क्रिकेट आणि चित्रपट या भारताला जोडून ठेवणाऱ्या दोन गोष्टी आहेत. चित्रपट समजण्यासाठी प्रत्येक वेळी भाषा ओळखीची असावी लागतेच असे नाही तर अनेकदा चित्रभाषा सगळी बंधने तोडून माणसांना जोडतात. दक्षिण भारतीय असे वर्णन केले जाते तेव्हा या दक्षिण भारतात पाच वेगवेगळी राज्ये आहेत आणि त्यांच्या चार भाषा, वेगळी संस्कृती आहे याचा थोडासा विसरच पडतो. कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ. खासकरून दाक्षिणात्य चित्रपट असे म्हणताना सब घोडे बारा टक्के असेच होऊन जाते. मारधाडपट, काहीही संबंध नसणारे भडक चित्रपट, नायकांना देवत्व देणारे चित्रपट, नायिकांना केवळ शोभेची बाहुली दाखवणारे चित्रपट, प्रचंड हिंसा दाखवणारे चित्रपट अशी सगळे लेबले या दाक्षिणात्य चित्रपटांना आजही लावली जातात. मात्र गेल्या काही वर्षात ही सगळी समीकरणे खूप प्रमाणात बदलली आहेत. आजचा लेख त्या सगळ्या बदलांबद्दल नाही, तर कन्नड चित्रपटसृष्टीबद्दल! केजीएफ, कांतारा या हिंदीतही गाजलेल्या चित्रपटांमुळे कन्नड चित्रपटसृष्टी, कन्नड अभिनेते अचानक चर्चेत आले. मात्र कन्नड चित्रपटसृष्टी ही जवळपास नव्वद वर्षे जुनी आहे. पहिला कन्नड चित्रपट ‘सती सुलोचना’ १९३४ मध्ये आला होता. पण सिंगनल्लरू पुट्टूस्वामी मुथुराज म्हणजेच डॉ. राजकुमार यांच्या रुपात कन्नड चित्रपटसृष्टीला त्यांचा सुपरस्टार १९५४ मध्ये मिळाला आणि कन्नड चित्रपटांची दुनिया कायमची बदलली.
डॉ राजकुमार यांनी पहिल्यांदा १९४२ साली बाल कलाकार म्हणून भक्त प्रह्लाद मध्ये काम केले होते, त्यानंतर १९५२ मध्ये श्रीनिवासा कल्याणा मध्ये जरी भूमिका केली असली तरीही त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली ती बेदरा कन्नप्पा या १९५४ साली आलेल्या चित्रपटामुळे. त्यानंतर त्यांनी दोनशेहून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. राजकुमार यांच्यावर कन्नड रसिकांनी जिवापाड प्रेम केले, त्याचे महत्वाचे कारण होते राजकुमार यांचे व्यक्तिमत्व. त्यांनी त्यांच्या पूर्ण कारकिर्दीत एकदाही पडद्यावर आणि पडद्यामागेही धूम्रपान किंवा मद्यपान केले नाही. आपल्या भूमिकेत कोणतेही अश्लील शब्द असणार नाहीत याची ते काळजी घ्यायचे. शेवटच्या श्वासापर्यंत ते रोज तासभर कर्नाटीक संगीताचा तासभर रियाज ,आणि योगासने देखील करायचे. राजकुमार यांचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे ते प्रचंड कन्नड अभिमानी होते. त्यामुळेच त्यांनी कधीच कन्नड चित्रपट सोडून इतर भाषांमध्ये काम केले नाही. पृथ्वीराज कपूर यांना त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा होती, मात्र मी हिंदीत काम करणार नाही, तुम्हीच कन्नड चित्रपटात काम करा असा राजकुमार यांनी निरोप पाठवल्यावर पृथ्वीराज कपूर यांनी खरोखरीच १९७१ साली साक्षात्कार या चित्रपटात राजकुमार यांच्या वडिलांची भूमिका केली. १९६१ साली कर्नाटकात पडलेल्या दुष्काळावेळी त्यांनी मदतनिधी गोळा करून दिला होता. राजकुमार यांच्या नावावर अजून एका आगळ्या विक्रमाची नोंद आहे, त्यांना अभिनया बरोबरच गायकासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. राज कुमार त्यांच्या परिवारासह चित्रपट संगीताचे लाईव्ह कार्यक्रम गावोगावी करायचे. त्या प्रत्येक वेळी रसिकांना अभिमानी देवरगळू म्हणजे देवासमान चाहते म्हणायचे, त्यामुळेच की काय त्यांच्या चाहत्यांनी केवळ त्यांच्यावरच नव्हे तर पूर्ण त्यांच्या परिवारावर तेव्हढेच निरपेक्ष प्रेम केले आणि अजूनही करत आहेत. काही दिवसांपूर्वीच राजकुमार यांच्या नातवाचा चित्रपट आला. राजकुमार यांनी गाजावाजा न करता अनेक सामाजिक संस्थांना मदत केलीच पण त्याचबरोबर स्वतः नेत्रदान करुन आदर्श ठेवला. कदाचित त्यांची जनमानसातील प्रतिमा लक्षात घेऊनच विरप्पनने त्यांचे अपहरण केले असावे.
१९७० च्या दशकापर्यंत कन्नड चित्रपट हा मुख्यतः मैसूर भागातच तयार केला जायचा. १९८० च्या दशकात हे केंद्र बेंगलोरकडे सरकले . त्यामुळेच बहुदा जुन्या कन्नड चित्रपटांमध्ये मैसूर कन्नड भाषा, तेथील संस्कृती यांचेच जास्त चित्रण बघायला मिळते. राजकुमार यांच्या तोडीचे नाही मात्र त्यांच्या खालोखाल ज्यांचे नाव घेतले जाते असे दोन इतर महत्वाचे अभिनेते म्हणजे विष्णु वर्धन आणि अंबरीष. डॉ. राजकुमार, विष्णु वर्धन आणि अंबरीष यांना कन्नड चित्रपटातले त्रिमूर्ति म्हणून ओळखले जाते. हे तिघेही आता हयात नाहीत, मात्र हे गेल्यानंतर अनेक चाहत्यांनी घरातला माणूस गेल्यासारखे सूतक पाळले होते, आणि दिवस केले होते. आजही अनेक चाहते त्यांच्या पुण्यतिथीला प्रसादाचे ताट ठेवतात. अशीच काहीशी लोकप्रियता राजकुमार यांच्या धाकट्या मुलाला म्हणजे पुनीत राजकुमार याला मिळाली. त्याचे बाल कलाकार म्हणून आधी कौतुक झाले आणि त्यानंतर त्याने अभिनेता म्हणूनही प्रसिद्धी मिळवली. वयाच्या अवघ्या ४६ व्या वर्षी त्याचे हृदयविकाराने निधन झाले, त्यामुळे त्याचे चाहते अजूनच जास्त हळहळले. २०२१ मध्ये पुनीत गेला, मात्र तो गेल्यावरही त्याच्या वाढदिवशी, पुण्यतिथीला त्याचे चाहते त्याच्या समाधीला भेट देतात, त्या दिवशी जागोजागी त्याच्या प्रतिमेला हार घालून अन्नदान केले जाते.
अशीच लोकप्रियता मिळालेला दुसरा अभिनेता, ज्याच्या निधनाच्या जवळपास २५ वर्षानंतरही अनेक रीक्षांच्यावर विराजमान असलेला अतिशय देखणा आणि तितकाच हुशार अभिनेता म्हणजे शंकर नाग. शंकर नाग हा तशा अर्थाने मराठीने प्रकाशात आणलेला हिरा आहे. अनंत नाग, शंकर नाग हे कन्नडमध्ये काम करण्याच्या आधी मराठी नाट्य सृष्टीत कार्यरत होते. २२ जून १८९७ या चित्रपटाचे सहलेखन शंकर नाग यांनी केले होते आणि सर्वसाक्षी या चित्रपटात भूमिका देखील केली होती. शंकर नाग यांना त्यांच्या वंदोदू कालनल्ली या पहिल्याच कन्नड चित्रपटातील अभिनयासाठी पुरस्कार मिळाला होता. त्यांनी दहाहून अधिक कन्नड चित्रपटांचे दिग्दर्शन केले, पन्नासहून जास्त चित्रपटात अभिनय केला. तरीही कन्नड रसिकांमध्ये ऑटो राजा मुळे त्यांची खास प्रतिमा आजही ताजी आहे. तर कर्नाटकाबाहेरील चित्ररसिकांसाठी शंकर नाग यांची ओळख पटवली जाते ती मालगुडी डेज या मालिकेतून. अवघ्या ३६ व्या वर्षी त्यांचे अपघाती निधन झाले, पण त्यांनी काही काळासाठी तरी कन्नड चित्रसृष्टीत एक वेगळी हवा तयार केली होती. व्व्यावसायिक आणि प्रायोगिक चित्रपटांची सांगड घालण्याचा ते प्रयत्न करत होते. कदाचित ते अजून काही वर्ष जगले असते तर कन्नड चित्रपटांची वाटचाल वेगळी झाली असती.
कन्नड चित्रपट सृष्टीने खऱ्या अर्थाने कात टाकली ती २००० नंतर. अनेक नवीन कलाकार या इंडस्ट्रीत आले. केवळ मैसूर बेंगलोर भोवती घुटमळणारे सँडलवूड आता कर्नाटकातील इतर भागांना देखील सामावून घेण्याचा प्रयत्न करत होते. चित्रपटात विषयांचे वैविध्य येत होते. त्याच बरोबर उडुपी, मेंगलोरकडील तुळूमिश्रित कन्नड, गुलबर्गा भागातील तेलगू मराठी प्रभावाची कन्नड, अशा भागांची कथा सांगणारे चित्रपट फक्त त्या त्या भागातच नव्हे तर कर्नाटकात,OTT वर देखील प्रसिद्ध होऊ लागल्याने कन्नड चित्रपटांमधील साचलेपण कमी व्हायला मदत झाली. बेंगलोर शहर सुध्दा कात टाकत असल्याने केवळ कर्नाटकाच्या इतर भागातील स्थलांतर येथे झाले नाही तर तमिळ, तेलगू, मल्याळम भाषिकसुद्धा या शहरात येत आहेत व त्याचा प्रभाव इथल्या चित्रपट व्यवसायावर झाला आहे.
हिंदी चित्रपट सृष्टीत जम बसण्याआधी अनिल कपूर यांनी मणीरत्नम यांच्या पल्लवी अनु पल्लवी या कन्नड चित्रपटात काम केले होते. मणी रत्नम यांचा तो पहिलाच चित्रपट होता. तो फारसा यशस्वी ठरला नाही. त्या दोघांचा तो पहिला आणि शेवटचा कन्नड चित्रपट झाला. जुही चावला ने देखील कयामत से कयामत मध्ये अभिनय करण्याआधी प्रेमलोका या कन्नड चित्रपटात काम केले होते. अक्षय कुमार याने देखील १९९३ साली विष्णु विजया या चित्रपटात काम केले होते. २००७ साली आलेल्या मुंगारू मळे या चित्रपटानंतर सोनू निगम हा इथल्या अनेक अभिनेत्यांचा आवाज बनला आहे.
कन्नड प्रायोगिक चित्रपटसुद्धा आजही त्यांच्या उत्तम कथा, संवाद, अभिनयसाठी ओळखले जातात. गिरीश कर्नाड, बी व्ही कारंथ, गिरीश कासारवल्ली यांचे आशयघन चित्रपट भारतात विदेशात आजही आवडीने बघितले जातात. आताच्या अनेक कन्नड चित्रपटांमध्ये मधला मार्ग धरत करमणूक करता करता वेगळे प्रयोग देखील केले जातात. गेल्या दशक भरात आलेल्या यु टर्न , वंद मुट्टेय कथे या चित्रपटांचे हिंदी रिमेक देखील आलेले आहेत. कांतारा, केजीएफने रक्षित शेट्टी, यश यांना बॉलीवूड अभिनेत्यांच्या मांदियाळीत बसवले आहे.
कन्नड चित्रपट सृष्टीला ‘सँडलवूड’ म्हणून ओळखले जाते. एका लेखात त्याबद्दल सारे काही लिहिणे शक्य नाही. हा लेख म्हणजे एक धावती ओळख असे म्हणता येईल. चंदनस्पर्श झालेली ही चित्रपट सृष्टी तमिळ, मल्याळम, तेलगू चित्रपट सृष्टि पेक्षा अनेक प्रकारे वेगळी आहे. त्याचे वेगळेपण समजून घ्यायचे असेल तर आधी राजकुमार नावाचा टिळा लावावा लागतो आणि मग मारायची बुडी या आगळ्या वेगळ्या जगात, न जाणो तुम्हाला ती आवडेल ही.. !!
(ही एक त्रयस्थाच्या नजरेतून केलेली मुशाफिरी आहे. शहर , माणसे समजून घेताना मी सामान्य व्यक्ति म्हणून केलेला हा प्रयत्न आहे.)
अनंत नाग
कन्नड चित्रपट जाहिरातीतील अनिल कपूर
सुपरस्टार राजकुमार
विष्णूवर्धन

