‘मनी आणावे ते ते होते
कृपा केलिया रघुनाथे प्रचिती येते’
समर्थ रामदासांचे हे शब्द ग. दि. माडगूळकरांच्या लेखन-प्रतिभेला तंतोतंत लागू पडतात. त्यांच्या गीतांच्या झोक्यांनी गाव-खेड्यातले चिमुकले डोळे झोपी जातात. ‘गोरी गोरी पान’, ‘नाच रे मोरा’ अशी बालगीतं शाळाशाळांची स्नेहसंमेलनं गाजवतात. ‘गीत-रामायण’नं ओसऱ्या राममय होऊन जातात. चित्रपटगीतांनी मराठी वाद्यवृंदांना ओळख मिळते. लावण्यांनी जत्रेच्या रात्री रंगतात. एके काळी कथा-पटकथा-संवाद-गीतं – ग. दि. माडगूळकर या शब्दांना सोन्याचं मोल होतं; तसंच त्यांच्या कथा-कथनाच्या कार्यक्रमांत शेकडो श्रोते तल्लीन होऊन जात असत. असं हे अष्टपैलू व्यक्तिमत्व!
परंतु गदिमांचा उमेदवारीचा काळ खडतरच होता. चित्रपटसृष्टीच्या बंद दरवाज्यासमोर ताटकळणाऱ्या अनेकांपैकी ते एक होते. आचार्य अत्र्यांमुळे हे दरवाजे थोडे किलकिले झाले. ‘ब्रम्हचारी’ चित्रपटात एक्स्ट्रातले एक म्हणून तोंडाला प्रथम रंग लागला. पुढे अनेक चित्रपटांतून चरित्र-अभिनेते म्हणून त्यांची कारकीर्द घडली.
‘पहिला पाळणा’ चित्रपटाच्या पडद्यावर प्रथमच गीतकार ग. दि. माडगूळकर अशी लफ्फेदार अक्षरं उमटली. ‘जय मल्हार’ चित्रपटातल्या काहीशा रासवट गाण्यांनी त्यांना थोडीफार ओळख मिळाली. ‘छबीदार नार गुलजार’, ‘साझ्या व्हटाचं डाळिंब फुटलं’ अशा गाण्यांचं वर्णन ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक बाबूराव पेंढारकरांनी ‘एक्स्ट्रा स्ट्राँग गाणी’ असं केलं होतं. याच काळातला आणखी एक चित्रपट म्हणजे ‘संत जनाबाई’. मराठी बोलपटांची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या, भारतीय चित्रपटसृष्टीत इतिहास निर्माण करणाऱ्या ‘प्रभात’ चित्रसंस्थेच्या अखेरच्या काळातला हा चित्रपट. ‘प्रभात’ युगाचा अस्त आणि ‘गदिमा’ युगाचा उदय! या विधिलिखीताला काय म्हणावं!
‘प्रभात समयो पातला
आता जाग बा विठ्ठला…’
हे गीत लिहित असताना गदिमांना स्वतःच्या भविष्याची चाहूल लागली होती का? त्यानंतर ३०-३५ वर्षं त्यांनी आपल्या लेखन सामर्थ्यावर मराठी चित्रपटाचं आभाळ तोलून धरलं.
व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘लोकशाहीर राम जोशी’ चित्रपटानं त्यांच्या टोलेजंग कारकीर्दीचा पाया घातला. हा चित्रपट इतका गाजला, की ‘‘रामजोशी’च्या ग. दि. माडगूळकरांचा पुढील चित्रपट ‘वंदे मातरम’’ अशी जाहीरात झाली. नायक-नायिका पु. ल. देशपांडे-सुनीता देशपांडे, दिग्दर्शक राम गबाले, संगीतकार सुधीर फडके आणि गीतकार अर्थातच गदिमा. असे दिग्गज कलाकार एकत्र येवूनही चित्रपट चालला नाही. परंतु गाणी लोकप्रिय झाली.
‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वंदे मातरम्….
गाऊ त्यांच्या आरतीचे
गीत वंदे मातरम…’
माउलीच्या मुक्ततेचा हा यज्ञ होता. या यज्ञात लाखो वीरांनी आपल्या जीवनाची आहुती दिली. ते हुतात्मे देव झाले. त्यांच्या आरतीचं हे गीत राष्ट्रगीतासारखं गायलं जायचं.
पुढे १९५३ साली प्रदर्शित झालेला गदिमा-पु.ल. या जोडीचा चित्रपट म्हणजे ‘गुळाचा गणपती’. त्यात या दोघांबरोबरच चित्रपटसृष्टीशी आणखी एक नाव जोडलं गेलं, पं. भीमसेन जोशी. या तिघांच्या एकत्रित प्रतिभेचा आविष्कार म्हणजे ‘इंद्रायणी काठी’ हा अभंग. पु.लंना जेव्हा ‘गदिमा प्रतिष्ठान’चा ‘गदिमा’ पुरस्कार प्रदान झाला, त्या सोहळ्यात पु.ल. म्हणाले होते, “गदिमांच्या नावाचा पुरस्कार मला या आधीच मिळाला आहे. ‘इंद्रायणी काठी’ हा अभंग माडगूळकरांनी चाल लावण्यासाठी मला दिला, तेव्हाच हा पुरस्कार मला मिळाला होता.” सभागृहातील अनेकांप्रमाणे या प्रसंगाची मीही एक साक्षीदार आहे. कारण त्या पुरस्कार प्रदान सोहळ्याचं सूत्रसंचालन मी केलं होतं. तेव्हा गदिमांच्या अनेक आठवणी पु.लं.नी सांगितल्या होत्या. खचाखच भरलेल्या सभागृहात टाळ्यांचा अक्षरशः पाऊस पडत होता. ते सारं हा लेख लिहित असताना आठवलं. या अभंगात ‘उजेडी राहिले उजेड होऊन…’ अशी एक ओळ आहे. “ही ओळ गदिमांच्या आवडत्या तेजतत्वाशी नातं सांगणारी आहे” असं कवी गंगाधर महांबरे यांनी लिहिलं आहे.
‘प्रभात समयो’, ‘इंद्रायणी काठी’, ‘विठ्ठला तू वेडा कुंभार’, ‘तुझे रूप चित्ती राहो’, ‘एकवार पंखावरूनी’…. अशी गाणी नुसती आठवून पहा. ही केवळ गाणी नव्हेत. त्यात माडगुळ्यातले, मराठी मातीतले संस्कार आहेत. अध्यात्माचा सत्वांश त्यांच्या शब्दांतून ओसंडून झरत असे. गदिमांनीच लिहिलं आहे
‘नजिक नाझरे श्रीधर कवीचे, नदी माणगंगा
नित्य नांदते खेडे माझे, धरूनि संतगंगा…’
तरीही श्रमांच्या क्षमतेवर त्यांचा विश्वास होता.
‘नसे राऊळी वा नसे मंदिरी
जिथे राबती हात तेथे हरि…’
गदिमांच्या एकूण गीत-रचनेमध्ये लावण्यांना वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे. अस्सल मराठी वळणाच्या, रसरशीत शृंगाराचं दर्शन घडवणाऱ्या, तरीही उत्तान किंवा बिभत्सपणाचा लवलेशही नसलेल्या लावण्या आहेत. कदाचित् म्हणूनच अनेकजण त्यांना शाहिरी परंपरेतील आठवा शाहीर मानतात. ‘बुगडी माझी’, ‘फड सांभाळ’ अशा लावण्या आजही तमाशाच्या फडावर लोकप्रिय आहेत.
गदिमा अनेक संगीतकारांचे स्वरमित्र झाले ;परंतु गदिमा आणि सुधीर फडके ही जोडी म्हणजे मराठी चित्रसृष्टीच्या एका कालखंडाचे अनभिषिक्त सम्राट! परंतु या दोघांच्या एकत्रित प्रतिभेचं कैलासलेणं म्हणजे गीत-रामायण. गदिमांच्या एकूणच गीत-प्रतिभेच्या माथ्यावरचा जणू चंदनाचा टिळा!
गदिमांची भावगीतं असू देत, चित्रपटगीतं, भक्तिगीतं किंवा लावण्या महाराष्ट्रात वर्षानुवर्षं गायली जात आहेत, ऐकली जात आहेत. पोटापाण्यासाठी केलेल्या लेखनातूनही नवं-निर्मितीचा झरा, वाटावळणं घेत वहात राहिला, हे महत्वाचं.
‘त्या तिथे, पलिकडे, तिकडे
माझिया प्रियेचे झोपडे।
गवत उंच दाट दाट
वळत जाय पायवाट
वळणावर अंब्याचे
झाड एक वाकडे…’
किती साधे शब्द! पण आपल्या डोळ्यासमोर एक सुंदर landscape उभं रहातं. ‘पोटापुरता पसा पहिजे’, ‘एक धागा सुखाचा’, ‘दिवसामागून दिवस’, ‘करू देत शृंगार’, ‘सावळाच रंग तुझा’, ‘धुंद येथ मी’… अशा शताधिक गाण्यांनी आपलं आयुष्य सुरेल, संपन्न केलं आहे.
मराठी चित्रधंद्यात एक काळ असा होता, की गदिमांना क्षणाचीही फुरसत नव्हती. सकाळ-दुपार-रात्र लेखन चालू असे. तीन पटकथा, तीन निर्माते आणि तीन दिग्दर्शक. स्विच ‘ऑन-ऑफ’ करावं इतक्या सहजतेने ते एका विषयातून दुसऱ्या विषयात जात असत. गदिमा त्याकाळी ‘किंग मेकर’ होते. सकाळी राजाभाऊ परांजप्यांसाठी, दुपारी दत्ता धर्माधिकारींसाठी ;तर रात्री राम गबालेंसाठी. गदिमांचं लेखन ही चित्रपटाची मूळ वीट असे. ऊनपाऊस, लाखाची गोष्ट, वरदक्षिणा, पेडगावचे शहाणे… चित्रपटामागून चित्रपट येत राहिले. केवळ मराठीच नव्हे, तर हिंदीतही त्यांनी २२ पटकथा लिहिल्या होत्या. व्ही. शांतारामांसारखे निर्माते-दिग्दर्शक मिळाल्यावर ‘दो आँखे बारह हात’ सारख्या अजरामर कलाकृतीचा जन्म झाला.
अशा ह्या लेखन प्रवासात दोन वेळा साहित्य संमेलनाचे आणि एकदा नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष झाले. साहित्य संसार सांभाळत असताना लोकनेते यशवंतराव चव्हाण यांच्या प्रोत्साहनानं राजकारणाची धुळवडही खेळले, आमदार झाले. निवडणुकीसाठी प्रचारगीतं लिहिली. एका निवडणुकीपूर्वी साम्यवादी नेते श्रीपाद डांगे ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’ला येऊन मिळाले होते. तेव्हा गदिमांनी लिहिलं –
‘आता काही समिती वाचत नाही
डांग्या खोकला झाला ग बाई…’
समितीच्या वतीनं आचार्य अत्र्यांनी पलटवार केला –
‘कऱ्हाडी दादल्यानं कान फुंकले
अन्
माडगुळी रंगूचं पोट
दुखले …’
जेमतेम ५८ वर्षांचं आयुष्य गदिमांना मिळालं. तेही ते समरसून जगले. त्यांनी जे जे केलं ते पराकोटीच्या तन्मयतेनं केलं. मैत्री केली, भक्ती केली, वादविवाद, कधी भांडणं… सारं अटीतटीनं केलं. त्यांच्या कोणत्याही नाते-संबंधात राखीव भाग नसायचा. असे गुण-दोषांनी युक्त खरेखुरे ‘माणूस’ होते. ‘एक तरी ओवी अनुभवावी’ या वारीतले वारकरी होते.
