराठी साहित्यात यादवकाल आला’ असे गौरवोद्गार प्राध्यापक गं.ना. जोगळेकर यांनी काढले होते.

त्यांनी वाद घातले नाहीत असे नाही. ना.सि. फडके स्वतःला मराठीतील लघुनिबंधाचे जनक म्हणवीत असत. त्याला यादवांनी साधार हरकत घेतली होती. व्यंकटेश माडगूळकरांनी यादवांना सुरुवातीच्या काळात आकाशवाणीवर घेतले होते पण माडगूळकरांच्या ‘सत्तांतर’ कादंबरीवर यादवांनी वाङ्मय चौर्याचा आरोप केला होता.

ग्रामीण साहित्य संमेलने, समरसता संमेलन, विभागीय संमेलने अशा असंख्य संमेलनांचे अध्यक्षपद यादवांनी भूषवले.  ते पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पत्रिकेचे संपादक आणि नंतर परिषदेचे उपाध्यक्षही झाले. मराठी साहित्यिकास मिळणारा सर्वोच्च सन्मान अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांच्याकडे बिनविरोध चालून आले.  यादवांनी ‘संतसूर्य तुकाराम’ ही कादंबरी लिहिली होती. संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम ही  त्यांची श्रद्धास्थाने होती . ‘संतसूर्य तुकाराम’ या कादंबरीत त्यांनी संत तुकारामांचे एक माणूस म्हणून चित्रण केले आहे. त्यात चमत्कारांना फाटा दिला आहे. असे चित्रण तेव्हाच्या वारकरी संप्रदायाच्या काही धुरिणांना मानवले नाही. त्यांनी या कादंबरीवर आणि खुद्द यादव यांच्यावर तीव्र आक्षेप घेतले. यादव अध्यक्ष असतील तर आम्ही हे संमेलन होऊच देणार नाही अशी भूमिका घेतली. यादवांनी मार्ग काढण्यासाठी माफी मागितली, कादंबरी मागे घेतली, संत तुकाराम हे मलाही संत आणि कवी म्हणून आदर्श वाटतात हेही सांगितले पण कशाचाच काही उपयोग झाला नाही. शेवटी यादवांना संमेलनाध्यक्ष पदापासून वंचित राहावे लागले आणि महाबळेश्वर चे संमेलन अध्यक्षाविनाच पार पडले. यादवांवर अब्रू नुकसानीचा खटलाही भरला गेला आणि अनेक काळ त्यांना जामीनावर राहावे लागले. यादवांसारख्या प्रतिभावंत साहित्यिकावर अशी वेळ यावी हे मराठी साहित्यसृष्टीसाठीच लांच्छनास्पद गोष्ट झाली असे म्हणायला हवे.

  यादवांची प्रकृतीही त्यांना साथ देत नव्हती. २०१३ साली त्यांनी लेखन निवृत्ती घेण्याचाही मानस व्यक्त केला होता आणि २०१६ साली त्यांनी जगाचाच निरोप घेतला.

माझ्या विडंबनकवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्ताने मी १९८४ च्या आसपास विद्याधर पुंडलिकांना वरचेवर भेटत असे . अशाच एका भेटीत अनौपचारिक गप्पांत यादवांचा विषय निघाला होता. ‘मी यादवां इतका sophisticated (सोफिस्टिकेटेड) ग्रामीण लेखक दुसरा कोणी पाहिला नाही’ असे ते म्हणाले. हे विशेषण आजच्या साहित्यिकांना कृत्रिमतेचे निदर्शक वाटेल ; पण त्याचा शब्दशः अर्थ सुसंस्कृत, उच्च अभिरुची आणि वर्तन असलेला,जटिल सामाजिक समस्यांची जाणअसलेला, बुद्धिमान, व्यासंगी, सुजाण असा आहे. यादव त्या अर्थाने सुजाण साहित्यिक, समीक्षक आणि माणूस होते !

Author

Leave a Reply